जस्ट मॅरीड प्लीज एक्सक्यूज

यशोधरा लाल
अनुवाद : नीता गद्रे

लग्न आणि पालकत्व याविषयीचा प्रामाणिक विचार असलेली, स्वत्वाचा शोध घेणारी कथा…

*************************************************************************************************************

मी विजयला विमानतळाच्या ‘आगमन थांब्या’च्या बाहेर चालत येताना पाहिलं. मी तिथं असल्याचं त्याला माहीत नव्हतं. विमानतळावरच्या प्रखर प्रकाशझोतात त्याचे केस चमकले. त्यानं लांब हाताचा टी-शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्याच्याकडे असलेल्या कपड्यांच्या तीन डिसेंट जोडांपैकी हा एक होता.
तो डौलदारपणे पुढे सरकला. जवळजवळ तरंगतच. तो नेहमीच मला चाकांच्या बुटावर चालणारा जिराफ वाटतो. स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी, अगदी समर्पित होऊन गेली अनेक वर्षे प्रॅक्टिस करणारा जिराफ!
कॉलेजमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या तरुणाप्रमाणे तो दिसत होता; पण त्याबद्दल त्याला कधीही अहंकार वाटला नव्हता.
मी त्याला जवळून बघत होते. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की, नेहमीप्रमाणेच त्याचे तपकिरी डोळे आताही स्थिर नव्हते. ते विद्युतवेगानं हालचाल करत होते. त्यानं मला एकदा सांगितलं होतं की, तो इतकं चांगलं ड्रायव्हिंग करू शकतो. कारण त्याचे डोळे कधीच स्थिर नसतात. तो संपूर्ण परिसराकडे सतत पाहात असतो, त्यामुळे त्याचा भोवताल त्याला नीट माहीत असतो.
त्याची ती वेगानं होणारी डोळ्यांची हालचाल, साध्या डोळ्यांनी पाहणार्‍या इतर मर्त्य मानवांच्या क्वचितच लक्षात येत असे. पण तरी त्यानंतर मी त्याला ‘भिरभिरत्या नजरेचा’ म्हणायला लागले.
मी तिथं असेन अशी अपेक्षा नव्हती तरीही विमानतळावरच्या त्या रंगीत गोंधळाला पार करत त्याचे ते भिरभिरते डोळे माझ्यावर स्थिर झाले. मला बघून तो हसला आणि त्यानं आपला हात उंचावून हलवला.
आपल्या भावनांचं चारचौघांत प्रदर्शन करण्याबाबत तो सावध होता. मी तशी नव्हते. तरीही त्याचं ते हलकेच हात हलवणं माझ्या हृदयाच्या प्रांतात सूक्ष्मशी धडधड उत्पन्न करायला पुरेसं होतं. मी घाईघाईनं त्याच्याजवळ गेले.
आम्ही मिठी मारून एकमेकांचं स्वागत केलं. माझी मिठी उत्साहवर्धक होती आणि त्याची घाईघाईत मारलेली होती. कारण त्याचवेळी तो त्या अनोळखी गर्दीत कुणी आमच्याकडे बघत नाहीये ना, याची खात्री करून घेत होता.
आम्ही एकमेकांचे हात धरले आणि चालायला लागलो. बाहेर वाट पाहात असलेल्या त्याच्या टॅक्सीकडे तो मला चालवत नेत असताना आम्ही अवांतर गप्पा मारत होतो. गाडीमध्ये मी आनंदानं बडबडत होते; पण तो मात्र गप्पात लक्ष नसल्यासारखा माझ्याकडे एकटक बघत होता, हे माझ्या लक्षात आलं.
‘‘काय?’’ मी सावधपणे विचारले.
‘‘काही नाही. मी जे बोललो त्यावर तू विचार केला असशील असं मला वाटत होतं.’’
मी खिडकीच्या बाहेर निसर्ग पाहायला सुरुवात केली. थंडपणे म्हटलं, ‘‘तू कशाबद्दल बोलतोयस मला कळत नाहीये.’’
तो नेमकं कशाबद्दल बोलतोय ते मला नक्की माहीत होतं आणि मला माहीत आहे हे त्याला माहीत होतं. हे मला माहीत असल्याचं त्यालाही माहीत आहे हे मला माहीत होतं. हे सगळं गुंतागुंतीचं होत चाललं होतं. त्यामुळेच, ‘‘ओह! पुरे झालं हनी, किती दिवस आपण हा विषय टाळू शकू असं तुला वाटतं?’’ असं म्हणून त्यानं माझ्या विचारांची तंद्री मोडली तेव्हा मला सुटल्याचा आनंद झाला.
हे अति होत होतं. मी म्हटलं, ‘‘तू माझ्यामागे लकडा लावतोयस विजय. एवढा मोठा निर्णय इतक्या पटकन घेणं कुणाच्याही दृष्टीनं खूप घाईचं आहे.’’
‘‘अरे! पण मी ठरवलंय ना! मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय. मग तुला इतका उशीर का लागावा?’’
‘‘कारण… माझी अजून तयारी नाही.’’
‘‘तुझी आणि केव्हा तयारी होणार ती?’’
‘‘मला माहीत नाही’’, मी प्रामाणिकपणे सांगितलं. पण प्रामाणिकपणाचं बक्षीस या जगात क्वचितच मिळतं.
‘‘माहीत नाही म्हणजे? आणि काय गं, तुझी तयारी आहे हे तुला कधी आणि कसं कळणार?’’
आयत्या वेळी उत्तर ठोकून द्यायचं असं मी ठरवलं, ‘‘ते एक कारण आहे विजय. ते तू समजून घे. मला खात्री आहे, एक दिवस मलाही या प्रश्‍नाचं उत्तर माहीत असेल, पण मला वेळ दे.’’
त्याच्या पुढच्या प्रश्‍नाचं, तो विचारण्याआधीच उत्तर देत मी म्हटलं, ‘‘आणखी काही महिने. कदाचित एक वर्ष.’’
त्याचा चेहरा पडला. हे त्याच्या पचनी पडणं कठीण होतं, पण मला स्वत:साठी वेळ मागून घेणं अत्यावश्यक होतं. एक वर्ष म्हणजे काही फार नव्हतं. तो अर्धवट स्वत:शी पुटपुटलेलं मी ऐकलं. तो म्हणत होता, ‘‘माझं तुझ्यावर प्रेम आहे; पण माझी मलाच खात्री नाहीये की मला तुझ्याशी खरंच लग्न करायचंय की नाही? मला तुमची ही विचार करण्याची पद्धतच कळत नाही, हा अतिशय पुढारलेला वगैरे प्रकार वाटतो. आजकालच्या मुली…’’ इत्यादी.
काहीवेळा विजय असा वागतो की, तो दुसर्‍या ग्रहावरून आलाय. इतकंच नव्हे, तर तो मागच्या पिढीचा आहे असं वाटतं. या सगळ्यांमुळे त्याच्याशी कोणताही वायदा करण्यापूर्वी दीर्घकाळ वाट पाहायची, या माझ्या निश्‍चयाला बळकटी मिळाली.
त्यानं त्याविषयी बोलणं बंद केलं. या गोष्टीचा यापुढे पाठपुरावा करायचा नाही असं त्यानं ठरवलं. त्यानं खिडकीची काच खाली केली आणि सिगारेट काढली.
त्याच्या सिगारेट ओढण्याचा मी कमालीचा तिरस्कार करते हेमाहीत असूनसुद्धा त्यानं माझ्यादेखत ती पेटवली. तेव्हा मी अविश्‍वासानं त्याच्याकडे पाहिलं.
उदार मनानं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं मी ठरवलं. त्यानंच माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याआधीच मी दुर्लक्ष करणं फायद्याचं होतं.
मी त्याच्याकडे पाठ वळवली आणि खिडकीबाहेर बघायला सुरुवात केली. टॅक्सी रहदारीतून हळूहळू पुढे सरकत होती. त्यापेक्षा चालत जाणं जास्त जलद ठरलं असतं.
अस्वस्थ अशा धुरानं भरलेल्या शांततेत आम्ही बसलो होतो. मी ‘तयार’ आहे हे मला कळण्यासाठी आता तर ‘दोन वर्षे’ लागतील, असं मला वाटायला लागलं. तीन महिने कोणत्याही परिस्थितीत पुरेसे नव्हते, हे उघड होतं.
या काही महिन्यांत घडलेल्या अनेक लहानसहान प्रसंगांवर माझे विचार भरकटायला लागले.
*****

14-1
‘मी कॉलेजमध्ये एकटा निष्णात ड्रम वाजवणारा आहे’, असं सांगून माझ्यावर न पटणारं इंप्रेशन मारणार्‍या विजयसारखी मी नव्हते. मी खरी कशी आहे हे त्यानं जाणावं, असं मला वाटे. मग ते खरेपण त्याला आवडो वा न आवडो.
फक्त एकदाच एका सकाळी जेव्हा तो म्हणाला की, त्याला केस कापण्यासाठी बाहेर जायचंय, तेव्हा मी एक सत्य थोऽऽडं ताणलं होतं. त्या वेळी आम्ही आनंदी रोमँटिक प्रेमीयुगुलाच्या टप्प्यावर असल्यामुळे एकमेकांपासून एक मिनिटही दूर राहणं म्हणजे ते मिनिट वाया घालवण्यासारखं आहे, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून मी त्याला सांगितलं की मी एक निष्णात केशकर्तक आहे.
‘‘खरंच?’’ त्यानं विचारलं आणि मी त्याला सांगितलं की आधीच्या काळी कोणाचेही केस कापण्याचा प्रसंग उभा राहिला की मी अगदी एक ‘मागणी’ असलेली स्त्री असायची.
एका गोष्टीचा उल्लेख करायचं मी टाळलं, ते म्हणजे मी दहा वर्षांची असताना एके दिवशी मी खरंच एक ‘मागणी असलेली मुलगी’ झाले होते. माझ्या धाकट्या बहिणीला वाईट वाटायला लावणारा हेअरकट मी केला होता, म्हणून माझ्या आईला मी कुठे लपलेय हे माहीत करून घेण्याची गरज निर्माण झाली होती. तो हेअरकट सरळ रेषेत आला नव्हता. मी अगदी कणखरपणे सांगत होते की, माझ्या कल्पनेत मला तो तसाच व्हायला हवा होता आणि मला तो आवडलाय.
जेव्हा माझी आई माझ्या नावानं ओरडत होती आणि माझी लहान बहीण सांत्वन करायला कठीण व्हावं अशा मोठ्या आवाजात रडत होती, तेव्हा मी माझ्या खोलीतल्या कपाटात रडत बसले होते. त्या लहान वयातही मला कळलं की, ‘जिला नीट समजून घेतलं गेलं नाही अशी प्रतिभावंत’ होणं माझ्याबाबतीत पूर्वनियोजित होतं.
कात्रीच्या बाबतीत सांगितलेला माझा तथाकथित प्रगाढ अनुभवीपणा ऐकून विजयनं मला त्याचा एक छानसा हेअरकट करायला सांगितलं. मन वेधून घेणार्‍या अशा औदार्याचा आणि नम्रतेचा संयोग घडवून आणत मी म्हटलं, ‘‘नक्की. का नाही?’’
बाथरूममधल्या एका उंच स्टुलावर तो बसला आणि मी अगदी सराईत व्यावसायिक दृष्टिकोन बाळगत त्याच्यामागे उभी राहिले. तो आरशात निरखून बघत होता म्हणून मी त्याच्या पुढच्या केसांना हात लावला नाही. पण मी मागच्या बाजूला आरामात कातरकाम केलं. अधूनमधून त्याच्या वाहवासाठी मी थांबत होते. अतिशय आकर्षक पद्धतीनं त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूचे केस मी पाच स्तर देऊन कापले, ते त्याला दिसत नव्हते. पण जेव्हा त्यानं केसांना स्पर्श करण्यासाठी मागच्या बाजूला हात नेला तेव्हा तो म्हणाला की हाताला छान लागतंय आणि या प्रकारचा हेअरकट त्यानं यापूर्वी कधीच केला नव्हता.
दुसर्‍या दिवशी तो उत्साहात ऑफिसला गेला. त्याच्या नव्या हेअरकटची तारीफ होईल अशी त्याची अपेक्षा होती. त्याचे केस कसे दिसताहेत याबद्दल अकारण अस्पष्टवक्ता असलेल्या त्याच्या एका सहकार्‍यानं प्रातिनिधिक आणि सर्वसाधारण अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशा शब्दांत – ‘एखाद्या मांजरानं ओरबाडून केस काढलेत असं वाटतंय.’
विजयला या प्रतिक्रियेनं अर्थातच आनंद झाला नाही आणि पुढचे काही दिवस ऑफिसात असताना जाणीवपूर्वक डोक्याची मागची बाजू हातानं झाकल्याशिवाय त्याला राहवेना.
मला निराश करणारी गोष्ट म्हणजे तो मला हातात कात्री घेऊन पुन्हा कधीही त्याच्या केसाजवळ येऊ देईना. मी त्याला म्हटलं की, मी दुरुस्ती म्हणून मागच्या बाजूला थोडीशी कापाकापी करून त्याच्या केसांचे लेअर्स समान करून देते. एका रेषेत आणून देते; पण तो ऐकेना.
आमच्या मतभेदाचं पर्यवसान भांडणात होत असे. मूर्खासारख्या सतत बढाया मारणं आणि मनात येईल ते फटकन बोलणं, हा त्याचा स्वभाव लक्षात घेतला तरीही त्याच्या बोलण्यानं आणि कृतीनं मी भडकत असे.
त्या वेळी विजयचा मोठा भाऊ अजय आणि त्याची बायको गरिमा विजयजवळ राहात होते. माझं त्यांच्याशी पटायचं. आमच्या काही भांडणांचे ते साक्षीदार होते. या भांडणांचं पर्यवसान माझ्या तरातरा घराबाहेर निघून जाण्यात होई. माझ्या असं लक्षात आलं की ते दोघं माझी बाजू घेतात. विशेषत: अजय. तो नेहमी विजयला समजावून सांगायचा, ‘तू मोठा आहेस, तुला कळायला पाहिजे.’ विजयनं मला हा वृत्तांत सांगितला की मला किती छान वाटायचं! अजयबद्दल ममत्व निर्माण व्हायचं.
एकदा रात्री उशिरा, गरिमाला फ्लॅटच्या बाल्कनीत विजय खाली असलेल्या मुलांच्या खेळाच्या मैदानाकडे एकाकीपणे पाहात असलेला दिसला. तिनं जेव्हा तो काय करतोय असं त्याला विचारलं, तेव्हा त्यानं मुलांच्या झोपाळ्यावर बसलेल्या एका आकृतीकडे बोट दाखवून म्हटलं, ‘‘यशोधरा, ती माझ्यावर पुन्हा रागावलीय.’’
गरिमा म्हणाली, ‘‘किती गोऽऽड!’’ विजयनं तिच्याकडे शंकायुक्त वैतागानं पाहिलं. त्याच्या दृष्टीनं त्याचं ते वागणं इतर काहीही होतं, पण गोड नव्हतं. या सगळ्याची सुरुवात त्यानं माझ्या आवडत्या कुर्त्यांपैकी एका कुर्त्यावर सहज मारलेल्या एका शेर्‍यामुळे झाली.
सौंदर्याचा अनुभव देणार्‍या, छान काळ्या आणि पिवळ्या लांब बाह्यांचा, मण्यांनी सजवलेला असा कुर्ता मी नेहमी माझ्या जीन्सवर घालत असे. मला नेहमीच असं वाटत असे की मी त्या पेहरावात कूल दिसते, पण विजयनं मला प्रेमानं, कमालीचं स्वारस्य दाखवत, ड्रेसच्या मण्यांशी खेळत खेळत विचारलं, ‘‘मला सांग, हे असलं हरे रामा हरे कृष्णा टाइप काहीतरी तू नेहमी का घालत असतेस?’
त्यानंतर सगळंच उतरणीला लागलं आणि त्याचं पर्यवसान मी घुश्श्यात घराबाहेर जाण्यात झालं. रात्री इतक्या उशिरा जाण्यासारखी दुसरी जागाच नसल्यानं मी खेळाच्या मैदानाकडे गेले. वाटलं की, रात्रीच्या थंड हवेच्या झुळकीनं मी स्वत:ला शांत करू शकेन. काही मिनिटं गेली. मी नाकानं सूं सूं करत होते. तेवढ्यात त्या काळ्या रात्रीत अचानक विजय प्रगट झाला. त्याच्या हातात दोन संत्र्यांच्या आईस लोलीज होत्या. त्यापैकी एक त्यानं माझ्यापुढे धरली. मी काही न बोलता ती घेतली. दुसरी आईस लोली आपल्या हातात पकडत तो झोपाळ्यावर माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, ‘‘गरिमा म्हणाली की, आपण लहान मुलांसारखे भांडतो. मग म्हटलं आपलं भांडणही लहान मुलांसारखंच मिटवू या.’’
झोपाळ्यावर बसून तात्त्विक शांततेत आम्ही आमच्या लोलीज संपवल्या आणि थोड्या वेळानं वरच्या मजल्यावर गेलो.
त्याचा संयम, शांतपणा क्वचितच ढळत असे. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून मी निराश व्हायला लागले तेव्हा एकदाच त्यानं सांगून टाकलं, ‘‘मी सांगतोय तुला! तुझे असले हे टँपर टेन्ट्रम्स कसे हाताळायचे हे मला कळत नाही.’’ तेव्हा कुठं मला कळलं की त्याच्या भावनोद्रेकाच्या क्षणी आधीच कमकुवत असलेली त्याची इंग्रजी भाषेवरची पकड अधिकच ढिली होते, ‘टेंपर ट्रॅन्ट्रम्स – मनोवस्थेतील बदल’ ऐवजी तो ‘टँपर टेन्ट्रम्स’ हीच शब्दरचना पुन:पुन्हा म्हणत राहिला. न राहवून मला हसण्याची अनावर उबळ येईपर्यंत त्यात त्याला कोणतीही चूक जाणवली नाही.
मी का हसत होते हे धापा टाकत त्याला सांगेपर्यंत माझा श्‍वास अडकलाय, असंच त्याला वाटलं. त्यानंतर आमच्या भांडणाचे दु:खदायक क्षण उजळून टाकण्यासाठी आम्ही वरचेवर ‘टँपर टेन्ट्रम्स’ हे शब्द उच्चारायचो. काहीवेळा त्याचा उपयोग व्हायचा.
आमच्या टॅक्सीला, थांबण्याआधीचा मागे खेचणारा गचका बसला तसा सध्याचा मूड आनंदी करण्यासाठी त्या शब्दरचनेचा वापर करावा असं मला वाटलं, पण मी तसं करायचं नाही असं ठरवलं. त्याचं ते माझ्या तोंडावर निर्लज्जासारखा धूर सोडणं म्हणजे कळस होता.
टॅक्सीचं दार धाडकन बंद करून विमनस्कपणे त्याच्या फ्लॅटकडे जात असताना, माझ्या मनात आलं, लग्नच ठरवण्यासाठी मला ‘तीन’ वर्षंही लागतील. कुणास ठाऊक!
******
अजय आणि गरिमाबरोबर त्याच्या घरी आम्ही शांतपणे जेवलो. आम्ही आमचं बरंचसं संभाषण त्या बिचार्‍या जोडप्याच्या माध्यमातूनच केलं. अगदी कमीवेळा आम्ही धोकादायक आणि अतिरिक्त विनयानं एकमेकांशी बोललो.
आमच्या खोलीत आल्यावर एकमेकांकडे पाठ वळवून आम्ही झोपलो. मी झोपेचं सोंग करत होते. मला त्याच्याशी बोलायचं होतं. तसं मी ठरवलंही. त्यासाठी मी त्याच्याकडे वळले, पण तो मंद घोरत होता. मी त्याला हलवून जागं करायचा प्रयत्न केला. क्रमाने चढत जाणार्‍या आवाजात कुजबुजत मी म्हणाले, ‘विजय, विजय’, पण तो दिव्याप्रमाणे मालवला गेला होता. वैतागून मी त्याच्याकडे पुन्हा पाठ फिरविली. स्वत:शी कुरकुरत मी झोपी जाण्याचा प्रयत्न केला, पण बराच वेळ मला झोप आली नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळी मी उशिरा उठले. प्रखर सूर्यप्रकाशामुळे माझे डोळे जळजळत होते. मी माझ्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि मला जाणीव झाली की, मला आजारी असल्यासारखं वाटतंय. आदल्या दिवशी दुपारी जेवण म्हणून खाल्लेल्या – माझ्या गेस्ट हाउसमध्ये स्वत:साठी बनवलेल्या शिळ्या मॅगीमुळे आणि चिप्समुळे बहुधा माझं पोट भयंकर दुखत होतं आणि मला मळमळल्यासारखं आणि अशक्त वाटत होतं.
गेल्या काही महिन्यांतला हा पहिलाच प्रसंग असेल की मी आजारी पडलेय. त्यामुळे आजारी माणसाची काळजी घेण्याबाबत विजय किती हळवा आणि दुबळा आहे हे मला कळलेलं नव्हतं. आमच्यातले आदल्या दिवशीचे सर्व मतभेद तो विसरला. माझ्या आजाराबाबत त्याची इतकी तारांबळ उडाली की तितकी तर माझ्या आईचीही कधी उडाली नव्हती. त्यानं मला काही खायला हवंय का ते विचारलं आणि मी नकारार्थी उत्तर दिलं.
मला इतकं आजारी वाटत होतं की, मी काही खाऊ शकेन असं मला मुळीच वाटलं नाही.
‘‘पण तू काहीच खाल्लं नाहीस तर तू तुझी ताकद कशी परत मिळवणार?’’ त्यानं धमकावलं.
सुरुवातीला ते लक्ष देणं चांगलं वाटलं, तरी नंतर ते प्रमाणाबाहेर व्हायला लागलं. मी जोर देऊन सांगितलं की मला आता काय हवं असेल तर ती झोप हवीय, पण त्यानं गडबड-गोंधळ सुरूच ठेवला आणि ‘हे खा, ते पी’ अशा सूचना द्यायला लागला. दर पंधरा मिनिटांच्या अंतरानं माझं टेंपरेचर बघायला लागला.
मी तोंडात थर्मामीटर धरून माझ्या गादीत पडून होते. तोपर्यंत तो आजवर कधीही न दाखवलेल्या उत्साहानं खोलीतील बारीकसारीक कामं करत होता.
भयानक गोष्ट म्हणजे त्यानं असं जाहीर केलं की, माझी तब्येत पुन्हा धडधाकट व्हावी म्हणून माझी सेवा करण्यासाठी, तो दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी ऑफिसात रजा टाकणार आहे.
गडबड-गोंधळ करण्याचे नवे, संशोधित मार्ग तो वापरत होता. मला चांगलंचुंगलं खायला घालण्यासाठी सगळं चाललं होतं. घरात असलेले सर्व खाद्यपदार्थ आणि पेयं तो मला देऊ करत होता. सरतेशेवटी त्यापैकी काहीतरी खाईन असं मी कबूल केलं.
यशाची ही पहिली खूण दिसताच त्याच्या मनात आनंदानं खळबळ उडाली. त्यानं मला एक मोठा मग भरून चॉकलेट घातलेलं दूध प्यायला लावलं. कारण काय तर ‘एकूणच दूध हे प्रकृतीला चांगलं.’ आणखी एक कारण म्हणजे, ‘तू जर काहीही खाल्लं नाहीस तरी शरीरातली द्रवाची पातळी कायम राखण्यासाठी तू काहीतरी प्यायला तरी पाहिजेस.’
माझ्या आजारपणाच्या स्थितीत ठळक अशी कोणतीच सुधारणा दिसत नव्हती. महत्त्वाचं म्हणजे दूध प्यायल्यानंतर माझ्या पोटाची अवस्था आणखीनच वाईट झाली होती. दु:खानं विव्हळणार्‍या आणि तीव्र वेदनेमुळे हातानं पोट घट्ट पकडलेल्या स्थितीत मला त्यानं गादीवर बसायला लावलं आणि मोठ्ठा बाऊल भरून पपई खायला लावली. म्हणाला, ‘‘मला माहीत आहे की पपई पोटाकरिता खूप चांगली. माझी आई तसं म्हणते.’’
माझ्या इच्छेविरुद्ध ते दळदार फळ मी कसंतरी गिळलं. मला पपई मुळीच आवडत नाही. त्यामुळे आता तर मला उलटी होणार असं जास्तच वाटायला लागलं.
‘‘तुला उलटी होणार असं वाटतंय?’’ त्याच्याकडे यावरही उपाय होता. त्यानं थोडं आलं किसलं आणि ते मला चोखायला दिलं. मला त्यानं खात्री दिली की त्यामुळे मला ताबडतोब बरं वाटेल. पपईइतकंच माझं सर्वांत नावडतं काय असेल तर ते म्हणजे आल्याची चव. पण मी इतकी अशक्त झाले होते की, कसलाच प्रतिकार करू शकत नव्हते. मी स्थितप्रज्ञाप्रमाणे आलं चोखायला सुरुवात केली. त्यानंतर मला जो उलटीचा उमासा आला तो इतका जोरदार होता की, मला तो थांबवताच येईना. मी कशीबशी ताकद गोळा केली आणि झोकांड्या खात टॉयलेटकडे गेले. टॉयलेटमध्ये मला तीव्र ओकार्‍या व्हायला लागल्या. त्या उलट्यांच्या दरम्यान मला जाणीव झाली की, माझी काळजी करणारा विजय माझ्या मागेच उभा होता आणि मला उलटी करण्यासाठी मदत करत होता. अशक्त हातांनी मी त्याला बाहेर ढकलण्याचा आणि माझ्या मागचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं जबरदस्तीनं मला टॉयलेटच्या सीटवर ओणवं केलं आणि माझे केस मागे सारण्यासाठी तो माझ्या डोक्यावर हात फिरवायला लागलं… शेवटी माझ्या उलट्या थांबल्यावर मी वॉशबेसीनपर्यंत कशीतरी धडपडत आले आणि चेहरा स्वच्छ करायला लागले. मी जेव्हा वर पाहिलं तेव्हा मला आरशात आम्हा दोघांचं प्रतिबिंब दिसलं. मी आधी स्वत:कडे पाहिलं. माझी पार धुलाई झाली होती. माझा चेहरा विवर्ण, केसांचा गुंता झालेला, केस तेलकट झालेले, डोळे लाल, पाण्यानं भरलेले. त्या वेळी माझं स्वत:चं वर्णन करण्यासाठी जर मी कोणता शब्द वापरला असता तर तो म्हणजे, ‘किळसवाणी.’
मग मी आरशातल्या विजयकडे पाहिलं. तो माझ्या डोक्याच्या मागच्या भागाकडे पाहात होता. माझे केस तो अजूनही प्रेमानं थोपटत होता आणि स्वत:ला दोष देत होता. ‘ओ! यार… ही माझीच चूक आहे. मी आल्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळला असता तर त्याचा उपयोग झाला असता. आता मी तुला लिंबू पाणी देतो, ओके?’ हाच तो नेमका क्षण, जेव्हा मला काहीतरी जाणवलं. मी खोलवर श्‍वास घेतला आणि एका मंद उच्छ्वासाबरोबर माझ्या तोंडून शब्द आले, ‘‘ओके. आपण ते करू या.’’
‘‘ओके?’’ तो त्याच फाजील उत्साहात म्हणाला. ‘‘ओके, तू थांब. मी आणतोच.’’
‘‘लिंबू-पाणी नव्हे ठोंब्या.’’ मी फुत्कारत म्हटलं, ‘‘ओके. आपण लग्न करू या.’’
*************************************************************************************************************
(‘जस्ट मॅरीड प्लीज एक्सक्यूज’ या यशोधरा लाल यांच्या या आगामी पुस्तकातून ही कथा साभार घेतली आहे. हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने लवकरच प्रकाशित होत आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *