Warning: curl_exec() has been disabled for security reasons in E:\HostingSpaces\abab42631\choufer.com\wwwroot\2016\wp-includes\Requests\Transport\cURL.php on line 162
ग्रेट भेट : मंतरलेले दिवस

ग्रेट भेट : मंतरलेले दिवस

राम जगताप
ज्याच्या घरी लहानपणी दारिद्य्रामुळे टीव्ही नव्हता आणि आता विशिष्ट वैचारिक भूमिकेमुळे नाही असा माणूस ध्यानीमनी नसताना न्यूज चॅनेलमध्ये जातो आणि तिथे काय काय शिकतो, कुठले कुठले गमतीशीर अनुभव घेतो; निळू फुले, लालन सारंग, पाडगावकर, अमरापूरकर, प्रभावळकर, मुणगेकर यांच्या वेगळेपणाचे कोणकोणते पैलू टिपतो या विषयीचा लेख…
*************************************************************************************************************

गरिबीमुळे एकेकाळी आमच्या घरात टीव्ही नव्हता. मराठवाड्यातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेडेगावात आम्ही राहत होतो. आई-वडील शेतमजूर होते. आम्हा तिघा भावांना शाळेला सुट्टी असेल तेव्हा शेतमजुरी करावी लागे. बारावीनंतर पुण्यात शिकायला आलो. 1999 ते 2007 या काळात नोकरी करत शिक्षण पूर्ण केलं. एसटीडी बुथ, दही-ताकाचं दुकान, लोणच्याचा कारखाना अशा ठिकाणी काम करत असल्याने स्वस्तातल्या स्वस्त कॉटबेसिसचा पर्याय निवार्‍यासाठी निवडावा लागला. तिथे पाणी, वीज, स्वच्छता, अन्न, पुरेसा उजेड यांचीच मारामार असल्याने टीव्ही ही दूरची गोष्ट होती. मात्र, साहित्याचा विद्यार्थी असल्याने आणि लहानपणापासून वाचनाचा छंद असल्याने वाचनाची आवड मात्र प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन चिकाटीने जोपासली होती. त्याच वेळी पत्रकारितेमध्ये जाण्याचाही विचार करत होतो. नशिबाने बी.ए.नंतर पत्रकारितेचा कुठलाही अभ्यासक्रम वगैरे करावा न लागता पुण्याच्या दै. प्रभातमध्ये नोकरीला लागलो.
मात्र मला टीव्ही माहीतच नव्हता असं नव्हतं. गावी असताना रामायण-महाभारत आणि शुक्रवार-शनिवारचे चित्रपट पाहण्यापुरते आम्ही शेजारी-पाजारी जायचो, पण पुण्यात आल्यावर तीही सोय उरली नव्हती. कारण महाविद्यालयातल्या मित्रांपैकी जवळपास राहणारं कुणीच नव्हतं. थोडक्यात, वयाच्या पंचविशीपर्यंत टीव्हीला माझ्या आयुष्यात नगण्य म्हणावं इतकंच स्थान होतं, पण 2007 साल उजाडलं आणि या वर्षानं मला थेट आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये काम करण्याची संधी दिली. तोवर वृत्तवाहिनी ही संकल्पना बरीचशी ऐकून माहीत झाली होती, पण मराठी वृत्तवाहिन्या फारशा कधी पाहिल्या नव्हत्या.
त्या वेळी मी दै. प्रभातच्या नोकरीचा राजीनामा देऊन डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या सत्याग्रही विचारधारा या मासिकाचा सहसंपादक म्हणून रुजू झालो होतो. माझं ललित आणि ललितेतर वाचन बर्‍यापैकी होतं. तसंच वृत्तपत्र आणि नियतकालिकाच्या नोकरीनं वेगवेगळ्या लेखक आणि कार्यकर्त्यांशी काही प्रमाणात संपर्कही येत होता; त्यांचं लेखन वाचत असल्यामुळे त्यांच्याबद्दल उत्सुकताही होतीच. याच दरम्यान प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान यांच्याशी चांगली ओळख झाली. त्यामुळे त्यांच्या स्वारगेटजवळील अक्षर मानव या संस्थेच्या कार्यालयात अनेकदा सुशील धसकटे या मित्रासह जात असे. आम्ही त्यांना गुरुजी म्हणत असू. एके दिवशी ते आम्हाला म्हणाले, डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी त्यांना आमची मदत हवी होती. आम्ही तरुण होतो आणि काहीतरी तरी करून दाखवण्याची ऊर्जाही होती. त्यामुळे इतक्या मोठ्या स्तरावर आणि इतक्या कर्तृत्ववान लोकांसंदर्भात काहीतरी करायला मिळणं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. ही मुलाखत घेण्यासाठी म्हणून सुरुवातीला राजू परुळेकर आणि किशोर कदम यांची नावं गुरुजींच्या डोक्यात होती; पण नंतर काय झालं माहीत नाही. परुळेकर-कदम यांच्याऐवजी गुरुजींनी निखिल वागळे यांच्याशी बोलणं केलं, पण त्यांचा निश्‍चित होकार येण्याआधी गुरुजी मला आणि सुशीलला म्हणाले, वागळे यांनाही जमलं नाही, तर ही मुलाखत तुम्हीच दोघांनी घ्यायची आहे. तुम्ही तयारी करा. तेव्हा एकाच वेळी आनंद, भीती, दडपण या तिन्हींचा साक्षात्कार आम्हाला झाला, पण गुरुजी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मग मात्र आम्ही कसून तयारी केली. लागू-तेंडुलकर यांचं आणि त्यांच्याशी संबंधित सगळं बारीक-सारीक वाचून प्रश्‍न काढले; पण वागळेंनी होकार दिला. त्यामुळे आमच्यावरचं गंडांतर टळलं.
त्या वेळी आम्हाला निर्भीडपणा आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे निखिल वागळे यांचं आकर्षण होतं. त्यांचं दै. महानगर सतत चर्चेत असल्यामुळे, तसंच मीही तोवर पत्रकारितेत प्रवेश केला असल्यानं वागळे यांना पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची उत्सुकता होती. मुलाखतीचा दिवस निश्‍चित झाल्यानंतर मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी वागळे यांना बालगंधर्वला घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर आणि सुशीलवर येऊन पडल्याने ही संधी आयतीच चालून आली. मग आम्ही ठरलेल्या वेळेच्या तासभर आधीच वागळेंकडे गेलो. त्यांनी आमची अगत्यानं विचारपूस केली. त्यांनी 50 पन्नासेक प्रश्‍न काढले होते. तरी कुठले प्रश्‍न विचारायला हवेत, असं तुम्हाला वाटतं असं त्यांनी आम्हाला विचारलं. त्यावर आम्ही काढलेले प्रश्‍न आम्ही त्यांना ऐकवले. त्यावर ते म्हणाले, तुम्हीही चांगली मुलाखत घेतली असती.
लागू-तेंडुलकरांच्या मुलाखतीच्या सुरुवातीला एक गंमतशीर प्रसंग घडला. मी आयबीन-लोकमतमध्ये जाण्यासाठी हाही प्रसंग तितकाच कारणीभूत आहे, असं आताशा विचार करताना मला अनेकदा वाटतं. बालगंधर्व गच्च भरलेलं होतं. लोक कानाकोपर्‍यांमध्येही उभे होते. लागूंच्या तब्येतीमुळे कार्यक्रमाला थोडा उशीरही झाला होता. अशा वेळी प्रास्ताविक करण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आणि सुशीलनं माईक हातात घेतला; पण इतक्या लोकांसमोर बोलण्याची त्याची पहिलीच वेळ असल्याने तो बावरला आणि परत परत तेच तेच बोलायला लागला. त्यामुळे मुख्य कार्यक्रम लांबत चालला. ही परिस्थिती माझ्या लक्षात आली. त्या वेळी मला काय झालं माहीत नाही, पण तो बोलत असताना मी मध्येच व्यासपीठावर गेलो, त्याच्या हातून जवळजवळ माईक काढून घेतला आणि दोनच वाक्यात प्रास्ताविक संपवून पुढची सूत्रं वागळेंकडे दिली. कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रमानंतर निवडक लोकांसाठी डेक्कन जिमखान्यावर पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत वागळे यांना आम्ही पत्रकारितेविषयी बरेच प्रश्‍न विचारले. त्यांनीही त्याची मनमोकळेपणानं उत्तरं दिली. पार्टी संपल्यावर वागळे यांना लॉ कॉलेज रोडवरच्या त्यांच्या हॉटेलवर सोडायला गेलो, तेव्हा वागळे मला म्हणाले, मी मेपासून एका नवीन वृत्तवाहिनीचा संपादक म्हणून जॉईन होतो आहे. तू मला मेनंतर फोन कर. ते ऐकून मी हवेत तरंगतच माझ्या हॉस्टेलवर आलो.
महिनाभराने मुंबईला जाऊन वागळे यांना भेटलो. कॅमेर्‍यासमोर टेस्ट दिली. माझी निवड झाली आणि तोवर आयुष्यात स्थान नसलेला टीव्ही एकदम आयुष्याच्या केंद्रस्थानी आला!
सुरुवातीला सहा-सात महिने आमचं ट्रेनिंग होतं. त्यात टीव्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या संहितालेखनापासून ते कॅमेरासंदर्भातल्या तांत्रिक गोष्टींपर्यंत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच दरम्यान चॅनेलचं स्वरूप बर्‍यापैकी निश्‍चित करण्यात आलं. त्यात ग्रेट-भेट हा दिग्गजांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठरला होता. या मुलाखती वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे स्वत: घेणार होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, चित्रपट, कला, नाटक, उद्योग-व्यवसाय असा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात घेतल्या जाणार होत्या. तासाभराच्या या मुलाखतीमध्ये संबंधित व्यक्तीला त्याच्या क्षेत्राबद्दल, कामाबद्दल बोलतं करणं, तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणं हा त्यामागचा हेतू होता.

11-1
या मुलाखतींसाठी रिसर्च करणारी आणि इतर को-ऑर्डिनेशन करणारी टीम वेगळी होती. चॅनेल सुरू झाल्यावर पहिलीच ग्रेट-भेट झाली ती प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची. तोवर मराठी वृत्तवाहिन्यांवर तासाभराची मुलाखत घेतली जात नव्हती. इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर अशा मुलाखती होत, पण मराठी वृत्तवाहिन्या याबाबतीत मागे होत्या. आयबीएन लोकमतच्या पहिल्याच मुलाखतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एवढंच नव्हे, तर पुढच्या चार-पाच वर्षांमध्ये ग्रेट-भेट हा मुलाखतीचा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय झाला. (गेल्या वर्षी वागळे आयबीएनमधून बाहेर पडले आणि ग्रेट-भेटही बंद झाले.)
माझी आयबीएन लोकमतमधील कारकीर्द तशी छोटीच. 11 ऑक्टोबर 2007 रोजी मी जॉइन झालो आणि 17 जानेवारी 2009 रोजी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. वृत्तवाहिनी सुरू झाल्यावर काही दिवसांनी स्वतंत्र फीचर्स विभाग सुरू झाला आणि सगळेच फीचर्स शो त्या विभागाकडे गेले. माझाही रवानगीही त्याच विभागात झाल्याने ग्रेट-भेट, टॉक टाइम अशा विविध कार्यक्रमांसाठी रिसर्च आणि इतर नियोजन करणे हाच माझ्या दैनंदिन कामाचा भाग झाला. या काळात ग्रेट भेटच्या पंधरा-वीस मुलाखतींचा रिसर्च आणि इतर को-ऑर्डिनेशन करण्याची संधी मला मिळाली.
6 एप्रिल 2008 रोजी वृत्तवाहिनी सुरू झाली. लहान गावातून आल्याने एकूण मुंबईच्या मानसिकतेत मी बसत नव्हतो. त्यामुळे मी सतत बुजलेला असायचो. त्यात कॅमेराचा विचार किंवा त्याला सामोरं जाणं या तर त्यावेळी माझ्यासाठी स्वप्नवत म्हणाव्यात अशाच गोष्टी होत्या. त्यामुळे सुरुवातीला मला फारसं काहीच जमत नव्हतं, पण नंतर हळूहळू जमायला लागलं. एखादी गोष्ट मुळापासून जाणून घेण्याची वृत्ती स्मार्टनेसइतकीच महत्त्वाची असते आणि ती माझ्याकडे होती, हे हळूहळू उमजत गेलं. स्मार्टनेस कमावता येतो आणि माझ्या परीने तो मी गरजेपुरता या कारकिर्दीत कमावला.
दिलीप प्रभावळकर
पहिल्या तीन ग्रेट-भेटींनंतर प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ग्रेट-भेट करायचे ठरले. एके दिवशी वागळेंनी मला बोलावून प्रभावळकरांच्या मुलाखतीसाठी रिसर्च करायला सांगितलं. वास्तविक वागळेंना प्रभावळकरांबद्दल सगळं माहीत होतं. त्यामुळे वेगळ्या रिसर्चची त्यांना गरज नव्हती, पण त्या वेळी हे मला माहीत नव्हतं. खरंतर ते मला त्यांच्या परीने चाचपतच होते. पुन्हा वागळे यांचा ऑफिसमध्ये इतका दरारा होता की, त्यांना काही विचारणं शक्यच नव्हतं. मला तर मुलाखतीसाठीच्या रिसर्चची फारशी कल्पनाही नव्हती. दुसरं असं की, तोवर दृश्य माध्यमाशी संपर्क नसल्याने प्रभावळकर यांचे फारसे चित्रपटही मी पाहिले नव्हते आणि त्यांच्या मालिकाही पाहिल्या नव्हत्या. मात्र, त्यांचं एका खेळियाने हे आत्मकथन प्रकाशित झाल्याचं मला माहीत होतं. दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाण्याआधी मी प्रभावळकरांचं आत्मकथन विकत घेतलं. पुढच्या दोन दिवसांत ते वाचून पन्नासेक प्रश्‍न तयार केले. ते वागळेंना दिले. ते पाहून ते म्हणाले, अरे, असा रिसर्च करायचा नसतो आणि इतके प्रश्‍न काढायचे नसतात. मात्र, माझ्या इतक्या तपशीलवार रिसर्चमुळे ग्रेट-भेटचा रिसर्च मी आत्मसात करू शकलो असतो, असा आत्मविश्‍वास त्यांना माझ्याबद्दल वाटला असावा.
ही मुलाखत दादरच्या स्वामीनारायण मंदिरासमोरच्या एका हॉटेलमध्ये करायचं ठरलं होतं. या मुलाखतीसाठी प्रभावळकर यांना त्यांच्या शारदाश्रमातल्या घरी जाऊन घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मला एकाच वेळी उत्साही वाटत होतं आणि मी बावरूनही गेलो होतो. मुलाखतीची जी वेळ ठरली होती, त्याच्या पंधरा-वीस मिनिटं आधी प्रभावळकर यांना घेऊन यायला वागळे यांनी मला सांगितलं होतं, पण मी उत्साहाच्या भरात दीडेक तास आधीच प्रभावळकरांच्या घरी गेलो. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जाण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्यामुळं त्यांचं घर पाहण्याची मला मोठी उत्सुकता होती आणि त्याची साधारण भरजरी कल्पनाही मी केली होती. धडधडत मी त्यांच्या घराची बेल वाजवली. स्वत: प्रभावळकर साध्या कपड्यात दार उघडायला आले. अगत्यानं आत बोलावून त्यांनी बसायला सांगितलं. सोफ्यावर काहीसा अंग चोरून बसत मी त्यांच्या हॉलभर नजर फिरवली आणि माझी निराशा झाली! त्यांचं घर साधंच होतं. कुठेही उंचीपणा दिसत नव्हता. प्रभावळकर यांनी माझी जुजबी चौकशी केली. मुलाखतीसाठी घालायचे पाच-सहा शर्ट त्यांनी आधीच काढून ठेवले होते. ते एका बॅगेत भरून आम्ही निघालो. वागळे आणि प्रभावळकर यांना एकमेकांचा चांगला पूर्वपरिचय असल्याने, तसंच प्रभावळकरांनी वागळेंसाठी अनेक प्रकारचं लेखनही केलेलं असल्याने मुलाखत छानच झाली. प्रभावळकर यांनी कितीतरी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्याने त्यांची काही छायाचित्रं मिळाली तर, ती मुलाखतीमध्ये वापरण्याची कल्पना आमच्या कॅमेरा टीमने मांडली. त्यानुसार मी पुन्हा शारदाश्रमात त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधल्या छायाचित्रांची सीडी घेऊन आलो. त्यातली काही चित्रं आम्ही मुलाखतीमध्ये वापरली. ही मुलाखत ज्या दिवशी प्रसारित झाली, त्या दिवशी मुलाखतीच्या शेवटी श्रेयनामावलीत माझंही नाव झळकलं.
त्यानंतर मी आयबीन सोडेपर्यंत जवळजवळ प्रत्येक ग्रेट-भेटचा रिसर्च केला. हा रिसर्च जास्त परिपूर्ण करण्यासाठी, प्रसिद्ध व्यक्तीच्या ठरावीक आणि सर्वज्ञात पैलूंच्या पलीकडचे पैलू जाणून घेण्यासाठी, तसंच मुलाखत वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी त्या व्यक्तीशी संबंधित लहान-मोठ्या सगळ्या व्यक्तींशी, चाहत्यांशी बोलणं आवश्यक असल्याचं दरम्यानच्या काळात मला जाणवत गेलं. या लोकांचे मूड्स, ते मुडी होण्यामागची वलयाशी संबंधित किंवा वैयक्तिक कारणंही मला काही प्रमाणात कळत गेली. तसंच त्या-त्या व्यक्तीचं योगदान आणि कर्तृत्व, गाव, परिसर, घर आणि एकंदर काम या माध्यमांमधून कॅमेराद्वारे अधोरेखित करताना अशा चौफेर रिसर्चचा उपयोग व्हायला लागला.

मेधा पाटकर

त्यानंतर मेधा पाटकर यांच्या मुलाखतीच्या रिसर्चचं काम माझ्याकडे आलं. मुलाखत गांधीभवनला ठरली आणि त्यांना गांधीभवनला घेऊन जाण्याची जबाबदारीही माझ्यावरच सोपवलेली होती. त्या दिवशी मेधाताई वांद्राच्या तहसील कार्यालयात कामासाठी जाणार होत्या. तिथून त्यांना घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी जायचं होतं. त्यानुसार मी ऑफिसची गाडी घेऊन तहसील कार्यालयात गेलो. मेधाताई नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या गराड्यात होत्या. त्यांच्या अडी-अडचणी, गार्‍हाणी ऐकून घेत होत्या. काहींना सल्ले देत होत्या. मध्येच कुणाशीतरी राजकारणावर हिरीरीनं बोलत होत्या. धीर करून मी त्यांना भेटलो आणि मुलाखतीच्या वेळेची त्यांना कल्पना दिली. त्यांनी पंधरा-वीस मिनिटांत निघू म्हणून सांगितलं आणि त्या पुन्हा कार्यकर्त्यांच्या गराड्यात सामील झाल्या. अर्धा तास झाला, एक तास झाला, पण मेधाताईंचं बोलणं संपेना. मला टेन्शन यायला लागलं. मग मी त्यांच्या एक-दोन कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन त्यांना मुलाखतीच्या वेळेची कल्पना दिली. मग त्यांनी मेधाताईंना कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर काढत गाडीत बसवलं. तरीही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलण्यासाठी धडपडच होते. त्यांचा कसाबसा निरोप घेत आम्ही गांधीभवनच्या दिशेने निघालो.
दोन-अडीच तास नॉन स्टॉप मेधाताई कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यामुळे आता मुलाखतीसाठी त्यांच्याकडे ऊर्जा असेल का?, असा मला प्रश्‍न पडला होता; पण गांधीभवनला पोहोचल्यावर मेधाताई पाच-दहा मिनिटांत तयार झाल्या. पुढे दीड तास त्यांनी वागळेंना खणखणीत मुलाखत दिली. तोच जोश, तोच आवेश आणि तीच पोटतिडीक! असं म्हणतात की, लोकशाहीत लोक रस्त्यावर जास्त उच्चरवाने बोलतात, लाऊड होतात; पण मेधाताई मात्र रस्त्यावर, स्टुडिओमध्ये किंवा घरीही सारख्याच तळमळीने बोलत असणार याची त्या दिवशी मला खात्री पटली.

सदाशिव अमरापूरकर

मला वागळेंनी अमरापूरकरांच्या मुलाखतीचा रिसर्च करायला सांगितलं, तेव्हा त्यांच्याबद्दल मला विशेष काही माहीत नव्हतं. त्यांचे काही चित्रपट मी पाहिले होते तेवढंच! मात्र एव्हाना ग्रेट-भेटबाबत ऑफिसमध्येही खूप उत्सुकता निर्माण झाली होती. पुढची मुलाखत कोणाची?, असं सहकारी विचारत असायचे. या वेळी अमरापूरकर असल्याचं सांगितल्यावर प्रॉडक्शनमध्ये काम करणार्‍या श्रीकांत आगवणे या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दलची बरीच माहिती सांगायला सुरुवात केली. त्यात सिंहगडाच्या पायथ्याशी अमरापूरकरांचं शेत असल्याचं आणि तिथे ते सेंद्रिय शेती करत असल्याचंही त्याने सांगितलं. ही माहिती नवीन आणि त्यांचा एक वेगळा कोन उघड करणारी होती. प्रत्यक्ष मुलाखतीत अमरापूरकरांनी जपानी लेखक मासानोबु फुकुयोका यांचं ’एका काडातून क्रांती’ हे नैसर्गिक शेतीविषयीचं पुस्तक वाचून ते भारावून गेल्याचं आणि त्यातून सिंहगडाच्या पायथ्याजवळ अर्धा एकर शेत विकत घेऊन तिथे शेतीत केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल सांगितलं.
त्यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची तोवर काही अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्यामुळे त्यांच्याशीही बोललो. त्यांनी अमरापूरकर खूप वाचतात असं सांगितलं. तेव्हा शंकर सखाराम यांची सेझ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली होती. तिची चर्चाही चालू होती. ती अमरापूरकर यांनी ताबडतोब मागवून घेऊन वाचली होती. आमच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा यांची अमरापूरकरांची मुलगी रीमाशी चांगली ओळख होती. म्हणून मग रिमाशीही फोनवर बोललो.
याशिवाय अमरापूरकरांचा वेगवेगळ्या सामाजिक चळवळी, संघटनांमधला सक्रिय सहभाग वागळेंना चांगल्या प्रकारे माहीत होता. त्यामुळे ही मुलाखत चांगली झाली.
मुलाखतीसाठी प्रॉडक्शन टीमवर मुलाखतीचं ठिकाण ठरवून त्यानुसार कॅमेरा टीमसोबत नियोजन करण्याची जबाबदारी असे. त्यात कधी कधी गमतीजमती घडत. अमरापूरकर अंधेरीला राहत होते. त्यांच्या घरापासून जवळचं ठिकाण प्रॉडक्शन टीमने निश्‍चित केलं. ती जागा म्हणजे डान्स क्लासचा हॉल होता. हा हॉल पहिल्या मजल्यावर होता, पण त्याच्या खाली मासे, मटण यांची दुकानं होती. त्यामुळे हॉलला पोहोचण्याच्या वाटेत दुर्गंधी, माशा यांचं साम्राज्य होतं. नेहमीप्रमाणे माझ्यावर अमरापूरकरांना मुलाखतीच्या ठिकाणी घेऊन येण्याची जबाबदारी होती. त्यानुसार मी ठरलेल्या वेळी त्यांना घेऊन आलो. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि माश्यांच्या थव्यांनी आमचं स्वागत केलं. अमरापूरकरांच्या चेहर्‍यावर नापसंती उमटली, पण ते काही बोलले नाहीत. आम्ही तसेच हॉलच्या दिशेने चालायला लागलो. मला शरमल्यासारखं झालं होतं. आमच्या टीममध्ये मीच वयाने लहान होतो, त्यामुळे बहुधा हा राग कुठलाही दोष नसताना माझ्यावर निघणार, अशी मला भीती वाटायला लागली. तसंच इथे मुलाखत द्यायला अमरापूरकर नकार देतात की काय!, अशीही धास्ती वाटत होती; पण ते काही न बोलता माश्यांच्या थव्यांमधून आणि मटणांच्या दुकानांच्या वाकड्यातिकड्या रांगांमधून वाट काढत हॉलमध्ये आले. त्या हॉलमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्यांव्यतिरिक्त काहीच नसल्याने मुलाखतीसाठी याच खुर्च्या वापराव्या लागल्या. पण त्या सपाट, कुठलंही रंगरूप नसलेल्या आणि अंधार्‍या हॉलच्या एका कोपर्‍यात कॅमेरे लावून आमच्या कॅमेरा टीमने छान लायटिंग केलं आणि मुलाखतीसाठी उत्तम कॉम्पोझिशन तयार केलं. त्यांनी लावलेल्या फ्रेम पाहून आम्ही जसा खालचा प्रकार विसरून गेलो, तसेच बहुधा अमरापूरकही गेले असावेत. कारण नंतर ते खूप छान बोलले.

मंगेश पाडगावकर

पाडगावकरांची मुलाखत घ्यायची आहे, तू त्यांच्याशी बोलून दिवस आणि वेळ ठरवून घे, असं मला वागळेंनी सांगितल्यावर मी पाडगावकरांशी आधी फोनवर बोललो. तेव्हा पाडगावकरांनी तुम्ही मुलाखतीचं मानधन देणार का?, असा मला प्रश्‍न केला. तोवर मुलाखत देण्यासाठी मानधन घेण्याबाबत कुणी बोललं नसल्यामुळे मी एकदम गडबडून गेलो. तरी संपादकांशी बोलून सांगतो, असे म्हणून मी फोन ठेवला आणि वागळेंना जाऊन सांगितलं. वागळे म्हणाले, काही हरकत नाही, आपण त्यांना पाच हजार रुपये देऊ. मी अकाउंट विभागाशी बोलतो. ते तुला त्यांच्या नावाचा चेक देतील, तू तो त्यांना उद्याच नेऊन दे. त्यानुसार दुसर्‍या दिवशी मी त्यांच्या सायनच्या घरी चेक घेऊन गेलो. खरं तर तोवर मी कामाच्या निमित्तानं पाडगावकरांच्या घरी दोन वेळा गेलो होतो. त्यामुळे माझी पाडगावकरांशी थोडीफार ओळख झाली होती.
पाडगावकरांना थोडं कमी ऐकू येत असे. त्यामुळे मुलाखत निखिल वागळे घेणार असल्याचं त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं. मुलाखत तासाची असेल, त्यात तुमच्या एकंदर साहित्यप्रवासाबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. कुठलेही वादग्रस्त प्रश्‍न विचारले जाणार नाहीत, ग्रेट-भेट हा कार्यक्रम उखाळ्यापाखाळ्या करणारा नसून तो व्यक्तिमत्त्व दर्शन घडवणारा कार्यक्रम आहे. हेही मी पाडगावकरांना सांगितलं. त्यांनीही होकार दिला. या मुलाखतीसाठी प्रॉडक्शन टीमनं ठाण्याच्या घोडबंदर रोडवरचं एक रिसॉर्ट निवडलं होतं. त्याचा मालक पाडगावकरांचा चाहता असल्याने त्याने मोठ्या आनंदाने आम्हाला शूट करण्याची परवानगी दिली. मधोमध छोटंसं तळ आणि त्याच्या सभोवताली उतरत्या छपरांखाली बसण्याची सोय अशी या रिसॉर्टची रचना होती. उजव्या बाजूला रस्ता तर डाव्या बाजूला हिरवागार डोंगर होता. आभाळ सकाळपासूनच ढगाळलेलं होतं, पण पाऊस येईल असं वाटत नव्हतं. मी ठरलेल्या वेळी पाडगावकरांना घेऊन रिसॉर्टवर पोहोचलो. वागळेही आले. कॅमेरा टीमने नेहमीप्रमाणे उत्तम कॉम्पोझिशन केलं होतं. मेकअप आर्टिस्टला पाडगावकरांना मेकअप करायला सांगून त्यांना तयार केलं. मुलाखतीच्या जागी त्यांना खुर्चीत नेऊन बसवलं. समोरच्या खुर्चीत वागळे येऊन बसले, तोच पाडगावकर आश्‍चर्यचकित झाल्यासारखे म्हणाले, वागळे, मी तुम्हाला घाबरतो. तुम्ही माझी मुलाखत घेणार असाल, तर मला मुलाखत द्यायची नाही. मला वाटलं, हा राम जगतापच माझी मुलाखत घेणार आहे म्हणून मी होकार दिला होता, असं म्हणून ते थेट खुर्चीतून उठले. या प्रसंगामुळे आम्ही सगळेच अवाक झालो. मी त्यांना कसंबसं खुर्चीत बसवलं. त्यांना पुन्हा आठवण करून दिली की, मी नाही, वागळेच मुलाखत घेणार होते. या मुलाखतीचं स्वरूप व्यक्तिदर्शन असेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पाडगावकरांचा स्वभाव तसा भिडस्त असल्याने ते नाइलाज म्हणून बसले; पण आमच्यावर एकदम ताण आला. आता ही मुलाखत कशी होते देव जाणे! असं वाटायला लागलं. वागळेंनी शांतपणे प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. पाडगावकर सावधपणे उत्तरं देत होते. त्यांची साशंकता अजून कमी झाली नव्हती. दरम्यान मुलाखतीच्या नादात आमचं आभाळाकडे लक्षच नव्हतं. एकाएकी टपटप पाऊस पडायला सुरुवात झाली. तसा वागळेंनी पाऊस, त्यावरच्या पाडगावकरांच्या कविता यांचा विषय काढला. तसे पाडगावकर खुलले. त्या उतरत्या छपरावरून दोन्ही बाजूंनी पाऊस निथळत होता आणि त्याखाली पाडगावकर पाऊस, प्रेमकविता यांच्याविषयी त्याही वयात दिलखुलासपणे बोलत होते.
मुलाखत संपेपर्यंत पाऊस थांबला नाही. कॅमेरा टीमने निवडलेल्या मुलाखतीच्या फ्रेममध्येही पावसाने शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे ही मुलाखत खूप चांगल्या प्रकारे शूट झाली. पाडगावकर छान बोलले आणि वागळेंनीही त्यांना बोलू दिले. त्यामुळे या मुलाखतीमध्ये पाडगावकरांच्या कवितांसारखाच रसरशीतपणा उतरला. नंतर रिसॉर्टच्या मालकांनी पाडगावकर आणि त्यांच्यामुळे आमचंही चांगलं आदरातिथ्य केलं. मग पाडगावकर आणखीनच खूश झाले. नंतर मी त्यांना गाडीनं त्यांच्या घरी सोडून आलो. आमच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा यांनी पाडगावकरांच्या दोन कवितासंग्रहांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यासाठी त्यांच्या प्रती माझ्याकडे दिल्या होत्या. एरवी मला कधी लेखक-कलावंतांसोबत छायाचित्रं काढून घ्यायचं सुचत नाही की, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर स्वाक्षरी घेण्याचंही लक्षात राहत नाही, पण ज्ञानदानं तिचे संग्रह दिल्यामुळे मीही माझ्याकडचे दोन संग्रह सोबत घेऊन गेलो होतो. मुलाखतीमुळे पाडगावकर इतके खूश झाले होते आणि इतके भरभरून बोलत होते, कविता ऐकवत होते की बस्स! लहान मुलासारखा निरागस उत्साह त्यांच्यात संचारला होता. त्यांना थांबवावंसं वाटत नव्हतं, कारण त्यांच्या तोंडून त्यांच्याच कविता ऐकणं हा अविस्मरणीय अनुभव होता. मी कशाबशा त्यांच्या हातात जिप्सी, बोलगाणी, भटके पक्षी आणि सलाम या चार कवितासंग्रहाच्या प्रती स्वाक्षरीसाठी ठेवल्या. त्यांनी बोलगाणीच्या प्रतीवर स्वाक्षरी करून तारीख लिहिली. मला वाटलं, पाडगावकर पुढच्या प्रतींवरही फक्त स्वाक्षरीच करतील, म्हणून मी त्यातल्या माझ्या प्रती कोणत्या आणि ज्ञानदाच्या कोणत्या हे त्यांना सांगितलं नाही, पण नंतरच्या तिन्ही प्रतींवर प्रिय राम जगताप, आशीर्वाद असं लिहून त्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे जिप्सी आणि भटके पक्षी हे दोन्ही ज्ञानदाचे कवितासंग्रह माझ्याच मालकीचे झाले!

विक्रम गोखले

विक्रम गोखले यांची मुलाखत विठ्ठल कामत यांच्या अंधेरीच्या हॉटेलमध्ये घ्यायचं ठरलं होतं. या मुलाखतीसाठी रिसर्च मीच केला होता, पण गोखले यांना मुलाखतीच्या ठिकाणी घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. ते स्वत:च येणार होते. त्यामुळे आम्ही तीनेक तास आधीच हॉटेलमध्ये जाऊन मुलाखतीसाठी वॉटर टँकला लागून असलेल्या एका कोपर्‍यातल्या जागेची निवड केली. गोखले ठरलेल्या वेळी आले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा ऍटिट्यूड होता. त्याच ऍटिट्यूडमध्ये त्यांनी मुलाखत दिली. आपण मालिकांमधल्या आपल्या भूमिकांचे संवाद दिग्दर्शकाशी बोलून कसे बदलून घेतो, त्याच्यासाठी प्रसंगी कसे भांडतो, मालिका किती टुकार पद्धतीने केल्या जातात अशी वेगवेगळ्या प्रकारची परस्परविरोधी मतं त्यांनी मांडली. ते काहीशा तोर्‍यात आले, त्याच तोर्‍यात बोलले आणि त्याच तोर्‍यात मुलाखत संपल्यावर निघूनही गेले. मुलाखत चालू असताना वॉटर टँकमध्ये छोटी मुलं पाणी उडवत खेळत होती. त्यांचे काही पालकही पाण्यात उतरून उगाच स्वत:ला ओलं करून घेत होते. फाइव्ह स्टार हॉटेलमधला वॉटर टँक तो, त्यात पोहण्याची, खेळण्याची गंमत ती किती असणार! गोखलेही तसेच वाटले!!

आशुतोष गोवारीकर
आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाखतीचा रिसर्च करताना ऑफिसमधल्या एका सहकार्‍याने त्यांचे वडील निवृत्त ट्रॅफिक इन्स्पेक्टर असल्याचं सांगितलं. इंटरनेटवरून गोवारीकर यांच्या चित्रपटांविषयी, त्यांच्या इंग्रजीतील मुलाखतींविषयीची बरीच माहिती मला मिळाली होती. शिवाय त्यांचे चित्रपट पाहणार्‍या ऑफिसमधल्या काही सहकार्‍यांशीही मी बोललो. मग वाटलं की, त्यांच्या वडिलांशीही बोलावं. त्यांच्या घरच्या फोनवर फोन केला. गोवारीकरांचे वडील जरा करारी वाटले. त्यांनी सुरुवातीलाच मला सुनावलं आशुतोषची मुलाखत घेणार आहात, तर मग मला कशाला फोन केलात? त्यावर मी त्यांना सांगितलं, ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची असते, त्याच्या घरातल्या व्यक्तींशी, मित्रांशी आम्ही बोलतो. त्यामुळे आजवर उलगडले न गेलेले त्या व्यक्तीचे काही पैलू समोर येतात. शिवाय ही मुलाखत व्यक्तिदर्शन घडवणारी आहे. त्यामुळे तुमच्याशी बोलणं गरजेचं आहे. त्यावर ते म्हणाले, तुम्ही पत्रकार लोक बोलण्यात पटाईत असता आणि कामात शॉटकट मारण्यात माहीर असता! तुम्हाला माझ्याकडून माहितीच हवी आहे, तर तुम्ही माझ्या घरी या. मी म्हातारा माणूस आहे. फार वेळ फोनवर बोलू शकत नाही. आमच्याकडे वेळ कमी होता. शिवाय त्यांच्या घरी जाऊन येण्यात एक दिवस खर्च झाला असता. एरवी मी तेही करायचो, पण नेमकं त्या वेळी मला इतर कामांमुळे ते शक्य नव्हतं. म्हणून मी चिकाटीनं, पण आर्जवी सुरात त्यांना म्हणालो, तुमच्या घरी नक्की येतो, पण आत्ता मला थोडीशी बेसिक माहिती हवी आहे. ती तरी सांगा. असं म्हणून मी त्यांना बोलण्यात गुंगवलं. तेही स्वतःच्या कर्तबगार मुलाबद्दल अभिमानानं सांगायला लागले. पाच-दहा मिनिटांची ऐंशी-नव्वद मिनिटं कशी झाली होती, ते त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं आणि आलं, तेव्हा माझं काम जवळपास झालं होतं. हे लक्षात आल्यावर ते म्हणाले, तुम्ही भारीच हुशार निघालात! खरं तर मी ट्रॅफिक इन्स्पेक्टर असताना मला चकवून जाता येणं कुणालाही शक्य झालं नव्हतं, पण तुम्ही मात्र मला बोलण्यात गुंगवून सगळी माहिती माझ्याकडून काढून घेतलीत. आता तुम्हाला भेटलंच पाहिजे. तुम्ही आता आमच्या घरी चहा प्यायला या. मीही होकार दिला. नंतर मुलाखत झाली; पण गोवारीकरांच्या घरी जाण्याचं राहूनच गेलं.

सुभाष अवचट

अवचटांची मुलाखत घ्यायचं ठरलं, तेव्हा मी त्यांना भेटायला त्यांच्या साहित्य सहवासमधल्या घरी गेलो. मी गेलो तेव्हा ते त्यांच्या स्टुडिओत काम करत होते. तिथेच त्यांनी मला बोलावलं. मुलाखतीचं स्वरूप, कालावधी, तिच्या प्रसारणाची वेळ वगैरे प्राथमिक गोष्टी बोलून झाल्यावर मला वाटलं की, त्यांच्या या स्टुडिओमध्येच त्यांची मुलाखत का घेऊ नये! मी तसं अवचटांशी बोललो. त्याला त्यांनी तत्काळ होकार दिला, पण तो साहित्य सहवासमधला अगदी छोटा फ्लॅट असल्याने कॅमेरे लावायला अडचण आली असती, असं मला वाटत होतं. शेवटी ही जबाबदारी मी कॅमेरा टीमवर सोपवायचं ठरवलं, पण टीमला त्यात काही अडचण वाटत नव्हती. त्यामुळे तीच जागा नक्की केली. दिवस, वेळ ठरवली, पण नेमक्या मुलाखतीच्या दिवशी ज्ञानदा म्हणाली, आज मी जाते. तू ऑफिसमध्येच थांब. मी थांबलो. ज्ञानदा प्रॉडक्शन आणि कॅमेरा टीमसोबत अवचटांकडे गेली, तेव्हा ते स्टुडिओमध्ये काम करत होते. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहीत नाही; पण मला दोनेक तासांनी अवचटांचा फोन आला. या कोण बाई आहेत? माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलत आहेत? माणसाला साधी पूर्वसूचना देण्याचं सौजन्य त्यांना पाळता येत नाही? यांना तू कशाला पाठवलंस? मला मुलाखत द्यायची नाही. ही मुलाखत कॅन्सल करा. तुमच्या कॅमेरामन्सना आणि या बाईंना माझ्या स्टुडिओमधून बाहेर जायला सांगा. अवचट फारच संतापले होते. नेमकं काय झालं होतं, ते मला ऑफिसमध्ये बसून कळायला मार्ग नव्हता, पण त्यांच्या बोलण्यावरून त्यांचं ज्ञानदाशी चांगलंच वाजलं असावं!
ऐन वेळी ही नौबत आल्यानं मोठाच पेचप्रसंग उभा राहिला होता. दरम्यान ज्ञानदानं वागळेंना फोन करून अवचट मुलाखत कॅन्सल करण्याविषयी सांगत असल्याची माहिती दिली. वागळेंनी मला फोन करून झाल्या प्रकाराबद्दल खडसावलं; पण मी काय सांगणार? प्रत्यक्ष मुलाखतीच्या ठिकाणी ज्ञानदा होती, मी ऑफिसमध्ये होतो आणि वागळे त्यांच्या माहीमच्या घरी होते. मला काही कळेना. शेवटी अर्ध्या तासानं अवचटांचाच फोन आला. त्यांनी मुलाखतीला होकार दिला, पण त्या वेळी मी तिथं हजर असण्याविषयी बजावलं. मी ताबडतोब गाडी घेऊन साहित्य-सहवासमध्ये गेलो. नंतर वागळे आले. अखेरीस अवचटांच्या रोखठोकपणामुळे मुलाखत चांगली झाली.

11-2
नामदेव ढसाळ

ढसाळ अंधेरीला शास्त्रीनगरमध्ये राहत होते. त्या काळात मी सतत त्यांच्याकडे जात असे. त्यामुळे ढसाळ, मलिकाताई यांच्याशी चांगली ओळख झाली होती. ढसाळांचा अघोरी आग्रह आणि मलिकाताईंचं अगत्य यांचा अनुभव त्यांच्या घरी गेलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला येत असे, पण त्यांच्या घरावर ढसाळांच्या मायस्थेनिया ग्रेविस या असाध्य आजाराची एक अदृश्य छाया पसरलेली असे. तिचं सावट सतत जाणवत असे. ढसाळांच्या लहरीपणामुळे त्या आजाराचं गांभीर्य मलिकाताईंकडूनही ऐकायलाही मिळे. एकदा खुद्द ढसाळांनी सांगितलं होतं की, हाताच्या मुठीत वाळू भरून घेतली आणि ती मूठ उंचावर धरली, तर खालून वाळू हळूहळू निसटून जात शेवटी मूठ रिकामी होत जावी, तसा हा आजार आहे. माझा जीव हळूहळू माझ्या शरीरातून निसटून जातो आहे. हे ऐकताना मी हादरलो होतो.
ढसाळांची ग्रेट-भेट करायचं ठरलं, तेव्हा त्यांना सोयीचं पडेल असं त्यांच्या घराजवळचंच ठिकाण निवडायचं ठरवलं. त्यानुसार दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र हे स्थळ नक्की केलं. ढसाळांची मिळतील तेवढी पुस्तकं वाचून मी माझा रिसर्च पूर्ण केला. मुलाखतीच्या दिवशी मी प्रॉडक्शन आणि कॅमेरा टीमसोबत त्या ठिकाणी गेलो. या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. त्याच्या एका कोपर्‍याचं कॉम्पोझिशन चांगलं वाटल्यानं त्याची मुलाखतीसाठी निवड करून कॅमेरा, प्रकाशयोजना यांची मांडणी केली. बर्‍यापैकी तयारी झाल्यावर मी ढसाळांच्या घरी गेलो. मुलाखतीसाठी म्हणून ढसाळ एक रंगीबेरंगी शर्ट घालून बसले होते, तर मलिकाताई त्यांना म्हणत होत्या, हा शर्ट नको. तो चांगला दिसत नाही. तो काढून टाक. मी तुला दुसरा शर्ट देते. तो घाल. ढसाळ काही ऐकायला तयार नव्हते. मलिकाताई मात्र त्यांना पुन्हा पुन्हा शर्ट बदलण्याचा आग्रह करत होत्या. त्यांनी मलाही ढसाळांना शर्ट बदलण्याविषयी सांगायला सांगितलं. मी म्हणालो, अहो, त्या म्हणता आहेत तर बदला. तसाही हा शर्ट कॅमेर्‍यासमोर चांगला दिसणार नाही. त्यावरून प्रकाश रिफ्लेक्ट होईल. मग शेवटी त्यांनी तो शर्ट बदलला. आम्ही निघालो. दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात आलो. तिथं आल्यावर आमच्या लक्षात आलं की, वरच्या मजल्यावर जायला लिफ्ट नव्हती. डॉक्टरांनी ढसाळांना पायर्‍या चढायला मनाई केली होती. आली पंचाईत! त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, त्यांना तुम्ही पायर्‍या चढण्याचा आग्रह करू नका. लिफ्ट नसल्याचं आणि पायर्‍याही बर्‍याच असल्याचं पाहून ढसाळही म्हणाले, आपण मुलाखत कॅन्सल करू. नंतर दुसर्‍या ठिकाणी करू. त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीनं ठीक असलं, तरी गेले तीन-चार तास आमच्या प्रॉडक्शन आणि कॅमेरा टीमने खपून मुलाखतीची सगळी तयारी केली होती. असं असताना ऐन वेळी मुलाखत रद्द करणं परवडणार नव्हतं. म्हणून आम्ही ढसाळांना सुचवलं की, आम्ही तुम्हाला उचलून वर नेतो. पण ते त्यालाही होकार देईनात. आणखी दुसरा पर्याय दिसत नव्हता. म्हणून आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह करायला लागलो की, मुलाखतीची तयारी करायला दहा-बारा माणसांचा एक दिवस खर्च होतो. त्यामुळे आता मुलाखत रद्द केली, तर सगळ्यांची मेहनत वाया जाईल. तसं करू नका. आम्ही तुम्हाला अलगद वर उचलून नेतो. ढसाळांना उचलून वीस-पंचवीस पायर्‍या चढणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, पण मुलाखत गुंडाळण्यापेक्षा हा पर्याय जास्त चांगला होता. शेवटी हो-नाही करता करता ढसाळ वर यायला तयार झाले, पण त्यांना उचलून नेण्याला त्यांनी विरोध केला. तसं करणं त्यांना बहुधा मानहानीकारक वाटत असावं. मग त्यांचा ड्रायव्हर, मी आणि इतर सहकार्‍यांनी त्यांच्या दोन्ही हातांना आधार देत त्यांना सावकाश चालवत वरती नेलं. त्या वीस-पंचवीस पायर्‍या चढेपर्यंत ढसाळांना चांगलाच घाम आला. त्यामुळे आम्ही काळजीत पडलो, पण ढसाळ शांत होते. ते पाच-दहा मिनिटं शांत बसून राहिले. थकवा कमी झाल्यावर त्यांनी मला तयारीची खूण केली. मग त्यांचा मेकअप करवून घेऊन वागळेंनी मुलाखतीला सुरुवात केली. काही वेळापूर्वी वरती येण्यासाठी आम्हाला काकुळतीला आणणार्‍या ढसाळांनी नंतर स्वतःच्या बालपणीचे अस्पृश्यतेचे दाहक अनुभव सांगून आम्हाला रडवलं! ते वास्तव इतकं दाहक होतं की, वयाच्या त्या टप्प्यावरही ढसाळांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि ते सगळं ऐकताना आम्हीही गलबलून गेलो होतो!

भालचंद्र मुणगेकर

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची ग्रेट-भेट करायची असल्याचं वागळेंनी सांगितल्यावर मी कामाला लागलो. त्यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं होतं. त्यामुळे माझं रिसर्चचं काम बरंच सोपं झालं होतं. तरीही फोन करून मुणगेकरांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. स्वत:वर मनापासून प्रेम करणार्‍या मुणगेकरांनी पुष्कळ माहिती दिली. बापानं मुलाविषयी कौतुकानं बोलावं, तसं ते स्वत:विषयीच बोलत होते. एवढंच नव्हे, तर त्यांच्यावर लघुपट करणार्‍या एका दांपत्याला त्यांनी बोलावून घेतलं होतं. त्या लघुपटाची एक प्रत त्यांनी मला सीडीवर कॉपीही करून दिली. तेव्हा मुणगेकर केंद्रीय नियोजन मंडळावर होते. त्यामुळे त्याअंतर्गत केलेल्या कामाविषयीही त्यांनी उद्बोधक माहिती दिली. त्यांच्या सोयीने मुलाखतीचा दिवस आणि वेळही ठरली. मुणगेकरांच्या इच्छेनुसार ही मुलाखत विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरमध्ये घेण्याचं ठरलं. विद्यापीठ प्रशासनाकडून तशी परवानगीही मिळवली, पण मुलाखतीच्या दोन दिवस आधी मुणगेकरांचा फोन आला. त्यांना सोमवारी अचानक हैदराबादला जावं लागणार होतं आणि तिथून परस्पर दिल्लीला जावं लागणार होतं. त्यामुळे मुलाखतीचा ठरलेला दिवस बदलून मुलाखत लगेच दुसर्‍याच दिवशी घेण्याविषयी त्यांनी विचारलं. वागळेंना चालणार होतं, आम्हालाही काहीच अडचण नव्हती, पण मुलाखत विद्यापीठातच घेण्याविषयी मुणगेकरांचा आग्रह असल्याने आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला, पण त्यांनी सांगितलं रविवारी विद्यापीठ बंद असेल. तुम्ही सोमवार सांगितल्याने आम्ही त्याप्रमाणे तयारी केली. आता ऐन वेळी तुमचा दिवस बदलला आणि तो नेमका रविवार आहे. आमचा नाइलाज आहे. आम्ही काही मदत करू इच्छित नाही. हे मुणगेकर यांना समजल्यावर ते रागावले. त्यांनी आम्हाला कुलगुरूंशी बोलायला सांगितलं, पण त्यांचा फोन लागेना. आता काय करायचं? आम्ही संकटात सापडलो. इतक्या ऐन वेळी दुसरं ठिकाणही मिळणं शक्य नव्हतं. दुसर्‍या दिवशी अकरा वाजता मुलाखतीची वेळ ठरली होती. आमच्या टीमनं दुसर्‍या जागेची चाचपणी करायला सुरुवात केली, पण दोन-चार ठिकाणांहून नकारघंटाच ऐकायला मिळाली. शेवटी एका सहकार्‍यानं चर्चगेट स्टेशनसमोरच्या इंडियन मर्चंट चेंबरचं नाव सुचवलं. त्यांचं ग्रंथालय चांगलं आहे. तिथं मुलाखत करता येईल. असं त्यानं सांगितलं. आम्ही तातडीनं त्यांच्याशी संपर्क साधला. मुणगेकर म्हटल्यावर त्यांनीही तत्काळ होकार दिला. मुणगेकरांची मुलाखत त्यांच्या इच्छेनुसार पुस्तकांच्या सान्निध्यात झाली, फक्त राजाबाई टॉवरऐवजी इंडियन मर्चंट चेंबरच्या ग्रंथालयात झाली! कॅमेरा टीमनं या मुलाखतीचं कॉम्पोझिशनही चांगलं केलं होतं; पण हे ग्रंथालय ऑफिसच्या मध्यभागी होतं. त्याच्या दोन्ही बाजूंनी माणसांना जाण्या-येण्यासाठी वाट होती. ही गोष्ट आमच्या कॅमेराच्या फ्रेमच्या दृष्टीनं अडचणीची होत होती. शिवाय सतत वाजणार्‍या फोनचाही प्रश्‍न होता. त्यामुळे मुलाखत संपेपर्यंत आम्ही त्यांना फोन बंद ठेवण्याची आणि कोणीही इकडून तिकडे न जाण्याची विनंती केली. त्यांनीही या विनंतीला तत्काळ होकार देऊन आम्हाला सहकार्य केलं. मुलाखत संपल्यावर मात्र चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी मुणगेकरांना पकडून त्यांचा भरपूर वेळ खाल्ला. त्या वेळी ते नियोजन आयोगावर असल्याने प्रत्येक जण त्यांच्याशी बोलण्यासाठी धडपडत होता. त्या पदाधिकार्‍यांच्या उत्साहाला आवर घालणं आम्हाला शक्य नव्हतं आणि ते मुणगेकरांनाही जमत नव्हतं. आम्ही हळूच काढता पाय घेतला, मुणगेकर मात्र अडकून पडले!

लालन सारंग

लालन सारंग पुण्याला स्थायिक झाल्यामुळे त्यांची मुलाखत पुण्यालाच करायचं ठरलं. शनिवार पेठेतल्या सुदर्शन हॉलमध्ये ही मुलाखत होणार होती. लालनताई औंधला राहत होत्या. त्यांना मुलाखतीच्या ठिकाणी घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सुदर्शनमध्ये कॅमेरा, प्रकाशयोजना यांची बर्‍यापैकी तयारी झाल्यावर मी लालनताईंकडे निघालो. त्यांच्या घरी पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की, त्या बहुधा एकट्याच राहत असाव्यात. हा विचार माझ्या मनात येतो न येतो, तोच लालनताईंनी बोलायला सुरुवात केली इथे मी एकटीच राहते. मुलगा राकेश मुंबईला असतो. सध्या माझी कंबर दुखतेय. गुडघे दुखतात. स्वतःच्या आजारपणाबद्दल त्या स्वत:हून बोलत होत्या. मला त्यांना थांबवताही येईना आणि नुसतीच मान डोलवत हो होही करता येईना. बोलता बोलता त्यांनी आवरलं. आम्ही बाहेर पडलो. लिफ्टजवळ आलो, तर ती बंद होती. झालं, लालनताई भडकल्या. वॉचमन, सोसायटीवाले यांना दोष द्यायला लागल्या. गाडी त्यांच्या आजारपणाच्या तक्रारीवरून सोसायटीच्या तक्रारींकडे सरकली. मी हो हो करत होतो. आम्ही गाडीत बसलो, तरी त्यांच्या तक्रारी चालूच होत्या. मी स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला की, बहुधा एकटेपणामुळे त्यांचा तक्रारखोरपणा वाढला असावा, पण त्याच वेळी अशीही भीती वाटली की, माझी कंबर दुखतेय, पाय दुखताहेत, गुडघे दुखताहेत असं त्या सतत सांगतायत, तर तासभर खुर्चीत बसून मुलाखत देतील ना? नाहीतर मध्ये थांबावं लागणार किंवा आधीच मुलाखतीची बसण्याची पद्धत बदलावी लागणार. पण ते सोपं काम नव्हतं. मुलाखत तीन कॅमेर्‍यांवर शूट केली जायची. त्यांची रचना आणि प्रकाशयोजना करायला दोन तास तरी लागायचे. त्यामुळे रचना बदलायची झाली असती, तर आणखी दोन तास विनाकारण थांबावं लागलं असतं; आणि त्यासाठी पुन्हा लालनताई तयार झाल्या असत्या का, असाही प्रश्‍न होताच. मला काही कळेना. आम्ही सुदर्शनला पोहोचलो. ओळखपाळख झाली. वागळे त्यांना म्हणाले, आमची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही तयार असाल, तर सुरुवात करू या. त्यावर लालनताईंनी होकार देत मेकअप आर्टिस्टविषयी विचारलं. मग त्या मेकअपरूममध्ये गेल्या. थोड्या वेळाने ठसठशीत कुंकू लावून, साडी नेसून प्रसन्न चेहर्‍याच्या लालनताई बाहेर आल्या. मघाशी सतत कुणाच्या ना कुणाच्या तक्रारी ज्या लालनताई करत होत्या, त्यांचा मागमूसही आता त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता. चेहर्‍याला रंग लावल्यानंतर त्यांचा एकदम कायापालट झाला होता. त्यांची मुलाखतही खणखणीत झाली.

निळूभाऊ फुले

एक दिवस वागळेंनी मला बोलावून निळू फुले यांची ग्रेट-भेट करायची असल्याचं सांगितलं. त्यानुसार प्रॉडक्शन टीम, कॅमेरा टीम आणि मी आम्ही सगळे कामाला लागलो. आदल्या दिवशी वागळे मला म्हणाले, तू उद्या सकाळी लीलावती हॉस्पिटलला जाऊन तिथून निळूभाऊंना घेऊन अंधेरीला कामतांच्या हॉटेलमध्ये ये. त्यानुसार मी लीलावती हॉस्पिटलला गेलो. निळूभाऊंचे स्वीय सहायक मकबुल तांबोळी यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर गाडी पार्क करून थांबलो. थोड्या वेळाने निळूभाऊ आणि तांबोळी आमच्यासमोरच एका गाडीतून खाली उतरले. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. आम्ही निळूभाऊंना आमच्या गाडीत घेतलं. गाडी अंधेरीच्या दिशेनं निघाली. निळूभाऊ गाडीत आमच्याशीमधे-मधे बोलत होते; जुजबी चौकशी करत होते. त्यांचं थकलेलं वय त्यांच्या चेहर्‍यावर, शरीरावर जाणवत असलं, तरी त्यांचा कमालीचा साधेपणा त्यांच्याकडे आकर्षून घेत असल्याचं पहिल्या पाच-दहा मिनिटांतच माझ्या लक्षात आलं. निळूभाऊ, तांबोळी आणि मी बोलत होतो, पण बोलता बोलता निळूभाऊंना एकाएकी उबळ येऊन बेडका पडायचा. तांबोळीही बोलता बोलता अगदी सहजपणे आणि सराईतपणे पेपर नॅपकीन पुढे करून निळूभाऊंना द्यायचे आणि नंतर तो शेजारच्या बास्केटमध्ये टाकायचे आणि बोलणं पुढे चालू व्हायचं. असे दोन-तीनदा झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, निळूभाऊंना बरं नसावं. तसं मी विचारल्यावर तांबोळी म्हणाले, नाही नाही. थोडासा खोकला आहे निळूभाऊंना. बाकी काही नाही. पण दोन-पाच मिनिटांनी निळूभाऊंना उबळ येणं आणि बेडका पडणं चालूच होतं. हे असंच चालू राहिलं, तर मुलाखत कशी पार पडणार? सततच्या उबळीने मुलाखत मधेमधेे थांबवावी लागणार, या कल्पनेनेच मी धास्तावून गेलो होतो; पण निळूभाऊ, तांबोळी मात्र शांत होते. मला काही कळेना. हा प्रकार वागळेंना कळला, तर आपलं काही खरं नाही, असं मला वाटायला लागलं. हॉटेलमध्ये आल्या आल्या मी वागळेंना या गोष्टीची कल्पना दिली, पण आता ऐन वेळी काय करणार? त्यामुळे वागळे म्हणाले, पाहू. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर थोडा नाश्ता केल्यानंतर निळूभाऊ जरा फ्रेश झाले. नंतर ते मेकअप आर्टिस्टसोबत तयार होण्यासाठी गेले. इकडे आम्ही आता काय होणार!, या धास्तीत होतो. थोड्या वेळाने निळूभाऊ मेकअप करून आले, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो! हे निळूभाऊ मघाशी माझ्यासोबत आलेले निळूभाऊ वाटत नव्हते. ते अतिशय प्रसन्न, उत्साही आणि टवटवीत झालेले होते. आता त्यांच्या पाठीचा बाकही मघापेक्षा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता. मग मी त्यांना खुर्चीत बसवले. त्यांनी करू या सुरुवात? म्हणून वागळेंना विचारलं. आमची तयारी झालेलीच होती. त्यामुळे मुलाखतीला सुरुवात झाली आणि पुढचा तास-सव्वा तास निळूभाऊंना उबळ तर सोडाच, पण साधी उचकीही लागली नाही. ते त्यांच्या निर्मिष साधेपणाने वागळेंच्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर देत होते. मनमोकळेपणाने बोलत होते.
चेहर्‍याला रंग लावून कॅमेर्‍यासमोर बसल्यानंतर निळूभाऊंमध्ये एकाएकी जो बदल झाला, तो माझ्या दृष्टीने विलोभनीय होता. मुलाखत संपली. निळूभाऊंनी मेकअप उतरवला आणि त्यांना परत उबळ येऊन बेडके पडायला लागले. आमच्या गप्पा चालल्या होत्या. निळूभाऊही बोलत होते. मधेच त्यांना उबळ येई. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असलेले तांबोळी तत्परतेने पेपर नॅपकीन पुढे करत. नंतर तो तितक्याच सहजपणे सोबतच्या बास्केटमध्ये टाकून बोलणं चालू पुढे चालू होई.
मुलाखतीनंतर निळूभाऊंना लगेच पुण्याला निघायचं होतं. त्यामुळे त्यांनी मला एक पाकीट देत ते दादरला एका ठिकाणी जाऊन नेऊन देण्याविषयी विचारलं. सोबत पत्ताही दिला. मी होकार दिला. दुसर्‍या दिवशी वागळेंना विचारून ते पाकीट द्यायला दिलेल्या पत्त्याच्या दिशेनं निघालो. रस्त्यालगत मोठी चाळवजा इमारत होती. तिच्या तळमजल्यावर डावीकडे शेवटच्या खोलीत एक वृद्ध दांपत्य राहत होतं. बहुधा दोघंच असावेत. वयानं सत्तरीच्या पुढे तरी असतील. निळूभाऊंनी तुम्हाला हे पाकीट द्यायला सांगितलंय असं म्हणून मी त्यांच्याकडे ते पाकीट दिलं. बहुधा त्याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे त्यांनी ते माझ्याकडून घेतलं; पण ते दोघंही खूपच वृद्ध असल्यामुळे इच्छा असूनही मला त्यांच्याशी बोलता आलं नाही. मी त्यांच्या घरातून बाहेर पडलो. ऑफिसला निघालो; पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की, निळूभाऊ अनेक व्यक्ती, संस्था यांना मदत करत असणार. त्यासाठी ते ठरावीक रक्कम दर महिन्याला बाजूला काढून ठेवत असणार. हे दांपत्य त्यांपैकीच एक असणार. बहुधा ते स्वातंत्र्यसैनिक किंवा सामाजिक कार्यकर्ते असावेत. या वृद्ध दांपत्याकडे परत जाऊन त्यांच्याशी बोलायचं मी ठरवलं होतं, पण तेही राहून गेलं.
लालनताईंच्या आणि निळूभाऊंच्या अनुभवाने माझ्या एवढं लक्षात आलं की, खरा अभिनेता अभिनेत्री एकदा त्यांच्या भूमिकेत शिरले की, ते वेगळेच होतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा येते, उत्साह येतो; आणि जोवर त्यांच्या चेहर्‍यावर रंग असतो तोवर शरीरातले आजार गपगार होतात. तो रंग उतरला की, ते पुन्हा आपल्यासारखेच माणूस होतात! तेव्हा त्यांचे प्रश्‍न-समस्या आपल्यासारख्याच असतात!
आयबीएन-लोकमत ही वृत्तवाहिनी प्रत्यक्ष चालू झाल्यानंतर मी वर्षभरच तीत होतो, पण त्या काळात मी जेवढ्या ग्रेट-भेटसाठी काम केलं, त्या प्रत्येकाचा काही ना काही किस्सा आहे, आठवण आहे. इथे त्यातल्या काही निवडकच आठवणी सांगितल्या आहेत. ग्रेट-भेट हा आयबीएन-लोकमतवरचा एक पॉप्युलर शो होता. वागळे मुलाखतीही उत्तम घ्यायचे. त्याच्या रिसर्चचं आणि इतर को-ऑर्डिनेशनचं काम हा माझ्या दैनंदिन कामाचा एक भाग होता. प्रत्येक वेळीच त्यांना माझ्या रिसर्चची गरज असायची, असं नाही. मिकी कॉन्ट्रॅक्टर हे हिंदी चित्रपटसृष्टीतले नामांकित मेकअप आर्टिस्ट किंवा प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्यासारख्या काही मुलाखतींसाठी त्यांना एका ओळीच्याही माहितीची गरज नव्हती. त्यामुळे वर्षभरात झालेल्या सगळ्याच ग्रेट-भेटसाठी मी रिसर्च केला नाही, पण को-ऑर्डिनेशन मात्र जवळपास सगळ्या मुलाखतींसाठी केलं. ज्या ग्रेट-भेटचा रिसर्च वागळेंना आवडायचा, त्या रिसर्चबद्दल ते मला आवर्जून दाद द्यायचे. कधी म्हणायचे, यासाठी मी तुला एक जेवण देणार!
1 फेब्रुवारी 2009 रोजी ज्ञानदाने फिचर्स संपादक म्हणून ऑफिसमधल्या सगळ्यांना ‘Features team celebrates !’ अशी मेल पाठवली. त्यात सुरुवातीला ग्रेट-भेटबद्दल लिहिताना तिने म्हटलं होतं – “We have Great Bhet that is moving on almost (touch wood!) flawlessly… All our guests praised the research efforts that went in prior to the interview. I am proud to acknowledge Ram Jagtap’s fantastic research skills.”
वागळेंनी या मेलला रिप्लाय करताना आमच्या फिचर्स विभागाचं तर कौतुक केलंच, पण प्रॉडक्शन, कॅमेरा, एडिटिंग, वाहतूक व्यवस्था, पीसीआर या विभागातल्या आमच्या इतर सहकार्‍यांचंही कौतुक केलं. कारण टीव्ही हे एक असं माध्यम आहे, जिथे टीमवर्कशिवाय कुठीच गोष्ट वर्कआउट होऊ शकत नाही. त्या टीमवर्कमध्ये मी माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी माझ्यापरीने पार पाडण्याचं काम केलं, तसंच इतरांनीही केलं. म्हणूनच तर ग्रेट-भेट हा शो पाच-सहा वर्षे आयबीएन-लोकमतवरील एक पॉप्युलर शो राहिला होता. त्यासाठी रिसर्चपासून एडिटिंगपर्यंत काम करणारी इतर माणसं बदलत गेली, पण मुलाखती मात्र शेवटपर्यंत निखिल वागळे यांनीच घेतल्या! आयबीएन-लोकमत ही वृत्तवाहिनी वागळेंमुळे ओळखली जात असे, तसेच ग्रेट-भेट हा मुलाखतीचा कार्यक्रमही. त्यात माझा काही काळ खारीचा वाटा होता, एवढंच!
*************************************************************************************************************
राम जगताप
लोकसत्ता, प्रभात, प्रहार, मी मराठी लाइव्ह या वृत्तपत्रासह आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीमध्ये काम केले आहे. ‘कर्ती माणसं’ व ‘मराठा समाज वास्तव आणि अपेक्षा’ या पुस्तकांचे संपादन.
Email: jagtap.ram@gmail.com
Mob: 81084 13720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *