Warning: curl_exec() has been disabled for security reasons in E:\HostingSpaces\abab42631\choufer.com\wwwroot\2016\wp-includes\Requests\Transport\cURL.php on line 162
आपले असेच झालेय का?

आपले असेच झालेय का?

शैलेश पांडे

साबणाच्या फॅक्टरीत व्यवस्थित पॅकेजिंग केलेले साबण जसे एकापाठोपाठ एक बाहेर पडतात, तसे प्रत्येक माणसाचे आकारमान, वजन व पॅकेजिंगही समाज ठरवणार. छापखान्यात पत्रके छापली जातात. ती एकसारखी दिसतात. तशी एकसारखी, नाकासमोर पाहून चालणारी माणसं हवीत का समाजाला? प्रत्येक माणूस हे वेगळे रसायन असतो. प्रत्येकाची रचना वेगळी, चेहरा वेगळा, संस्कार वेगळे…
*************************************************************************************************************

‘दि स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या गाजलेल्या ग्रंथमालिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या विल ड्युरंट नावाच्या तत्त्ववेत्त्याने भारताचेही खूप कौतुक केलेले आहे.‘दि केस फॉर इंडिया’मध्ये भारताकडूनच सहिष्णुता, परिपक्वता आणि मानवप्रेमाची शिकवण जगाला घ्यावी लागणार आहे, असे प्रतिपादन तो करतो. हे पुस्तक 1931 साली प्रकाशित झाले तेव्हा भारतात स्वातंत्र्यलढ्याचे पर्व सुरू होते. त्या वेळी हा देश आणि इथली माणसे एका ध्येयाने भारली होती. त्याने या पुस्तकात जे काही लिहिले, ते अगदीच निरर्थक आहे असे नव्हे. त्याच्या प्रतिपादनाला निश्‍चित आधार होता, आहे. परंतु एवढा देदीप्यमान इतिहास असलेल्या देशात सध्या संचारलेले पाखंड पाहिले तर विल ड्युरंटच्या आणखी एका वक्तव्याची आठवण आल्यावाचून राहात नाही. ‘पुरेशा वैचारिक शिक्षणाविणा, परिपक्वतेविना लोकशाहीला अमर्याद ढोंगाचे स्वरूप प्राप्त होते’, असे तो म्हणायचा. हे त्याने भारताच्या संदर्भात म्हटले होते की नाही ठाऊक नाही. भारत देश ड्युरंटची ‘केस फॉर इंडिया’ विसरून ढोंगाबद्दलचे त्याचे प्रतिपादन खरे ठरवण्यासाठी कधीचाच धावत सुटला आहे हे मात्र खरे.
ढोंग… अमर्याद ढोंग… जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ढोंग आणि पाखंड हे आधुनिक भारताचे व्यवच्छेदक लक्ष बनले आहे! हा समाज शिक्षित आहे, असे म्हणता येत नाही. तो परिपक्व आहे असेही म्हणता येत नाही आणि तो विचारी आहे, असे तर अजिबात म्हणता येत नाही. आपल्या समाजात ढोंगाला सामाजिक प्रतिष्ठा आहे. ढोंगाच्या संघटना आहेत. ढोंगाला नेते आणि कार्यकर्तेही आहेत. ढोंगाला जात आणि धर्माचीही साथ आहे. ढोंगासाठी कर्मकांड आहे आणि ढोंगासाठी कथित पुरोगामित्वही आहे. जो ढोंगी नाही, तो एकटा. आपले कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन पूर्णपणे पाखंडाने भरलेले आहे. आर्थिक क्षेत्रात ढोंगाच्या बरोबरीने थोडा मोकळेपणाही आहे. आर्थिक क्षेत्रातली माणसं प्रसंगोपात ढोंगाला थारा न देता बेधडक बोलतात, निर्णय घेतात. तसे इतर क्षेत्रांमध्ये घडत नाही. आपल्या सार्‍या जगण्यावर कथित सामाजिक सभ्यतेच्या नावाखाली नीतिनियमांचा अंकुश आहे आणि हा अंकुश अमूर्त असूनही ‘निरंकुश’ आणि ताकदवान आहे. ‘पॉवर करप्टस् अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्टस् ऍब्सोल्यूटली’, असे जे म्हणतात, ते समाजाच्या बाबतीतही खूपसे खरे आहे. समाजाकडे अधिकार खूप, जबाबदारी शून्य! आणि या अधिकारांच्या अंमलबजावणीला समाजानेच चालीरितींचे नाव द्यायचे, ते समाजाला कसे उपकारक आहे, हेही सांगायचे आणि त्याचे कौतुकही करीत राहायचे… हेच ते अमर्याद ढोंग. व्यक्तींना जबाबदार्‍या खूप, स्वत:च्या जगण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार मात्र मर्यादित.

16-1
आपल्या समाजात माणसांचे जगणे अत्यंत चाकोरीबद्ध आहे. ती चाकोरी अर्थातच समाज नावाच्या अमर्याद शक्तिशाली व्यवस्थेने ठरवून दिलेली… माणसाचे जगणे म्हणजे जणू काही एखाद्या अवाढव्य यंत्राने शिस्तीत चालावे तसे चाकोरीबद्ध. एकही नट-बोल्ट किंवा लिवर इकडेतिकडे व्हायला नको. साबणाच्या फॅक्टरीत व्यवस्थित पॅकेजिंग केलेले साबण जसे एकापाठोपाठ एक बाहेर पडतात, तसे प्रत्येक माणसाचे आकारमान, वजन व पॅकेजिंगही समाज ठरवणार. छापखान्यात पत्रके छापली जातात. ती एकसारखी दिसतात. तशी एकसारखी, नाकासमोर पाहून चालणारी माणसं हवीत का समाजाला? प्रत्येक माणूस हे वेगळे रसायन असतो. प्रत्येकाची रचना वेगळी, चेहरा वेगळा, संस्कार वेगळे… आणि तरी समाजाची अपेक्षा अशी की, प्रत्येकाने साबणाच्या वडीसारखे सुबक – वेष्टणबद्ध जगावे. ज्या वडीचे वेष्टण वा आकार किंवा वजन कमी जास्त होईल, ते समाजाच्या डोळ्यात खुपणार. समाजाने नियम करून दिलेत ना माणसे घडवण्याचे यंत्र चालविण्यासाठी?… तेल-वंगण-नट-बोल्टही दिलेत. मग साबणाची वडीच बाहेर पडली पाहिजे!… जो सुबक वडीसारखा असणार नाही, त्याचे जगणे बहिष्कृतही होऊ शकते. मध्यमवर्गीय माणसांची अशात होणारी परवड तर भीषण असते. मोठ्यांच्या उच्छृंखलपणाकडेही समाज कुतूहलाने पाहणार. पण हाच सामान्य माणसांची बहुसंख्या असलेला समाज, आपल्यासारख्या सामान्याला समजून घेणार नाही. त्याची कितीही फरफट, परवड झाली तरी नाही. एक तर त्याने मुजोर व्हावे किंवा भित्रे… पण, माणसाने प्रामाणिक होऊ नये, मनासारखे जगण्याचा प्रयत्न करू नये!
खरे बोलण्याची शिक्षा मिळू लागली की माणसे खोटे बोलू लागतात. हे छोट्या मुलांच्या बाबतीत खरे आहे, तसे ते समाजाच्या बाबतीतही खरे आहे. एखादे मूल शाळेला दांडी मारून क्रिकेट खेळायला गेले आणि घरी आल्यावर त्याने पालकांना खरे ते सांगितले तर ते नक्की मार खाणार. मार न देता त्याला असे करण्यापासून परावृत्त करता येणे शक्य असते. तसे घडत नाही. मग ते शाळा बंद करते, क्रिकेट खेळते, पण पालकांना सांगत नाही. सारे काही सुरळीत सुरू असते. तसेच समाजाचे आहे. सामाजिक प्राणी म्हणून प्रामाणिकपणाला स्वीकारार्हता नाही, हे लक्षात येताच माणसे दंभाची, ढोंगाची, पाखंडाची पांघरुणे घ्यायला लागतात. प्रत्येक वर्तुळात वेगळे ढोंग… वेगळे पाखंड. सगळे नाटक. पण, सारे कसे सर्वांच्या सरावाचे आणि अपेक्षित असलेले. व्यक्तींचा, समूहाचा हाच सराव मग सार्‍या समाजाच्या सरावाचा होतो. सगळे लोक म्हणजे सारा समाज मग पाखंडाला सरावतो. कुणालाच दंभाचे-पाखंडाचे काहीही वाटत नाही. तोच प्रतिष्ठित समाज व्यवहार बनतो. खरे मांडण्याची – बोलण्याची मुभा नसते. त्याची गरजही नसते. दुसरी बाजू ऐकून घेण्यास कुणी तयार नसतो. प्रश्‍न विचारण्याची मुभा नसते. विशिष्ट लोक किंवा कंपूने जे सांगितले तेच खरे मानावे (किमान म्हणावे) लागते. अशा समाजाचे डबके होते आणि त्याला कुबट वास सुटतो. आपले असेच झालेय का?…
*************************************************************************************************************
शैलेश पांडे
सकाळ वृत्तपत्र समूहाच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक म्हणून कार्यरत. पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत. विविध विषयांवर विपूल लेखन. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
Email: pandeshailesh2003@yahoo.co.in
Mob: 96899 17803

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *