ललितबंध

जयंत विद्वांस
स्वर आणि सूर जुळून आले की जगण्याचीच एक अविट मैफल रंगते. समृद्ध करणारे हे ललितबंध
मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्‍न पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा.
*************************************************************************************************************

म्हणून मलापण दिसतं!
दहाची एस.टी. धापा टाकल्यासारखी पुलाच्या अलीकडच्या चढावर थांबली आणि पटकन उतरलो. नाही तर महिन्यात एकदा भरणारा बाजार हुकेल अशा भीतीने पिशवी फुटून रस्त्यावर धान्य सांडावं तशी माणसं एस.टी.च्या लाल दरवाजातून बाहेर पडली. यशोदामावशी उतरायची वाट बघत एक हात दरवाजाला धरून कंडक्टर उभा होता.
‘ये मावशे, चल की पटकन…’
‘दम धर की वाईच, तरणी पळाली पटापटा, म्हातारीला पायाखाली घेतील म्हणून मागं थांबली ना, दुपारच्याला गाडी थांबव परतीची, म्या हाईच हिथं उभी, लवकर जाऊन बायकूला भेटायची घाई नगं उगाच.’
‘उतर चल, लोकं खोळंबल्यात.’
हा संवाद दर वेळेला व्हायचा. लोकांना सवयीचा होता. त्यामुळे कुणीही तक्रार केली नाही. यशोदामावशी नीट उतरल्यावर कंडेक्टरने डबल दिली आणि एस.टी. निघाली. ड्रायव्हर आणि कंडेक्टर दोघेही तिच्याच गावचे होते. दिवसाला चारेक फेर्‍या व्हायच्या तिच्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी. संध्याकाळची शेवटची फेरी झाली की गावदेवीजवळ एस.टी. लावून दोघं आपापल्या घरी जायचे. आता तीच तालुक्याला गेलेली एस.टी. तासा- दीड तासात परत यायची आणि यशोदा त्या एस.टी.तूनच गावी परतायची.

12-1
सत्तरीच्या आसपासची, गव्हाळ रंगाची, पिकल्या केसांची, कमरेत थोडीशी वाकलेली, निळ्या फुलांची पांढरी कॉटनची नऊवार नेसलेली, हातात गावंढ्या शिंप्याकडून शिवलेली एक आडमाप मोकळी काळपट पिशवी, दुसर्‍या हातात तिच्या डोक्यापेक्षा उंच काठी, गळ्यात एक चकाकती बोरमाळ आणि आणि चेहर्‍याचं पार वहीत जपलेलं पिंपळपान झालेली यशोदा शोधल्या नजरेने सगळीकडे बघत कडेच्या मैलाच्या दगडावर दम गोळा करायला बसली. पिशवीतून तिने चंची काढली. अर्ध पान घेतलं. उगीच त्याची एखादी शीर काढल्यासारखं केलं. इवल्याशा गोल डबीतून उजव्या अंगठ्याने चुना काढला आणि बोट पुसल्यासारखा पानाला लावला. चवीला मीठ टाकावं तशी थोडी तंबाखू, काताचा तुकडा आणि सुपारीचा भुगा तिने पानात टाकला आणि त्या सगळ्या ऐवजाची पुरचुंडी तिने दाढेखाली घातली. तसेही थंडीचे दिवस असल्याने ऊन फार नव्हतं. तोंडातल्या पानाला चिंचेला सुटतं तसं पाणी सुटायला लागल्यावर तिला जरा बरं वाटलं. एक पिचकारी मागच्या बाजूला टाकून ओठांच्या दोन्ही कडेला उभ्या काडीसारखे आलेले लाल डाग पुसून ती उभी राहिली आणि बाजाराकडे निघाली.
आज इतकी वर्षे ती बाजाराला येत होती. पण, अजूनही तिचा उत्साह मात्र अगदी पहिल्यांदाच आल्यासारखाच असायचा. काय घेऊ नी काय नको असं व्हायचं तिला. जी काय खरेदी असेल ती तिच्या लहानग्या नातीसाठी असायची. कोपर्‍यालाच आपलं दुकान लावून बसलेल्या गुजाक्काने तिला हाक मारली, ‘आलीस काय गं, पिशवी कशाला आनलीस, बारदाना तरी आनायचास खरेदीला, येष्टीच्या टपावर टाकून न्यायला बरा.’ यशोदा तोंडभरून हसली. ‘धंदा काय दिसत नाय तुझा सकाळपासून म्हनून मला हाक मारलीस काय गं?’ ‘बस गं, च्या पी कोपभर, बाजार काय पलून नाय जात.’ किटली घेऊन फिरणार्‍या पोर्‍याला हाक मारून गुजाक्काने दोघींना चहा घेतला. चहा झाल्यावर यशोदेनं परत एकदा पुन्हा अर्ध पान जमवून तोंडात टाकलं आणि गुडघ्यावर एक हात टेकून दुसर्‍या हातातल्या काठीचा आधार घेत उठली आणि निघाली. ‘येताना घेते तुझ्याकडं, आधी फुडचं उरकून येतो.’ कनवटीचे पैसे चाचपून तिने शंभराच्या चार नोटा बाहेर काढल्या आणि बाकी सगळ्या परत त्या कमरेच्या वळकटीत गायब केल्या. काय काय घ्यायचं त्याची उजळणी मनाशी एस.टी.त बसल्यापासून झालेली होती. नातीच्या आवडीच्या लाल रंगाच्या स्याटीनच्या रिबिनी तिने घासाघीस न करता घेतल्या. नंतर रेवड्या, लाल रंगाची गोड गाठीशेव पावशेर, राजगिर्‍याचे लाडू, पिवळ्या बॉब्या, नाक मुरडत मरून रंगाची नेलपॉलिशची बाटली, तिच्या जटा काढायला मोठ्या दातांचा कंगवा, एक लेस लावलेला पिवळ्या रंगाचा घेरदार फ्रॉक अशा एकेक गोष्टी तिच्या पिशवीत जात होत्या. एस.टी. येऊन गेली तर परत तिनेक तास थांबावं लागेल, या भीतीने ती परत वळली. ‘किती वाजले रे दाम्या, येळ झाली का बशीची?’ ‘नाय अजून अन् तुला घेतल्याबिगार जाईल का यशवंता,’ प्लास्टिकची खेळणी विकायला बसलेला दामू म्हणाला. ‘हे घे नातीला एक, पैशे नकोत, असंच ने. दामू मामानी दिलंय म्हणून सांग,’ असं म्हणत त्याने किल्ली फिरवल्यावर उड्या मारणारं माकड तिच्या पिशवीत टाकलं. ‘तुला काय फुकट येतं काय,’ असं म्हणून तिने दहाच्या तीन नोटा त्याच्या हातात कोंबल्या. ‘अगं राहू दे गं’ म्हणत त्याने नोटा परत तिच्या पिशवीत टाकल्या. ‘त्ये चालवायचं कसं त्ये तरी सांग.’ ‘आजच्या पोरांना सांगावं लागत नाय, पण दावून ठेवतो तुला’ म्हणत दामूने त्याच्याकडच्या एका माकडाला किल्ली देऊन त्याला उड्या मारायला लावल्या. लहान मुलाच्या उत्सुकतेने तिने ते थांबेपर्यंत बघितलं. परत गुडघ्याला हात टेकवून उठायच्या आधी तिने रेवडीची एक पुडी त्याच्या मुलासाठी हातात कोंबली आणि ती हाडात कुरकुरत उठली.
दूरवर कुठेतरी एस.टी.चा आवाज आल्यासारखं तिला झालं आणि ती लगालगा निघाली. ती कोपर्‍याला आली तशी मोकळा रस्ता बघून मंदावली. गुजाक्काने तिला हाक मारली, ‘काय गं, सकालचा फुकट च्या पिवून पलतेस काय गं, यष्टीला टायेम हाय अजून, बस वाईच, येशवंता वरच्या अंगाला आला की हारन देईल.’ गुजाक्काच्या पोत्यावर तिच्याशेजारी यशोदा बसली आणि एस.टी.त बसलो की तिथे पान खाता येणार नाही नीट म्हणून तिने चंची काढली आणि पान खाल्लं. ‘काय काय घेतलंयेस भवानीला तुझ्या.’ कुणीतरी विचारायची वाट बघत असल्यासारखं तिने उत्साहाने पिशवी गुजाक्काच्या पुढ्यात टाकली. तिनेही मोठ्या कौतुकाने एकेक वस्तू बाहेर काढून बघितल्या आणि परत आत टाकल्या. ‘सालंत जाईल नाय औंदाच्या वर्सी.’ ‘ल्हान हाये गं अजून, पण ऐकेल कोन माझं घरात? आपन काय शिकलो शालेत? उगाच बुकं वाचून डोळे खराब करायची कामं.’ गुजाक्काच्या कडेला बसलेली तिची नात कौतुकाने दोघांकडे बघत होती. तिच्या तोंडावरून मायेचा हात तिने फिरविला आणि राजगिर्‍याचा एक लाडू तिच्या हातावर ठेवला. तेवढ्यात एस.टी.चा हॉर्न वाजला वरच्या वळणाला, तशी यशोदा लगबगीनं उठली आणि पिशवी घेऊन ‘येते गं’ म्हणत रस्त्याच्या पलीकडं निघाली. ‘अगं थांब, सोडतो पलीकडे तुला मी’ म्हणत मागून हट्टाने नातीसकट धावत आलेल्या गुजाक्काने तिचा हात धरला आणि ती निघाली. यशवंताने एस.टी. थांबल्यावर दार उघडून धरलं. लोक अंधारात शिरल्यावर दिसेनाशी होतात तसे रस्त्यावरून एस.टी.त गुडूप झाले. दाराशी गुजाक्का उभी होती पिशवी धरून. ती त्याने आत घेतली आणि डबल दिली. ड्रायव्हरने घाम पुसला आणि यशवंताकडे बघितलं. गावात गाडी गेली आणि मारुतीच्या देवळाजवळ यशोदाची पंधरा वर्षांची नात पिशवी घ्यायला उभी होती. यशवंताने तिला पिशवी दिली, ओल्या डोळ्यांनी ती घराकडे निघाली आणि एस.टी. शेवटच्या थांब्याकडे. सकाळी तिनेच यशवंताला रिकामी दिलेली पिशवी भरून आणली होती. दर महिन्याला येते तशी. घरात गेल्या दहा वर्षांची वर्षाला बारा अशी एकशेवीस किल्लीची खेळणी होती साठवून ठेवलेली. आता मी मोठी झालीये हे आज्जीला कसं सांगायचं हे तिला समजत नव्हतं. कधी थांबणार हे सगळं. तिथे बाजार भरायचा बंद होईल तेव्हा, गुजाक्का मरेल तेव्हा किंवा यशवंता घरी बसेल तेव्हा, एवढ्याच शक्यता तिच्या वयाच्या मेंदूला पेलत होत्या.
दहा वर्षांमागची गोष्ट. रोड क्रॉस करताना पाय अडकून पडल्यावर हात सुटल्यामुळे गुजाक्काची नात रस्त्यातच रडत थांबली आणि दोघी पुढे गेल्या. पुलावरचं येतानाचं वळण घातक होतं. मोठी गाडी असली तरी झाडांमुळे ती पुढ्यात आल्यावरच दिसायची. ट्रकचा आवाज ऐकून यशोदा तशीच मागे फिरली आणि काठीने तिने गुजाक्काच्या नातीला पलीकडे ढकललं. चढ असल्यामुळे आधीच जोरात आलेला ट्रक यशोदाला शांत करून भरधाव निघून गेला. तिची पिशवी आणि वस्तू रस्ताभर झाल्या. तेव्हापासून हे सगळं दर महिन्याला घडतं त्या रस्त्यावर, दिसतं फक्त मोजक्याच लोकांना, दामू, यशवंता, एस.टी.चा ड्रायव्हर, गुजाक्का आणि मी. ‘मला का दिसतं?’ हे काय विचारताय खुळ्यासारखं, ट्रक कोण चालवत होतं मग? मीच, म्हणून….

भैरवी

लहान असताना घरी कुणी नात्यातलं, ओळखीतलं आलेलं माणूस गाणं वगैरे म्हणणार असेल तर त्याला गायचा आग्रह व्हायचा. मोठ्या माणसांकडून शेवटी ‘एक झकास भैरवी होऊ दे’ असं म्हटलं जायचं. तो ‘राग’ आहे वगैरे गोष्टी काही ठाऊक नव्हत्या. चिमुकला मेंदू (अजूनही तेवढाच आहे, उत्क्रांती काहीही नाही.) विविध शक्यता तपासत बसायचा. मागच्या वेळेला अभंग होता भैरवी म्हणून यावेळी वेगळंच गाणं कसं भैरवी म्हणून असे अज्ञानी प्रश्‍न पडायचे. मैफिलीच्या शेवटी म्हटला जाणारा राग असं नंतर समजलं. मग आयुष्याच्या संध्याछायेलापण भैरवी म्हणायची वेळ आली वगैरे असं झालं. एकदा शिक्का बसला की बसला, तसं झालंय भैरवीचं. अपभ्रंश, अर्धवट माहितीवर आधारित पायंडे, कालबाह्य प्रथा सहसा बदलत नाहीत, उलट त्या नेमाने पाळल्या जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेला राहणारे इंग्रज दक्षिण भागाला Behind the Bazar म्हणायचे त्याचं भेंडी बाजार झालं आणि तेच अधिकृत नाव झालं. भारतीय शास्त्रीय संगीतात जी घराणी आहेत, त्यात हे भेंडी बाजार घराणं पण आहे.
एका मासिकात मी वाचलं होतं. भैरवी हा सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणायचा राग. तेव्हा मैफिली रात्रभर चालायच्या आणि पहाटेला संपायच्या. सकाळी सांगता करताना भैरवी सकाळचा राग म्हणून गायला जायचा. नंतर ते भैरवी मैफिल संपताना म्हणतात असं रूढ झालं आणि ती प्रथा झाली. एरवी नियमात चालणारी घराणी यात कुठे आडवी आली नाहीत हे नशीब. मैफिल संध्याकाळी, रात्री जरी संपली तरी भैरवी आळवली जाऊ लागली. अतिशय गोड, चटकन् ओळखता येईल असा हा राग आहे. ग, रे, ध, नी – सगळे कोमल स्वर आहेत. कठोर, तीव्र काहीही नाही म्हणून मी साने गुरुजी राग म्हणतो याला. मनाला अतिशय ‘शांत’ करणारा हा ‘राग’ आहे. त्याचे एखादा स्वर बदलून केलेले, नटभैरव, अहिरभैरव वगैरे प्रकारही आहेत; पण ते अचूक टिपता येण्याएवढी बुद्धी माझ्याकडे नाही. ती नाहीये तेच बरं आहे. स्वर रांग सोडून कधी बाहेर येतोय का, यावर लक्ष ठेवणारे ट्रॅफिक पोलिस रसिकत्व करायचंय काय. एखादं गाणं आवडलं आणि ती भैरवी आहे हे मला समजलं नाही तरी मला त्याची खंत वगैरे वाटत नाही. त्या चालींनी दिलेला आनंद महत्त्वाचा. राग ओळखून चारचौघांत मला फार कळतं हे दाखवणं एवढाच त्याचा उपयोग माझ्यादृष्टीने.
सिनेमाच्या गाण्यांचा अर्थ आपण आपल्या आयुष्यात घडलेल्या, घडाव्याशा वाटणार्‍या घटनांशी जोडतो त्यामुळे त्यांच्याबरोबर लवकर मैत्र जुळत असावं. अतिशय अचूक शब्दं, चित्रपटातील सिच्युएशन, सुरेल गळा आणि भैरवी म्हणजे कातील प्रकरण. काळजाला हात घालतात अगदी ती गाणी. हे असं नुसतं सांगून ते डोळ्यापुढे येणार नाही. प्रत्येकाची आवडत्या गाण्यांची यादी असतेच तशी माझ्याकडे भैरवीची एका फोल्डरमध्ये आहे. काही असतील इतरही जी भैरवी आहे हे माहीतही नसेल; पण अरे, हा आपल्या गावचा असं कळल्यावर जशी त्या माणसाबद्दल आपल्याला जरा जास्ती आपुलकी वाटते, तसं माझं भैरवी समजल्यावर होतं एवढंच. नौशादच्या दोन भैरवी मला प्राणप्रिय आहेत, ‘बैजू बावरा’मधलं ‘तू गंगा की मौज मै’ आणि ‘गंगा जमना’चं ‘दो हंसोंका जोडा’. पहिल्यात ती विसेक वर्षांची होडीत हाताच्या तळव्यात तोंड झाकून बसलेली देखणी मीनाकुमारी अतिशय मोहक आहे आणि दुसर्‍या गाण्यात आलेले ते सध्या दुर्मिळ झालेली मोरा, असुअन, भयो, रतिया ही शब्दं. बघा, तुम्ही ‘मेरा गोरा अंग ले ले’पेक्षा ‘मोरा गोरा अंग लई ले’ला काय गोडवा आहे ते. लता ‘गजब’ ‘जुलम’ म्हणताना ‘ज’चा उच्चार ‘ज’हाजातला करत नाही तर ‘ज’गातला करते, मुश्किल न म्हणता मुसकील म्हणते ते सगळं कानाला काय गोड लागतं, ऐका एकदा. गाण्याच्या सुरुवातीलाच सारंगी की व्हायोलीन जे काही वाजतं तेच इतकं करूण आहे की पुढे काय, याची जाणीव व्हावी. एखाद्याला तिच्या तळतळीचा शाप लागेल असं वाटायला लावणारी चाल आहे ती.
‘चिंगारी कोई भडके’, ‘जब दिल ही टूट गया तो’, ‘जा रे जा रे उड जा रे पंछी’, ‘जिया जले जां जले’, ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’, ‘जो भजे हरी को सदा’, ‘मधुकर श्याम हमारे चोर’, ‘भोर भये पनघटपे’, ‘फूल गेंदवा न मारो’, ‘मै पिया तेरी’ (बासरी काय सुंदर वाजवलीये या गाण्यात), ‘हमे तुमसे प्यार कितना’ (किशोर आणि परवीन, दोन्ही श्रवणीय), ‘इस भरी दुनिया में’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा’, ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’, ‘मिले जो कडी कडी’, ‘साकीया आज मुझे नींद नही आयेगी’, ‘आया है मुझे फिर याद वो जालीम’, ‘ये जिंदगी के मेले’, ‘दिल आज शायर है’, ‘जैसे राधाने माला जपी’, ‘दिल का खिलौना हाये टूट गया’, ‘किसी बात पे पर मैं’, ‘किसी नजर को तेरा इंतजार’, ‘मुझको इस रातकी तनहाई में’, ‘तुम्हे और क्या दू मैं’ – ही सगळी गाणी माझ्या माहितीप्रमाणे भैरवीत आहेत (नसेल समजा एखादं तरी मी फोल्डर काही बदलणार नाहीये.) अवीट गोडी, कितीही वेळा ऐका. भैरवीत एकूणच आळवणी, तक्रार, साद घालणं, आठवण हे भाव जास्ती उमटतात असं माझं मत आहे. पोटतिडकीनं बोलताना जसा माणसाचा आवाज पोटातून येतो ना, तशी भैरवीतली भावना खूप आतून कुठूनतरी खोलवरून येते. जिव्हारी लागाव्यात अशा काही चाली आणि त्यात गुंफलेले शब्द आहेत. प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल इतकी सुंदर गाणी आहेत ही.
शंकर-जयकिशन यांच्यातल्या शंकरचा हा अतिशय आवडीचा राग. ‘संन्यासी’ सिनेमाची सगळी गाणी म्हणे त्यांनी या एकाच रागात केली होती; पण एकूणच त्यांची या रागातली अनेक सुरेख गाणी आहेत. बरीचशी अर्थात ‘आरकें’साठीचीच आहेत. ‘आवारा हु’, ‘छलिया मेरा नाम’, ‘कहता है जोकर’, ‘ऐ मेरे दिल कही और चल’, ‘कैसे जाऊ जमुनाके तीर’, ‘मेरा जूता है जपानी’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘सब कुछ सिखा हमने’, ‘दोस्त दोस्त ना रहा’, ‘तेरा जाना दिलके अरमानोका’, ‘रमय्या वस्तावैया’, ‘बोल राधा बोल संगम’, ‘किसीने अपना बनाके मुझको’ (याचा एंंट्रो आणि इंटरल्यूड पिसेस इतके सुंदर आहेत की मी एकदा परत त्यासाठी हे ऐकतो), ‘छोड गये बालम, ‘दुनिया बनानेवाले’, ‘कैसे समझाउ बडे नासमझ हो’ ही त्यांची काही गाणी आहेत भैरवीतली. ‘एसजें’च्या बर्‍याच गाण्यांचे एंट्रो, इंटरल्यूड स्वतंत्र चाली होतील इतक्या सुरेख आहेत (‘आवारा हुँ’, ‘प्यार हुआ’, ‘रमय्या’, ‘ऐ मेरे’ ऐका एकदा परत). पण त्यांची भैरवीतली तीन गाणी अशी आहेत की त्यापुढे इतर काही नाही. ‘बरसात में हमसे मिले तुम’ (ठेका, एंट्रो आणि सगळंच अप्रतिम, प्रत्येकी फक्त दोनच कडवी असलेली दोन गाणी ‘राजा की आयेगी बारात’ (त्यात ‘दिलपे लगेगी ठेस’ नंतर जे वाजतं- बहुतेक मेंडोलीन आहे – ते भारी आहे एकदम) आणि अजरामर ‘घर आया मेरा परदेसी’.
शशी कपूरने आर.के.ला विचारलं होता, ‘परत करशील का असं सुंदर गाणं?. तो म्हणाला, ‘नर्गिस आण करतो.’ त्यातला ठेका वाजविण्यासाठी म्हणे त्याला तो ढोलकीवाला लाला हवा होता, तो सापडेपर्यंत त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं नव्हतं. त्यातलं ते खतरा मेंडोलीन आपल्या लक्ष्मी-प्यारेलालमधल्या लक्ष्मीकांत कुडाळकरांनी वाजवलंय. त्यातलं ‘आवारा हूँ’ अख्ख्या रशियाला आणि चीनच्या माओलापण आवडायचं. तुर्कस्थानात त्याचा रिमेकपण निघाला होता. ‘कम सप्टेंबर’, ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’, ‘घर आया’, ‘शोले’ची ट्यून ह्या माझ्या कायमस्वरूपी आवडत्या रिंगटोन्स आहेत. ‘घर आया’च्या सुरुवातीचं ते मेंडोलीन आणि त्याला सोबत करणारा तो ठेका ऐकत राहतो मी अगदी. एकतर आधीच दोन कडवी आहेत फक्त त्यामुळे आंबावडी लवकर संपल्याचं जसं दु:खं होतं, तसा मला ते गाणं संपत आलं की होतं. कालातीत गाणी ही. सिनेमा कुठला, संगीतकार, गायक कोण हे माहीत नसलं तरी ऐकणारा कान देऊन ऐकेल अशी ही गाणी.
अगदी अलीकडची आवडलेली आणि कायम ऐकावीशी वाटणारी भैरवी म्हणजे ‘चिन्मया सकल हृदया.’ आनंदगंधर्व भाटे पोटातून गातात अगदी. असे चित्रपट म्हणून थेटरात बघावेत. तो मोठा पडदा आणि ते आर्त स्वर. आत हलतं काहीतरी. मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्‍न पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा. समागमानंतर येणार्‍या तोडीचा थकवा येत असावा. अशी भैरवी संपल्यानंतर कुणीही टाळ्या वाजवू नयेत खरंतर, निरव शांतता हवी. गायकाचा देहतंबोरा थांबलेला वाटला तरी त्या तारांची कंपनं चालूच रहात असतील काही काळ, त्यांना शांत व्हायला अवधी द्यायला हवा. अशा सुखालासुद्धा चव असते. ती शांततेत चाखता येते. एक अनाम ठेवा मिळाल्याचा आनंद गायकाला होत असावाच; पण आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो पोहोचवू शकलो, हा दुप्पट आनंद मिळत असणार. अशी गाणी ऐकली की आपल्याला त्यातलं काही येत नाही याची मला खंत वाटते. स्वांतसुखाय आपण करतोच असतो, दुसर्‍यालाही आनंद मिळेल अशी काही कला अंगात हवी.
‘जिव्हाळा’ चित्रपटातली ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ ही एक कातर भैरवी आहे. गदिमांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात राम गबालेंना अर्जन्सी होती म्हणून लगेच कागद घेऊन त्यांनी झरझर लिहून दिलंय हे गाणं. तेव्हा त्यांनी ‘कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जावा, सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही’ असं जिव्हारी लागणारं लिहिलंय. परकायाप्रवेश अजून तो काय वेगळा असतो. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार पडद्यावर नसतील येत; पण त्या पात्राच्या भूमिकेत जाऊन त्याला काय वाटतंय हे किती परिणामकारकरीत्या दाखवू शकतात, यावर त्या कलाकृतीचं आयुष्य ठरतं. त्यातलं बाबूजींच्या आवाजातलं ‘कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ ऐकताना आत कुठेतरी तुटणं म्हणजे काय ते कळतं. ‘बाबुल मोरा’वर मी आधीही लिहिलंय त्यामुळे लांबी वाढवत नाही उगाच. हृदयनाथ, जगजितसिंग, भीमसेन, सैगल सगळ्यांचं ऐकलंय; पण पहिला ठसा सैगलचा, अमिट आहे तो. गळ्यात पेटी अडकवून जाणारा सैगल, लाईव्ह रेकॉर्डिंगसाठी त्याच्यामागे अंतर ठेवून चालणारा वाद्यवृंद. चेहरे रडवेले करून, हुंदके काढून दु:ख पोचतंच असं नाही. उलट साधेपणाने बोललेलं पायात काटा रुतावा तसं रुततं.
आता मला कायमस्वरुपी आवडलेल्या शेवटच्या दोन भैरवी. दोन्हींचा संगीतकार एकच. जिंगल्स, मालिका शीर्षकगीतांचे बादशाह अशोक पत्की. दूरदर्शनसाठी अतिशय घाईत अनेक भाषांत, अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन केलेलं ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, अनेक भाषांतून एकाच रागातली एकच भावना किती वेगवेगळी दिसते. ओपनर भीमसेन आणि स्लॉग ओव्हरला लता मंगेशकर. इतक्या वेळा ऐकूनसुद्धा अजूनही लताबाईंचा आवाज आला त्यात की मला मोहरून गेल्यासारखं होतं. संपूर्ण अर्थ माहीत नसताना हजारोंना पाठ असणारं हे गाणं असावं. त्यांची दुसरी भैरवी म्हणजे शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं ‘सजल नयन नित धार बरसती’ हे गाणं कितीही वेळा मी ऐकू शकतो. कडकडे काही फार आवडीचे गायक नाहीत माझ्या; पण ‘वद जाऊ कुणाला शरण’ म्हणजे आशा खाडिलकर तसं हे गाणं त्यांचंच. त्यातल्या ‘तुझ्याविना विषधारा होती’मधला ‘ष’ कसा म्हटलाय ऐका एकदा. हृषिकेश बडवेनीपण सारेगमला छान म्हटलं होतं ते. निरव शांततेत ऐकावीत ही गाणी. हेडफोन असला तर समाधी अवस्था. आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी रस्त्यावर पडलेला दारुडा कसा निवांत, काळजी संपल्यासारखा झोपलेला असतो, तशी शुद्ध हरपून गेल्यासारखं ऐकता यायला हवं.
अशी लक्षात न राहिलेली, माहीत नसलेली त्या रागातली अनेक गाणी असतील. उल्लेख केलेली; पण त्या रागात नसलेली ही गाणी असतील वरती. शब्द लक्षात न राहिलेल्या यातल्या ठुमर्‍या ऐकल्या आहेत. ‘मी डोलकर डोलकर’ची मूळ पंजाबी चीज, ‘माउली गुरुमाउली’, ‘रसके भरे तोरे नैन’, ‘बोला अमृत बोला’ ऐकलंय. अजून कुणी कुणी माहीत असलेली गाणी सांगेल, तीही ऐकेन. मुळात ती अमक्या रागात आहेत म्हणून आवडलीत असं नाही. मूळ नुसरत फतेह अलीच्या गाण्यावरून घेतलेलं ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ भीमपलास आहे हे कळलं म्हणून जास्ती आवडतं अशातला काही भाग नाही. फक्त आडनाव ‘दीक्षित’ दिसलं तर आपण जरा उत्सुकतेने बघतो, त्यातलं आधी काहीतरी आवडलेलं असतं, एवढंच.

*************************************************************************************************************

यमन…

आर.बी.आय.ची रेपोरेट, व्याजदर पॉलिसी, जीडीपी, अर्थसंकल्प या आर्थिक बाबी; ब्रिज, पोकर, गोल्फ, बेसबॉल, स्क्वॅश हे खेळ; राग, शास्त्रीय संगीत, आपलं परराष्ट्र धोरण, फिजिक्स, वाद्यवादन, एफबीवरच्या अनेक दुर्बोध कवितांमधले अर्थ, स्वत:च्या पोस्टला स्वतःच लाईक करण्यातलं लॉजिक आणि इतर एकूणच बर्‍याच बाबीतलं मला फार कळत नाही. त्यातलं माझं ज्ञान अनेक वर्षे एकाच म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर आहे. तरीही मला न्यूनगंड येत नाही; कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कशी येईल असं कुठेतरी वाचलं होतं मी. त्यामुळे तरीपण मी त्यावर बोलतो हा निव्वळ आगाऊपणा किंवा अतिशहाणपणा आहे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. माझ्यापेक्षा कमी माहिती असलेला माणूस मला बरा पडतो अशावेळी. त्याच्या नजरेत कौतुक दिसलं की अगदी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी भावना होते. परवा भैरवीवर लिहिलं तेव्हा माझं पितळ उघडं पाडण्यासाठी असेल; पण कुणीतरी म्हणालं, ‘इथे थांबू नका, येऊ दे अजून.’
मला आवडलेलं गाणं महत्त्वाचं, ते अमुक एका रागात आहे असा माझा समज किंवा गैरसमज असला म्हणून त्याची गोडी काही कमी होत नाही. फार तर मी कसं आत्मविश्‍वासाने चुकीचं बोलतोय एवढंच सिद्ध होईल त्यातून. तर माझा दुसरा आणि शेवटचा आवडता राग म्हणजे यमन आणि त्याचा भाऊ यमनकल्याण. आयत्यावेळी घरी पाहुणे आलेत, भाजी आणायला जायला वेळ नाही, सुगरण बाई काय करते? तर ती बटाट्याची भाजी करते. तसा यमन आणि यमनकल्याण हा बटाटा आहे. एक संगीतकार म्हणाला होता, ‘चाल सुचत नाही, वेळ कमी आहे पण चाल तर सुरेल हवीय मग यमन घ्या. सोप्या, सहज गुणगुणता येतील अशा सुरेल चाली त्यात आपोआप होतील.’ एक संगीतकार म्हणाला होता, ‘सात तर सूर आहेत, किती चाली कराल? कुठल्या स्वरानंतर कुठला घेता, तिथे किती थांबता, कुठला सोडता, कुठला वेगळा पकडता यावर तुमच्या चालीचं वेगळेपण ठरतं.’ एकाच रागातल्या अनेक गाण्यांमध्ये काही गाणी एकसारखी वाटू शकतात, त्यात गैर काही नाही; पण सतत तेच करत राहणं गैर आहे. अर्थात सोन्यापेक्षा पितळ काहीवेळा चमकूनही जातं.
इन्स्पिरेशन घेणं आणि जसंच्या तसं उचलणं यात फरक आहे. 1964 च्या ‘मि. एक्स इन बॉंबे’मधलं ‘खूबसूरत हसीना’, ‘एल.पी.’चं होतं आणि 1993 च्या ‘बाजीगर’मधलं ‘ऐ मेरे हमसफर’, हे इन्स्पिरेशन नाही (अन्नू मलिक- बेस्ट म्युझिक डायरेक्टर-फिल्मफेअर होतं.) कारण स्वत: अन्नूच्या सुरेल चाली अमाप नाहीत म्हणून. इन्स्पिरेशन म्हणजे काय? एस.डीं.नी ‘ठंडी हवाए, लहराके आये’ केलं यमनमध्ये (नौजवान -1951 ) मग 1964 च्या ‘आपकी परछाईयॉं’मध्ये मदनमोहननी यमनमध्येे ‘यही है तमन्ना’ केलं. मग एस.डीं.ना रीतसर रोशननी ती चाल घेऊ का विचारलं. तो ही घे म्हणाला. मग त्यांनी त्याच चालीत ‘रहे ना रहे हम’ (ममता -1966) केलं. त्यावर पुढे मग आर.डीं.नी त्यात ‘सागर किनारे दिल ये पुकारे’ (सागर – 1985) बसवलं. तसंही राजेश रोशन कशाला परवानगी घेईल कुणाची, त्याच्या पण वडिलांचं गाणं होतं की मग,
त्यांनीपण ‘घरसे निकलतेही’ (पापा कहते है – 1996) उरकून घेतलं यमनात.
काहीवेळेस मला वाटतं जुन्या चाली जरा घासूनपुसून नव्याने यायला हव्यात. तेव्हाची जरा बोजड भाषा, गायक नसलेल्या माणसांचे आवाज, तांत्रिक मागासलेपण यामुळे कितीतरी सुंदर चाली अज्ञात आहेत. त्या तुकारामाच्या गाथेसारख्या जाणकार माणसांनी वर काढून ब्रासो लावून चमकवायला हव्यात. काळाचा गंज निघून गेला की कशा उन्हात चमकणार्‍या पितळी कळसांसारख्या मान वर करून उभ्या राहतील. याचा अर्थ नवीन वाईट आहे सगळं असं नाही; पण मेलडी अस्तंगत झालीय. ठेका महत्त्वाचा ठरतोय. शब्द अर्थवाही नाहीत. चाल कशी पाण्याच्या धारेसारखी हवी. सतत, सलग, ओघ असलेली. सैगलची काही मोजकी गाणी मी ऐकलीयेत, जी मला आवडतात. त्याची कित्येक गाणी मला माहीत नाहीत. त्या चाली नव्या रूपात बाहेर येऊ शकतात. ‘मैं क्या जानू क्या जादू है’, ‘नुक्तंची है गमेदिल’, ‘दो नैना मतवारे तिहारे’ ही त्याची गाणी यमन रागात आहेत, हे समजल्यावर मला या रागाचं काहीतरी गवसल्यासारखं झालं. कुठलीही मात्रा, काना, अनुस्वार, रफार, वेलांटी, उकार नसलेला यमन हा अत्यंत सरळमार्गी राग आहे. राहुल द्रविड आणि यमन यात साम्य आहे मग. सरळमार्गी, प्रथमदर्शनी चित्ताकर्षक नाही वाटणार; पण काहीतरी जादू आहे त्यांच्यात एवढं खरं. ग्लॉसी नसेल काही त्यांच्यात; पण मॅट फिनिशमध्येदेखील एक रॉयल टच असतो तसे आहेत दोन्ही.

12-2
किशोरची संथ गाणी घ्या ही – ‘आपके अनुरोधपे’, ‘इस मोडसे जाते है’, ‘हजार राहे मुडके देखी’, ‘जिंदगी का सफर’, ‘सवेरे का सूरज’ आणि ‘वो शाम कुछ अजीब थी’. सगळी यमन. धबधबा आकर्षक असतो, तिथे गर्दी होतेच (कुणी उंचावरून पडतंय म्हटलं की आपल्याला आनंद होतो त्याचं मूळ इथे असावं का? 🙂 पण संथलयीत वाहणारी नदीसुद्धा तालबद्ध असते. खळखळाट नसेल फार; पण एक उपजत लय असते तसा हा राग आहे. सगळे शुद्ध स्वर आणि मधे दगड आल्यावर प्रवाह जरा वळसा घेतो तसा तीव्र मध्यम. बाकी चालीत तीव्रता डोकावणार नाही ती. आर्ट फिल्ममध्ये काहीवेळा एक जीवघेणा संथपणा असतो. काहीच घडत नाही; पण ते अंगावर येतं तसं त्या ‘वो शाम कुछ अजीब थी’ला होतं. जुने संगीतकार विचार करत असणार चाल देताना. ‘अर्थ’ चित्रपटातला प्रसंग, मूड असं सगळं बघून राग निवडत असावेत का? ‘सवेरे का सूरज’ एक असंच गाणं आहे त्याचं. ‘इस मोडसे जाते है’मध्ये ‘कुछ सुस्त कदम रस्ते’ ऐकतानापण एक वातावरणातली शांतता अनुभवायला येते. त्यात राहे आणि रस्ते असे दोन शब्द का असावेत? रस्ता शब्दात डांबरीपण आहे आणि राहेमध्ये एक पायवाटेचा, मातीचा फील वाटत आलाय मला कायम. ‘एक राह तो वो होगी, तुम तक जो पहुँचती है’.
शुद्ध ‘म’ घेतलात की त्याला ‘यमनकल्याण’ म्हणायचं. ‘यमनकल्याण’मधली ही गाणी काही फार वेगळी नाहीयेत- ‘जिया ले गयो रे’, ‘चंदनसा बदन’, ‘रसिक बलमा’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘जिंदगीभर नही भुलेगी’, ‘जब दीप जले आना’, ‘प्रिय प्राणेश्‍वरी‘, ‘जहॉं डाल डालपर’, ‘ढलती जाये रात’, ‘जरासी आहट होती है’, ‘बीती ना बिताई रैना’, ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’, ‘सारंगा तेरी यादमें’, ‘जिया ले गयो रे मोरा सावरिया’ तर अगदी बांधून ठेवतं ऐकताना. ‘चंदनसा बदन’ तर नूतनएवढंच सोज्वळ आणि शांत आहे. पेटी किंवा सिंथेसायझर शिकताना सुरुवात करायला ‘एक प्यार का नगमा है’ एकदम सोप्पं गाणं आहे. ‘सा रे ग, ग म प, मम ग’ हे त्याचं नोटेशन झालं; पण दोन स्वरांमध्ये पूल बांधल्यासारखं जोडून वाजवता आलं पाहिजे, तर त्या पुस्तकीज्ञानाचा उपयोग. नुसते वादी संवादी स्वर, आरोह अवरोह कळले म्हणजे राग समजतो असं नाही.
‘पाकिजा’चं यश पहाणं संगीतकार गुलाम महंमद आणि मीनाकुमारीच्या नशिबात नव्हतं. दारिद्य्रात गेला तो. नौशादचा कित्येक वर्षे तो असिस्टंट होता. तो गेल्यावर नौशादनी पूर्ण केला ‘पाकिजा’. ‘इन्ही लोगोने’ आणि ‘मौसम है आशिकाना’ ही कालातीत गाणी यमनमध्ये आहेत. ‘इन्ही लोगोने’चा तबला कुणी वाजवलाय माहीत नाही; पण अजून लक्षात राहिलेले दोन म्हणजे ‘शोले’चा पाठलाग आणि ‘मेरी सुरत तेरी आँखे’च्या ‘नाचे मन मोरा मगन धिक धा धिगी धिगी’चा सामताप्रसादांनी वाजवलेला. शब्द सापडत नाहीत त्या ठेक्याचं वर्णन करायला. लहान मूल जसं आपण त्याला त्रास होणार नाही; पण आनंद मिळेल असं खेळवतो ना तसा ठेका आहे तो. शब्दांना इजा न होईल याची काळजी घेणारा आणि रूळ जसे समांतर एकसारखे पळतात तसा सोबत चालणारा. आई जसं कौतुकाने मुलाकडे बघते ना तसा ठेका आहे ‘इन्ही लोगोने’चा. तळहाताच्या फोडाप्रमाणे शब्दांना, चालीला जपणारा, उठाव आणणारा आणि वेगळं अस्तित्व असलेलाही. ‘मौसम है आशिकाना’च्या ओळी म्हणजे तर बोलायलाच नको (कैफी आझमी). विरोधाभास, वैषम्य काय तलम शब्दात आलंय. ‘बेखाब मेरी आँखे, मदहोश है जमाना’. काळजाला चीर पडेल असं आक्रंदूनपण दु:ख सांगता येतं आणि नि:शब्द करेल असंही सांगता येतं. शल्य, बोच, सल हळूवारपणे सांगणारा राग आहे हा.
मुकेशचा आवाज आधीच उदासवाणा होता. सानुनासिक, वर फाटणारा अशी वैगुण्ये असलेला आवाज असूनसुद्धा त्याची गाणी मात्र हृदयाला हात घालणारी होती. ‘आंसू भरी है’, ‘कभी कभी मेरे दिलमें’, ‘भुली हुई यादों’ आणि कदाचित ‘तुम्हे जिंदगी के उजाले मुबारक’ ही गाणी यमनमधली आहेत. ‘न जाओ सैय्या’, ‘एहसान तेरा होगा’, ‘वो जब याद आये’, ‘ये दुनिया अगर मिल भी जाये’, ‘रंजीश ही सही’, ‘बडा दुख दिना तेरे लखन’ने हीपण यमनमधलीच आहेत. कुठलाही गोंगाट नाही, धावपळ नाही. वेदनेचं, आर्ततेचं शांत लयीतलं कथाकथन आहे हे. ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘सांज ये गोकुळी’ हीपण त्यातलीच गाणी आहेत. दिवसात कधीही म्हणता येईल असा; पण सहसा संध्याकाळी गायला जाणारा हा राग आहे. सांजेची कातरता उतरत असेल का त्या स्वररचनेत? की म्हणूनच तो संध्याकाळी म्हणतात? शास्त्रं असावंच काहीतरी. खूप विचार करूनच या रागांचे गायनसमय ठरविले असावेत. एरवी गायले तर आनंद मिळेलंच; पण कार्तिकी आणि आषाढीला जसं एक वेगळेपण जाणवतं एकादशीचं तसं काहीसं असावं.
आशा भोसले या बाईबद्दल मला कायम अचंबा वाटत आलेला आहे. त्यांची दोन यमनमधली गाणी मी मुद्दाम शेवटी ठेवलीयेत. 1963 चा रोशननी रोशन केलेला ‘दिल ही तो है’ काही मी पाहिलेला नाही; पण त्यातली ‘भुलेसे मोहब्बत कर बैठा’, ‘तुम अगर मुझको न चाहो’, ‘लागा चुनरी में दाग’ आणि ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ ही सदाबहार गाणी मला आवडतात. तेव्हाची निर्मला नागपाल ऊर्फ आताची सरोज खान तेरा वर्षांची होती या गाण्यात ग्रुपमध्ये. साहीरनी लिहिलेल्या या गाण्याची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक खटकेबाज सफर आहे. ‘जिस घडी मेरी निगाहो को तेरी दीद हुई’पासून ‘वो जलवा जो ओझल भी है सामने भी, वो जलवा चुरानेको दिल चाहता है’पर्यंत नुसते रोमांच आहेत. ती फार डांबरट लोकं होती. रिपीट व्हॅल्यू येण्यासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र दाखवायच्या आणि माणसाला हे बघू, ते बघू की ऐकू असं संभ्रमात पाडून परत परत यायला भाग पाडायचं. शेलाटी नूतन काय अप्रतीम दिसते या गाण्यात. तिचे हावभाव, तो सोज्वळपणा, ते निरागस सौंदर्य, परफेक्ट लिप मूव्हमेंट्स हे बघेपर्यंत गाणं संपतं. मग आशाचा आवाज कधी ऐकायचा आम्ही? परत बघणं आलं ना म्हणजे. ‘बरसात की रात’चं ‘ना तो कारवां की तलाश है’पण आशा, रोशनचंच होतं.
तिचं दुसरं यमनमधलं अफाट गाणं म्हणजे 1966 च्या शैलेंद्रला रस्त्यावर आणणार्‍या ‘तिसरी कसम’मधलं शैलेंद्र आणि शंकर जयकिशनचं ‘पान खाओ सैंय्या हमारो’, ‘बुगडी माझी सांडली गं’मधलं ‘हाये’ आणि या गाण्यामध्ये ते ‘सांवली सुरतीया’च्या आधीचं ‘ओय होय’ आणि ‘मलमल का कुर्ता’च्या आधीचं ‘हाय हाय’ आणि मधे ते हसणं. हे गाण्याच्या क्लासमधे शिकवत नाही, शिकता येत नाही. तो पिसारा वरूनच येताना घेऊन यावा लागतो. गरिबाघरी कार्य निघालं की श्रीमंत माणसं लागले चार पैसे तर असावेत म्हणून तयारीने जातात तसं भोसलेबाई करतात. ‘तुमची मुलगी आहेच सुंदर; पण मी येताना ठुशी आणलीये तिच्यासाठी, तीपण घाला, बघा किती सुंदर दिसते अजून’’ असं कुणी मोठ्या मनाने म्हटल्यासारखं स्वबुद्धीने स्वतःची हिरे माणकं त्यात जडवतात. भरून येतं. शब्द तुटपुंजे ठरतात कौतुकाला. किती छान क्षण जगले ते वादक, गीतकार, संगीतकार. इतिहास असा घडताना त्याचा एक भाग असणं हे भाग्याचं लक्षण. आशा भोसलेला वय आहे, वर्ष नाहीत. काय खट्याळपणा आहे त्या बाईच्या स्वरातच. त्या गाण्यामधल्या तलवारीसारख्या धारधार ताना नायगारासारख्या आहेत. अशा कोसळतात की आ किंवा कान वासून ऐकत रहाव्यात फक्त. सेहवाग, अमिताभ आणि आशा यात साम्य काय तर ‘वन मॅन शो’ सगळा. बाईच्या गाण्यात फेरारीचा स्पीड आहे.
यात इतर उल्लेख केले त्यातलं एखादं गाणं असेलही यमनमध्ये, माहीत नाही. त्या अज्ञानाचं मला दु:खही नाही. अज्ञानात सूख असतं. ती गाणी ऐकून मला सूख मिळालं एवढं खरं. सगळी माणसं सारखी म्हटली तरी शेवटी वैकुंठात गोत्र लागतंच, त्याप्रमाणे ही काही सगोत्री गाणी मला सापडली. एखादं नसेलही त्यातलं, काय फरक पडतो. भैरवी आणि यमन हे दोन राग मात्र मला प्रिय झाले. त्याचं कारण त्याच्या सुरावटीत दडलं असेल. बाकीचे कळत नाहीत फार. राग सगळेच चांगले. धानी आणि सलगवरळी ही रागांची नावं आहेत हे कुठे माहिती होतं; पण त्याच्यातलं म्हणून दोन वेगळ्या चालीतलं ‘घेई छंद मकरंद’ ऐकताना कुठे काय अडतंय. चार ज्ञानी माणसं लिहितात ते वाचून लक्षात राहिलं की काहीतरी समजल्याचा आनंद होतो. गाणी सुंदर मुलीसारखी असतात. कुणाची, कॉलेज कुठलं, कुठे राहते कळलं म्हणजे तेवढंच एक पाऊल पुढे पडल्यासारखं वाटतं एवढंच.

हिंदी गाणी सतत कानावर पडतात. ते चित्रपट बघितले जातात. त्यामुळे ती जास्ती लक्षात रहातात; पण मातृभाषेतही अतिशय सुंदर गाणी झालेली आहेत. मराठी गाणी ऐकताना अर्थ जास्ती पोचतो किंवा त्याकडेच जास्ती लक्ष असतं आधी. द्रविड, सचिन, लक्ष्मण, गांगुली, कुंबळे एकाचवेळी देशासाठी खेळले हा खरा योग. त्या अर्थाने ब्रायन लारा दुर्दैवी. वॉल्श आणि अँब्रोज सोडले तर तो खेळायचा. ती टीम डबघाईला आली होती. ग्रिनीज, हेन्स, लॉईड, रिचर्ड्स आणि लारा असा योग असता तर? असाच योग मराठी संगीतात मात्र आपल्या नशिबात होता. गदिमा, खेबूडकर, पी. सावळाराम असे कवी गीतकार, बाबूजी, पु.लं., तीन वसंत (प्रभू, पवार, देसाई), राम कदम असे दिग्गज संगीतकार एकाच काळात जन्माला आले आणि आपल्या कानांना सोन्याची कर्णफुलं घालून गेले. योग्य वेळी जन्म घ्यायलापण नशीब लागतं. आपलं आहे.
पु.लं. साहित्यिक म्हणून जितके गाजले तितकं त्यांच्या संगीताचं कौतुक नाही झालं, असं माझं आगाऊ मत आहे. सायीचा मऊपणा, गोधडीची ऊब, आजीच्या सुरकुतलेल्या हाताचा स्पर्श आणि माणिक वर्मांच्या आवाजातला शांत स्नेहगोडवा शब्दात कसा सांगता येईल? तसंच हे पुलंचं यमनातलं गाणं ‘कबीराचे विणतो शेले’, गदिमा तर काय डोक्यात 16 जीबी रॅम बसविल्यासारखा सीपीयू त्यांचा, टेन जी कनेक्शन असल्यासारखे योग्य, पर्यायी शब्द सापडायचे त्यांना, माणसांनी किती साधं लिहावं, तर ते गदिमांसारखं, त्यापेक्षा साधं, सोप्पं वाचण्यात नाही. या गाण्यात ‘एकएक धागा गुंते, रूप ये पटास’ या ओळीत पट (म्हणजे वस्त्रं) हा म्हटलं तर एकच अवघड शब्द आहे. डोळ्यांवर काकडीचे काप ठेवून जेवढा गारवा जाणवणार नाही, तेवढी शीतलता माणिकताईंच्या आवाजात आहे. कबीर सगळीकडे पोचला; पण गदिमा नाहीत. कारण, ते अनुवादित झाले नसावेत आणि चित्रपटगीत म्हणजे प्रतिष्ठा नाही हे कारण असावं. संतांच्या तोडीची रूपकं, सोपा परमार्थ हा माणूस अनंत गाण्यांतून श्‍वास घ्यावा इतक्या सहजपणे सांगत आलाय; पण चित्रपटगीत यापुढे आपण त्याची किंमत करायला तयार नाही हा आपला करंटेपणा.
बाबूजींची अनेक गाणी या रागात आहेत. ते, गदिमा आणि आशाबाई अफाट त्रिकूट होतं. एकसे बढकर एक गाणी त्यांनी दिलीयेत. तिघांचं यमनातलं ‘का रे दुरावा, का रे अबोला’ आणि यमनाची तीट लावलेलं ‘जिवलगा, कधी रे येशील तू’ ऐका. हनुवटी हा शब्द गाण्यात यातच असावा फक्त. ‘नीज येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी धरी हनुवटीला’चा आवाज अगदी ढाकेकी मलमलसारखा सुळसुळीत आहे. केवढी शृंगारिक तक्रार. ‘जिवलगा’चा ठेका तर काय अप्रतीम आहे. एखाद्या संगीतकाराकडे एखादा गायक/गायिका फुलतो/फुलते. आशा/आरडी-ओपी-बाबूजी, किशोर/एसडी, आरडी या जोड्या वेगळ्या भासतात. केमिस्ट्री जुळल्यासारखी वाटते अगदी. त्यांचं अजून एक यातलं गाणं म्हणजे ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.’ ‘तुझा शब्द की थेंब हा अमृताचा’ यात ‘तुझा सूर हा, शब्द हा, अमृताचा’ अशी परिस्थिती आहे. फास्ट, -हिृदम बेस्ड गाणी म्हणायला सोपी असतात; पण अशी ठहराव असलेली, प्रेयसीच्या बटा हळूवारपणे बाजूला केल्यासारख्या निवांत चाली म्हणायला तयारी हवी. शोएब अख्तरच्या केएमपीएचला मजा आहेच; पण वॉर्नच्या हळूवार लेगीतपण मजा आहे. तशी गाणी आहेत ही संमोहित करणारी.
बाबूजींची संगीत दिलेली ‘तोच चंद्रमा नभात’, ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, गायलेलं ‘समाधी साधन, संजीवन नाम’ यातलंच आहे. ‘कशी केलीस माझी दैना’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘सुकांत चंद्रानना पातली’, ही नाट्यगीतं, पांडुरंगकांती दिव्यं तेज झळकती, ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘टाळ बोले चिपळीला’, वसंतरावांचं ‘प्रथम तुला वंदितो’ ही भक्तिगीतं, ‘बाळा जो जो रे’ आणि ‘निंबोणीच्या झाडामागे’ ह्या अंगाई, ‘सांज ये गोकुळी’, ‘बाई मी, विकत घेतला श्याम’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘चाफा बोलेना’, यशवंत देव आणि लताचं ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ ही गाणी, ‘लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं, तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं’, शोभा गुर्टू यांनी गायलेलं ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या लावण्या यातल्याच आहेत. सूर काय, चाल काय, राग काय आणि छापखान्यातले खिळे काय, जुळवणार्‍यावर अवलंबून असतं काय दाखवायचं ते. मुळाक्षरं आणि सूर स्वतः काही सांगत नाहीत. कशापुढे काय ठेवायचं आणि काय निर्माण करायचं, हे निर्मात्याच्या प्रतिभेवर ठरतं आणि आपल्या आकलनशक्तीवर. रामायणातलं ‘लीनते चारुते सीते’ यमन बिलावल आहे. ‘मी मज हरपून बसले गं’, ‘मागे उभा मंगेश’, अरुण दात्यांच्या बरोबर आजीवन जोडलं गेलेलं खळ्यांचं ‘शुक्र तारा मंद वारा’ ही यमनकल्याण आहेत. दोन गाणी मात्र यमन कल्याणमधली कधीही ऐकावी अशी आहेत. एक ग्रेसांचं ‘भय इथले संपत नाही’ आणि रामायणातलं ‘पराधीन आहे जगती.’
आजीनी आईला घेऊन दिलेलं काही आणे किमतीचं ‘गीतरामायण’ घरी आहे. भूर्जपत्रावर लिहिलं असावं असं वाटेल अशी आता पानं पिवळी पडलीयेत. राममंदिर बांधायला विटेला पैसे जमवतात. कारण, पुढे स्वतःच्या घरावर सोन्याची कौलं चढवता येतात. सत्ता मिळू शकते पण गरजच काय मंदिराची. एक गीतरामायण घरी ठेवलत तरी पुरेसं आहे. सगळं रावणाचं सैन्यं आहे; पण बांधायचंय राममंदिर. असो! 91 साली ‘सावरकर’ चित्रपटासाठी बाबूजी निधी गोळा करण्यासाठी परत गीतरामायण करणार होते. हॉटेल स्वरूपला ते उतरायचे आणि त्यांचं त्या कार्यक्रमाचं तात्पुरतं ऑफिस हॉटेल रविराजच्या ऑफिसमध्ये होतं. क्वचित यायचे ते तिथे. अतिशय मितभाषी आणि तापट माणूस असं कानावर आलेलं. एकदाच त्यांना मी तिथे पाहिलेलं, चार फुटांवरून. बुटकेसे, चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणि चित्रपटाचा विषय कायम डोक्यात असलेले त्यामुळे थोडेसे तणावग्रस्त. मोठ्या माणसांना मी बघतो फक्त, ते जवळ जाऊन सह्या वगैरे मागायचं माझं धारिष्ट्य नाही होत. त्यांच्याकडे फक्त बघत रहावं. सहीचा कागद हरवू शकतो, डोळ्यातली प्रतिमा सेव्ह असते.
तर मूळ मुद्दा ‘पराधीन आहे जगती.’ बाबूजींचे सहाय्यक प्रभाकर जोगांनी सांगितलेला किस्सा आहे. नेहमीप्रमाणे फक्त एक दिवस आधी महाकवींकडून गाणं मिळालं. त्याला बाबूजींनी दरबारी कानडामध्ये चालपण लावली. सकाळी पावणेआठाला लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचं होतं. दोघं रिक्षातून निघाले आकाशवाणीकडे. रिक्षात बाबूजी म्हणाले, ‘‘मी चाल लावलीये दरबारी कानडामध्ये पण मला ती योग्य वाटत नाहीय.’’ स्टुडिओत गेल्यावर मुखड्याची नवीन चाल त्यांनी ऐकवली. ‘‘ही बसवून घ्या वादकांकडून तोपर्यंत मी अंतरे बसवतो.’’ साडेसातला रिहर्सल झाली. पावणेआठला लाईव्ह ब्रॉडकास्ट. या महान माणसांनी दहा अंतर्‍याचं गाणं डायरेक्ट सादर केलं. देव माना, मानू नका पण अशावेळी कोण उभं राहतं मागे डोक्यावर हात ठेवायला? काहीतरी अज्ञात दैवी शक्ती असणारच. पावसाची सलग धार असावी तशी गदिमांची लेखणी होती. कुठलाही अडथळा न येता ती जशी अखंड येते तसे गदिमांच्या लेखणीतून शब्द झरत असावेत.
‘दैवजात दुःखें’. संचिताने सगळं मिळत असतं असं आपल्याला वाटतं. मला कायम प्रश्‍न पडत आलाय, देवाचं संचित कसं वाईट असेल? दशरथाच्या वंशात येताना कुठलं पूर्वसंचित येतं मग? त्या वंशाचं येत असावं. कसे सुचत असतील पर्यायी शब्द. आपण वनवास म्हणतो, ‘‘गदिमा काननयात्रा म्हणतात. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे,’’ असं रामदास म्हणाले. गदिमांच्या ओळी बघा, ‘जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्‍व नाशवंत’, ‘मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’ किंवा अजरामर ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवि आहे बाळा, मेळ माणसांचा’ बघा. पद्यरूपी संवाद आहे सगळा. राम सांगतोय भरताला. त्याच्या लेव्हलचं सांगणं पाहिजे. गदिमा पटकथा लिहायचे यात नवल ते काय. रामायण लिहिताना कित्येक पात्रांत ते फिरून आलेत. ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’ हे कसं आलं असतं मग सहज. शूर्पणखेचा राक्षसीपणा ‘सूड घे त्याचा लंकापती’मधून कसा आला मग सहज.
सगळे शब्द डिक्शनरीतपण असतात. गदिमांनी शब्दांचे कुंचले केले आणि या माणसांची गाण्यातून रेखाचित्रं काढली. मग त्यात बाबूजींनी सुरांचे रंग भरले आणि त्याच्या तसबिरी केल्या. आपले फोटो दिवाणखान्यात आपण गेल्यावर कुणी लावेल का माहीत नाही; पण या माणसांनी मोफतमध्ये आपल्या आयुष्याच्या दिवाणखान्यात काय भरगच्च दालनं मांडून ठेवलीयेत बघण्यासाठी. अरे किती द्याल? ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था आहे. आपलीच बुद्धीची झोळी फाटकी. मधुबाला, नूतन, माधुरी, रेखा एकाचवेळी पडद्यावर असतील तर कुणाकडे बघावं असा प्रश्‍न पडेल, तसं होतं इथे. शब्द बघू, अर्थ बघू, चाल बघू की आवाज बघू? डोळे मिटून आस्वाद घ्यावा म्हणून. बाबाजी का बायोस्कोपसारखं होतं मग. चित्रं बंद डोळ्यापाठीमागे दिसत असतात. कानात सूर आणि मेंदूत अर्थ शिरत असतो. तो हृदयात पोचला की पावसाची ओल यावी तशी डोळ्यांच्या भिंतींना ओल येते.
देखावा प्रेक्षणीय असतो, ठिकाण रमणीय असतं, ललना कमनीय असते, तशी ही सगळी गाणी ‘यमनीय’ आहेत. ऐकते रहो, जीते रहो.

*************************************************************************************************************

शिवरंजनी…

‘थोडा है थोडेकी जरुरत है’ हे गाणं मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. ‘अजून’ या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता ‘अजून’ हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, ‘कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो.’ कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडूनदेखील काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना. आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल.
भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्य काय तर तिघातही ‘म’ ‘नी’ नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्ससारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करुणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या ‘रागा’लापण होत असावी का? दुवा तोडावा तसं ‘सारेग’ नंतर ‘म’कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर ‘नी’ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चालीसारख्या वाटत असाव्यात.
वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं ‘रानात सांग कानात’ आणि वाटव्यांनी म्हटलेलं ‘वारा फोफावला’ अजूनही असतील. वर्तुळाकार चेहर्‍याचे नावडीकर आम्हाला मराठी शिकवायला होते सहावीला; पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्द थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिसर्‍या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात, म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं ‘सावळाच रंग तुझा’ त्यातलंच. एक धागा सुखाचा’वर मी मागे लिहिलं आहे. त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं ‘बाजार फुलांचा भरला’, ‘निसर्गराजा ऐक सांगतो’ हे संवादगाणं, भीमसेनजींचं ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, राम कदमांचं ‘दिसला गं बाई दिसला’ आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ ही सगळी शिवरंजनीमधली गाणी आहेत.
‘बाबुल मोरा’ लिहिणार्‍या बहादूरशहा जफरचं ‘लाल किला’मधलं रफीचं ‘न किसकी आँख का नूर हूँ’ या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्य, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच; पण चालीतदेखील आहे. रफीची यातली अनेक गाणी मला सापडली. ‘गझल’मधलं ‘रंग और नूरकी बारात किसे पेश करू’, ‘सूरज’मधलं ‘बहारो फूल बरसाओ’, ‘ब्रह्मचारी’मधलं ‘दिलके झरोको में तुझको बिठाकर’, लताबरोबरची तीन ‘प्रोफेसर’मधलं ‘आवाज दे के हमे तुम बुलाओ’, ‘जनम जनम के फेरे मधलं’ जरा सामने तो आओ छलिये’ आणि ‘अंजाना’मधलं ‘रिमझिमके गीत सावन गाये’, लताचीपण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात- ‘जंजीर’मधलं ‘बनाके क्यूँ बिगाडारे’, ‘घुंघट’मधलं ‘लागे ना मोरा जिया’, ‘तुम्हारे लिए’मधलं जयदेवचं ‘तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे’, ‘एक दुजे के लिए’चं ‘तेरे मेरे बीचमें’, ‘मेहबूब की मेहंदी’मधलं ‘जाने क्यूँ लोग मोहब्बत करते है’, ‘आँखें’मधलं ‘मिलती है जिंदगी में, मोहब्बत कभी कभी’, लता-मुकेशचं ‘संगम’मधलं ‘ओ मेरे सनम’. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे ‘मेहबूबा’चं ‘मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा’, करूणरस तर यात दिसतोच; पण हॉन्टेड मटेरिअलपण यात आहे. जुन्या ‘बीस साल बाद’चं लताचं ‘कही दीप जले, कही दिल’पण यातलंच आहे. ‘जिस देश में गंगा बहती है’मधलं अप्रतीम ‘ओ बसंती पवन पागल’ यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तोपण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.
बाकी मग ‘साथी’मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं ‘मेरा प्यार भी तू है’ आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट ‘एक जान है हम’चं टायटल सॉंग ‘याद तेरी आयेगी’ आहे. अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. ‘मर्द’मधली गाणी (?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. ‘प्यार झुकता नही’चं शब्बीर लताचं ‘तुमसे मिलकर ना जाने क्यू’ याच रागात आहे. एरवी नाक मुरडणार्‍या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्‍चर्य वाटतं. ‘कर्मा’चं किशोर-कविता कृष्णमूर्तीचं ‘ना जय्यो परदेस’ यातंच आहे. ‘प्रेमरोग’चं ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’ यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हाला. एक अपवाद, ‘सत्या’चं ‘सपने में मिलती है’ पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं ‘बेटा’मधलं ‘धक धक करने लगा’पण यातलंच आहे
वेळ झाला की कधीतरी बैजवार ‘मुकद्दर का सिकंदर’वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं ‘ओ साथी रे’ शिवरंजनीत आहे. सात विभागांत निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यांनी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये. त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो, ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली ‘मेमसाब’ राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच; पण राखीचा रोलही छान होता त्यात. विविध भावना काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली.
आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं ‘मेरा नाम जोकर’ यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के. हेदेखील होतं. आधीच तो सहा वर्षे चालू होता, लेंदी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:ख फार नव्हतं, ते होणारच होतं. मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं; पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळ्यांवर गॉगल लावून बसलेला आर. के., त्याच्याजवळ राहिलेला ‘तो’च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर. के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरशाच्या तुकड्यात दिसणार्‍या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. ‘जाने कहां गये वो दिन…’
आयुष्य जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनीसारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळूनपण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करूनपण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:ख जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे.
*************************************************************************************************************

जयंत विद्वांस
गूढ कथा, विनोद, चित्रपटगीते, व्यक्तिचित्रण हे विद्वांस यांचे जिव्हाळ्याचे लेखन प्रकार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या लेखनाला अनेक फॉलोअर्स लाभले आहेत.
Email: jayvidwans@gmail.com
Mob: 98233 18980

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *