गो वाइल्ड… केनिया

मंगेश देसाई

नदीपलीकडे विल्ड बिस्टचा म्होरक्या काठावर येत होता, त्याच्यामागे कळप…. काठावर येऊन परत मागे… हा प्रकार बराच वेळ आम्ही पाहत होतो. बर्‍याचवेळा वाटले आता रिव्हर क्रॉसिंग होणार… पण सगळा भ्रमनिरास… कंटाळून आम्ही परतायचा निर्णय घेतला…. परतणार तोच नदीकाठी मोठा आवाज आणि पाठोपाठ जोरदार हालचाली दिसू लागल्या. क्रॉसिंग सुरू झाले. म्होरक्याने पाण्यात उडी घेतल्या घेतल्या अख्खा कळप पाण्यात पडला आणि सुरू झालं बॅटल फॉर लाइफ…
*************************************************************************************************************

मुंबईतून ्आम्ही थेट नैरोबीत लँड केलं. काही वेळातच पुन्हा आमची सफारी चार्टर फ्लाइटनं सुरू झाली. केनियातील नैरोबी शहराचा विस्तीर्ण परिसर…जगातल्या कुठल्याही शहरासारखंच हेशहर. हळूहळू शहर मागे पडत राहिलं. आता जमिनीपासून काही ठराविक अंतरावर चार्टर फ्लाइट उडत राहतेय… इमारतींचं जंगलं मागे पडताहेत. त्यांची जागा गवती कुरणं, खुरट्या जंगलानं घेतलेली असते. हरीण, सिंह, बिबट्या, दिसू लागतात.

18-1
विमानकाही वेळाने उंच उडू लागते. खालचे दृश्य पाहताना नजर यत्किंचितही हटत नाही. सगळ्या कुरणभर काळे काळे ठिपके दिसू लागतात. उत्सुकता ताणते… हे ठिपके आताशा हलू लागल्याचा भास होऊ लागतो. विमान हळूहळू खाली येऊ लागते. काळ्या ठिपक्यांच्या छोट्या चवर्‍या कुरणातून वर उगवून जोरजोराने हलू लागतात. या काळ्याभोर चवर्‍या जंगलभर ढळू लागल्याचा भास होत राहतो. विमान हळूहळू खाली येत राहते आणि बराच वेळ वाटणारे आश्‍चर्य वास्तवात परावर्तीत होते… अरे हे तर ि्वल्ड बीस्ट… शेकडो हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने केनिया ते टांझानिया असे तात्पुरते स्थलांतर करणारे हे विल्ड बीस्ट फक्त मसाई मारा या परिसरातच दिसतात. त्यांच्यासोबतच झेब्य्रांच्या काफिल्याचा कारवॉंही सुरू असतो. फ्लाइट जंगलातच लँड होते आणि आपल्या आजूबाजूला, अगदी काही फुटांच्या अंतरावर हरीण, जिराफ, झेब्रा असं सगळं प्राणीजगत दिसू लागतं. केनियात सर्रास मिळणारा अनुभव.
कोल्हापुरातून बाहेर पडतानाच आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाला जणूयावन्यप्राण्यांची ओढ लागून राहिली होती. मी अनेकदा वाइल्ड लाइफ सफरी केल्या आहेत. केनियाला तर अनेकदा भेट दिलीय. भारतातील प्रमुख जंगल सफरीही आधीच केल्या आहेत. केनियाभेटही झालेलीच होती. मात्र, सोबत ग्रुप असल्यामुळे यावेळच्या टूरची मजा वेगळीच होती. ग्रुपमधल्या प्रत्येकाचा उत्साहही दांडगा होता. या उत्साहाच्या भरातच आम्ही मुंबईहून नैरोबीत कधी लँड केलं ते समजलेच नाही.
जगाच्या पाठीवरील समृद्ध देशांपैकी एक केनिया. ज्याभूमीने या सृष्टीला माणूस नावाची सर्वांगसुंदर भेट दिली, त्या आफ्रिका खंडातील संपन्न जैवविविधता लाभलेल्या देशांपैकी एक. सृष्टीची ही संपन्नता नैरोबीत पाऊल ठेवल्या-ठेवल्याच जाणवू लागते. त्याहीपेक्षा लक्षात राहते ते तेथील लोकांचे आदरातिथ्य. प्रकृतीने कणखर, रफ ऍन्ड टफ असंच म्हणा हवं तर… असा केनियन माणूस अत्यंत विनयशील. आमच्या दहा-बारा दिवसांच्या सफरीत त्यांची ही विनयशीलता प्रकर्षाने जाणवली. अर्थात आपले सगळे अर्थकारण पर्यटकांवरच अवलंबून असल्याची तेथील माणसांना जाणीव असावी. यामुळेच कदाचित ही संस्कृती त्यांच्यात रुजली असावी. ते काहीही असो, आठ दहा-दिवसांत जंगल सफरी घडवताना आमच्या गाइडने हातचे काही राखून ठेवले नाही.
नैरोबीत उतरल्या उतरल्या आमची जंगल सफारी सुरूही झाली. स्वच्छ, सुंदर हवा, भरपूर सूर्यप्रकाश, जुलै ते सप्टेंबरअखेर येथील वातावरण अत्यंत आल्हाददायक. त्यामुळे सफरीची मस्त मजा तर येतेच… अशातच प्रवास सुरू असतो. जगातील सर्वाधिक वाइल्ड लाइफ आपल्याला याच देशात पाहायला मिळते. विशेष म्हणजे आपल्याला वन्यजीवांचे दर्शन सर्वाधिककाळ होत असते. किंबहुना, अनेक ठिकाणी वन्यप्राणी आपल्या अवतीभवतीच असतात. फार्म हाऊस किंवा हॉटेलमधून बाहेर पडले रे पडले की वन्यप्राणी दिसला नाही, असे कधीच होत नाही. भारतीय जंगलात आपल्याला एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शन होईलच असे नाही. वाघ-बिबट्याची तर गोष्टच वेगळी. कारण आपल्याकडील जंगले अत्यंत घनदाट आहेत. त्यामुळे प्राणी दर्शनासाठी आपल्याला तासन्तास नव्हे दिवसरात्र वाट पहात बसावी लागते.
केनियातील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणाल तर तेथील सर्व परिसर हा गवती कुरणांचा. खुरट्या जंगलाचा आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षीदर्शन हरघडी होतेच. फिरायला सहज बाहेर पडले तरी दगडाच्या उंचवट्याआड लपलेला बिबट्या दिसणारच. हरीणसदृश तृणभक्षी, प्राणी-पक्षी तर पावलोपावली दिसतातच. वाइल्ड लाइफ फोटोग्राफरसाठी तर हा परिसर आणि हा काळ अत्यंत सुखावह असतो. केनियाच्या उत्तरेला सांबुरूजंगल आहे. या जंगलाचे वैशिष्ट्य असे की, काही प्राणी हे फक्त सांबुरूमध्येच दिसतात. जगातल्या पक्षीनिरीक्षकांसाठी हा परिसर जणू स्वर्गच. पक्ष्यांच्या जवळपास साडेतीनशे प्रजाती येथे पाहायला मिळतात. किंगफिशर, गिधाडे, डौलदार सोमाली ऑस्टरिच पहावा तो इथंच. भरपूर मोकळा प्रदेश आणि पाहिजे तेवढे वाइल्ड असल्यामुळे हवी तशी फोटोग्राफी करता येते. म्हणूनच जगभरातील वाइल्ड लाइफ फोटोग्राफर येथे दिसतात. आमच्या ग्रुपमधील अनेकांनी येथे फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद लुटला.

18-2
सिंह, बिबट्या, हायनाज, जिराफ, झेब्रा, शहामृग अशी विपुल जंगल संपदा एकाचवेळी पाहता येते म्हणूनच जगभरात केनियाचं आकर्षण आजही मोठ्या प्रमाणात आहे.
मारा नदीकाठचा दृश्यानुभव आमच्या ग्रुपमधील प्रत्येकासाठी आनंददायी आणि तितकाच आश्‍चर्यकारक ठरला. डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील दृश्य पाहतानाचे भीती, आश्‍चर्य आणि आनंद असे व्यामिश्र भाव मला सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होते. मी अनेकदा केनियातील जंगल सफारी केल्या. पण, माझ्यासोबतच्या ग्रुपमधील बहुतेकजण पहिल्यांदाच असे दृश्य अगदी काही अंतरावरून पाहत होते. हा दृश्यानुभव देता आला, याचा आनंद मलाही होताच. केनियातील आठ दहा दिवसाच्या सफरीत असे अनेक प्रसंग आम्हाला अनुभवता आले.
आता आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल, अशा अनुभवाविषयी…
तुम्ही रिसॉर्टच्या डेकवर आहात किंवा दमून-थकून रात्री झोपला आहात. काही वेळाने रूममधील अलार्म वाजतो. तुम्ही बाहेर येता. रिसॉर्टसमोरील लेकवर काहीशी हालचाल जाणवते. नजर रोखली जाते… समोरचे दृश्य पाहताना स्वतःवरच विश्‍वास बसत नाही… ज्याला पाहण्यासाठी आपण हजारो किलोमीटर दूर आलेलो असतो तो सिंह, बिबट्या किंवा आफ्रिकन हत्ती कधी-कधी यांची अख्खीज फॅमिलीच तुमच्यासमोर अवघ्या काही अंतरावर असते. अशाच एका रिसॉर्टवर आम्हालाहत्ती दिसला. अबर्डियस रिजनमध्ये भेट दिली, तेव्हा अर्थातच कोलबस मंकीने दर्शन दिले. तोंडावर पूर्ण पांढरे केस आणि शरीराच्या दोन्ही बाजूला केसाळ पट्टे असलेले हे वानर जगात केवळ याच भागात पाहायला मिळते. किंबहुना, तो येथील काही प्रदेशनिष्ठ प्राण्यांपैकी एक महत्त्वाचा प्राणी. दिवसभरची भटकंती करून आम्ही तेथील द आर्क या खासगी मालकीच्या अभयारण्यात रात्री मुक्कामाला होतो. जेवणं आवरुन बहुतेकजण झोपेच्या तयारीत होते. काहीजण उगीचंच बेडवर लोळत पडले होते. तोपर्यंत अलार्म वाजला. अलार्मबाबत आधीच कल्पना दिल्याने पटापट सगळे रुमच्या बाहेर आले. लेकच्या दिशेने सगळ्यांनीच नजरा फेकलेल्या. अंधारात काही डोळे चमकू लागले. निरखून पाहिले तर समोर भव्य आणि डौलदार गजराज. अगदी काही अंतरावरून हा आफ्रिकन भव्य प्राणी पाहताना अनेकजण हर्षोल्हासात न्हाऊन गेले…

18-3 - Copy
क्रॉसिंग आणि बॅटल फॉर लाइफ
सांबुरू जंगलात विल्ड बीस्ट मायग्रेशन होते. मसाईमाराचे वैशिष्ट्यच हे की येथे वील्डबीस्ट मायग्रेशन होते ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत. लाखोंच्या संख्येने विल्डबीस्ट मायग्रेट होत असतात.या कळपाबरोबर झेब्रेही मोठ्या संख्येने असतात. त्यांचे हे जणू सहजीवनच. विशेष म्हणजे आधी विल्ड बीस्ट रिव्हर क्रॉसिंग करतात आणि मग झेब्रे… रिव्हर क्रॉसिंगच्यावेळेचे थ्रील केवळ शब्दातीत. कळपाने येणार्‍या विल्ट बिस्टचा एक म्होरक्या असतो. रिव्हर क्रॉस कधी करायची, हे तो ठरवतो. त्याच्यामागे मग अत्यंत गतीने बाकीचे क्रॉसिंग करतात. प्राणीप्रेमींसाठी हा एक वार्षिक उत्सवच. क्रॉसिंगचे थ्रील न अनुभवता केनिया सोडणे म्हणजे जंगलात गेलो आणि वाघच पाहायला न मिळण्यासारखे. म्हणून काही क्षणभर का असेना क्रॉसिंग पाहायला मिळावे, यासाठी वाइल्ड लाइफ टुरिस्ट मारा नदीकाठी तासन्तास थांबून राहतात. आम्हीही बराचवेळ माराकाठी थांबलो होतो. क्रॉसिंग आता पाहायला मिळेल, मग पाहायला मिळेल या विचारात बराच काळ जात हो्ता. सगळ्यांच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्सुकता दिसत होती. नदीपलीकडे विल्ड बिस्टचा म्होरक्या काठावर येत होता, त्याच्यामागे कळप…. काठावर येऊन परत मागे… हा प्रकार बराच वेळ आम्ही पाहत होतो. बर्‍याचवेळा वाटले आता क्रॉसिंग होणार…पण सगळा भ्रमनिरास…कंटाळून आम्ही परतायचा निर्णय घेतला….परतणार तोच नदीकाठी मोठा आवाज आणि पाठोपाठ जोरदार हालचाली दिसू लागल्या. क्रॉसिंग सुरू झाले होते. म्होरक्याने पाण्यात उडी घेतल्या घेतल्या अख्खाग कळप पाण्यात पडला. मोठ्या विल्ड बीस्टबरोबर त्यांची पिलंही रिव्हर क्रॉस करीत होती. त्यांच्या आईचा त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न… पाण्यात पडल्या-पडल्या सुस्त पडलेल्या मगरीही तुटून पडू लागल्या. एकीकडे जीव वाचवण्याचा तर दुसरीकडे पोटासाठी… असा दोन्ही बाजूला जीवनसंघर्ष. जबरदस्त थ्रील…, सगळ्या नदीभर प्रचंड घुसळण…

18-3
काहीवेळांनी ही घुसळण थांबली… समोरचे दृश्य पाहवत नव्हते. शेकडोंच्या संख्येने वील्ड बिस्ट वाहत येत होते. पाठोपाठ आकाशात घिरट्या घालणारे गिधाडांचे कळप…बॅटल फॉर लाइफ काय असते, ते प्रत्यक्ष पाहताना सगळ्यांच्याच अंगावर शहारे, बहुतेकांचा थरकाप उडालेला, मात्र त्याचवेळी क्रासिंग पाहण्याचा आनंदही…सगळे विल्ड बीस्ट अलीकडे रिंगण करून उभे होते. पिले हरवलेल्या आया रिंगणभर फिरत होत्या. पिलांसाठी आक्रोश सुरू होता. काहींची पिलं सापडत होती… काहींची सापडत नव्हती…ज्यांची सापडली त्या पिलांचं आईला बिलगणं, अवखळपणे चावा घेत आईच्या कुशीत जाण्याचा प्रयत्न असं सगळं सुरू होतं…ज्यांची पिलं सापडली नाहीत ती अर्थातच नदीला अर्पण झाली होती, त्यांच्या आयांचा आक्रोश तर सुरूच होता, मात्र कारवॉं सुरू राहणं गरजेचं होतं, काही वेळानं हा काफिला पुढे जात राहिला…पुन्हा एका संघर्षासाठी…
केनिया सफरीच्या अशा आठवणींसोबतच आम्हीही परतलो…

18-4
*************************************************************************************************************

मंगेश देसाई
निसर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये देश व विदेशातील अनुभवी पर्यटनतज्ज्ञ म्हणून ख्याती. गो वाइल्ड या पर्यटन संस्थेतर्फे अनेक पर्यावरणपूरक सहलींचे देश-विदेशांत आयोजन.

Email: mangeshdesai86@gmail.com
Mob: 75886 97822

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *