एका मित्राची कथा

भारत सासणे

पाटील घटना सांगताना पुन:प्रत्ययाचं दु:ख भोगत होते, तडफडत होते आणि त्यांना सांगावंसंही वाटत होतं. मला तर त्यांचं अहंकाराचं दु:ख दिसत होतं. पाटील कोणत्या तरी नरकसदृश मानसिक स्थितीत होते. त्यांच्या मुलाने हट्ट धरला, इथे संपलं नाही. शत्रूने मुलाला वश केलं. मुलगा त्यांच्या घरी जाऊ-येऊ लागला. त्यांचं ऐकू लागला, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला. वरपक्षाचा झेंडा उंच राहिला नाही. मानहानीची पाळी आली. शत्रूने मुलगी पाटलाच्या घरात दिली आणि समारंभपूर्वक पाटलांचं नाक कापलं.
– भारत सासणे

*************************************************************************************************************

अर्थात, पाटील हे त्यांचं खरं नाव नाही. ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करतात. कपाळाला टिळा लावतात, गळ्यात माळ घालतात. पांडुरंगाची वारी करतात. पैसेही खातात. अर्थात, असे दुहेरी जीवन अनेकांचं असतं, त्यातून एखाद्यानं स्वत:चं नैतिक जीवन कसं असावं हे ठरविल्यास इतरांना ते ठरविण्याचा हक्क नसता. म्हणून त्यांच्या जीवनपद्धतीला माझं ऑब्जेक्शन नाही. मधूनमधून ते माझे मित्र असतात.
एकदा ते म्हणाले, ‘‘माझं जीवन दु:खमय आहे, वरकरणी मला सगळं आहे, पण सुख नाही.’’ मला अंदाज होताच. कारण त्यांची विचार करण्याची पद्धती परद्वेषावर आधारलेली आहे. हाही वाईट, तोही वाईट. सगळे चोर, भ्रष्ट वगैरे. मी म्हटलं,
‘‘तुम्हाला काय झालं?.. सगळं तर छान आहे!’’
‘‘आहे! चार मुलं आहेत मला आणि उच्चपदस्थ आहेत!’’
‘‘काय करतात?’’
‘‘एक मिलिट्रीत आहे!… एक डॉक्टर आहे!… एक वकील आहे, शेवटचा शिकतोय!’’
‘‘छानच!.. मग प्रॉब्लेम कुठे आहे?’’
‘‘कुपुत्र आहेत, भाडेऽ!’’
मी हादरलो.
‘‘कुपुत्र? का म्हणता असं?’’
‘‘जाऊ द्या!’’
मी अंदाजाने अंधारात तीर मारला.
‘‘तुमच्या मनाविरुद्ध त्यांनी प्रेमविवाह केला असेल.’’
‘‘बरोबर ओळखलंत तुम्ही!’’
मला वाटलं, इतकंच असेल तर हा प्रश्‍न काही फार गंभीर नसेल. पण प्रश्‍न इतका सोपा नव्हता. त्यांनी म्हटलं,
‘‘माझे गुरू मला एक गोष्ट नेहमी सांगतात!… ज्या ज्या वेळेस मी प्रवचनाला गेलो की गुरुजी हीच गोष्ट सांगतात. मला माहीत आहे, ही गोष्ट मला उद्देशून असते. माझ्याकडे त्यांचा इशारा असतो.’’
‘‘काय आहे गोष्ट?’’
त्यांच्या गुरुजींनी सांगितलेली गोष्ट अशी –
एक माणूस होता. त्याला पहिला मुलगा झाला. तो आनंदाने त्याच्या गुरुजींकडे गेला. गुरू म्हणाला, ‘ऍ हॅ!… फार आनंद झाला रे तुला. पुरून टाक!’’ गुरूची आज्ञा. माणसाने मुलाला टोपलीत ठेवलं. त्यावर पाच रुपये ठेवले, (पाचच का ते पाटीलने किंवा पाटीलच्या गुरूने सांगितलं नाही.) मुलाला पुरलं. दुसरा मुलगा झाला. परत तेच. ‘‘पुरून टाक !’’ पुरलं! पाचवा झाला. गुरू म्हणाला, ‘हांऽ आता बारसं कर! आणि रात्री जागा राहा, मग कळेल.’’ माणसाने बारसं केलं. रात्री जागा राहिला. मध्यरात्री चार आत्मे आले. म्हणू लागले, ‘‘तुझा गुरू फार हुशार आहे रेऽ, नाही तर आम्ही आलो होतो तुझ्या पोटी, तुझा सूड घ्यायला!… मी अमुकअमुक, तुझ्या साक्षीमुळे मला फाशी झाली होती. मी अमुकअमुक, तुझा वैरी, तुझा मुलगा होऊन तुझा सूड घ्यायला आलो होतो.’’ वगैरे. पाचवा आत्मा पाळण्यातूनच म्हणाला, ‘‘मी याचा ॠणी आहे. मी याची सेवा करायला आलो!’’ मग त्याला समजलं आपला गुरू असं का करायला सांगत होता, वगैरे.
ही गोष्ट श्रद्धापूर्वक पाटील मला सांगत होते आणि मी ऐकताऐकता थरारून चाललो होतो, कारण इतकी क्रिमिनल गोष्ट मी पूर्वी ऐकली नव्हती. मी म्हटलं,
‘‘या गोष्टीचा तुमचा काय संबंध?’’
‘‘गुरुजींनी मला इशारा दिला आहे! आणि तसंच झालं!’’
‘‘काय झालं?’’
‘‘माझ्या मुलाने शत्रूच्या मुलीशी लग्न केलं!’’
‘‘शत्रूच्या मुलीशी?’’
‘‘हो!… कितीतरी श्रीमंतांच्या मुली सांगून आल्या होत्या, पण त्या नकट्यांची मुलगी दिसली त्याला.’’
‘‘मग?’’
‘‘मोठ्या मुलाने ऐकलं नाही. तिच्याशीच लग्न करायचं म्हणून हटून बसला.’’
पाटील घटना सांगताना पुन:प्रत्ययाचं दु:ख भोगत होते, तडफडत होते आणि त्यांना सांगावंसंही वाटत होतं. मला तर त्यांचं अहंकाराचं दु:ख दिसत होतं. पाटील कोणत्या तरी नरकसदृश मानसिक स्थितीत होते. त्यांच्या मुलाने हट्ट धरला, इथे संपलं नाही. शत्रूने मुलाला वश केलं. मुलगा त्यांच्या घरी जाऊ-येऊ लागला. त्यांचं ऐकू लागला, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला. वरपक्षाचा झेंडा उंच राहिला नाही. मानहानीची पाळी आली. शत्रूने मुलगी पाटलाच्या घरात दिली आणि समारंभपूर्वक पाटलांचं नाक कापलं. लग्नात वरपित्याचा फारसा मानपान झाला नाही. फारसं महत्त्वही दिलं नाही. पाटील तर लग्नाला जाणारच नव्हते. घरचे इतरजण गेले, मग पाटील पती-पत्नी गेले. पाटील यांनी अपमानाचं दु:ख जन्मभर वागवलं आहे. आता मुलगा त्यांचं नाव लावत नाही म्हणे. पाटीलही त्याच्याकडे जात नाहीत म्हणे. आता तो मला मेल्यातच जमा आहे, असे ते सांगतात. त्याने सगळ्या गोतावळ्यात माझं नाक कापलं, असं म्हणतात. त्यावर सोयरा हसतो. माझं अपमानाचं दु:ख कोणाला सांगायचं, असा पाटलांचा प्रश्‍न आहे. त्यांचं म्हणणं की, तो कुपुत्रच निघाला.
मी म्हटलं,
‘‘जाऊ द्या! आपणच मोठेपणा दाखवायचा असतो!… तुम्ही स्वत:हून गेलात आणि नातवाला उचलून घेतलंत तर सगळं दु:ख वाहून जाणार नाही का?’’ मी लेखक असल्याने वरीलप्रमाणे ‘रोमँटिक सोल्यूशन’ सांगण्याचा प्रयत्न केला, पण पाटील वेगळ्याच मन:स्थितीत जगत होते. त्यांनी तीव्रतेने म्हटलं,
‘‘शत्रूच्या नातवाला उचलू? सगळं विसरून?… शक्य नाही!’’
मी गप्प बसलो. तेही शांत बसले, वरकरणी, पण त्यांच्या मनात धगधगत होतंच. दुखावलेल्या संबंधांना त्यांना आयुष्यभर वागवायचं होतं. मुलाने स्वत:च्या पसंतीने लग्न केलं. नेमकं नावडत्या, शत्रूसम माणसाची नकटी मुलगी निवडली, मानहानी करण्याला हातभार लावला, तेव्हा तो कुपुत्रच. काही पूर्वजन्माचं वैर निभवायला झाला आहे. त्याच्याशी आता समेट कसा होईल? गुरूने सांगितलं नसतं समेट करायला? पण ते कुपुत्राची कथा सांगतात प्रत्येक वेळेला आणि पाटलांची गुरूंवर श्रद्धा आहे.
‘‘इतर मुलांचं काय?’’

2-eka-1
‘त्यांचंही तसंच! दुसरा मुलगा डॉक्टर आहे. वेगळा राहतो… त्याची बायको माझा आदर करीत नाही… मीही जात नाही त्याच्याकडे… तिसरा वाटण्या करा म्हणतो. वकील आहे ना! त्याचा डोळा पैशावर आहे माझ्या! चौथा शिकतोय, पण भाडे, सगळे कुपुत्रच!’’
पाटलांचं कुण्या बाबा-महाराजांच्या नादी लागणं मुलांना पसंत नाही. कुणी एक मुलगा कधी त्यांच्या पश्‍चात गुरुजींना भेटून त्यांची कानउघाडणी करून आला. आता गुरुजी त्यांना कुपुत्रांची कथा पुन:पुन्हा सांगताहेत. पाटील त्यांच्यापासून दूर गेलेले त्यांना परवडणार नाही. त्यांचं अध्यात्माचं दुकान चाललं पाहिजे. पाटील अहंकाराच्या अग्नीत जळताहेत. त्यांनी स्वनिर्मित नरक निर्माण करून ठेवला आहे याची त्यांना कल्पनासुद्धा नाही. ते मुलांना पत्रं लिहू शकत नाहीत, नातवांना पाहू शकत नाहीत. स्वत:चा हेका त्यांना शेवटपर्यंत चालवायचा आहे. त्यांनी दु:खाचं जाळं निर्माण केलं आहे. मुलांना, सुनांना ते दु:ख देतच आहेत, स्वत:ही दु:खात आहेत आणि त्यांची गुरूंवर श्रद्धा आहे.
मी बाळबोधपणे म्हटलं,
‘‘जीवनरूपी बागेला श्रद्धारूपी पाण्याने फुलवायचं असतं, पण तुमचं पाणी विषयुक्त दिसतंय. त्यामुळे फुलं उमलली नाहीत, कोमेजून चाललीत.’’
मग मी पुन्हा म्हटलं, ‘‘सुपुत्र आणि कुपुत्र असे शब्द आहेत, तसे कुपिता आणि सुपिता असे शब्द आहेत काय?’’
त्यांना समजलं नाही. ते म्हणाले, ‘‘मी एकदाच विचारलं होतं गुरुजींना, समेट करू का, लेकरांना बघावंसं वाटतं.’’
‘‘मग?’’
‘‘त्यांनीही कुपुत्रांची गोष्ट सांगितली!’’
मी कपाळावर हात मारला मनातल्या मनात. म्हटलं, ‘‘मग?’’
‘‘मग काय? माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. ते माझं योग्य तेच करतील!’’
मी त्यावर विचारलं, ‘‘नातू कधी भेटला?’’
त्यांनी डोळ्यांतलं पाणी दडवलं. आवंढा गिळला आणि म्हणाले, ‘‘एकदा भेटला एका समारंभात. सुनेने पाया पडायला लावलं… आशीर्वाद दिला नाही!’’
मला जाणवलं की, पाटील आता कसल्याशा वेदनेच्या नरकात जगताहेत.
– पाटील यांची कथा मला त्यामुळे मुद्दामच सांगावीशी वाटली तुम्हाला.
*************************************************************************************************************
सासणे यांच्या अनेक दीर्घकथा व लघुकथा प्रसिद्ध आहेत. मानवी मनाचा तळ शोधणारा एक प्रमुख कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे.
Email: bjsasne@yahoo.co.in
Mob: 94220 73833

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *