अंतरंग एका एनआरआयचं

शिल्पा केळकर-उपाध्ये

आपला देश सोडून जाणे, हा निर्णय जरी अगदी स्वखुशीने घेतला असला, तरी आपले सोडून परक्या भूमीत आपले शोधणे ह्या दिव्यातून जाताना मनाची काय अवस्था होते हे सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. खोलवर झालेले संस्कार सतत मुळाशी धाव घेत राहतात, प्रत्येक गोष्टीत कित्येक वर्षे फक्त भारतातलेच ओळखीचे संदर्भ शोधले आणि जोडले जातात. परक्या भूमीत रूजून आणि आपले भारतीयत्व जपून, तिथल्या स्थानिक लोकांना आपलेसे करू शकणार्‍या या भारतीय मनाच्या लवचिकतेची ओळख करून देणारे हे काही अनुभव आहेत आणि हेच ह्या लेखांचे उद्दिष्ट.
*************************************************************************************************************

5-1

‘परदेशात जाणं’ यामागचं कुतुहलाचं वलय आता कमी होऊ लागलंय. हौशी प्रवासी म्हणून आता लोक सर्रास परदेश प्रवास करू लागलेत. ट्रॅव्हलर कंपनींतर्फे आयोजित केलेल्या ह्या प्रवासात त्या देशामधली प्रेक्षणीय स्थळे पाहून होतात, पण तिथल्या अंतरंगाची ओळख फारच कमी होते. तिथली संस्कृती, तिथले जगण्या-राहण्याचे रोजचे संघर्ष याचा कुठलाच वारा प्रवासी लोकांना लागण्याची शक्यता नसते. भारत सोडून त्या देशात कायमचे वास्तव्य केलेल्या भारतीयांशीही त्यांचा संपर्क येत नाही आणि त्या देशाशी ओळख होते, पण ती तोंडदेखली राहते.
तसेच हल्ली प्रत्येक कुटुंबातून परदेशस्थ नातेवाइकांची संख्याही वाढू लागली आहे.त्यांच्या वर्ष दोन वर्षांतून होणार्‍या भारतभेटी आणि त्यांनी आणलेल्या भेटवस्तू,त्यांच्याशी होणार्‍या गप्पा. किंवा त्यांच्याकडे सुट्टीत दिली जाणारी धावती भेट. यातूनही तिथल्या आयुष्याच्या वरवरच्या स्तराशीच ओळख होते. कितीही जवळचा नातेवाईक असला तरी तो फक्त मामे-चुलत-आत्ते भाऊ-बहीण याच ओळखीचा राहतो. तो परदेशात काय नोकरी करतो आणि त्याची कार कुठली ही आणि इतपतच माहिती बर्‍याचजणांना असते, पण त्याच्या मनात खोलवर चाललेल्या उलघालीचा पत्ता या छोट्या भेटीतून क्वचितच लागतो.
अनेक भारतीय शिकायला, कुतूहलापोटी, आवडीने, कधी कंपनीने पाठवले म्हणून किंवा निव्वळ पैसे कमवायच्या उद्देशाने भारताबाहेर पाश्‍चिमात्य देशातून स्थलांतरित होत आहेत. त्यातल्या त्यात अमेरिका या देशाचा त्यात पहिल्या पाचात वरचा नंबर. 1960 सालात खूपच मोठ्या प्रमाणात भारतीय अमेरिकेत आले. नेमकी त्याच सुमारास अमेरिकेत आर्थिक मंदी आल्याने या पिढीने सर्व प्रकारच्या हालअपेष्टांना तोंड दिले. परदेशात जाणे आणि तिथले आयुष्य हे सुख आणि चैनीचे असते या मूलभूत कल्पनेला धक्का लावणारा तो काळ होता. आता ती पिढी या मातीत रूजली आणि आता इथली झाली आहे. शिवाय आता ते वयाने ज्येष्ठ नागरिक या वर्गात मोडू लागले आहेत. त्यांची मुले इथेच जन्मली असल्याने ती इथल्या भूमीत रुजूनच वाढताहेत. त्यामुळे भारतीयत्वाचे चित्रदेखील बदलू लागले आहे. समाज जास्त वैश्‍विक होऊ लागला आहे आणि या बदलालाही मागची पिढी आता स्वीकारू लागली आहे, पण – वर्षे भारताबाहेर राहूनही या पिढीची आंतरिक व्याकुळता कमी झालेली नाही.
आता 21 व्या शतकात झालेल्या जागतिकीरणाने देशाबाहेर पडणार्‍या तरुण पिढीला अशा आर्थिक ओढाताणीला तोंड द्यावे लागत नाही; परंतु इतका काळ गेला, पिढी बदलली तरी आंतरिक धडपड मात्र तीच. मागच्या पिढीतला आणि या पिढीतला तो धागा मात्र समान राहिला. परदेशी आले की, तिथल्या स्वच्छतेची, चकचकीतपणाची, सर्व मुबलक उपलब्ध असण्याची नवलाई लवकरच संपते आणि मग सुरू होते ते रोजचे जगणे. भारतीय म्हणून स्थलांतर करून आपली पाळेमुळे परदेशी मातीत रूजवू पाहाणार्‍या भारतीय आणि विशेषतः लहान गावातल्या मराठी मनात चालणारी घालमेल. सणवार, लग्नसमारंभ यावेळी तिकडे नसल्याचे वाटणारे शल्य. भारतातला व्याकुळ करणारा पाऊस. हे आणि बरेच काही. मग हळूहळू त्यातून बाहेर येण्यासाठी काढले जाणारे मार्ग. इथले रोजचे आयुष्य, सणवार, दुखणीखुपणी, लग्नसमारंभ या सार्‍यातून जाताना मग ही परदेशस्थ कम्युनिटी भारतीय म्हणून एकमेकांना धरून राहते. प्रवासवर्णने लिहिली जातात. मात्र, रोजच्या जीवनाबद्दल आणि हे सारे कसे घडते याबद्दल मात्र फार कमी माहिती प्रसिद्ध होते.
आणि हेच ह्या लेखांचे उद्दिष्ट. आपला देश सोडून जाणे, हा निर्णय जरी अगदी स्वखुशीने घेतला असला, तरी आपले सोडून परक्या भूमीत आपले शोधणे ह्या दिव्यातून जाताना मनाची काय अवस्था होते हे सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. खोलवर झालेले संस्कार सतत मुळाशी धाव घेत राहतात, प्रत्येक गोष्टीत कित्येक वर्षे फक्त भारतातलेच ओळखीचे संदर्भ शोधले आणि जोडले जातात. परक्या भूमीत रूजून आणि आपले भारतीयत्व जपून, तिथल्या स्थानिक लोकांना आपलेसे करू शकणार्‍या या भारतीय मनाच्या लवचिकतेची ओळख करून देणारे हे काही अनुभव आहेत.
काटेरी बाभूळ
इस्त्रीवाला, कोपर्‍यावरचा दुकानदार आणि दारावर येणारा भाजीवाला. हे सगळेच नेहमीचे दिसणारे. ओळखीचे असेही नाहीत, पण त्यांचं ‘माहित’ असणं एकप्रकारची सुरक्षितता निर्माण करणारं. कॉलेजमध्ये जायला लागल्यावर बसचा नेहमीचा कंडक्टर, लेडीज हॉस्टेलच्या दाराशी बसणारा सिक्युरीटी गार्ड हे त्याच कॅटेगरीत मोडणारे. चालायला जायची सवय लागल्यावर माणसांच्या चेहर्‍याबरोबरच रस्त्यावरच्या खाणा-खुणा, झाडं, पक्षी यांचीही भर पडलेली. वर्षानुवर्षे न लागणारा विजेच्या खांबावरचा दिवा, सगळ्या झाडांना बहर येऊन गेल्यावर मगच फुलणारं ते एकांडं पांगार्‍याचं झाड. सगळेच रोजच्या जगण्याला आणि वातावरणाला दिलासा देणारे. माझी पाळंमुळं खोलवर इथंच रुजलेली आहेत याची सुखदायी जाणीव करून देणारे. चालायला जायच्या रस्त्यावरचं एकही झाड असं नसतं, ज्याचं नाव माहीत नसतं. सगळे पक्षी, येणारे आवाज, लांबवर संथपणे वाहणारं कृष्णा नदीचं पात्र, सगळंच कसं ओळखीचं. माझं. खोलवर रुजलेलं आणि रुतलेलं. हे सगळं आहेच आणि असतंच असं अध्याहृत धरलेलं. जाणीवपूर्वक विचारही न केलेलं.
आणि मग एक दिवस ते सारं सोडून बाहेर पडल्यानंतर असुरक्षिततेची झालेली तीव्र जाणीव. या सगळ्याचा विचार करायला लावणारी. देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलेलं. पण त्याबरोबरच त्रास झालेला असतो तो इथल्या एकाही झाडाला अन् पक्ष्याला नावानं हाक न मारता यावी याचाही. इथले दिसणारे डोंगर अन् नदी बघितल्यावर कुठलीतरी तार मनात झंकारायची नसती ओढ. रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहर्‍यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न. इतके दिवस दिलासा देणारे आणि आता हरवलेले चेहरे-झाडं आणि त्या न लागणार्‍या विजेच्या दिव्यानं रडू फुटेल हे स्वप्नातही कधी न वाटलेलं, पण प्रत्यक्षात उतरलेलं. परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचलेली, स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी.
अशाच अनोळखी, परक्या वातावरणात चालायला जायची सवय मात्र सुरू ठेवलेली. किमान तेवढीच एक दिलासा देणारी रोजची सवय आणि त्याच वाटेवर माझी आणि तिची पहिली नजर भेट झाली. इथं ओळखीचं असलेलं हे पहिलं-वहिलं झाड. तीच उग्र वासाची पिवळीधम्मक फुलं, तोच बोचरा काटेरीपणा. वेलबुट्टींची हिरवी नाजूक पानं. स्वत:च्याच तोर्‍यात उभी असलेली ती काटेरी बाभूळ. तिचा काटेरीपणा विसरून मी झाडाच्या जवळ पोहोचले आणि परकेपणाचा एक पदर नकळतपणे गळून पडलेला. गुलमोहराच्या बेभान बहरासमोर या बाभळीकडं पूर्वी कधी ढुंकूनही पाहिलेलं नसतं. बहाव्याच्या सोनेरी पिवळ्या भरघोस श्रीमंतीसमोर या बाभळीच्या फुलांना तुच्छच लेखलेलं असतं आणि हिला इथं या अनोळखी वातावरणात पाहिल्यावर तिच्याबद्दल वाटणार्‍या सार्‍या तुच्छ भावना जाऊन अगदी जवळीकच वाटलेली आणि मग हिची नजरभेट इथल्या अनोळखी वातावरणाशी दुवा सांधते आणि मग तिथून सुरुवात होते ती पुढच्या प्रवासाची. याच काटेरी बाभळीचा हात हातात घेऊन हळूहळू इथल्या इतर काटेरी झाडा-झुडुपांची ओळख होते. इथले विविध प्रकारचे कॅक्टस आणि त्यांना लागणारी मनोहारी फुलंही तोच आनंद देऊ लागतात. सोबतीला मात्र सतत असते ती काटेरी बाभूळ. आपलेपणाचा दिलासा देणारी.
आणि मग एक दिवस कावळा-चिमणीही दिसतात आणि आनंदाला पारावर राहात नाही. त्यांच्या सोबतीनं लालबुंद कार्डीनलशी झालेली ओळख. क्वेल, कॅक्टस व्रेन यांना त्यांच्या शिळेवरून ओळखायला यायला लागल्यावर झालेला आनंद काही वेगळाच असतो. वाटणारा परकेपणा जाऊन तिच सुरक्षिततेची भावना हळूहळू परतायला लागते. चालायला जाताना आता झालेली ओळखीची झाडं आणि चेहरे, रस्त्यावरच्या खाणाखुणा दिलासा देऊ लागतात. मी आता इथलीही झाली आहे याची ग्वाही देतात की एक आभास निर्माण करताहे हा प्रश्‍न मात्र आत कुठेतरी सलत राहतो. हे सगळं वाटणं खरंच आहे का? की या सगळ्यामध्ये मी अजूनही खुणा शोधतेय त्या माझ्या पूर्वीच्या ओळखीच्याच? इथल्या ग्रोसरी स्टोअरमधल्या बॅगरमधे मला तो दारावर येणारा भाजीवालाच दिसतो? का त्या बॅगरला बघून होणारा आनंद खरंच त्याला पाहून होणारा आहे? इथली पालो वर्दी जेेव्हा फुलते, त्यावेळी दिसतात ती तिची पिवळी फुलं, की मला त्या झाडातही बहरलेला गुलमोहरच दिसत असतो? इथं राहून होणारे आनंद निखळ-निर्मळ आहेत की, त्यांना कायमच माझ्या पूर्वीच्या ओळखी-आठवणींच्या सावलीत राहावं लागणारे? माझी पाळंमुळं मग शोध घेताहेत तो कशाचा? कुठंतरी स्थिर होण्याचा-रुजण्याचा-का जे हातून सुटून गेलंय तेच शोधत राहणार आहेत ती?
ती बाभूळही अशाच अनुभवातून गेली असेल. हा प्रश्‍न तिलाच विचारेन आणि ती उत्तरही देईल एक दिवस, अशी मी मनाची भाबडी समजूत करून घेत आली आहे.

5-2

इंद्रधनुषी दिवाळी

“Are you saying that you enjoyed blowing up things when you were young? – That is kind of scary you know…”
“Intro to Law” आणि “Speech and Debate” अशा दोन्ही क्लासेसला नुकतीच ऍडमिशन घेतलेल्या माझ्या मुलीनं मला खाडकन् माझ्या तंद्रीतून भानावर आणलं. दरवर्षीप्रमाणं माझं तिच्याबरोबर दिवाळीच्या आठवणींना उजाळा आणणं सुरू होतं. प्रत्येकवर्षी लहानपणीची एक नवीन आठवण सांगून मी तिला माझ्याविषयीचा आदर वाढवण्यासाठी मदत करत असे. पण आजचा माझा प्रयत्न चांगलाच फसला होता. किल्ला बनवण्याची सगळी प्रोसेस तिला सांगून झाली. मग दिवाळी संपल्यावर, किल्ल्याच्या भुयारात (जे प्लान करून त्याच कारणासाठी बनवलेले असे) लक्ष्मी तोटा ठेवून तो कसा उडवून द्यायचा याचं वर्णन करून सांगत होते. या अगदी साध्या-निष्पाप एक्सप्लोजनचा संदर्भ या काळातल्या मुलांना बॉम्ब आणि टेररिझमचीच आठवण करून देईल हे माझ्या लक्षातच न आलेलं. मग मी तिचा नाद सोडून दिला आणि माझी मी एकटीच दिवाळीचे सगळे रंग मनात रंगवू लागले.
दिवाळी एकच पण आतापर्यंत किती वेगवेगळ्या रंगात साजरी केली.
अगदी लहानपणी काहीच कळत नव्हतं त्यावेळी नवीन फ्रॉक, खाण्या-पिण्याची चंगळ आणिआईनं तेल चोपडून चांगली अंघोळ घालून दिली की, दिवाळी साजरी होत असे. एकदम सरळ-साधी सुगंधी दिवाळी. मग नंतर मोठं होऊ लागल्यावर हळूहळू फटाक्यांची भीती नाहीशी झाली. मग मात्र दिवाळीच्या आदल्या दिवशी होलसेल मार्केटमधून फटाके आणायला गेलेल्या बाबांची अगदी वाड्याच्या दाराशी बसून वाट बघितलेल्याच्या आठवणी अगदी आजही झगझगीत आहेत मनात – अगदी शोभेच्या झाडाच्या प्रकाशाइतक्या. मग ते आले की, त्या फटाक्यांचं वाटप. सगळ्यांना एकसारखे मिळण्याचा माझा अट्टाहास असत असे. त्यापायी मी अगदी लवंगी फटाक्याची माळही अर्धी कापून घेत असे. हळूहळू त्या दारूच्या वासाचा आणि फटाक्यांच्या आवाजाचा नशा उतरून गेला आणि मग दिवाळीला रंग चढला तो रांगोळीचा. चार दिवस वेगवेगळ्या किती मोठ्या आणि कुठल्या रांगोळ्या काढायच्या याची खलबतं चालत असत. मग अगदी परफेक्ट रांगोळी मिळवण्याचा खटाटोप. जास्त बारीक नाही, पण अगदी भरड नाही, बोटाच्या चिमटीत धरून रेघ काढून पाहिल्याशिवाय रांगोळीची खरेदी होत नसे. ‘इतकी चिकित्सा मी जेव्हा भाजी आणायला सांगते तेव्हा करत जा’, असं आईचं कायमचं पालूपद ऐकावं लागे दिवाळीच्या दिवसात. एकदा सगळं जमलं की मग अगदी गुडघे अवघडून आणि पाठ मोडून येईपर्यंत रांगोळ्या काढण्याचं काम चालत असे. इतके कष्ट करून काढलेली रांगोळी पुसायची का आणि मग जर पुसायचीच असेल तर इतके कष्ट का करायचे असे प्रश्‍न कधीच पडत नसत त्यावेळी.
दिवाळीवर असलेला फराळाचा खमंग रंग मात्र कितीही लहान-मोठं झालं तरी अगदी पक्का ऑईलपेंट असल्याप्रमाणं कायमचा बसलेला. आई आणि वाड्यातील सगळ्या काकू-मावशी एकत्र फराळाचे करत असत. त्याची तयारी सुरू असली की, त्यांच्या गप्पामधून त्या सार्‍या कामांची पडणारी उजळणी मनात एक उत्सुक आनंद निर्माण करायची. एकदा फराळाचे बनले की मग फराळाच्या ताटांचं वाटप हे काम अगदी ठरलेलं असे. मग कोणाचं ताट आलं की त्याचं पूर्ण ऍफनालिसिस होत असे. कोणाच्या चकल्या अलवार होतात, शंकरपाळी कोणाची खुसखुशीत असतात. जाळीदार अनारसे कसे कोणालाच जमत नाहीत आणि शेजारच्या एक काकू फराळाचं विकत आणतात पण घरी बनवल्याचं क्रेडिट घेतात. या आणि अशा अनेक बातम्यांची देवाण-घेवाण फराळांच्या ताटांबरोबर चाले. मग प्रत्येकाचं आलेलं ताट रिकामं द्यायचं नाही म्हणून त्यात घालून देण्यासाठी फराळाचं सोडून आणखी काही पदार्थ आई करत असे. मग आपलं वेगळं ताट देण्याऐवजी त्यांच्याच ताटात आपण आपलं फराळाचं का नाही द्यायचं याचं समाधानकारक उत्तर मला कधीच नाही मिळालं.
आणि मग दिवाळीचे हे सारे परिचयाचे रंग उतरून जाऊन तिला एक वेगळाच रंग चढला, जेंव्हा घर, आपली माणसं आणि देश या सर्वांपासून लांब जाऊन दिवाळी एकट्यानं साजरी केली तेव्हा. सार्‍याच गोष्टी लुटुपुटीच्या वाटलेल्या. आईनं केलेलं पदार्थ आठवून आठवून तसेच करण्याचा केलेला असफल प्रयत्न. मग इथल्या इनग्रेडिएंटसमध्येच काहीतरी गडबड आहे असं म्हणून मनाची काढलेली समजूत. लक्ष्मी पूज़नाला साळीच्या लाह्या मिळत नाहीत म्हणून वापरलेल्या राईस क्रिस्पीज, बत्तासे नाहीत म्हणून वापरलेली शुगर कँडी आणि मग मात्र या परदेशी दिवाळीला सबस्टीट्यूशनचा रंग चढू लागला. गुलाबजामसाठी खवाच हवा, नरकचतुदर्शीला उटणंच हवं हे सगळे अट्टहास कमी होऊ लागले. स्वत:ची आणि इतरांची कल्पकता वापरून जे मिळेल त्यात दिवाळी साजरी करण्यात वेगळाच आनंद वाटू लागला. खरं तर परदेशात साजरी केली जाणारी दिवाळी ही भारतीय पाककलेसाठी फार मोठा माईलस्टोन बनायला हवा. विविध पर्याय शोधून केले जाणारे अत्यंत चविष्ट फराळाचे पदार्थ या दिवाळीचा मानबिंदू असतात. इटालियन रिकोटा चीजचे गुलाबजाम, फ्रेंच पेस्ट्रीशीटस वापरून बनणार्‍या करंज्या-चिरोटे. मेक्सिकन टॉरटी आजचे बनणारे शंकरपाळे – अशा विविध देशांतली सामग्री एकत्र येऊन भारतीय दिवाळीचा फराळ बनवते त्यावेळी ‘हे विश्‍वची माझे घर’ याचा साक्षात्कार मला त्या फराळाच्या ताटात होतो.
आणि मग इथं अमेरिकेत दिवाळीच्या सुमारासच हॅलोविनही येऊ घातलेलं असतं पहिल्या-पहिल्यांदा मी अगदी आवेशानं दिवाळी सुरू असताना हॅलोविनचं डेकोरेशन करायला विरोध करत असे. कसल्या त्या अभद्र चेटकिणी आणि भुतं लावायची दिवाळीला? मग माझ्या मुलीला जेव्हा नरकासुराची गोष्ट सांगायला लागले तेव्हा वाटलं अरे – हे तर सगळे नरकासुराचे भाऊबंदच की. मग दोन्हीही डेकोरेशन सुखानं एकत्र नांदू लागलं. विविध क्लृप्त्या लढवून आकाशकंदील बनवणे हाही पाककलेसारखाच इथल्या दिवाळीचा मानबिंदू असतो. इतकी रिसोअर्सफुल लोकं घरी कंदील, पणत्या बनवताना पाहूनच माझ्या मनात खरं तर दिवाळी साजरी झालेली असते आधीच.
आईच्या हातच्या खमंग भाजणीच्या चकल्या, सुगंधी तेल-उटण्याचा वास, अभ्यंगस्नान- ओवाळणं या सार्‍यामागे सोडलेल्या आठवणींचे तरंगतर उठतच राहतात प्रत्येक दिवाळीला. त्या आठवणींनी मन भुसभुसशीत मातीप्रमाणं मोकळं होतं. पण मग त्या मातीला ओलावा मिळतो तो अनुभवाच्या मुठीतील क्षणांचा. मग त्याच मातीतून एका वेगळ्याच वैश्‍विक दिवाळीचे हिरवे कोंभ तरारून येतात आणि मग माझ्या मनातल्या इंद्रधनुषी दिवाळीचे रंग सुवासिक होऊन जातात.

ओळख
माझ्या आत्मविश्‍वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्‍याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने घात केला.
गाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या बाजूला चालवूनही कठीण प्रसंग शिताफीने टाळला होता. दिवा बंद आहे की सुरू, हे बटण बघून न समजल्याने, ‘हिची ट्यूब जरा उशिरा पेटते‘ असा नजरेने मारलेला शेरा सफाईने चुकवला होता.
‘हाय. आय ऍम बॉब, नाईस टू मीट यू’, असे म्हणत उत्साहाने शेकहँड करण्यासाठी हात पुढे करणार्‍याचा हात हातातही न घेता, ‘नाही मी रॉबर्टला भेटायला आले आहे, तुम्हाला नाही’ असे म्हणले होते आणि मग त्या सज्जनाचा असा नकळत अपमान केल्यावरही, तासभर रॉबर्ट ऊर्फ बॉबबरोबर निर्लज्जपणे बोलले होते.
अलेक्झांड्रा म्हणजेच जिच्याशी मी तासनतास फोनवर बोलले ती सॅण्डी आहे आणि एचआरमधली ट्रिश आणि पट्रीशिआ या जुळ्या बहिणी नसून एकच आहेत, हे समजायला मला 6-8 महिने तरी जावे लागले, पण मी ते कोणालाही कळू न देण्यात पूर्ण यशस्वी झाले होते.
‘लेट अस मीट अँट द टॉप ऑफ द आवर’ असं कलिगनं सांगितल्यावर म्हणजे नक्की किती वाजता आहे मिटींग, हे न समजल्याने मिटींगरूममध्ये तो येईपर्यंत मुक्काम ठो़कून कळ काढली होती. अमेरिकेतला फ्रान्सिस ऊर्फ लिन हे पुरुषाचे नाव असते तर तर कॅनडामध्ये लिन ही बाई असते! देशाची सीमा ओलांडल्यावर बाईचा पुरुष होतो हे कटू सत्य तर मी अगदी डोळे मिटून एरंडेल प्यायल्यासारखे पचवले होते. प्रत्येक देशात ही/शी बरोबर वापरायला शिकले होते.
हायवे सोडून फ्रीवेवर माझी गाडी जरा सुरळीत झाली न झाली तोवर मी बॉस्टनला गेले. कुठे जाण्यासाठी तिथे टर्नपाईक घ्यायचा म्हणजे काय हेच न समजल्याने मला नाकीनऊ आले होते. नक्की काय करायचे हे न समजून कारपार्कमध्ये गाडीत कितीतरी वेळ घालवला होता. शेवटी हायवे, फ्रीवे आणि टर्नपाईक, हे एकाच कुळातले, पण लहानपणी एशिया, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेतल्या तीन घरी दत्तक गेलेल्या भावांची नावे आहेत हे समजले होते.
हे असे घराच्या बाहेरचे सगळे प्रसंग अगदी सराईतपणे हाताळत होते. इतके सारे होऊनही, माझा आत्मविश्‍वास अजूनही अबाधित होता, पण घरी मात्र काही झाले तरी घरी बटाट्याची भाजीच करता येत नव्हती! बटाटा हे अमेरिकनांचे अगदी आवडीचे खाद्य, मुबलक उपलब्ध. शिवाय माझीही ती सगळ्यात आवडती भाजी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भाज़ी आणायला गेले त्यावेळी उत्साहाने जाऊन बटाटे आणले. चिरायला घेतले तर प्रत्येक बटाटा आतून जांभळा-काळा. बापरे, म्हणजे अगदी विकसित देशातल्या भाज़ीवाल्याने फसवले तर! आपण उगाचच भारतातल्या नेहमीच्या बटाटेवाल्याबरोबर भांडायचो याचे वाईटही वाटलेले. मग ते काळे किडके बटाटे टाकून देऊन परत एक फेरी. यावेळचे बटाटे एकदम नेहमीसारखे दिसणारे. बस्स. मस्तपैकी काचर्‍यांची भाज़ी केली तर एकदम चिकट. मग उकडून करून बघितली तर सगळ्याचा गच्च गोळा. फोडींचा आकार न राहाता लगदा होऊन एक मोठा फोडणीचा बटाटा बनलेला. बटाट्याचे परोठे करायला जावे तर बटाट्याचे सारण एकजीव न होता सगळे कोरडे झालेले. शेवटी मी बटाट्यासमोर हात टेकले. इतके दिवस मी कष्टाने टिकवलेल्या आत्मविश्‍वासाचे पाणी पाणी झाले. साधी-सुधी बटाट्याची भाजी जमू नये म्हणजे काय? 6-7 वीत असताना, कधी काही चूक केली की, भंडारे बाई म्हणत ‘डोक्यात बटाटे भरले आहेत की काय? ‘ते वाक्य बटाट्याची भाजी न करता आल्याने सिद्ध व्हावे या योगायोगाने मला हसावे की रडावे हेच कळेना.
मग मात्र मी ईरेला पडले. सुपरमार्केटमधे इतर सर्व आकर्षक गोष्टींना बळी न पडता, बटाटे जिथे मांडून ठेवलेले असतात त्या स्टॉलभोवती मी चकरा मारू लागले. प्रत्येक प्रकारच्या बटाट्याला हातात घेऊन निरीक्षण करू लागले. एरवी नुसती पाऊंडाची किंमत वाचून इतर पाटीकडे दुर्लक्ष करणारी मी प्रत्येकाचे लिहिलेले नाव आणि तो कशाकरता उपयुक्त आहे हेही वाचू लागले आणि बटाट्याच्या कुटुंबाचा हा एवढा लवाजमा आहे हे समजल्यावर आश्‍चर्यचकितच झाले.
सर्वात प्रथम माहिती मिळाली की, ते किडके समजून टाकून दिलेले बटाटे खरं तर आतून तसेच असतात. ‘पर्पल पेरूव्हिअन बटाटे‘, असे ह्या जातीचे नाव. आतून कधी पूर्ण जांभळे तर कधी पांढर्‍या जांभळ्याचे मिश्रण. भाजण्या-तळण्यासाठी एकदम उपयुक्त. त्यांना छानशी बटरी चव. हे वाचल्यावर मग मात्र मी टाकून दिलेल्या पाऊंडभर बटाट्यांचे मला फारच वाईट वाटू लागले.
जसजसा बटाट्यांचा कुलवृत्तांत वाचत गेले तसतसा माझा त्यांच्याबद्दल आदर वाढू लागला. ढिगात विकले जाणारे बाजारातले आणि दुसरे डोक्यात भरलेले, असे दोनच प्रकारचे बटाटे आतापर्यंत माहिती. पोर्तुगीजांनी भारतात बटाट्याची लागवड केली. ब्रिटिश व्यापार्‍यांनी तो भारतभर पसरवला. त्याचे उपयोग खूप, सर्रास वापरला जाणारा, पण आपल्या खाद्यसंस्कृतीत तसे त्याला मानाचे स्थान नाहीच. ज्याला जास्त पाणी लागत नाही, असे हे खरीप पीक, सर्वसामान्य लोकांचा पोटभरीचा म्हणूनच राहिले.
इथे मात्र छपन्न प्रकारचे बटाटे. तीन मुख्य प्रकार स्टार्ची, वॅक्सी, ऑल पर्पज. मग त्यातले तेरा-चौदा उप-प्रकार. जांभळ्या-निळ्या रंगाचे पर्पल पेरुव्हिअन, अडीरोन्डॅक ब्लू (Adirondack blue). बटरी-नटी फ्लेवर्सचे इंका गोल्ड, करोला वॅक्सी. अगदी हाताच्या बोटांसारखे दिसणारे फिंगरलिंग बटाटे. प्रत्येकाची उपयुक्ततता त्यामधे असणार्‍या, स्टार्चवर अवलंबून. जास्त स्टार्च असलेले आयदाहो, न्यू पोटॅटोज बेकिंगसाठी उत्तम. क्रिमी आणि मऊशार असलेले रेड ब्लिस, फिंगरलिंगस सूपसाठी एकदम झकास. फ्रेंच-फ्राईज आणि ग्रीलिंग करण्यासाठी रसेट आणि कदाहदिन (Katahdin) सारखी दुसरी उत्तम जात नाही. बरेच प्रकार पाहिले आणि माहिती करून घेतली. अमेरिकन बायकांच्या नेहमी बोलण्यात येणारे, बिनकामाचे काऊच पोटॅटो मात्र मला कुठे दिसेनात. शेवटी मी भाजीच्या सेक्शन मधल्या माणसाला विचारलं. त्यावेळी तो ’यू आर किडींग राईट‘, असे म्हणत मोठ्याने का हसला याचा उलगडा मला नंतर झाला.
मग लक्षात आले माझ्या डोक्यात भरलेले बटाटे हे कारण नाहीये भाजी बिघडण्याचे, तर त्यातला पिष्टमयपणा हे आहे. ही माहिती करून घेण्याची कधी वेळच आली नाही. भारतातले एकमार्गी-एकगुणी बटाटे परोठे-पावभाजीपासुन ते उपवासाच्या भाजीपर्यंत सर्व गोष्टींना उपयोगी पडणारे आणि ग्रिलिंग, बेकिंग ब्रॉयलिंग अशा प्रकारांना गावरान महाराष्ट्रीय जेवणात काही स्थान नाही. पण इथे मात्र हे प्रकार अगदी नेहमी केले जाणारे. मग मात्र बेक्ड पोटॅटो करायचे तर रसेट आणायचे आणि आपली काचर्‍यांची भाजी करायची असेल तर युकॉन किंवा रोझ गोल्डच चांगले हे गणित डोक्यात पक्के बसवले.

5-3
इथल्या वातावरणात रूजून, इतर गोष्टी अंगवळणी पडल्या. रहिवासी झाल्याचा अगदी ऑफिशिअल स्टॅम्पही मिळाला, पण बटाट्याची भाजी जमायला मात्र त्याहीपेक्षा जास्तच वेळ लागला. म्हणूनच आता ठरवले आहे की, कुठल्याही नवीन देशात राहायला गेल्यावर, त्या देशाच्या चालीरीती, माणसे यांच्याशी ओळख तर होईलच आणि ते निभावूनही नेता येईल, पण आत्मविश्‍वास टिकवायचा असेल तर तिथल्या बटाट्यांची ओळख लगेचच करून घ्यायची. आपण खरे स्थानिक झालो का नाही हे पटेल, जेंव्हा तिथे बटाट्याची भाजी नीट जमेल!

आऊटसोअर्सड्

आई-वडिलांच्या भरल्या घरातून उठून बाहेरदेशी आल्यावर, सर्वांत उणीव भासली, ती कोणीतरी मोठं आजूबाजूला असण्याची. संध्याकाळी घरी आल्यावर आपल्यापेक्षा जास्त जबाबदार माणसाच्या उपस्थितीची. त्यांची घरात जाणवणारी ऊब आजूबाजूला नसल्यानं आपलं घरही आपलं वाटत नसे कित्येक दिवस.
आणि अशा मनोवस्थेत असताना 98 साली फिनिक्सला ओळख झाली ती, अण्णा आणि कुसुमताई करमरकरांची. दोघे 65-70 च्या आसपास. प्रसन्न घर. त्याला अगदी भारताचाच वास. घरात जाणत्या, मोठ्या माणसांच्या अस्तित्वाची ऊब भरून ओसंडून वाहणारी. समृद्ध, आल्या-गेलेल्याला मनसोक्तपणे लपेटून बरोबर घेऊन जाण्याइतकी मुबलक.
मी आणि अमित, रविवार दुपारचे जात असू त्यांच्याकडे. काहीतरी निमित्त काढून. शिवाय रविवारी अण्णा ज्ञानेश्‍वरी सांगत, तेही निमित्त असेच. ओळख जेमतेमच, पण दोघेही अगत्याने गप्पा मारत. काही खाणे-पिणे होई. खरं तर शिष्टाचाराप्रमाणे निघायची वेळही होई, पण उठवतच नसे. त्या घरची ऊब सोडून आपल्या रिकाम्या घरी जायच्या कल्पनेने पायच निघत नसे. पहिल्या एक-दोन भेटीतच कुसुमताईंच्या ‘आईपणाने’ ते चाणाक्षपणे हेरले असावे. या दोघांना उठवत का नाही, हे सारे न सांगता बोलताच त्यांनी समजून घेतलेले. मग त्या आग्रह करत. खरं तर आम्ही कुठेच जाणार नाहीये, हे माहीत असूनही त्या म्हणत, ‘बसा आता, मी पिठलंभात टाकते, रात्रीचं जेवूनच जा.’ आम्हाला कुठे जायचे असल्यासारखे आम्हीही अगदी उगाचच आढेवेढे घेत असू. ‘नको, नाही,. परत कधीतरी’, असे लटके म्हणत असू. मग कुसुमताई-अण्णा परत एकदा आग्रहाने, ‘थांबा रे’ म्हटले की, हुश्श होत असे. बर्‍याचदा रविवारी खेळ खेळलो आम्ही हा. मग पिठलं-भाताचे सुग्रास जेवण, सोबतीला परत गप्पा, असं पोटभरून मग नाईलाजाने रात्री उशिरा घरी येत असू.
खरं तर हेही दोघे आमच्या सारखेच भारतातून सर्व सोडून स्थलांतरित झालेले. 1970 च्या सुमारास जीवलगांना सोडून अमेरिकेला आलेले. अतिशय कठीण परिस्थितीतून दिवस काढत परक्या वातावरणात पाळेमुळे रुजवली या दोघांनी. कुसुमताईंना इंग्लिश भाषेचा गंधही नाही. त्यावेळी फॅक्टरी असेंब्ली लाईनवर काम करून संसाराला हातभार लावायची त्यांची हिंमत. त्यावेळी मराठीच काय तर भारतीय माणसे आजूबाजूला फारच कमी. त्यामुळे आतासारखी आपल्या देशबांधवांकडून मदत मिळेल ही अपेक्षाच नाही. शिवाय हे, टॉम वुल्फ या पत्रकाराच्या शब्दात अमेरिकेतलं ‘मी डिकेड (चश वशलरवश)’. माणसाने समाजापासून दूर होत स्वतःमध्ये मश्गुल होण्याची ती सुरुवात. व्यक्तिस्वातंत्र्य आणि आत्ममग्नतेला महत्त्व येऊ लागलेले. अशा वातावरणात आल्यावर, ‘मी आणि माझं घर-संसार-मुलं’ हे मर्यादित वर्तुळ स्वतःभोवती आखून त्यातच राहाणं अगदी सोपं. बर्‍याचजणांनी ते आवडीनं पत्करलेलंही. अण्णा-कुसुमताईंनी ते वर्तुळ आखलं खरं, पण त्याचा व्यास इतका मोठा केला की, फक्त त्यांचेच कुटुंब नव्हे तर इतर कित्येकजणांना त्या वर्तुळाने आत सामावून घेतले. इथे आल्यावर आपल्याला जे मिळालं नाही ते दुसर्‍यांना द्यावं हाच त्याचा उद्देश.
भारतात असतो तर जेजे काही प्रत्येकाच्या आई-बाबांनी केले असते ते इथे या दोघांनी कित्येक मुला-मुलींचे केले. गाडी नसलेल्यांना नेणे-आणणे. नवीन लग्न होऊन आलेल्यांना स्वयंपाकघरातले धडे देणे, केळवणे, डोहाळ जेवणे, बारशी-लग्न. इतकंच काय तर अगदी बाळंतपणदेखील. माझ्या मुलीच्या जन्माच्यावेळी कुसुमताई तीन आठवडे आमच्याकडे राहिल्या. माझ्या मुलीची पहिली अंघोळ याच कुसुमआजीच्या हातची.
हे असे अनुभवणारे फक्त आम्हीच नाही तर गावातले आणखीन इतर चाळीस-पन्नासजण. स्वतःची दोन मुलं वाढवतच आपली ऊब गरज असणार्‍या इतर मुलांना उदारपणे वाटणारे हे असे परदेशातले आमचे ‘ करमरकर आई-बाबा’. आता फिनिक्स सोडून त्यांना बरीच वर्षे झाली, पण फिनिक्सच्या दौर्‍यावर असताना आमच्याकडे दोन-तीन दिवस राहायला आले आणि आम्हाला परत ऊब मिळाली. आता वय 80 च्या पुढे दोघांचेही. ‘फार सगळ्यांकडे जात दगदग नका करू कुसुमताई’ असं मी म्हटलं. तर म्हणाल्या, ‘अगं मला दुसर्‍याला आनंद द्यायला आवडतं. माझ्या नुसत्या जाण्यानं त्यांना तो मिळणार असेल आणि मग त्यामुळे माझी जरा गैरसोय झाली, दुपारची विश्रांती नाही झाली तर कुठं बिघडलं. मी त्याकडं दुर्लक्ष करते’, हे त्यांचं उत्तर. हे असं ऐकलं की, स्वतःच्या आणि या पिढीच्या मर्यांदाचा विचार तीव्रपणे जागा होतो मनात.
दोघांचे आयुष्य व्यापक. कितीतरी रक्ताचेही नाते नसलेल्या लोकांच्या आठवणी या दोघांच्या आयुष्यात गुंतलेल्या. त्या सार्‍यांबद्दल भरभरून बोललो, भरपूर गप्पा मारल्या. पूर्वीच्या दिवसांबद्दल आणि त्यांच्या मुला-नातंवडांबद्दल बोलताना डोळे सारखे ओलसर होत होते. वयानुसार हळवे आणि भावूक होण्याच्या त्यांच्या जागाही आता वाढल्यात.
दोघांकडे आज पाहताना वाटलं की, जणू भारतातल्या सगळ्या आईबाबांनी घरं सोडून गेलेल्या आपल्या मुला-मुलींसाठी, त्यांचं ‘आईबापपण’ जणू आऊटसोअर्स केलं या दोघांकडे आणि ते हे दोघंही अगदी आनंदानं निभावत आहेत. मात्र, या देवाणघेवाणीत प्रेमाच्या अमूल्य चलनाव्यतिरीक्त कुठलेच नाणे नाही चालत!

अंतिमसोहळा

एकाकडून दुसर्‍याला असे करत करत काकूंना बरं नसल्याची बातमी सर्वांच्यात पसरायला वेळ लागत नाही. त्यांनी या गावात बर्‍याचजणांचे बरेच काही केलेले असते. डोहाळ जेवणे, केळवण, वाढदिवस, चांगल्या-वाईट प्रसंगी धावून जाणे, मदत करणे. दूरदेशी आपली माणसे सोडून आलेल्यांची ती उणीव आपल्या प्रेमाने भरून काढणे आणि बरेच काही. त्यांना ज्या दवाखान्यात ठेवलेले असते तिथे हळूहळू येणार्‍यांी रिघ लागते. काकूंच्या कुटुंबीयांना लागेल ती मदत केली जाते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार प्रत्येकजण काहीबाही करू लागतो. कोणी खायचे-प्यायचे पाहातो, कोणी फुले आणून खोलीतील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणी मूकपणे शेजारी बसून आपले मनोबळ देऊ करतो, कोणी काकूना आवडणारी कविता वाचतो तर कोणी रामरक्षा, मृत्युंजय मंत्राचा जप करतो. कोणीही कोणालाच काही करायला सांगितलेले नसते, पण सारे जिव्हाळ्याने नेमून दिल्यासारखे होत रहाते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या काकूंना असलेल्या परिस्थितीत आराम मिळावा म्हणून सारेच जण भारावून जाऊन धडपडत असतात, मनाची तयारीही करत असतात.
शेवटी अटळ असणारे घडतेच, सर्वांना त्या सत्याला सामोरे जायला मागे ठेवून काकू हे ऐहिक जग सोडून त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघतातच. कितीही वर्षे परदेशी राहात असलो, इथल्या प्रथा, चालीरीती अंगवळणी पडल्या असल्या तरी अशा प्रसंगाची मात्र तयारी कोणीच केलेली नसते. त्यामुळे आता ‘पुढे काय‘ हा प्रश्‍न पडतो. शिवाय अशा प्रसंगी पूर्वीचे संस्कार नवीन काही स्वीकारायचे धाडस करू देत नाही आणि त्यामुळे आपल्या धर्म, रूढी, परंपरांपापासून लांब असल्याने मनात गोंधळ उडतोच. मग सर्वांच्या मदतीने त्यातून मार्ग काढला जातो आणि त्यानंतर घडतो एक हृद्यप्रसंग.
माहिती काढून इथल्या स्थानिक फ्युनरल होमला दिलेली भेट, जिथे दफन आणि दहन असे दोन्ही केले जाते. तिथला आम्हाला नेमून दिलेला फ्युनरल मॅनेजर अतिशय आस्थेने चौकशी करतो. घडल्या प्रसंगामध्ये तोही दु:खात सहभागी आहे हे तो अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. त्याला भारतीय परंपरांची माहिती असते. तो अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईने आम्हाला काय करायचे आहे याची माहिती काढून घेतो. वेळप्रसंगी कशाऐवजी काय वेगळे करता येईल याचा सल्लाही अतिशय हळूवारपणे देतो. खरं तर हा तिशीतला लहानपणापासून ख्रिश्‍चन म्हणून वाढलेला उमदा तरुण असतो. अजून फारसे जगही न बघितलेला; पण त्याची संवेदनशीलता अतिशय वाखाणण्याजोगी असते. तो करत असलेले काम ही त्याची नोकरी जरी असली, तरी तिथे येणार्‍या प्रत्येकजणाने नुकतेच कोणीतरी गमावलेले आहे याची जाण त्याला असते, हे त्याचे कमालीचे कौशल्य म्हणायला हवे. फ्युनरल होमच्या नियमात बसेल आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची अतिशय काटेकोरपणे दखल घेतली जाते. काकूंच्या उमद्या स्वभावाला आणि त्यांनी जगलेल्या सुंदर आयुष्याला साजेसेच सारे काही ठरवले जाते.
रूढीनुसार चालत आलेले मृत्यूचे अशुभपणाचे सावट दूर केले जाते आणि या संमिश्र संस्कृतीचा सुरू होतो तो एका जिवाचा अंतिम सोहळा. धीरगंभीर वातावरण असलेल्या चॅपेलमध्ये जमलेले सुहृद. समाजातले विविध स्तरातले लोक. विविध धर्मीय-प्रांतीय-भाषीय, वेगवेगळ्या संस्कृती-शिष्टाचाराचे पालन करणारे. काकूंच्या कामावरचे सहकारी. त्यांचे नातलग. 30-40 वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या मित्र-मैत्रिणी. सगळे प्रेम या एका धाग्याने गुंफून एकत्र आलेले.
ते पाहताना मला आठवण होते ती रूडयार्ड किपलिंगच्या कवितेची –

Oh, East is East and West is West,

and never the twain shall meet,

Till Earth and Sky stand presently

at God’s great Judgement Seat,

But there is neither East nor West,

Border, not Breed, nor Birth,

When two strong men stand face to face,

though they come from the ends of the earth !

मी मनातल्या मनात शेवटच्या ओळी आजच्या ह्या प्रसंगासाठी बदलून टाकते.

But there is neither East nor West,

Border, nor Breed, nor Birth-death,

When loving souls stand face to face,

though they come from the ends of the earth!

जमलेल्यांपैकी बरेचजण काकूंविषयी बोलतात. प्रत्येकाच्या विविधरंगी आयुष्यातला कुठला न कुठला रंग काकूंनी गडद रंगवायला मदत केलेली असते. त्याचे मार्मिक वर्णन कोणी डोळे भरून करते. कोणी विनोदाला आपलेसे करून डोळ्यातले अश्रू लपवत करते. नुसते मराठीच नाहीतर, भारतीय आणि नुसते भारतीयच नाही तर भिन्न संकेत, धर्म, तत्वज्ञान पाळणार्‍याच लोकांनाही काकूंनी इथल्या 30-40 वर्षांच्या वास्तव्यात आपलेसे केलेले असते. ते करताना त्यांनी कुठल्याच रूढी-परंपरांना आड येऊ दिलेले नसते आणि कसलाच वर्णभेद केलेला नसतो, माझे-त्यांचे पाहिलेले नसते. हे सर्व अनुभवत असताना मला वाटत राहाते ॠग्वेद जिवंत केला यांनी – ‘आ नो भद्राः ऋतवो यन्तु विश्‍वतः‘ नुसते ॠग्वेदाचे पठण करणे वेगळे आणि तो जगणे वेगळे.
परदेशातल्या बर्‍याच गोष्टींबद्दल लिहिले जाते. स्वच्छता, प्रेक्षणीय स्थळे, चांगले-वाईट खाणे-पिणे स्वातंत्र्य वगैरे. इथे साजर्‍या होणार्‍या सणांबद्दलही लिहिले जाते. गणपती उत्सव, दिवाळी, पाडवा, ख्रिसमस वगैरे. इथे स्थायिक झालेल्या लोकांबद्दलही लिहिले जाते. कधी कौतुक, कधी त्यांचा भारत सोडून भौतिक सुखासाठी परदेशी स्थायिक झाल्याचा स्वार्थीपणा वगैरे. आपल्या चालीरीतींना फाटा देऊन वेगळी संस्कृती अंगीकारल्याचा बोलबालाही असतो. थोडेफार बोलले जाते ते इथे येऊन वेगळ्या वातावरणात आपले बस्तान बसवून इथल्या समाजात आपला ठसा उमटवलेल्यांबद्दल, पण फार कमी बोलले जाते ते एका गोष्टीबद्दल. अंत्यसंस्कार. ज्या संस्कृतीत मुख्यत्वे दफन केले जाते तिथे दहनविधी कसा केला जातो याबद्दल फार कमी बोलले-लिहिले गेले आहे. दहनविधी करणार्‍यांत जागा फार मर्यादित शिवाय त्यांचे नियमही कडक. ही वेळ सर्वांत हळवी. मदतीला लोकं येतातही, पण तरी बर्‍याचजणांना माहिती नसते, मृत्यूची भीती असते. आपल्यावरच्या संस्कारांनी मृत्यूला अशुभ मानण्याचे कंडिशनिंगही केलेले आहे.त्यामुळे पुढे येणारेही कमी असतात, पण तरीही अशा प्रसंगी एकत्र येऊन केली जाणारी मदत आणि धीराने दिले जाणारे तोंड याविषयी फारच कमी माहिती असावी, बाहेरच्या जगाला. हे सारे पाहताना वाटते की, नव्या-जुन्याचा हा मेळ म्हणजेच ऋग्वेदातल्या ह्या श्‍लोकाचे सार नव्हे का? असेलही, की आम्ही इथे जे पूजा-पाठ, विधी करतो ते साग्रसंगीत परंपरागत पद्धतीमध्ये बसणारे नसतील. आजचा इथला हा विधीही रूढ अंत्यविधीपेक्षा वेगळाही असेल, पण त्याच्या मागची भूमिका त्याला जास्त अर्थपूर्ण बनवते. जन्म-मृत्यूच्या शुभ-अशुभ संकल्पनांच्या पलीकडे घेऊन जाते. सर्वांची भाषणे संपतात. काकूंच्या आवडत्या रामरक्षेचे सामूहिक पठण केले जाते. सर्वजण जड अंत:करणाने शेवटचा निरोप घेतात. आता चॅपेलमध्ये भरून राहतो तो ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’चा ध्वनी. माझे लक्ष समोरच्या काचेवरच्या येशूच्या दोन हात जोडलेल्या म्युरलकडे जाते. आज ते हात थरथरत, रामनामाची माळ ओढत या गर्दीत सामील झाले असावेत, असा मला भास होतो तो खरा असेल का?

माया

लग्नसमारंभात नेसण्याइतकी भरजरी नाही, पण तरीही ठेवणीतली चोपून-चापून तिने नेसलेली साडी आणि इस्त्रीचा पांढरा आणि भारतातल्या प्रदूषित हवेत काळा पडू नये, म्हणून कधीतरीच घातला जाणारा त्याचा शर्ट. पँटही तशी ठेवणीतली. ती शिवून काळ उलटून गेल्याने काळाप्रमाणे तिने आणि तिच्या मालकाने आपापले माप बदलेले. त्यावरती अगदी विशोभित दिसणारे, तात्पुरते भाचा-भाची/ पुतणा-पुतणीकडून मागून घेऊन घातलेले, थंडीचे जर्किन-जॅकेट. ‘चारच महिन्यांसाठी महागाचे कशाला विकत घ्या’, या मध्यमवर्गीय विचारात चपलख बसणारे ; पण त्या व्यवहाराला अंगाचे माप माहीत नसल्याने मोठे होणारे. म्हणून जमेल तसे त्याच्या बाह्या दुमडून लहान केलेले. जॅकेटच्या खिशात चुकून राहिलेला पुतण्याचा गॉगल नुकताच सापडल्यानं, आता मोटारसायकलनं कामावर जाताना त्याच्या डोळ्यात काहीबाही जाणार या विवंचनेनं ग्रासलेले.

5-4
पायात नुकतेच घेतल्यानं, अजूनही पांढरेशुभ्र असलेले स्पोर्टस शूज. घालणार्‍याला आणि त्या शूजना, दोघांनाही अजून एकमेकांचा सराव नाही हे त्यांच्या चालीतून स्पष्ट दिसून येणारे. सांसारिक ओझ्यांशिवाय काही न वाहिलेल्या पाठीवर बॅगपॅकचे एक नवीन ओझे. त्याचे खांद्यात रुतणारे आणि लांबीला जरा जास्तच असलेले पट्टे. त्याशिवाय त्याच्या खांद्यावर एक पिशवी आणि तिच्या खांद्यावर पर्स, तट्ट फुगलेली. त्यातून अर्धवट डोकावणारे सामान आणि येणारे वास, बघणार्‍याची उत्सुकता चाळवणारे. प्रवासात अर्धशिशीनं डोकं वर काढलंच तर ठेवलेलं अमृतांजन. मधे-अधे चघळायला आणि पित्तासाठी बरी म्हणून बरोबर ठेवलेली लवंग आणि आवळ्याची सुपारी. कानाला बांधायचा रुमाल-मफलर. नव्या चष्म्याचं नवं कोरं पाकीट. रोज सकाळी वाचायची छोटी शिवलीलामृताची पोथी. दुसरी मोठी बॅगेत असल्याची खात्री दोनदोनदा केलेली. झालेच तर पावडर, कुंकू, कंगवा. रोजची ब्लडप्रेशर आणि लागली तर बरोबर असावीत म्हणून ठेवलेली इतर औषधे. पासपोर्ट-तिकिटाव्यतिरिक्त आणखीन महत्त्वाच्या जिनसा. दोन पिढ्या चालत आलेला, नव्या नातवासाठी घेतलेला जिवतीचा गोफ आणि चांदीचे वाळे. मुली-सुनेसाठी एखादा मोजका नवीन पद्धतीचा दागिना. बाळगुटी, वावडिंग, मुरुडशिंग. उगाच हरवू नये म्हणून, सारं बरोबरच ठेवलेले. प्रवास सुरू होताच त्या पिशवीवरची घट्ट धरलेली पकड हाताला रग लागूनही न सुटलेली.
या सार्‍या सामानाव्यतिरिक्त केसरी ट्रॅव्हल्सची आणखीन एक मोठी बरोबर असलेली बॅग. मोडू नयेत म्हणून एका खोक्यात भरलेल्या कुरडया. गोडा मसाल, मेतकूट, डिंकाचे-अळीवाचे लाडू. वाटेत लागेत तर तोंडात टाकायला घेतलेल्या शंकरपाळ्या-चकल्या. नेमका उपासाचा दिवस आल्याने आठवणीनं घेतलेले राजगीराचे लाडू आणि बटाट्याचा चिवडा. शेजारच्या बापटकाकूंनी त्यांच्या मुलीसाठी बांधून दिलेला डबा आणि जोश्यांच्यांनी नुकत्याच शिकायला आलेल्या मुलासाठी दिलेला छोटा प्रेशर कुकर. सारे तब्येतीत त्या बॅगमधे ठासून भरलेले. स्वत:चे 4-5 कपडे हे सामान मावावं म्हणून कमी केलेले. एकमेकांना सांभाळून घेत, वेळ पडलीच तर संकोचाने का होईना, पण एकमेकांचा हात धरुन दिलासा देणारे, आपलं सुरक्षित जग सोडून, मायेसाठी या धाडसी प्रवासाला निघालेले हे मूक प्रवासी.
कुठल्याही इंटरनॅशनल विमानतळावर सापडती तुम्हाला हे दोघे. कुणाचे तरी आई-बाबा, सासू सासरे- मामा-मामी, मावशी-काका.अगदी स्वतःचे प्रतिबिंबही न्याहाळता येईल अशा स्वच्छ चकचकीत विमानतळावर ट्रान्झिटमधे पुढच्या विमानाची वाट बघत बसलेले.कानावर पडणार्‍या शब्दांचा अर्थ लागत नाही, या नवीन अनुभवानं गोंधळलेले. तीन खोल्यांच्या मोजक्या जागेला आणि कमी वॅटेजच्या मिणमिणत्या प्रकाशाला सरावलेले, अचानक या अपरिचित रंगीत झगमगाटानं बावचळलेले. खड्डेभरल्या रस्त्यावर एसटीच्या प्रवासानेही एरवी न दमणारे, पण, 40,000 फूट उंचीवरच्या आरामदायक प्रवासात शिणून गेलेले. पण तरीही शिणलेले त्यांचे चेहरे मायेनं उजळून निघालेले. बघणार्‍याचा शिणवठा घालवणारे.
अशा या दोघांना कुठल्याही विमानतळावर मी ज्यावेळी बघते त्यावेळी माझे डोळे भरून येतात ‘काळ बदलला, अगदी जवळच्या नात्याचा जिव्हाळा संपला’ वगैरे वगैरे, लोकं काहीही म्हणोत, पण मी जेव्हा जेव्हा हे असे दोघे भारत सोडून, लांबवरच्या अनोळखी जगात प्रवास करत असलेले बघते, त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष नाही करता येत म्हणून मी मनोमन खाली वाकून नमस्कार करते. गेट आणि कनेक्टिंग फ्लाईटची माहिती शोधून देणे, त्यांना हवी असेल तशी चहा कॉफी आणून देणे, अशी मला जेवढी शक्य असेल तेवढी मदत तर करतेच करते.
हो, काळ बदललाय खरा, माया करायचे प्रकार बदललेही असतील खरे, पण ‘हे दोघे‘ असेपर्यंत माया संपणार नाही या जगातली हेही मात्र तितकेच खरे….
मोजपट्टी

आरकोसांटी – (Arcosanti) फिनिक्समधल्या एका छोट्याशा प्रायोगिक वसाहतीचा परिसर. तिथे गुजराती-जैन मुलगा आणि ज्युईश-ब्रिटिश मुलीचा विवाहसमारंभ. नोव्हेंबर महिन्याची सुंदर संध्याकाळ. बोचरा गारवा. आधीच फॉलकलर्सने रंगलेली आणि संधिप्रकाशात न्हाऊन निघालेली झाडे. जागोजागी त्या परिसराच्या निर्मात्याच्या- पालो सोलेरी या इटालिअन स्थापत्यकाराच्या, अरकॉलॉजी (आर्किटेक्चर+ इकॉलॉजी) या संकल्पनेच्या खाणाखुणा. शहर बांधणीचा निसर्गावर कमीतकमी परिणाम व्हावा आणि माणसा-माणसातली इन्टरऍ्क्शन वाढावी अशा कल्पना रुजवणारी ही वसाहत. गावाबाहेर वसवलेली. 50-100 जणांची वस्ती आणि उत्पन्न म्हणून लग्नसमारंभांना जागा भाड्याने देऊ करणारी.
अशा या रमणीय परिसरात विखुरलेली देखणी माणसं. उन्हाळ्याने आलेली मरगळ झटकून थंडीचा तजेला घेऊन, लग्नसमारंभासाठी नटून-थटून आलेले हे वर्‍हाडी. गुजराती साड्या, इव्हिनिंग गाऊन्स, उंधियू-ढोकळ्याचे वास मुरलेले सूट-जॅकेटस अशी संमिश्र गर्दी. गोर्‍या हातांवर रंगलेली लालचुटूक मेहंदी आणि कपाळांवर विविध मॅचिंग टिकल्या. कुठे बुजलेल्या बेनचा इव्हिनिंग गाऊन घालून तो नीटपणे सांभाळण्याचा सिन्सीअर प्रयत्न, तर कुठे अंग झाकून उरलेल्या, पदर नामक साडीच्या कापडाचं काय करायचं, हा प्रश्‍न घेऊन फिरणारी उत्साही अमेरिकन युवती. वरमाईने मोठ्या प्रयत्नपूर्वक ऍचमेझॉनवरून मागवलेले बेस्ट मॅनचे भारतीय एकसारखे पारंपरिक पोषाख. शेरवानी-चुन्नी आणि मोज़डी. चार-पाच काळे-गोरे-निमगोरे विविध आकारांचे बेस्ट मॅन मोठ्या हौसेने त्यात वावरायचा प्रयत्न करणारे. बारा-तेरा शू साईज असलेल्या पायाला नवीन छोटी मोजडी टोचणारी पण लंगडत तशीच घालून मिरवाणारे. कोणी नावीन्याचा हव्यास म्हणून कोणी उत्सुकतेपोटी, कोणी आदराने तर कोणी बळजबरीने प्रयत्नपूर्वक घातलेले एकमेकांचे पारंपरिक पोषाख आणि दागदागिने.
या सार्‍या गर्दीत, मांडवात लग्नसोहळा सुरू होण्याची वाट पाहात बसलेली मी. अजून काही वर्षांनी हे जग कसे रवी स्मिथ, जोऍतना पटेल, टीम जोगळेकर, रंजना व्हरोना यांनी विविधरंगी होईल अशा विचांरांचा माझ्या डोक्यात कल्लोळ. भारतीय वेळेप्रमाणे साडेतीनची वेळ दिलेले लग्न सव्वाचारला सुरू होते. आधी जैन धार्मिक विधी आणि नंतर अमेरिकन वेडिंग सेरेमनी. दोन्ही थोडक्यात केले जातील याची ग्वाही. मांडवात सगळे स्थानापन्न आणि शांतता पण माझ्या पुढच्या रांगेत समोरच्या चार खुर्च्यांवरून अव्याहत हलकीच गुजराथी खुसफूस-कुजबूज. चार मध्यम-उतारवयीन बेन. गुजराती साड्या, पारंपरिक आभूषणे आणि चेहर्‍यावर जे काही चालले आहे त्याबद्दलची न लपणारी नाराजी. कुजबुज त्याबद्दलचीच. कुणी काय घालयला नको-हवे होते, काय करायला हवे-नको होते हे अनुमान काढणारे. प्रत्येकीकडे तिची-तिची वेगवेगळ्या आकारातली मोजपट्टी आणि त्याने सार्‍या जमावाला आणि या संमिश्र समारंभाला मोजणार्‍या-जोखणार्‍या-बरोबर-चूक ठरवणार्‍या या चौघीजणी. मांडवात जैन विधी सुरू होतो. भारतीय पारंपरिक पोषाखातला मुलगा आणि अमेरिकन पद्धतीनुसार पांढर्‍या शुभ्र घोळदार वेडिंग-गाऊन आणि मॅचिंग रंगाच्या गुलाबांच्या फुलांचा मुकुट घातलेली मुलगी येतात. माझ्या पुढच्या रांगेत कुजबुज. ‘लग्नासाठी तरी साडी नको होती का नेसायला’. लग्नविधी सुरू होतात. भटजींच्या आदेशानुसार दोघेही विविध मंत्र म्हणणे, हातवारे करणे, नमस्कार करणे करतात. ओळीनं एकेक विधी पार पडत असतात आणि प्रत्येक विधीला माझ्या पुढच्या रांगेत खुसफूस. गठबंधन – गाऊनची शेरवानीशी गाठ मारली जाणार नाही हा प्रश्‍न आधीच उपरणे आणि एका साडीला गाठ मारुन ठेवून सोडवलेला असतो. त्या प्रिमेड गाठीत दोघे अडकतात त्यालाही पुढच्या रांगेतल्या कुजबुजीचं पार्श्‍वसंगीत असतंच. टिळा लावणे – मुलगी मेकअपला सांभाळत टिळा लावून घेते आता एका बेनला तिच्या मोजपट्टीची उंची अगदीच पुरत नाही. नंतर मंगळसूत्र – क्रॉसचे पेंडंट असलेले नेकलेस तिच्या नाजूक मानेभोवती गुंफले जाते आणि आता मात्र पुढच्या रांगेतल्या निषेधाच्या कुजबुजीचा स्फोट होईल की काय असे वाटते. ‘हे काय अतर्क्य – मंगळसूत्रात काळे मणी नाहीत?’
एव्हाना जैनविधी संपत येतात आणि आता पुढच्या रांगेत अमेरिकन लग्नाविषयीची उत्सुकता ओसंडून वाहत असते. मी मनातल्या मनात आता ह्या कुठची मोजपट्टी वापरणार याच्या विचारात. पुढच्या सेरेमेनीची सुरुवात हलक्याश्या विनोदाने होते. आता ब्राईड आणि ग्रुमला बोलण्याची परवानगी, शपथा घेण्याच्या आधी काही सांगायाचे-बोलायचे असल्यास. ती सुरुवात करते. या होणार्‍या नवर्‍याची भेट कशी-केव्हा-कुठे झाली हे सांगायला सुरुवात करताना तिला पहिला हुंदका फुटतो. त्यांच्या दोघांच्या मैत्रीचे या बंधनात कसे रूपांतर झाले हे सांगताना मात्र तिचा बांध फुटतोच. त्याबरोबर पुढच्या रांगेत हलकेच खुसफूस. आता तिच्या मेकअपची पर्वा न करता ती हमसाहमशी रडू आणि एकीकडे हसूही लागते. रडू आल्याबद्दल सगळ्यांची माफी मागू लागते. आता मात्र माझ्या पुढच्या रांगेत ना कुजबूज-ना खुसफूस. नुसतीच मुसमुस. इतक्यावेळ चेहर्‍यावर असलेली नाराजी पुसलेली. बरे-वाईट, हवे-नकोचे अनुमान-मते गळून पडलेली. चौघींच्या डोळ्यासमोर आता त्या मांडवाच्याऐवजी असतो त्यांच्या लग्नाचा मंडप. त्यांच्या बिदाईची वेळ. भाऊ-बहीण, आई-वडील यांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडलेले त्यांचे फार वर्षांपूर्वीचे पण अजूनही स्वच्छ आठवणारे स्वतःचेच चेहरे. हळूहळू मुसमुस थांबते. मोजपट्ट्या बाजूला राहातात. भानावर येत चौघींचेही मुलगी चांगली आहे हो यावर एकमत झालेले असते. त्या भिन्नधर्मीय-देशीय-भाषीय मुलीच्या अश्रूंनी मांडवातल्या कित्येकांना जिंकलेले असते. एव्हाना एकमेकांना अंगठ्या घालून आणि पहिला किस होऊन दुसराही सेरेमेनी संपलेला असतो. हे सारे प्रसन्न चेहर्‍याने पाहात मांडवात व्हिलचेअरवर बसलेल्या त्र्याण्णव वर्षांच्या ‘बा’ ला, पणजीला दोघांनी खाली वाकून नमस्कार केलेला असतो. तिने मायेने त्यांच्या वरून ओवाळून कानशिलावर मोडलेल्या बोटांचा आवाज सार्‍या मांडवभर घुमतो. आता कुणाच्याच वाईट नजरा-निषेध-मोजपट्ट्यांची नजर या जोडप्याला लागणार नसते.
मांडवात धार्मिक विधींचे रूपांतर सेलिब्रेशनमध्ये कधी होते ते कळतंच नाही. सारा मांडव म्युझिकने भरून जातो. सारी गर्दी जल्लोषात सामील होते. नवी नवरी आता पारंपरिक गुजराती साडीत आणि मुलगा सूट-बूट घालून येतात. माझी नजर त्या चौघींना शोधण्यासाठी भिरभरते. चारी बेन आता मोजपट्ट्या विसरून डान्स फ्लोअरवर नवीनच जोडलेल्या आपल्या गोर्‍या वाह्यांना वेस्टर्न म्युझिकवर गरब्याच्या स्टेप्स दाखवण्यात गुंग असतात.
*************************************************************************************************************

शिल्पा केळकर-उपाध्ये
जगभरातल्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये विविध पदांवर 22 वर्षे कार्यरत. कार्पोरेट क्षेत्रातल्या कामामुळे अनेक देशांना भेटी आणि तिथले अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे मांडतात.
Email: kelkarshilpa@gmail.com
URL: www.facebook.com/shilpa.kelkar.585

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *