चित्रांकित

प्रभाकर भाटलेकर

खरोखरच आयुष्य मोठी अद्भुत गोष्ट आहे. आपल्याला ते समजलंय असे वाटत असतानाच ते गूढही वाटत असते. कलाकाराने निर्माण केलेली कला आस्वादक रसिकांपर्यंत पोहोचेपर्यंत अपूर्णच म्हणायला हवी. कलाकार आणि आस्वादक हे नातं अद्भुतच. कलाकार जातो तरी त्याची कला मागे राहते. पुढच्या पिढ्यांतील आस्वादकांसाठी. हे नातं अमर आहे.
– प्रभाकर भाटलेकर

*************************************************************************************************************

माणूस जन्मतो… वाढत जातो. कुठल्यातरी वळणावर स्वप्ने जमा करत जातो. पुढच्या काळात काही पुरी होतात, काही होत नाहीत… काही तुटतात. एखाद्या क्षणी आयुष्य निरखून पाहिलं तर गूढच वाटते. एकाच वेळी समजल्यासारखं वाटतं आणि गूढही! हॉलिवूडचा प्रसिद्ध नट एरोल फ्लेन आपल्या आत्मचरित्रात एके ठिकाणी म्हणतो, ‘‘… आम्ही सर्व धमालबाज मित्र जगण्याच्या नुसत्या कल्पनेनेच झिंगलेलो असायचो.’’
माझ्या आयुष्यात जी माणसे आली किंवा मी पाहिली, त्यांच्याविषयी विचार करतो तेव्हा त्यांचा माझ्या आयुष्यावर, मनावर त्यांनी केलेला परिणाम मी निरखायचा प्रयत्न करतो. बरा-वाईट दोन्हीही. सार्‍यांचाच मी चित्रकार असण्याशी संबंध नाही. त्यापेक्षाही मी एक विचार करणारा माणूस घडताना, या माणसांचा त्याच्याशी काय संबंध होता?
माझे वडील कलेशी काहीच संबंध नसलेले. थोडेसे रागीट पण अतिशय माणुसकी आणि सच्चेपणा याचे ते मूर्तिमंत उदाहरणच होते. आई मनोरुग्ण होती. पण तिच्याकडे चित्रकला होती, माझ्या आयुष्यातली ही दोन प्रभावी माणसे.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् (अप्लाईड) मध्ये मी डिप्लोमाचा रिझल्ट घेतला. मी वडिलांना भेटायला माझगावमधल्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्या चेहर्‍यावर समाधान पसरले. खिडकीतून दूर गोदीचा भाग दिसत होता. मोठ्या बोटी, प्रचंड क्रेन्स. त्या पलीकडचे अफाट जग. माझ्यासमोर बसलेले कृष्णाजी सीताराम भाटलेकर.
एकदम सारे स्वप्नवत वाटू लागले. माझे पुढे या जगात काय होणार? मी कोण आहे? माझे शिक्षण संपले होते. आता स्वप्ने आणि व्यवहार यांचे नवीन आयुष्य सुरू होणार होते.
सुरुवातीला दोन-चार नोकर्‍यांत रमलो नाही. अखेर एका नवीनच सुरू झालेल्या जाहिरात कंपनीत रुजू झालो. रस्त्यापलीकडे होता खळाळणारा ब्रीचकँडीचा समुद्र. कंपनीत माझ्या कौशल्याला चांगलाच स्कोप मिळाला. लंच टाईममध्ये मी समुद्र किनार्‍यावर खडकावर जाऊन बसे. काहीबाही विचार करत.

4-chitra-1
दर महिन्याला चांगला पगार मिळत होता ही महत्त्वाची गोष्ट.
एरॉल फ्लेनचे उद्गार आठवायचे. वाटायचं, आयुष्यातली अतर्क्यता, अनिश्‍चितता नशा आणणारी असते का? पण तसे वाटणारे असतात काहीजण थोडेच असतील म्हणा!
आमची कंपनी चर्चगेटला शिफ्ट झाली. त्याचा फायदा झाला. जवळच ‘युसीस’ लायब्ररी होती. आता जहांगीर गॅलरीत फेर्‍या मारता येऊ लागल्या. त्या काळातले ‘माणूस’ हे साप्ताहिक मला फार आवडायचे. मराठी पत्रकारितेचे ते विद्यापीठच होते म्हणा ना! त्यात फ्रान्सच्या इतिहासावर ‘पराजित-अपराजित’ ही लेखमाला चालू होती. एकदा त्यात दि गॉल या फ्रेंच नेत्याचे सुंदर अर्कचित्र पाहिले. कुठल्या तरी विदेशी मासिकामधून बहुधा ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ नुक्स) उचललेले. क्रॉसलाईन शैलीचे ते रेखाचित्र माझ्या मनात घर करून बसले. मला नकळतच त्या शैलीत मी अर्कचित्रे काढायचा प्रयत्न करू लागलो. अतिशय कठीण शैली! केवळ माझ्या स्वत:च्या आनंदासाठी मी चित्रे काढत होतो. बरीच चित्रे जमा झाली. एखाद्या वृत्तपत्रात जाऊन संपादकांना दाखवावी असे काही वाटत नव्हते. पण माझ्या मित्रांनी जबरदस्तीने मला टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसात जायला भाग पाडले. आयुष्यात प्रथमच माझ्या कॉलेजच्या जवळ असलेल्या ‘टाइम्स’मध्ये मी पाऊल ठेवले.
मी ‘संडे रिव्ह्यू’ असा बोर्ड असलेल्या केबिनचे दार ढकलले. आतमध्ये संपादकीय मिटींग चाललेली दिसली. मी घोटाळाच केला होता. सार्‍यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. ‘‘एडिटर?’’ मी चाचरतच विचारले. एडिटर डॅरल डिमॉंटीने जवळ येण्याची खूण केली. माझ्या रेखाचित्रांवरून त्याने भरभर नजर फिरवली नि म्हटले,
‘‘कम टुमारो… देअर इज वर्क फॉर यू!’’ मी उडालोच!
‘संडे रिव्ह्यू’मध्ये माझे पहिले अर्कचित्र आले. कार्ल मार्क्स आणि पुढे दर रविवारी एरॉल फ्लेन म्हणतो ते खरंच! जगणं ही एक नशाच की!
टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवार आवृत्तीत माझी अर्कचित्रे सातत्याने येऊ लागली. कधी कधी अर्कचित्रांऐवजी इलस्ट्रेशन्स, पोट्रेटस् हेदेखील मी करू लागलो. टाइम्सपाठोपाठ इंप्रीन्ट, ऑनलुकर, इंडियन एक्स्प्रेस (रविवार), फ्री प्रेस, लोकसत्ता, ट्रान्सइंडिया अशा अनेक वृत्तपत्रे-मासिकांतून चित्रे येऊ लागली. याव्यतिरिक्त नाटके, सिनेमे (इंग्लिश), एशियाटिक, युसीस, ब्रिटिश कौन्सिल या लायब्रर्‍यांत मी रमून गेलेलो असे. मला असेच काही हवे होते का? हे स्वातंत्र्य, निर्बंध भटकणे, चित्रे काढणे वाटायचे की खरोखर आयुष्य ही अद्भुत गोष्ट आहे. पुढे जेव्हा मी नोकरी सोडल्यानंतर सुरुवातीला पत्नी जरा काळजीत पडली होती. पण माझा जम बसल्यानंतर विशेषत: मी जे करत होतो त्याचा मी आनंद घेतोय ही बाबच तिच्यासाठी समाधानकारक होती. आमच्या दोन मुलांनाही मी कधी कधी घरी असतो याचा आनंदच वाटायचा. कधी मी विचार करत असे. मी हे जे करतो आहे याच्या पलीकडे काय? जेव्हा मी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया, डॉ. झिवागोंसारखे चित्रपट पाहिले तेव्हा त्यातील उच्च अभिनय, कला, निर्मितीमूल्ये पाहून झपाटूनच गेलो. पुढे वृत्तपत्रांतून, दिवाळी अंकांतून मी इंग्लिश चित्रपटविषयक लिखाण केले. चांगल्या साहित्यकृती, चांगली नाटके-चित्रपट तुमच्यावर खोल परिणाम करत असतात. तुम्हाला बदलून टाकतात.
1973 सुमाराची गोष्ट असेल. मी ‘गिधाडे’ नाटक पाहायला गेलो होतो. या नाटकाने वादळ निर्माण केले होते. नाटक संपल्यानंतर आम्ही दोघे बाहेर पडलो.
‘‘जरा चल’’ मित्र म्हणाला. ‘‘कुठे?’’ ‘‘चल तर खरा!’’ आम्ही भटकत ब्रीच कँडीला भुलाभाई बिल्डिंगमध्ये आलो. समोर विजया मेहता उभ्या होत्या. विजयाबाईंनी 40-50 मुलांचा ग्रुप घेऊन थिएटर वर्कशॉप सुरू केले होते. मी त्यात केव्हा मिसळून गेलो कळलेच नाही. बाईंच्या ‘बाई खुळाबाई’ नाटकात मला भूमिका होती. 90 वर्षांच्या म्हातारीच्या भूमिकेतली, नऊवारी साडीतील भक्ती बर्वे आणि बाई खुळाबाई म्हणजे विजयाबाई अजून नजरेसमोर आहेत. विजयाबाई म्हणजे एक अद्भुत मानवी रसायन होतं. त्यांच्याबरोबर असणं हा एक सुंदर संस्कारच होता. तुम्हाला घडवणारा, बदलून टाकणारा. सुमारे अडीच वर्षांनंतर परत माझा मार्ग बदलला. पण आता मी बदलून गेलो होतो. गंभीर झालो होतो. तसाच परत अस्वस्थही. हे सारं माझ्या जवळच्या मित्राबरोबर मी शेअर करायचो. तो म्हणायचा, ‘‘तू अस्वस्थ आहेस?… म्हणजेच तू जिवंत आहेस!’’

4-chitra-2
1979 च्या जुलैत जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या अर्कचित्रांचा ‘वन-मॅन-शो’ झाला. वृत्तपत्रांतून रिव्ह्यूज आले. थोडंसं वलय लाभलं. काहीशा जादा आत्मविश्‍वासाने ऍड एजन्सीमधली नोकरी सोडली. अर्कचित्रे आणि ग्राफिक डिझाईनची फ्री-लान्स कामे धरून करायला सुरुवात केली. बायकोच्या नोकरीमुळे हे डेअरिंग! जहांगीर आर्टच्या परिसरात मला ओळखू लागले होते. रोज मी रुबाबात सिगारेट आणि कॉफीचा आस्वाद घेत (रिकाम्या खिशाने)‘समोवार’मध्ये बसत असे. हाय, हॅलोला खुशीत प्रतिसाद देत असे. मनात ‘पुढे काय?’ याचे चिंतन चालायचे. एकदा अचानक मालविका सिंघवी माझ्यासमोर उभी राहिली.
‘‘तू काय करतोयस. तुला बेहरॅम कॉन्ट्रॅक्टर शोधतोय… ‘इन्किलाब’ गु्रप ‘मिड-डे’ सायंदैनिक सुरू करताहेत… बेहराम संपादक आहे.’’ तिने फरकन टिश्यू पेपर घेतला त्यावर ‘इन्किलाब’चा पत्ता लिहिला आणि माझ्या खिशात तो कोंबून ती घाईघाईने निघून गेली. ‘समोवार’ मालविकाच्या आईच्या मालकीचं होतं.
ताबडतोब मी बेहराम कॉन्ट्रॅक्टर (बिझीबी) समोर ठाकलो. दोन-तीन दिवसांत ‘मिड-डे’ प्रकाशित झाला. माझ्या कॅरिकेचर्ससहीत. देशात जनता पार्टीचे सरकार होते. राजकीय घडामोडी होत होत्या. माझ्या कार्टून्सना वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ग्राफिक डिझाईन्सचे कामही चालू होते. मी मजेत होतो आणि नव्हतोही! आता मुंबईचाच कंटाळा येऊ लागला होता. गोव्यात जाऊन स्थायिक व्हायचे (रोमँटिक) विचार मनात घोळू लागले होते. बायको बिचारी घाबरून गेली. पण माझ्यावर कादंबर्‍यांत वाचलेल्या ट्रान्झिशनच्या धैर्यकथांचा प्रभाव होता ना!
एका मित्राचे गोव्यात काही ऍडव्हर्टायझिंगचे काम होते. मला त्यासाठी त्याने गोव्यात पाठवले. 1985 च्या ऑगस्टमध्ये प्रथमच मी गोव्यात दाखल झालो. मित्राच्या मित्राचे गोव्यात हॉटेल होते. फ्री-स्टे आणि जेवणखाण बाहेर असा दिनक्रम सुरू झाला. काम वेळ खाणारे नव्हते. जे.जे.मधल्या काही मित्रांनी गोव्यात ऍड एजन्सी सुरू केली होती. त्यांना भेटलो. त्यांचा स्ट्रगलच चालला होता. दोन-तीन पत्रकार मित्र होते. पण निराशच होते. एकाला म्हटलं, ‘‘गोव्याने किती ग्रेट (लता मंगेशकर वगैरे) माणसे निर्माण केली.’’ बिअरचे घुटके घेत मित्र म्हणाला,
‘‘ते गोवा सोडून गेल्यामुळे ग्रेट झाले.’’
रोज मी 20-25 रुपयांचे ड्रिंक्स घेत मुक्त चिंतन करत असे. गोव्यात गोवेकरासारखे राहायचे ठरवले होते ना!… रोज नवा बार. असाच एकदा मुक्त चिंतनात असताना एक लांब केस, पांढरी दाढी असलेला माणूस स्कूटरवरून आला. ‘हा बहुधा चित्रकार असणार!’ मी अंदाज केला. मी त्याच्यासमोर जाऊन बसलो. तो मराठीच होता. गंमत म्हणजे गोवा स्कूल ऑफ आर्टस्मध्ये शिकवत होता.
‘‘ओह’’ तो म्हणाला. दामू केंकर्‍यांनी काल तुमचा उल्लेख केला. तुम्ही गोव्यात आला आहात हे सांगितले. मी गोव्यात आल्या आल्या कला अकादमीत केंकर्‍यांना फोन केला होता. डोळे मिचकावत तो म्हणाला, ‘‘दामूचा एक सिक्रेट बार आहे. तो आणि प्रा. रेगे रोज संध्याकाळी तिकडे असतात. उद्या आपण जाऊन धडकू या तिथे.’’
दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही ‘सिएस्ता’ या चिमुकल्या बारसमोर स्कूटर उभी केली व आत शिरलो. फक्त खुर्च्या आणि भिंतीलगत ग्लासेस ठेवायला फळी. मला पाहताच रेगे ओरडले, ‘‘अरे ये येे… कसा आहेस?’’ बराच वेळ चौघांच्या गप्पा रंगल्या. उशिराने मांडवीचा पूल ओलांडून एका ओपन-एअर हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर केंकर्‍यांनी मला माझ्या हॉटेलात सोडले. केंकर्‍यांना कला अकादमीचे प्रमुख म्हणून कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा होता. त्यांच्या गाडीवर गोवा सरकारचा सिंबॉल होता. चार दिवस मी केंकर्‍यांचा पाहुणचार घेतला. गोवा स्कूल ऑफ आर्टमध्ये माझे डेमो-लेक्चर झाले. डीन लक्ष्मण पै यांच्याशी ओळख झाली.
एकदा मित्र म्हणाला, आज आपल्याला उद्योगमंत्री अनंत नायक यांच्या वाढदिवसाला जायचंय. तुझे स्केचबुक बरोबर घेऊन ठेव. आम्ही गेलो. नायकांनी मला स्केचिंगसाठी पोझ दिली. मी त्यांचे पोट्रेट सुरू केले. सर्वत्र कोकणी भाषेत कलकलाट चालू होता. एकदम शांतता पसरली. मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे आले. ‘‘ओह, सम ड्रॉईंग इज गोईंग ऑन!’’ ते माझ्याजवळ माझी कलाकारी बघत बसले. हलकेच पाठीवर थोपटून ‘‘ग्रेट!’’ असा उद्गार काढला. मी माझ्या मित्राला म्हटले, ‘‘तुझं कोकणी मला समजते. हे कोकणी समजत नाही.’’
‘‘माझे कोकणी महाराष्ट्राच्या बॉर्डरजवळचे आहे. यांच्या कोकणीवर कॅनरीज संस्कार आहेत.’’ मग ठिकठिकाणी छोटे हॉल्ट करत आम्ही मित्राच्या घरी जेवायला पोहोचलो तेव्हा माझं डोकं जड झालं होतं. शक्यतो न अडखळता मी मित्राच्या बायकोला अभिवादन करून म्हटलं, ‘‘तुमच्या नवर्‍याला घरी यायला माझ्यापायी उशीर झाला.’’ गोड हसून ती म्हणाली, ‘‘तुमच्यामुळे आज ते घरी लवकर आलेत…’’ जेवताना गप्पा रंगल्या. वहिनींचं मराठी ऐकून मी म्हटलं, ‘‘तुमचं मराठी अगदी शिवाजी पार्कमधलं मराठी वाटतंय.’’ खो खो असून ती म्हणाली, ‘‘माझं माहेर शिवाजी पार्कलाच आहे. लग्नानंतर मी गोव्यात आले.’’
पंधरा दिवसांनंतर मी परत घरी आलो. प्रीतीश नंदींचा ‘टाइम्समध्ये येऊन भेट’ असा निरोप होता.
‘इलस्ट्रेटेड वीकली’ हे टाइम्स ऑफ इंडियाचे बंद पडलेले प्रकाशन परत सुरू झाले होते. प्रीतीश नंदी या कल्पक संपादकाने त्याचे रूप पार बदलून टाकले होते. त्याच्या दुसर्‍या अंकापासूनच माझी अर्कचित्रे त्यात येऊ लागली. प्रीतीशने मला वीकलीच्या स्टाफवर येण्याची ऑफर दिली. ‘‘आय एम नॉट अ जॉईन टू फाईन टाईप’’ मी उत्तरलो. मात्र फ्री-लान्स कॅरिकेचर्स करण्याची संमती दाखवली.
‘…I want you around… be with me !‘ असे त्याने सांगितल्यावर ‘मला वेळेचे बंधन नको’ या अटीवर मी ‘वीकली’मध्ये रुजू झालो. प्रीतीश नंदी एक अफलातून माणूस होता. वीकलीमध्ये माझी बैजू पार्थनशी दोस्ती झाली (बैजू पुढे नावाजलेला पेंटर झाला) ‘टाइम्स’ची सगळी मासिके प्रीतीश नंदींच्या अधिकाराखाली होती. सर्वत्र माझी कॅरिकेचर्स येऊ लागली. एका महान व्यंग्यचित्रकाराने माझ्या कामात अडथळे निर्माण केले. तो व्यंग्यचित्रे काढत असलेल्या टाइम्सच्या खास वृत्तपत्रांत माझी राजकीय व्यंगचित्रे येणे बंद झाले. तसेच ‘टाइम्स’मध्ये पावसाळ्यात जशा भू-छत्र्या उगवाव्यात तसे ‘जळूगिरीग्रस्त’ निर्माण झाले. त्यातील बहुतेकांशी माझी साधी ओळखदेखील नव्हती. हा एक अनुभवच होता. पुढे काही काळाने पूर्वीचे बंद पडलेले ‘इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया’ हे टॅब्लॉईड आकाराचे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात माझी ‘भाटलेकर्स व्ह्यू’ ही व्यंगचित्र चौकट सुरू झाली. त्यातले पहिलेच, बांगलादेशच्या जनरल ईर्शाद यांचे व्यंग्यचित्र अरुण शौरी यांनी माझ्याकडे मागितले. मी खुशीने ते त्यांना (त्यांच्या व्यंग्यचित्रसंग्रहासाठी) दिले.

4-chitra-3
आता मी अर्कचित्र आणि राजकीय व्यंगचित्रे दोन्ही काढू लागलो. ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये माझी राजकीय व्यंग्यचित्रे सुरू झाली. (इथे त्या थोर व्यंग्यचित्रकाराची डाळ शिजली नाही.) महाराष्ट्र टाइम्समध्ये अशोक जैन यांचे दर रविवारी ‘कानोकानी’ हे चुरचुरीत सदर यायचे. त्याच्यासाठीही मी अर्कचित्रे काढू लागलो. पाठोपाठ अरुण टिकेकरांच्या ‘इकडे-तिकडे’ या सदरातही माझी चित्रे प्रकाशित होऊ लागली.
टाइम्समध्ये रुजू होण्यापूर्वीचा एक रोमांचक अनुभव. इंडियन एक्स्प्रेच्या रविवार आवृत्तीसाठी मी चित्रे काढत होतो. आदिल जसावालाच्या मार्गदर्शनाखाली ही दर्जेदार पुरवणी निघत असे. एकदा आदिलने ‘सिक्स रायटर्स इन अ सर्च ऑफ रिडर्स’ असा लेख लिहिला. अरुण कोल्हटकर, सलमान रश्दी, दिलीप चित्रे, अनिता देसाई, जिव्ह पटेल इ. नवीन लेखकांची अर्कचित्रे त्या लेखात होती. तो लेख गाजला.
त्याच आठवड्यात गिरगावातील ‘मौज’ प्रकाशनात जाण्याचे मी ठरविले. मराठी साहित्य विश्‍वात ‘मौज’ प्रकाशनाविषयी आदर व दबदबा होता. प्रथमच मी ‘मौज’च्या त्या जुन्या इमारतीच्या डगमगणार्‍या जिन्याने चढून ‘मौज’च्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. समोर राम पटवर्धन बसले होते. अभिवादन करून मी माझी ओळख करून दिली. ‘‘अहो, तुमची ओळख केव्हाच झालीय.’’ रामभाऊ म्हणाले आणि त्यांनी टेबलाचा ड्रॉवर उघडून आदिल जसावालाच्या त्या लेखाचे पान समोर ठेवले. रामभाऊंशी कायमचे स्नेहबंध जुळले.
काही वर्षे ‘टाइम्स’साठी फ्री-लान्स केल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने अधिकृत ‘कॅरिकेचरिस्ट’ म्हणून मला नोकरीवर रुजू केले. (तोवर मी फक्त कॉन्ट्रॅक्टवर होतो.) चौदा वर्षांनंतर मी निवृत्त झालो. नंतर खाजगी प्रदर्शने आणि डेमो-लेक्चर्सचे महाराष्ट्रात काही दौरे केले.
माझा एक गुजराती उद्योजक मित्र मला सातत्याने अर्कचित्रांचे काम देत असे. एक गमतीशीर प्रसंग. या मित्राची एक बड्या रंग निर्माण करणार्‍या मोठ्या उद्योजक कुटुंबाशी मैत्री होती. एकदा त्या कंपनीच्या वृद्ध मालकाने माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खाजगी पार्टीचे निमंत्रण दिले होते. (‘कृपया भेटवस्तू आणू नयेत’ अशी सूचना छापलेली.) मित्राने मला त्यांचे अर्कचित्र काढायला सांगितले. खुर्चीवर रुबाबात बसलेल्या मालकांच्या हातात भिंत रंगवायचा ब्रश. त्या ब्रशावर डोंगर, झाडे, इंद्रधनुष्य असा चिमुकला सीन. ही भेट त्या मालकाने (अर्थात) आनंदाने स्वीकारली आणि पुढे त्याच्याकडून ‘अर्कचित्रांची’ मोठी ऑर्डर मला मिळाली. हा एक योगच.
लिंटास ऍडव्हर्टायझिंगचे अलेक पदमसी यांच्याकडून कामाचा ओघच सुरू असे, तसेच प्रीतीश नंदी यांच्याकडूनही प्रसिद्ध लोकांना भेट देण्यासाठी सातत्याने अर्कचित्रांची ऑर्डर असे.
मला माझ्या जहांगीर आर्ट गॅलरीत झालेल्या प्रदर्शनावेळेचा एक प्रसंग आठवतो. एक शाळकरी मुलगा परत परत फिरून प्रदर्शन पाहात होता. महंमद अलीच्या अर्कचित्राजवळ तो घोटाळत असे. थांबून पाहात राहत असे. धीर एकवटून तो माझ्याजवळ आला. चित्रांच्या यादीवर चित्रांची किंमत छापली होती. कुठल्याही चित्रासाठी एकच किंमत. त्याने बहुधा यादी पाहिली नव्हती. चाचरतच त्याने ‘महंमद अलीं’च्या चित्राची किंमत विचारली. मी हसतच त्याच्या हातात यादी दिली आणि किंमत दाखवली. तो खट्टू झाला. बहुदा त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तो गेला.
दुसर्‍या दिवशी परत मी त्याला महंमद अलीचे चित्र निरखताना पाहिले. मी हळूच त्याच्याजवळ उभा राहिलो नि विचारले, ‘‘तुला आवडलंय हे चित्र?’’ तो संकोचला व म्हणाला, ‘‘छान आहे!’’ त्याला म्हटलं, ‘‘तू प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी येशील? हे चित्र मी तुला देणार आहे.’’
‘‘…पण सर, त्याची किंमत?’’
‘‘तू मला काही पैसे देऊ नकोस. हे चित्र मी तुला भेट देतोय. पण आता ते मी काढू शकत नाही. येशील ना?’’
तो मुलगा आनंदून गेला व जोराजोरात म्हणाला, ‘‘येईन… येईन!’’ शेवटच्या दिवशी संध्याकाळी सारी चित्रे उतरवताना तो छोकरा आला. महंमद अलीच्या चित्राखाली मी ‘… अमूक यास सप्रेम भेट’ लिहून सही केली. त्याने ते चित्र काळजीपूर्वक पॅक केले. माझ्याशी हस्तांदोलन करीत तो म्हणाला, ‘‘सर थँक्यू व्हेरी मच… सो काईंड ऑफ यू!’’
कधी कधी त्या मुलाची आठवण येते. तो आता मध्यम वयाचा गृहस्थ असेल. त्याच्या आयुष्यातला एक रोमांचकारक क्षण माझ्यामुळे निर्माण झाला याची गंमत वाटते.
खरोखरच आयुष्य मोठी अद्भुत गोष्ट आहे. आपल्याला ते समजलंय असे वाटत असतानाच ते गूढही वाटत असते. कलाकाराने निर्माण केलेली कला आस्वादक रसिकांपर्यंत पोहोचेपर्यंत अपूर्णच म्हणायला हवी. कलाकार आणि आस्वादक हे नातं अद्भुतच. कलाकार जातो तरी त्याची कला मागे राहते. पुढच्या पिढ्यांतील आस्वादकांसाठी. हे नातं अमर आहे.

*************************************************************************************************************
‘अर्कचित्र’ हा कलाप्रकार रुजविण्यात आणि त्याची लोकप्रियता वाढवण्यात भाटलेकरांचा सिंहाचा वाटा आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड विकली, इकॉनॉमिक टाइम्स अशा नियतकालिकांमधून भाटलेकरांनी कॅरिकेरिस्ट म्हणून काम केले.
Email: prabhakarbhatlekar07@gmail.com
Mob: 98332 71640

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *