जोकमार : एका लोकसंस्कृतीचा शोध

चन्नवीर मठ
माती आणि माता ज्यांच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे, नव्हे तर तेच त्यांचे बलस्थान आहे़ ही सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत़ सर्जनशीलता सृष्टीची असो वा शरीराची प्रवाहीच असली पाहिजे़ अशाच सर्जनशीलतेचा पुरूषी प्रतिनिधी वा रूप म्हणून जोकमार स्वामीकडे पाहता येईल़ अनेक लोकसंस्कृती आणि लोकदैवतांच्या अभ्यासकांना जोकमारस्वामी नेहमीच औत्सुक्याचे ठरले आहे़

*************************************************************************************************************

सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटला होता़ जूनमध्ये हजेरी लावून गेलेला पाऊस, पत्ता हरवलेले गाव शिवार पावसाची वाट पाहत असतांना गणेशाचे आगमन झाले़ पुन्हा दुष्काळाची धसका घेतलेल्या सर्वांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागलेले़ त्यातही ‘जोक्या मेल्यावर येईल पाऊस’ हा विश्‍वास सीमावर्ती भागातील बुजुर्गांकडून व्यक्त होत होता़ सार्वजनिक गणेश मंडळांना आता विसर्जनाचे वेध लागले होते़ या दरम्यान एके दिवशी माझ्या गावाकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ – वागदरी परिसरात डोक्यावर ‘जोकमार’ घेऊन जातांना महिला दिसल्या़ यासोबतच लहानपणीच्या गुळ्ळव्वा -जोकमारच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या़ पत्रकारितेच्या सवयीप्रमाणे मोबाईलवर एक फोटो घेतला, उद्देश केवळ फेसबुकी उपद्व्याप इतकाच होता़ फोटोसोबत जोकमारची ओळख करून देणार्‍या काही ओळी फेसबुकच्या वॉलवर लिहिल्या़ दोन दिवसांत या पोष्टवर लाईक्सपेक्षा कॉमेंटस् अधिक पडल्या़ वाचणार्‍यामंध्ये उत्सुकता अधिक जाणवली़ या उत्सुकतेमागचे कारण ‘जोकमार’च्या शरीराची विचित्र वा हिडीस वाटणारी रचना कारणीभूत असल्याचे जाणवले़
मोठे डोळे, रुंद कपाळ, तोंडात लोण्याचा गोळा, हातात उगारलेली तलवार आणि तलवारीप्रमाणेच भासणारे मोठे शिश्‍न अनेकांना कोड्यात टाकणारे ठरले़ या पोष्टने काहींच्या स्मृतींना उजाळा मिळाला असला तरी जोकमारबाबतची उत्सुकता सर्वांची होती़
बहुजन, कष्टकरी आणि शेतकर्‍यांच्या इतर दैवतांच्या वाट्याला ज्या अवहेलना आल्या, जे भोग आले, त्यातून जोकमारचीही सुटका झाली नाही़ त्याचेही प्रतिमाभंजन करण्यात आले़ जोकमाराला गावावरून ओवाळून टाकलेला फटिंग, अतिशय कामुक, आजच्या भाषेत लिंगपिसाट. केवळ बहुजनांना नव्हे तर त्यांच्या दैवतांनाही तुच्छ-क्षुद्र लेखण्याची परंपरा जोकमाराबाबतही दिसते.
जोकमाराची पद्धत प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात आहे़ कोकण आणि इतरही काही ठिकाणी आहे. मात्र त्याच्या स्वरूपात थोडाफार बदलही दिसून येतो़ ‘जोकमार’ हा कोकणातील अघोरी पंथीयांचा देव मानला जातो. उत्तर कर्नाटकच्या सीमेलगतच्या महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सीमावर्ती भागात हा लोकदैवत मोठ्या प्रमाणात पूजला जातो़ शिवाय वार्ली समाजातील नारनदेवही जोकमारशी साधर्म्य सांगणारा आहे़ गणेश उत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात सीमा भागातील लोक जोकमार उत्सव साजरा करतात. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यातील गावागावात मिरवणूक काढली जाते. हे तालुके थेट कर्नाटकच्या सीमेशी जोडलेले आहेत़ सुख-समृद्धी, धन-धान्य आणि पाऊस-पाण्यासाठी जोकमाराकडे जोगवा मागितला जातो. मूळचा कर्नाटकातील ‘जोकमार’ हा बोलीभाषेत जोकमार स्वामी, जोकप्पा, जोक्या म्हणून ओळखला जातो. पाऊस चांगला पडावा, भरपूर पीक हाती यावे, गावावर कुठलेही संकट येऊ नये, अशी मागणी या जोक्याकडे केली जाते. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतल्या सीमाभागातील गावात अजूनही पूजला जातो. दुष्काळाच्या भीतीपोटी गावकरी न चुकता ‘जोक्या’ची आराधना करतात. त्याला डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली जाते. घरोघरी जाऊन ‘जोक्या’ गावकर्‍यांची मागणी स्वीकारतो. ‘जोक्या’ला मिरवण्याचा मान कोळी समाजाला आहे.

15-1
जोकमारचा जन्म

जोकमारचा जन्म कुंभाराच्या घरात होतो़ भाद्रपद अष्टमीला त्याचा जन्म तर पौर्णिमेला त्याचा मृत्यू होतो़ एकूण सात दिवसांचे त्याचे आयुष्य आहे़ कुंभाराच्या घरात जन्म झाला तरी तो वाढतो वालीकारांच्या (गंगामत/कोळी) घरात़ कोळी समाजाच्या महिला शेणाने सारवलेल्या बुट्टीत बसलेल्या जोकमारला डोक्यावर घेऊन गावोगाव फिरतात़ त्याची आराधना करतात़

जोकमार आहे कसा…

उपलब्ध माहितीनुसार 9 व्या शतकापूर्वीपासून जोकमार हा लोकदैवत म्हणून पूजला जात असल्याचे दिसून येते़ जोकमार हा दणकट शरीरयष्टीचा, नितळ कांतीचा, गोरा गोमटा (हळदीने माखलेला), रुंद कपाळ, मोठे आणि पाणीदार डोळे, कपाळावर विभूती भस्म, मध्ये कुंकुवाचा टिळा, डोक्यावर किरीट, दाट, पिळदार मिशा, बूड टेकून बसलेल्या अवस्थेतील जोकमाराच्या उजव्या हातात मोठी तलवार आहे़ तोंडात लोण्याचा गोळा आणि शिश्‍नाचा आकार मोठा आहे़ जोकमाराच्या या मातीच्या मूर्तीला वेताच्या बुट्टीत (टोपलीत) कडुलिंबाच्या पानांत बसविले जाते़
एकूणच जोकमार कसा आहे, याचा विचार करताना रुढी आणि परंपरांचा अभ्यास केला असता असे जाणवते की, तो दणकट शरीरयष्टीचा आहे़ त्याच्या तोंडात लोण्याचा गोळा आहे, तो कृषकांचा देव असल्याने त्याला दूध-दुभते चालते. तो अचाट ताकदीचा आहे तो घोडेस्वारी करतो, तो युद्धनिपुण आहे़ तो आपल्या ताकदीने पाऊस पाडतो, तो जेता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे शिश्‍न वाजवीपेक्षा मोठे आहे़ तो जास्त कामुक असावा़ त्याच्या हातात उगारलेली तलवार आहे़ जी त्याच्या वजनाच्या तीनपट वजनाची आहे़ इतर देवतांप्रमाणे बहुपत्नी नसून उलट अल्पायुषी/अविवाहित आहे़ लोकवैद्यक शास्त्रानुसार कडुलिंबार्क वीर्यवर्धक, वीर्यरक्षक मानला जातो़ या गुणांमुळेच जोकमाराला कडुलिंबाच्या डहाळ्यात बसविले जात असावे़

जोकमाराची उपासना कशासाठी…

लोकदैवत असलेल्या मातीचा सुपुत्र म्हणूनही गौरविल्या जाणार्‍या जोकमाराची अनेक कारणांसाठी उपासना केली जाते़ सुख-समृद्धी, धन-धान्य आणि पाऊस-पाण्यासाठी जोकमाराकडे जोगवा मागितला जातो. पाऊस चांगला पडावा, भरपूर पीक हाती यावे, गावावर कुठलेही संकट येऊ नये, यासाठी त्याची उपासना केली जाते़ दुष्काळाच्या भीतीपोटीही ‘जोक्या’ची आराधना केली जाते, ही झाली सार्वत्रिकता़
व्यक्तिगत पातळीवरही जोकमाराची उपासना केली जाते़ अपत्य सुखापासून वंचित जोडपे जोकमाराची पूजा केल्यास पुढच्या वर्षापर्यंत पाळणा हलतो, अशी लोकधारणा आहे़ अनेक दिवसांपासून अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रीने जोकमाराची टोपली उचलून डोक्यावर घेतल्यास तिला हमखास मूल होते़
नपुंसकत्वाची भीती वाटणार्‍या पुरुषांनी जोकमाराची उपासना केल्यास त्यांचे पौरुषत्व अबाधित राहते, अशीही धारणा आहे़ शिवाय काही ठिकाणी वशीकरणासाठी (काळी जादू) उपासना होत असल्याची धारणा आहे़ घरातील ढेकूण, गोचिडांसारख्या कीटकांचा उपद्रव दूर करण्यासाठीही जोकमाराची उपासना केली जाते़ जोकमाराला मीठ आणि मिरची दान केल्यास कीटकांचा बंदोबस्त होतो, अशीही धारणा आहे़

जोकमाराला बायको नाही, गुळ्ळव्वाला नवरा नाही

बहुसंख्य देवांना एक नव्हे तर अनेक बायका असताना जोकमाराला मात्र बायकोच नाही़ त्याचे कारण त्याचे अवघ्या 7 दिवसांचे अल्पायुष्यही कारणीभूत असावे़ तसेच गुळ्ळव्वा या लोकदेवतालाही नवरा नाही़ त्या अनुषंगाने दोन विजोड स्त्री-पुरुषांच्या (कोणत्याही अंगाने) एकत्र येण्याबद्दल ही म्हण वापरली जाते़

झकमार्‍या

झकमार्‍या या शिवीचा जन्म जोकमार्‍याच्या अपभ्रंशातून झाला असावा़ बिनकामाचे गावभर हिंडणारा, स्त्रीलंपट, दुसर्‍याच्या उचापत्या करणारा, उपद्रमूल्य ठासून भरलेला या गुणांनी युक्त व्यक्तीला ‘झकमार्‍या’ म्हणतात़ ही शिवी सीमावर्ती भागासह मराठवाड्यात विशेषत लातूर, परभणी, बीडमध्ये लोकप्रिय आहे़

जोकमारची गाणी

जो जो जो जोकमारा
येरे बा़़़़ जोकमारा
पाऊस आण बा जोकमारा
नदी नाले वाहू दे बा जोकमारा
तळी-विहिरी भरून दे गा जोकमारा
दरिद्री धुवून दे बा जोकमारा
या जो जो जो गीतांना कन्नडमध्ये जोगूळ पदगळू म्हणतात़ म्हणजे मराठीत हे अंगाई गीत होय.
या व्यतिरिक्त बहुसंख्य गाणी जोकमार आणि गुळ्ळव्वा यांच्याविषयी अश्‍लील म्हणता येतील अशा आशयाची आहेत़ ही गाणी लैंगिक भावनांची कुचंबणा (प्रामुख्याने स्त्रीयांची), नैतिक व अनैतिक ठरविणार्‍या लोकरूढींचा समाचार घेणारी आहेत़

पार्वतीचा पुत्र

जोकमार जन्माची एक कथा गणेश जन्माच्या कथेशी जुळणारी आहे़ पार्वतीला स्नान करायचे होते़ तिने आपल्या अंगावरील मळाने एक बालक बनविले व त्याला संरक्षणासाठी दारावर थांबण्यास सांगितले़ थोड्या वेळाने भगवान शंकराचे तेथे आगमन झाले़ महादेवाचे आक्राळ रूप पाहून हे बालक घाबरले़ घाबरलेले जोकमार बालक आत अंघोळ करणार्‍या आपल्या मातेला म्हणजेच पार्वतीला बिलगले़ याचा अर्थ माता पार्वतीने भलताच घेतला़ तो आपल्यावर लुब्ध झाल्याच्या शंकेने तिने जोकमाराला केवळ सात दिवसांच्या अल्पायुष्याचा शाप दिला़ शिवाय परिटाच्या घरी डोके फुटून मरण्याचा शाप दिला़

15-2
इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गणेश आणि जोकमाराची जन्मकथा समान असली तरी गणेश हा शूरवीर, धैर्यवान, साक्षात शंकराशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेला योद्धा, अशी प्रतिमा तयार करण्यात आली तर जोकमाराला भित्रा, पळपुटा त्यातही स्त्रीलंपट, मातृभोगी असे ठरविण्यात आले़

जोकमार हा शिवाचा पुत्र

जोकमार हा शिवाचा तिसरा पुत्र म्हणून ओळखला जातो. गणपती मूळ विघ्नकर्त्या व्रात्यांची देवता. अतिशय धूर्त! सत्कार्यात चातुर्याच्या बळावर विघ्न आणण्यात त्याचा हातखंडा होता म्हणे! शेवटी त्याने विघ्न आणू नये म्हणून त्यास वंदन करून शांत करणे गरजेचे होते. याच अपरिहार्यतेतून त्यास शिवगणात स्थान देताना व आद्यपूजेचा मान देताना त्यास जोकमारस्वामी स्वरूपात स्वीकारले गेले असण्याची शक्यता आहे. गणपती विसर्जनाची प्रथा जोेकमारस्वामीच्या विसर्जनाच्या अनुकरणातून आली असल्याची शक्यता आहे.

कार्तिकेयने घेतलेला अवतार

गणेशचतुर्थीत भक्तांचे दर्शन घेऊन गणेश कैलाशी परततो़ या दहा दिवसांत मिष्टान्न भोजन करून पृथ्वीवर सर्व प्रजा सुखी आणि आनंदी असल्याचे गणेश माता पार्वती आणि महादेवाला सांगतो़ आपली कशा पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली याचेही रसभरीत वर्णन तो कैलासात करतो़ त्याचे हे वर्णन कार्तिकेयला पटत नाही़ गणेश एकांगी माहिती देत असल्याचे कार्तिकेय आई-वडिलांना सांगतो़ महादेवाच्या आज्ञेनुसार खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कार्तिकेय पृथ्वीवर जोकमाराच्या रूपात अवतरतो़ शेत-शिवारात, वाड्या-वस्त्यांवर फिरत असताना शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे दैन्य कार्तिकेयच्या नजरेस पडते़ पावसाअभावी शेतकर्‍यांची अवस्था त्याला पाहवत नाही़ एका अर्थाने जोकमार ‘नाही रे’ वर्गाची पाहणी करतो़ कैलाशी परतल्यानंतर महादेवाला तो सत्य कथन करतो आणि महादेव जोरदार पर्जन्यवृष्टी करतात़

शिव-पार्वतीचा मुलगा

जोकमार हा शिव-पार्वतीचाच मुलगा आहे़ गणेशानंतर त्याचे पृथ्वीवर आगमन होते़ जोकमाराला केवळ बाजरी, ज्वारीच्या कण्या आणि अंबिलाचा नैवेद्य मिळाल्याने तो पृथ्वीवरील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था महादेवाला सांगतो. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पाऊस पाठविण्याचा तो आग्रह धरतो़ पृथ्वीवरील शेतकर्‍यांची करुण कहाणी ऐकल्यानंतर दयानिधी महादेव तत्काळ वरुणाला सांगून मुसळधार पर्जन्यवृष्टी घडवितात़ त्यामुळे पावसाने ओढ दिल्यानंतरही जोकमार येऊन गेल्यानंतर पाऊस नक्की येईल, असा विश्‍वास आजही गावागावातून व्यक्त होतो़

जोक-गौरीचा पुत्र

जोक ऋषी आणि गौरी या दंपतीला अनेक वर्षे अपत्य झाले नव्हते़ या ऋषी दाम्पत्याला भगवान शिवाची उपासना केली़ या दाम्पत्याला अत्यंत तेजस्वी सुपुत्र झाला़ तो म्हणजे जोकमाऱ त्याची वाढ झपाट्याने होत असे़ बर्‍याच दिवसांपासून पाऊस न आल्याने हा जोकमार आपल्या घोड्यावरून शिवारात गेला़ त्याचा दरारा इतका होता की ढगांनाही कंप सुटला़ त्याने ढगांवर कांबळ फेकल्याने जोरदार पावसास प्रारंभ झाला़ जोकमाराच्या या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र वार्‍यासारखी पसरली़ तो एका तरुणीवर मोहित झाला़ आपल्या अचाट ताकदीच्या बळावर तिला वश करण्याचा प्रयत्न फसला़ त्या मुलीच्या वडिलांनी जोकमाराला ठार केले़

पार्वतीला पाच मुलं

माता पार्वतीला चंद्र, सूर्य, गणेश, काम आणि जोकमार अशी पाच मुल़ं यापैकी केवळ चंद्राला तू दिवसा आणि रात्रीही शीतल राहशील असा वर देणारी माता पार्वती इतर चारही पुत्रांना वेगवेगळे शाप देते़ त्यानुसार जोकमार सातव्या दिवशी परिटाच्या घरी मरण पावतो़ या कथेत जेवणाच्या पंगतीचा उल्लेख आहे़

आणखी एक कथा

सप्तर्षींनी आपल्या लाडक्या शिष्याला म्हणजे जोक मुनीला पृथ्वीवरील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाठविले़ हा तपस्वी, तरूण, तेजस्वी होता़ या तरूणाचे तेज पाहून मारी (मरीआई) त्याच्या प्रेमात पडली़ सप्तर्षींची सूचना विसरून जोकमुनीहीमारीकडे आकर्षित झाला़ या दोघांच्या संबंधातून मारीदेवीला मुलगा होतो, हा जोकमाऱ हा वडिलांप्रमाणेच देखणा व राजबिंंडा असतो़ जनमानसात तो खूप लोकप्रिय असतो़ एकदा घोड्यावरून जात असताना त्याची नजर एका परीटकन्येवर- ‘सुकर्णिका’ वर पडते़ तिच्या सौंदर्याने तो मोहीत होतो़ ही वार्ता सुकर्णिकेच्या वडिलांना समजल्यानंतर ते आपल्या समाजबांधवांसह जोकमाराचे मुंडके उडवून त्याला ठार करतात़ त्याचे मुंडके पाहून जनतेला खूप दुःख होते़ त्या गावकर्‍यांच्या अश्रूमुळे सर्वत्र मुसळधार पाऊस होतो़ वा त्यांच्या अश्रूंनी नदी/नाले भरून वाहतात़
याशिवायही जोकमार जन्माच्या आणखी अनेक कथा असाव्यात़

गरिबांचा गणेश

जोकमाराला बडवर बेनक म्हणजे गरिबांचा गणेश म्हटले जाते़ दोघांची जन्मकथा सारखीच आहे़ उपासनेचा कालावधीही दोन/चार दिवसांच्या फरकाने समान आहे़
गणेश हा अभिजनांचा, उच्चभू्रंचा, श्रीमंतांचा देव तर जोकमार हा गरिबांचा, बहुजनांचा, क्षुद्रांचा देव आहे़ परीट-धोबी, कोळी, बुरुड, सुणगार, बणगार अशा समूहांचा जोकमाराशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध, थेट संबंध येतो़ गणेशाला पुरण-वरणाचा नैवेद्य असतो़ विशेषतः मोदक (हुरण कडबू) हा पदार्थ गणेशाला आवर्जून दिला जातो़ तर जोकमाराच्या नैवेद्यात अंबिल, ज्वारी, बाजरीच्या कण्या हे पदार्थ असतात़ नैवेद्याच्या पदार्थांवरूनही त्या-त्या देवांची श्रीमंती समजून येईल़
जोकमाराची कृषकांतील लोकप्रियता अभिजनांना सहन झाली नसावी़ त्याला थेट ‘मातृभोगी’सारखा कलंक लावण्यात आल्याचे अनेक अभ्यासकांना वाटते़

15-3
गणेश जोकमाराला भयभीत होतो म्हणून जोकमाराची अचाट ताकदच कारणीभूत असावी.

गणेश आणि जोकमार – एक तुलना

गणेश पार्वतीचा मुलगा.

जोकमारही पार्वतीचा मुलगा.
गणेशाची निर्मिती मातीपासून होते.
जोकमाराचीही निर्मिती मातीपासून होते़
उत्सवानंतर गणेशाचे पाण्यात विसर्जन होते.
जोकमाराला मारल्यानंतर पाण्यात विसर्जित केले जाते.
गणेशाला जास्वंदाची फुले आवडतात.
जोकमारालाही जास्वंदाच्या फुलांचा मान आहे़
गणेशाला दूर्वा तर जोकमाराला कडुनिंबाची पाने वाहतात़
गणेश सेनाप्रमुख गणाधिपती आहे.
जोकमारही दणकट, लढवय्या आहे़
गणेशाला चार हात तर जोकमाराला दोन हात आहेत़
गणेशाचे हात आशीर्वाद देतात तर जोकमाराच्या हाती तलवार आहे़
मात्र गणेश अभिजनांचा देव तर जोकमार बहुजन, क्षुद्रादी समूहांचे दैवत आहे़

गणपती जोकमाराला टरकतो

जोकमार समोर आला की गणपतीला कापडाने लपविले जाते़ त्याने पाहिल्यानंतर गणपतीचे पोट फुटून जाईल, अशी आख्यायिका असल्याने गणेशावर कापड टाकून त्याला लपविले जाते़ जोकमार हा पार्वतीचा मुलगा, गणेशाचाच भाऊ मानला जातो़ याबाबत अनेक कथा/उपकथा, रूढी सांगितल्या जातात़

पाऊस आणि पोरं देणारा देव

साधारणपणे जोकमाराला पर्जन्यदेवता वा पाऊस देणारा देव म्हणून ओळखले जात असले तरी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेले साहित्यिक डॉ़ चंद्रशेखर कंबार यांनी आपल्या ‘जोकमार स्वामी’ या नाटकांत त्याचा ‘पोरं देणारा – लेकरं देणारा देव’ असे वर्णन केले आहे़
ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ शिवराम कारंथ जोकमाराच्या सात दिवसांच्या आयुष्याचा उलगडा करताना एकूणच पावसाळ्याचा दाखला देतात़
जोकमाराने घोड्यावरून शिवारात संचार केल्याने भेगाळलेल्या भूमीवर मुसळधार पर्जन्यवृष्टी होते़, अशी धारणा आहे़
उत्तरा नक्षत्राच्या पावसापासूनच रब्बी हंगामाची सुरुवात होते़ तर त्याचवेळी खरीप पीकही जोमात असते़ ही वेळ खरिपासाठी फलधारणेची असल्याने मोठ्या पावसाची नितांत गरज असते़ त्यामुळेच जोकमाराचे आयुष्य सात नक्षत्रांनी ज्येष्ठा ते उत्तरा नक्षत्र (ज्येष्ठा, मूळा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रावण, पूर्वाभाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद) असे सात दिवस मोजले आहेत़ त्यामुळेच तो कृषकांचा दैवत झाला असावा असेही कारंथ म्हणतात़
माती आणि माता ज्यांच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे, नव्हे तर तेच त्यांचे बलस्थान आहे़ ही सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत़ सर्जनशीलता सृष्टीची असो वा शरीराची प्रवाहीच असली पाहिजे़ अशाच सर्जनशीलतेचा पुरूषी प्रतिनिधी वा रूप म्हणून जोकमार स्वामीकडे पाहता येईल़ माझ्यासह अनेक लोकसंस्कृती आणि लोकदैवतांच्या अभ्यासकांना जोकमारस्वामी नेहमीच औत्सुक्याचे ठरले आहे़ जेष्ठ लेखिका उमा कुलकर्णी यांनी डॉ़ चंद्रशेखर कंबार यांच्या जोकमारस्वामी या नाटकाचा मराठीत केलेले अनुवाद मी वाचला आहे़ तेव्हापासून या विचित्र तितकाच गूढ वाटणार्‍या देवतेविषयी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला़ यासंदर्भात सखोल अभ्यास झाल्यास येणार्‍या पीढीसाठी तो ठेवा ठरणार आहे़
– तारा भवाळकर, लोकसंस्कृती व लोकसाहित्याच्या व्यासंगी लेखिका पुरोगामी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या
लोकसंस्कृतीच्या विकास आणि संक्रमणात लोकदैवतांचे महत्त्व खूप आहे़ जोकमार एका अर्थाने प्रासंगिक देव आहे़ पावसाळ्यात तो येतो़ वास्तविक पाहता तो फलधारणेचा देव आहे़ आजच्या शब्दात तो खरा ‘क्रिएटीव्ह गॉड’ आहे़ त्याच्या आगमन काळाच्या नैसर्गिक अवस्थेचा अभ्यास करताना आपल्याला त्याची मनोमन साक्ष पटते़ खरीप पीक या वेळी फलधारणेच्या अवस्थेत असते, तर जमीन रब्बी हंगामाची बी गर्भात घेण्यास आसुसलेली असते़ अशा वेळी गरज असते ती पावसाची़ जोकमार ती गरज पूर्ण करतो़ त्याच्यामुळे पाऊस येत असल्याची कृषक संस्कृतीची धारणा आहे़ स्त्री-पुरूषांच्या लैंगिक गरजांतील पारदर्शिकता हा देव देतो़ स्त्री विवाहित असली तरी विवाहसंस्थेच्या बंधनात न ठेवता तिला स्वातंत्र्य देतो़ तिचे पातिव्रत्य नष्ट झाले असे तो मानत नाही़ उलट तिला फलधारण होते याचा आनंद मानतो़ कारण फलधारणा स्त्रीचा स्थायीभाव आहे़ म्हणूनच जोकमार सारख्या लोकदैवताबाबत अभ्यास होणे गरजेचे आहे़ त्या अभ्यासातून आपल्याला संस्कृतिक स्थित्यंतराच्या मूळापर्यंत जाण्याचा मार्ग मिळेल़ निसर्गचक्राचे प्रयोजन समजेल़

– डॉ़ चंद्रशेखर कंबार, ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक तथा जोकमारस्वामी या बहुचर्चित नाटकाचे लेखक

वैदिक संस्कृतीच्या पूर्वी इथे नांदत असलेली आर्येतरांची/ द्रविड संस्कृती प्रगत आणि निकोप होती़ या संस्कृतीमध्ये प्रजनन आणि सुफलीकरण यांना विशेष महत्त्व होते़ किंबहुना या संस्कृतीचा पाया भूमी आणि स्त्री यांच्याकडे (माती आणि माता) एकात्म भावनेने पाहिले आहे़ सुफलीकरण आणि प्रजननासाठी भूमीचा आधार घेतलेला दिसतो़ म्हणूनच प्रजननवृद्धीसाठी एकीकडे वारूळाची तर दुसरीकडे लज्जागौरीच्या रूपाने स्त्री जननेंद्रियाची पूजा केली आहे़
लोकसंस्कृतीत भूमी केवळ उपजावू जमीन नव्हे तर भूमाता, भूदेवी मानली आहे़ म्हणूनच गुळ्ळव्वा पूजनाचे प्रयोजन समजून घेता येईल़ बहुप्रसवा मातृदेवतेच्या योनी पूजेप्रमाणे जोकमारची पितृदेवता वा ‘पुरूषाचे’ प्रातिनिधिक रूप म्हणून उपासना केली जात असावी असे अनेक अभ्यासकांना वाटते़ बलवर्धक मानले जाणारे ‘लोणी’ त्याचे मुख्य नैवेद्य असल्याने या तर्काला पुष्टी मिळते़
एकूणच कुंभाराच्या घरातून माती आणून जोकमार तयार केला जातो़ तर पौर्णिमेच्या रात्री परिटाच्या घरी त्याचे शीर फोडले जाते़ (भाद्रपद अष्टमीला जन्मतो, पौर्णिमेला मरतो) बळीराजापासून रावणापर्यंत लोकमान्यता असलेल्या डोक्यांना धोका असल्याचे दिसून येते़ एकाच्या डोक्यावर पाय ठेवले जाते, दुसर्‍याचे डोके छाटले जाते आणि तिसर्‍याचे डोके फोडले जाते़ कुलहीन असलेले हे तिघेही शिवभक्त होते, तिघांनाही व्यापक जनाधार होता, तिघे आपल्या मूल्यांबद्दलही निष्ठा बाळगून होते़ या तिघांच्या डोक्यात एक समान धागा असावा का?

*************************************************************************************************************
लेखक पत्रकार असून सीमावर्ती भागातील लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत़.
Email: channavir@gmail.com
Mob: 99222 41131
(या लेखासाठी ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी डॉ़ चंद्रशेखर कंबार यांचे जोकमार स्वामी ही नाट्यकृती, या नाटकाचे सोलापूरचे जेष्ठ साहित्यिक प्रा़ निशिकांत ठकार यांनी मराठीत केलेले अनुवाद ‘गाणं पंचरंगी पोपटाचं’(साकेत) , डॉ़ शिवराम कारंथ यांचे दीर्घ लेख, डॉ़ भद्रापूर (जोकमार- जानपद साहित्य मंडळ), डॉ़ वीरेश बडीगेर (कृषी मातृदेवता गुळ्ळव्वा- हंपी विद्यापीठ), कर्नाटकातील ग्रामदैवते (संगमेश बिराजदार) लोकजीवन आणि लोकसंस्कृती (संपादक ः द. ता. भोसले- मराठी सांस्कृतिक मंडळ), डॉ. रा. ची ढेरे यांची पुस्तके – (लोकसंस्कृतील लोकदैवते आणि आनंदनायकी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *