दोन ओळींच्या दरम्यान

राजेश जोशी
मराठी अनुवाद
– बलवंत जेऊरकर

*************************************************************************************************************
‘जादू जंगल’, ‘अच्छे आदमी’ आणि ‘ठंकारा का गाना’ ही तीन नाटकं, भर्तृहरीच्या कवितांचा अनुवाद’ भूमि का कल्पतरू यह’ आणि मायकोव्हस्कीच्या कवितांचा’ ‘पतलून पहिना बादल’ हे दोन अनुवाद प्रकाशित. समीक्षात्मक लेख, नोटस् याचं एक पुस्तक ‘एक कवि की नोटबुक’ प्रकाशित. हे पुस्तक लिहून त्यांनी आदर्श काव्य- दृष्टीचा वस्तुपाठच घालून दिलाय. कविता लिहिणार्‍यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं आहे. संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं.
कवी म्हणून प्रमुख ओळख असणार्‍या राजेश जोशींचे आत्तापर्यंत पाच संग्रह आले आहेत. ‘एक दिन बोलेंगे पेड’ ‘मिटृी का चेहरा’ ‘नेपथ्य में हँसी,’ ‘दो पंक्तियों के बीच’ आणि ‘चॉंद की वर्तनी’
आत्तापर्यंत त्यांना मुक्तिबोध पुरस्कार (1978), माखनलाल चतुर्वेदी पुरस्कार (1985), श्रीकांत वर्मा पुरस्कार (1986) शमशेर सम्मान (1996), पहल सम्मान (1998), शिखर सम्मान (2001) तर ‘दो पंक्तियों के बीच’ काव्यसंग्रहासाठी 2002 चा ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.
समकालीन कवितेची दिशा आणि दृष्टी बदलण्याचं बरंचसं श्रेय राजेश जोशींना दिलं जातं. हिंदीमध्ये घोषणावजा किंवा आक्रमक कवितेऐवजी त्यांनी सामान्य माणसांच्या सुखदु:खाची कविता लिहिली. या दृष्टीनं त्यांची ‘इत्यादी’ ही कविता फार महत्त्वाची आहे. ‘आठ लफंगे आणि एका वेड्या बाईचं गाणं’ सारख्या कवितेतून त्यांचं कौशल्य पाहात रहावं असं उतरलेलं आहे.
कवितेला ‘बचावलेला विश्‍वासार्ह आवाज’ मानणारे राजेश जोशी असं मानतात की, ‘कविता ही बहुधा आपल्या काळातील असा शेवटचा आवाज जिला बाजार आणि हिंसा अजून कलुषित अणि मार्गभ्रष्ट करू शकली नाही.’
इथे बारा कविता देत आहे… बाकी कविता बोलतीलच…
‘दो पंक्तियों के बीच’ या संग्रहाच्या बलवंत जेऊरकर यांनी केलेल्या ‘दोन ओळींच्या दरम्यान’ या अनुवादासाठी त्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला आहे.

इत्यादी

ज्यांचे काही हुद्दे होते अशा लोकांचा नामोल्लेख होता
बाकीचे सगळे इत्यादी होेते

इत्यादी संख्येनं नेहमीच जास्त होते
इत्यादी घासाघीस करून भाजी विकत घेत होेते आणि
जेवण-बिवण करत खास लोकांच्या भाषणांना जात होते.
इत्यादी मिरवणुकीत जात होते, फलक उंचावून घोषणा देत होते.
इत्यादी लांब रांगांमध्ये उभे राहून मतदान करत होते.
त्यांना सतत या भ्रमात ठेवलं गेलं होतं की तेच
या लोकशाहीत शासन बनवतात
इत्यादी नेहमी आंदोलनात सामील होत असत
म्हणून कधी-कधी पोलिसांच्या गोळीनं त्यांना मारलं जायचं

17-1

जेव्हा ते पोलिसांच्या गोळीनं मारले जायचे
तेव्हा त्यांची ती नावंसुद्धा आम्हाला सांगितली जायची
ज्या नावांनी त्यांना शाळेत घातलं होतं
किंवा ज्या नावांनी त्यातल्या काहीजणांना पगार मिळाला होता

खरंतर इत्यादी प्रत्येक जोखीम पत्करायला घाबरत होते
पण जेव्हा-जेव्हा ते घाबरणं सोडायचे
तेव्हा बाकीचे सारे त्यांना घाबरायचे
इत्यादीच ती सगळी कामं करायचे
ज्यामुळं देशाचा आणि जगाचा कारभार चालायचा
पण त्यांना असं वाटायचं की ही सारी कामं ते
फक्त त्यांच्या प्रपंचासाठी करत आहेत

इत्यादी प्रत्येक ठिकाणी सामील होते,
पण त्यांची नावं कुठंच सामील होऊ शकत नव्हती
फक्त काही माथेफिरू कवींच्या कवितेत
बर्‍याचदा दिसायचे इत्यादी.

मारले जातील

या काळात
नि:शस्त्र आणि निरपराध असणं
सगळ्यात मोठा अपराध आहे.
जे अपराधी होणार नाहीत ते
मारले जातील
जे या वेडेपणात सामील होणार नाहीत ते
मारले जातील

मी एक आवाहन लिहीपर्यंत

मी एक आवाहन लिहीपर्यंत
आग लागलेली असते सार्‍या शहराला
आवाहनाचं मुद्रितशोधन करेपर्यंत
कर्फ्यूची दवंडी देत फिरू लागते गाडी
प्रेसमध्ये आवाहन छापायला जाईपर्यंत
जळून खाक झालेली असतात दुकानं
मारली गेलेली असतात माणसं
आणि जेव्हा छापून येतं आवाहन
आवाहनाची गरज संपलेली असते!

कवीचं काम

बर्‍याचदा दिसायला जी सोपी वाटतात
पण असतात खरोखर गुंतागुंतीची
एका कवीला करायची असतात अशी खूप कामं

उदाहरणार्थ, खूप अवघड कामांपैकी एक अवघड काम म्हणजे
नद्यांच्या खळखळ करणार्‍या आवाजांचा अनुवाद करणं
झाडांच्या सळसळण्याचा आणि हजारो जातीच्या चिमण्यांच्या चिवचिवाटाचा अनुवाद करणं

पहाडं आणि पठारं दोघांचीही भाषा दुर्गम असते
अश्रूंसाठी आपल्या भाषेत कधीच मिळत नसतात
तेवढेच पारदर्शक शब्द

दुबळ्या लोकांच्या दु:खासाठी आणि रागासाठी शोधावे लागतात
कवीला तंतोतंत आणि तितक्याच तप्ततेनं भरलेले शब्द

आणि मौन या शब्दासाठी असा शब्द शोधून काढणं
की शब्दामध्ये लिहिल्यानंतरही तो मौनच वाटेल
यासाठी फार बारीक कारागिरीची गरज असते

आणि हे सगळं फक्त एका कवीच्याच आवाक्यातलं काम आहे!

आठ लफंगे आणि एका वेड्या बाईचं गाणं

इथं झाडं कापली जात आहेत लागोपा
दुष्काळ किंवा महारोगाच्या साथीत जसं लोक सोडून
जातात आपली घरं
सावल्या निघून चालल्या आहेत सोडून आपल्या जागा!

बरोबरीनं सगळी कामं करणारी आठ लफंग्यांची टोळी
टक्कल करून फिरू लागलीय सगळ्या शहरातून
आठ लफंग्यांच्या सोबत फिरतेय एक वेडी बाई
तळ्याच्या काठाला उभं राहून पुटपुटतेय ती
माशांच्या कानात
माशांनो!

कोरडी पडत चालली आहेत तुमची घरं, आता तुम्ही कुठं जाणार?
शेअर बाजाराच्या दलालांचा काळ आहे हा!
धुराला पाहिजे असतं आगीचं घर, माशांना पाण्याचं
सावल्या कुणाच्या ना कुणाच्या आश्रयातच राहू शकतात
नद्यांचा नाही, समुद्रांचा नाही, झाडांचा नाही, पहाडांचा नाही
बाजारांचा काळ आहे हा!

आठ लफंग्यांची टोळी फिरतेय
रस्त्यांची आणि आकाशांची झोप उडवून टाकत
वेडीबाई कधी कधी लपवते चंद्राला तिच्या काखोटीत
आठ लफंग्यांची टोळी गाणं गात फिरते
आकाशगंगेच्या सडकेवर
वेडीबाई कधी कधी तिचे कपडे सुकवायला टाकते
सूर्याच्या पाठीवर

आठ लफंग्यांची टोळी धान्य वाटते शहरात,
उपडे करून ठेवते पाण्याच्या घागरी!
मनसोक्त खायला-प्यायला दिल्यावर वेडीबाई
ठेवून येते चंद्र-सूर्याला आपापल्या जागेवर

एखाद्या कोपर्‍यात बसून ती काढते तिचं गाठोडं
आणि लफंग्यांना वाटते भाकर्‍या!
ना सगा ना सोयरा, ना काम ना धंदा, ना घर ना दर
फक्त एक ठार वेडी बाई मनात येईल तेव्हा दरडावणारी
मनात येईल तेव्हा प्रेम करणारी

या लफंग्यांना तर जन्मत:च सोडून गेले होते त्यांचे आई-बाप
सांगत असते वेडी बाई, मीच
दुधात उगाळून हळकुंड लावलं, बेसनाचं उटणं लावलं!
चिमणीची पिल्लं असती तर गेली असती आकाश व्यापत भुर्र
माशाच्या पोटची असती तर निघून गेली असती नद्या शोधत
खंगाळणारे समुद्र धुंडाळत!
पण हे उडाणटप्पू तर फक्त माझ्याबरोबरच हिंडतात
माझ्या बोकांडी वाढेना का कितीही पोरांचं ओझं
पण हे दोन-तीन पोरंसुद्धा जवळ ठेवून घेणार नाहीत,
सोबत घेऊन जाणार नाहीत.
चिडत वैतागत बडबडते वेडी बाई
आणि हसत बसते लफंग्याची टोळी

आठ लफंग्यांची टोळी रस्त्यावरून चाललेल्या कुणालाही अडवते
बिन शेंड्या-बुडख्याचे प्रश्‍न एकानंतर एक विचारत राहते.
मुलांकडून गृहपाठ पूर्ण करून घेतला की नाही
पतंग आणला, एखादं मैदान साफ केलं
महिन्याचं रेशन आणलं दुकानातून
आईचं औषध आणायला गेला होता दवाखान्यात
वडिलांसाठी नवीन स्वेटर आणला
गल्ली झाडून काढली, एखादं रोपटं लावलं
देवळाच्या दिव्यात तेल घालायला चाललात
घरातला फ्यूज उडालेला बल्ब बदलला की नाही अजून?
चिमण्यांना दाणे टाकले
जनावरांना पाणी पाजलं का नाही?

प्रश्‍न ऐकून वेडी बाई एवढ्या मोठमोठ्यानं हसू लागते
की कधी-कधी तिचं संतुलन बिघडतं
राग आल्यावर डोक्याला जोरजोरात
झटके देऊ लागते वेडी बाई
लफंग्यांची टोळी तेव्हा एक गाणं गाते
आणि हळूहळू वेडी बाई शांत होऊ लागते

तेव्हा वेडी बाई
तिच्या नद्यांच्या उशाला बसून हळूहळू पुटपुटते
खुनी लोकांना घेऊन जावं यमानं, दलालांना पकडून न्यावं पोलिसांनी
वाहा माझ्या नद्यांनो, वाहा
झडून जा जुन्या पानांनो माझ्या कुशीत
उगवा अंकुरांनो, उगवा
परत या माझ्या लाडक्या सावल्यांनो, परत या
माझ्या या लफंग्यांना बसायला जागा द्या, झोपायला जागा द्या!

17-2

वेडी बाई जेव्हा गाणं गाते
लफंग्यांची टोळी मागं-मागं म्हणत जाते.

रात्र कुणाचंही घर नाही…

रात्री-अपरात्री रस्त्यांवर बर्‍याचदा कुणी ना कुणी असं नक्की भेटतं
जो, विसरलेला असतो त्याच्या घराची वाट
कधी-कधी एखादा असाही भेटतो ज्याला ठाऊक असते घराची वाट,
पण त्याला जायचं नसतं घरी
बर्‍याचदा एक म्हातारा मला भेटतो
सांगत असतो की त्याला त्याच्या मुलांनी घरातून हाकलून दिलंय,
तीन दिवसांपासून उपाशी आहे.
मुलांबद्दल सांगतानाही नेहमी रडवेला होतो
आणि आपला फाटका सदरा वर करून दाखवतो
पाठीवरचे वळ सांगतो तो की मुलं लहान असताना मी मुलांवर
कधीच हात उचलला नाही
पण त्याची मुलं त्याला रोज मारहाण करतात
तो म्हणतो की आता परत कधीही
घरी जाणार नाही
पण लगेच त्याला वाटतं की हे वाक्य तो रागात बोलून गेलाय.
अपमानावर स्वार होते एक साशंकता
अचानक एक भीती पसरू लागते मनात
तो लगेचच स्वत:शीच हसतो
दुसर्‍याच क्षणी म्हणतो
की आता या वयात मी कुठं जाणार?
त्याला वाटतंय की मी त्याच्या मुलांना समजावून सांगावं
सांगावं की घ्या त्याला पुन्हा घरात
एका कोपर्‍यात मुकाट्याने पकडून राहील तो
बाजारातून काही आणण्या-करण्याची काम करत जाईल
मुलांना शाळेत सोडण्याचं-आणण्याचं काम तर तो करतोच आहे
कित्येक वर्षांपासून
तो गप्प होतो, थकून खाली बसतो
त्याचं बोलणं संपलंय असं वाटत असतानाच
तो पुन्हा म्हणतो मी आता म्हातारा झालोय
कधी-कधी चिडचिड होते
सगळा दोष मुलांचाच आहे असं नाही
ती मनानं इतकी वाईट नाहीत
परिस्थितीच वाईट आहे पैशाची चणचण असते
लहान लहान मुलं आहेत त्यांना आणि माझ्यावर फार माया आहे त्यांची
माझा तर सगळा वेळ त्यांच्या सोबत जातो
मग एकाएकी तो उभा राहतो आणि म्हणतो
मुलं मला शोधतही असतील
थोड्याच वेळात त्यांच्यापैकी कुणी ना कुणी मला घरी घेऊन जायला येईल
तुम्ही जर माझ्या मुलांपैकी कुणाला ओळखत असाल
तर त्याला काही सांगू नका
सगळं व्यवस्थित होईल

सगळं व्यवस्थित होईल
असं पुटपुटत तो चालू लागतो
रात्र कुणाचंही घर नसते
एखाद्या घर नसलेल्या माणसाचंही नाही
घरातून हाकलून दिलेल्या म्हातार्‍याचंही नाही
माझ्यासारख्या भटक्याचंही नाही

रात्र कुणाचंही घर नसते
तिच्या अंधारात लपू शकतात थोड्या वेळासाठी अश्रू
पण माणसाला लपण्याएवढी जागा देत नाही ती

मला त्या म्हातार्‍याला विचारायचं असतं
पण विचारू शकत नाही
की ज्या दिशेनं चालला आहे तो
त्या दिशेला त्याचं घर आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *