लेखकांच्या चित्तरकथा

डॉ. आनंद पाटील
त्रिवेंद्रमला स्वामी विवेकानंदांना दाक्षिणात्य पंडिताने प्रश्‍न विचारला होता. ‘‘महाराज आपण भारतभर फिरता. आपणाला सर्वांत पुरोगामी जनकल्याणी राजा कोण वाटतो? ’’ त्यांनी किंचितही वेळ न दवडता पटकन उत्तर दिले होते, ‘‘सयाजीराव महाराज?
*************************************************************************************************************

मराठी लेखक व लेखकरावां-विषयीचे किस्से ‘गॉसिप’, कुणाची अंगवस्त्रे तर एखाद्याचे वस्त्रहरणाचे कवित्व, कुणाच्या मिश्या, कुणाचा गॉगल, शबनम अशा चिल्लर व थिल्लर बाबींपलीकडे फारसे जात नाहीत. ते लिखित, हस्तलिखित अथवा ग्रंथ रूपात संग्रहित होणे तर दूरच. जयवंत दळवींनी ‘ललित’ मध्ये ‘ठणठणपाळ’ हे सदर दीर्घकाळ चालवले. पण त्यात वरण, तूप, भात अशा मिळमिळीत घासापलीकडे कोल्हापुरी झणझणीत रस्सा मिळणे अशक्यच. गोड गुदगुल्या व नाजूक चिमटे, क्वचित अस्वली गुदगुल्या व अप्रत्यक्ष गौप्यस्फोट, मिश्किली व हसवणूक हाच त्या सदराचा माफक उद्देश होता. चंद्रकांत खोतचं बिनधास्त जगणं आणि शेवटी कामगार चाळीजवळच्या देवळात मरणासन्न होणं, कुणा मन्या ओकचं खाणं, पिणं आणि बेबंद जगणं यावर स्मृतीसुगंधाचा शिडकावा करणारे लेख सापडतील. पण जेम्स सदरलंडने पन्नास वर्षांपूर्वी पाचशे पृष्ठाच्या ‘द ऑक्सफर्ड बुक ऑफ लिटरी ऍनेक्डोटस’सारखा ग्रंथ मराठीत निघाला असता तर नको ती लय तत्त्वे कवटाळणे आणि वाङ्मयबाह्य उपयुक्त घटकांना निषिद्ध ठरवणारी साहित्यिक सौंदर्यशास्त्रीय बुवाबाजी फोफावली नसती. हे इंग्रजी पुस्तक ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ लिहिताना मला त्यांच्या खाजगी ग्रंथ संग्रहालयात मिळाले. त्यावरील त्यांच्या खुणा व सांकेतिक खुणांसह केलेल्या कॉमेन्टस् हाच एक वेगळा किस्सा आहे. मंत्री सात-आठ हजार इंग्रजी पुस्तके विकत (स्वखर्चाने) घेतो, हे आठवे आश्‍चर्यच.
लेखकांच्या राजाश्रयाविषयीच्या दंतकथा भारतात अनेक आहेत. लेखक व कलावंतांना राजाने प्रसन्न होऊन सोन्याचा कंठा गीतकार अथवा संगीतकाराला दिल्याची उदाहरणे कमी नाहीत. रणजीत देसाईंनी छत्रपती शिवरायांवर ‘श्रीमान योगी’ लिहिल्यानंतर बाळासाहेब देसाईंनी त्यांना समारंभपूर्वक सोन्याचे कडे घातल्याचे अलीकडचे उदाहरण प्रसिद्ध आहे. पण जोतिराव फुल्यांनी ‘शेतकर्‍याचा आसूड’चे हस्तलिखित बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराज यांना वाचून दाखविल्यानंतर त्याच्या प्रकाशनाचा खर्चच नव्हे, तर सावित्रीबाईंना तहहयात पेन्शन दिले होते. आपले विद्यमान ज्ञानपीठ विजेते राजमान्य राजश्री भालचंद्रराव नेमाडेजी लंडन विद्यापीठात प्राध्यापक होते. ते याच महाराजांनी देणगीतून निर्माण केलेल्या मराठी गुजराती अध्यासनावर गेल्यानेच देशीवादी लेखकराव झाले. ह्या आधुनिक राजाश्रयाच्या दंतकथा फारशा माहीत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्रिवेंद्रमला स्वामी विवेकानंदांना दाक्षिणात्य पंडिताने प्रश्‍न विचारला होता. ‘‘महाराज आपण भारतभर फिरता. आपणाला सर्वांत पुरोगामी जनकल्याणी राजा कोण वाटतो? ’’ त्यांनी किंचितही वेळ न दवडता पटकन उत्तर दिले होते, ‘‘सयाजीराव महाराज? ’’
आता इंग्लंडला चला.
राणी पहिल्या एलिझाबेथच्या काळात सतराव्या शतकात लेखकांना चांगला राजाश्रय होता. शेक्सपिअर राणीसाठी आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग शक्य तेव्हा करीत असे. हेन्री द फिफ्थचा उल्लेख या संदर्भात केला जातो. इंग्रजीत पहिले महाकाव्य लिहिणारा एडमन्ड स्पेन्सर (1452-99) तिच्या दरबारचा मानकरी होता. तो आयर्लंडमधील पार्लमेंटचा सचिव होता. त्याच्या साहित्यावर तरुण रेने वेलक या अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांला एम. फिल. साठी मार्गदर्शकाने मुद्दाम विषय दिला. आयरिश रिव्हर्स (नद्या) इन स्पेन्सर्स पोएट्री. ‘‘मी भूगोलाचा प्राध्यापक नाही सर.’’ वेलेकने उद्दामपणे उत्तर दिले. कारण एम. ए. नंतर त्याचे थिअरी ऑफ लिटरेचर (1945) प्रसिद्ध झाले होते. त्यात त्याने साहित्याच्या स्वायत्ततेचासिद्धांत मांडला होता. तो त्यानेच खोडून काढावा अशा मार्गदर्शकाची इच्छा होती. अखेर कुरकुरत त्याने प्रबंध पूर्ण केला आणि अमेरिकेला तौलनिक साहित्याचा पहिला प्रोफेसर व विभाग प्रमुख मिळाला? एवढी क्रांती आपल्या विद्यापीठात घडणे शक्य आहे का?
मूळ किस्सा असा की, स्पेन्सरने काव्यसंग्रह राणीला भेट दिला तेव्हा तिने शंभर पौंडांचे पारितोषिक दिले. पण खजिन्याचा प्रमुख बर्लेहला कवीची गुणवत्ता माहीत नव्हती. तिरस्काराने त्याने आक्षेप घेतला. ‘‘एका गीतासाठी एवढी रक्कम? त्याचे रीझन काय?’’ खरे तर सुनिते लिहिण्यात तो आघाडीवर होता. पण राणी म्हणाली, ‘‘मग कारण बुद्धी पाहून योग्य ती रक्कम त्याला द्या.’’ स्पेन्सर बराच वेळ थांबला. फारच अपेक्षाभंग झाला. नंतर संधी मिळाली तेव्हा त्याने राणीच्या हाती एक कागद तिला जुन्या आज्ञेची आठवण करून देण्यासाठी दिला. त्यावर खालील ओळी लिहिल्या होत्या.

I was promised on a time
to have ‘reason’ for my rhyme.
from that time, unto this season,
I received nor rhyme, nor reason.

(आपले पुढारी जाहीर सभेत लेखकाला अशीच मोठी रक्कम जाहीर करतात. पण ती मिळाली नाही तर किती लेखक हा प्रयोग करतात?) याचा अपेक्षित परिणाम झाला. शंभर पौंड तत्काळ देण्याची आज्ञा झाली.
प्रशासनात असणारे लेखक बरेच ‘चालू’ असतात. तसा इंग्रजी साहित्यातील लेखकराव सर वॉल्टर व्हॅले (1552-1618) श्रीमंती व देखणेपणासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या बर्‍याच मैत्रिणी होत्या. त्यातील प्रथमच भेटणार्‍या एकीला तो जंगलात घेऊन गेला. ती स्वत:चा मान-सन्मान फार जपत असे. थोडे घाबरून ती नम्रपणे म्हणाली, ‘‘स्वीट सर वॉल्टर, काय विचारता हे मला? उद्ध्वस्त करायचेय का मला? नाही, नाही स्वीट वॉल्टर! स्वीट सर वॉल्टर! सर वॉल्टर.’’ शेवटी धोका व सुख एकाच वेळी चढत्या क्रमाने वाढले आणि समाधी अवस्थेत ती पुटपुटली. स्वीसर स्वॅट्टर, स्वीझर स्वॅट्टर? तिने बाळ जन्माला घातले पण या पट्ट्याने दोघांना सांभाळले. ते उत्पादन सामान्य मर्त्य मानव नव्हते. त्याचा दुसरा धमाल किस्सा पहा. बाप तसा बेटा, ‘भट्टी’ तसा लोटा?
1613 मध्ये आपल्या पुत्राची काळजी घ्यायला त्याला फ्रान्सला बरोबर पाठवला. तो विरंगुळा म्हणून सुंदर ललनांवर खूप खर्च करी आणि मनपसंत मद्यपान करी. रॅलेच्या औरस मुलालाच त्याची काळजी घ्यायचा प्रसंग आला, दारू ढोसून तर्र झाल्यावर त्याला एका गाडीवर झोपवावे लागते. ती गाडी रस्त्यातून मजूर ओढू लागले. प्रत्येक चौकात रॅले पुत्र लोकांना सांगे की येशूला सुळावर चढवले त्यापेक्षा हे प्रतीक जास्त जिवंत आहे. त्या मद्यपी रॅलेची माता खूष झाली. ती म्हणाली की, त्याचा बाप मुलापेक्षा सवाई होता! पण बाप मात्र तिरस्काराने संतापला. प्रश्‍न जनतेतील प्रतिष्ठेचा होता.
लेखकाचा पहिला ग्रंथ गाजला म्हणजे प्रेमप्रकरणे देखील गाजतात. मराठी लेखकांना मानधनाप्रमाणेच पत्नी देखीलमिळाल्याची उदाहरणे आहेत. पण सतराव्या शतकाच्या मध्यावरची इंग्लंडमधील ही गोष्ट आहे. विल्यम वायचेरले (1641 – 1716) ने सेंट जेम्सेस पार्क हे पहिले नाटक लिहिले. त्यानंतर राजदरबार व शहरातील सेलिब्रेटी बुद्धी चतुरांचा (विटस्) परिचय त्याच्याशी होऊ लागला, त्यात राजा चार्ल्सची एक मिस्ट्रेस होती. एक दिवस हा लेखक त्या बागेकडे आपल्या घोडागाडीतून निघाला होता. आपल्या घोडागाडीतून अर्धे अंग बाहेर काढून ती मोठ्याने ओरडली, ‘‘हे वायचेरले, तू वारांगनेचा कार्टा आहेस!’’ एवढे बोलून ती खिदळत सुटली. लेखकाला आश्‍चर्य वाटले, पण लगेच त्याला आपल्यावर उल्लेख केलेल्या नाटकातील गीताच्या शेवटच्या ओळींचा संदर्भ तिच्या बोलण्याला असावा असे वाटलं.

When parents are slaves
Their brats cannot be any other,
Great wits and great braves
Have always a punk to their mother.

घोडागाड्या वेगळ्या दिशेने निघाल्या होत्या. पण नाटककाराने स्वत:ला सावरून गाडीवानाला मागे वळून त्या बाईच्या घोडागाडीपुढे आपली गाडी ताणायची आज्ञा केली. तिला गाठल्यानंतर तो म्हणाला, ‘‘मॅडम, जी पदवी भाग्यवानाला मिळते ती तुम्ही मला दिली. आज रात्री बाईसाहेब नाटक बघायला येतील का?’’
‘‘ठीक, जिने तुझ्यावर प्रेम दाखवले तिचा अपेक्षाभंग न करण्याची खात्री वाटते कां?’’ तिने विचारले. तो उत्तर देत म्हणतात,
‘‘हो. तुझा गुलाम म्हणून मरायला तयार आहे.’’
हे ऐकून ती लाजली आणि तिने गाडीवानाला गाडी हाकायला लावली. ती इंग्लंडमधील सर्वांत सुंदर ललना होती. त्या रात्री ती राजाच्या शेजारी ड्रअरी लेन नाट्यगृहात नाटक बघत होती आणि लेखक तिच्या खालच्या पिटात होता. ही त्या दोघांमधील पत्रव्यवहाराची सुरुवात होती. या संबंधाने शहरात बराच गहजब उडाला.
लेखक बाथभागातील पुस्तकाच्या दुकानात उभा होता. तेथे मॅडम ड्रोघेदा ‘प्लेन डीलर’ या नाटकाची चौकशी करीत आली. तेथे जवळ उभा असणार्‍या मित्राने लेखकाला पुढे ढकलून म्हटले,
‘‘हा घ्या प्लेन डिलर मॅडम! तुम्हाला हवा तर!’’ लेखकाने तिला एक्सक्यूज केले पण तीच म्हणाली, ‘‘मला सरळ व्यवहार करणे सर्वांत जास्त आवडते.’’ नंतर लेखक तिला भेटला आणि यथावकाश त्यांचा शुभविवाह झाला. त्याचे हे खर्चीक प्रियाराधन सुरू होण्याआधी त्याला रिचमन्डच्या नवाबाचा गव्हर्नर म्हणून वार्षिक 1500 पाऊंड तनख्यावर नेमले होते. प्रेम प्रकरणाच्या नादात मित्र दुरावले. त्यात त्याची पत्नी निर्वतली. तिच्याकडून कसलाच लाभ झाला नाही. उलट तो फ्लीट रस्त्यावरच्या तुरुंगात गेला. तेथे सात वर्षे रखडायची वेळ आली.
यानंतर कर्नल ब्रेटने त्याचे ‘प्लेन डिलर’ बसवले आणि राजा जेम्सला त्याचा प्रयोग दाखवायची योजना हुशारीने केली. राजाने खुशीत लेखकाविषयी चौकशी केली. अनेक वर्षे हा लेखक त्याला भेटला नव्हता. कर्नलने संधी साधून सर्व माहिती पुरवली आणि राजाने लेखकाचे संपूर्ण कर्ज राज्याच्या तिजोरीतून भागवण्याची आज्ञा केली. लेखक एवढा दुबळा होता की, त्याने फक्त 500 पौंडांचाच हिशेब दिला. उरलेल्या कर्जासाठी तो सहा महिने जास्त काळ तुरुंगात अडकून पडला. दोन-तीनशे पौंड अधिक रक्कम भागविण्यासाठी त्याच्या पिताजींचे पाय धरावे लागले तेव्हा त्याची सुटका झाली.
विसाव्या शतकातील मराठीतील ‘नाच गं घुमा’पेक्षा सतराव्या शतकातील नाटककाराचा घोडागाडी दौरा फारच महाग पडला की नाही? मराठी लेखक तुरुंगात कधी गेला नाही.
कधी कधी लहानसहान घटना, प्रसंग वगैरे लेखकाच्या दैनंदिनीत नोंदवलेले असतात. लेखकांचे हेवेदावे, कळप स्वत:च्या लेखनाबद्दलच्या भ्रामक कल्पना वगैरे त्यांच्या दैनंदिनीत अधिक खुल्यापणाने व्यस्त झालेले दिसतात. लेखकांची पत्रे थोडी पोज घेऊन लिहिलेली असतात. ‘‘एक दिवस मी उठलो आणि स्वत: ख्यातकीर्त झाल्याचे आढळले’’ असा दावा करणारा अतिशय उनाड व स्पष्टवक्ता कवी लॉर्ड बायरन थोडा लंगडा पण फार देखणा होता. त्याच्या लग्नात अपयशी झाल्यानंतर तो पी. बी. शेलीप्रमाणे इटलीला पळून गेला. तेव्हा त्याने स्वत:ला मुलींच्या पाठलागापासून वाचवण्यासाठी खोलीत कोंडून घेतले. भिंतीवरून छतावर चढून कौल काढून एक तरुणी त्याच्या खोलीत उतरली. अशा या रोमँटिक कवीच्या डायरीचे एक पान वाचा.

20-1
प्रिय रॅव्हेण्णा, जाने. 4, 1821.
माझा मूड पार गेला होता – वृत्तपत्रे चाळली – ‘कीर्ती’ म्हणजे काय याचा विचार केला. खुनाची केस वाचल्यावर तो विचार आला. टर्नब्रिजचा किराणा दुकानदार श्री. व्रायच डुकराचे मांस, पीठ व पनीर विकत असे. असा समज आहे की एकांतात जिप्सी आदिवासी बाईला तो त्या वस्तू विकत होता. तिच्यावरच आरोप आहे. त्याच्या टेबलावर (मी पूर्ण विश्‍वासाने उद्धृत करीत आहे) एक पुस्तक ‘द लाईफ ऑफ पामेला’ होते जे तो टाकाऊ रद्दी म्हणून फाडीत होता वगैरे वगैरे. पनिरात इ. इ. सापडले, ‘‘आणि ‘पामेला’ (कादंबरी)चे पान मांसाला गुंडाळलेले होते.’’ जिवंत असलेल्या सर्व लेखकांत सर्वांत बढाईखोर व भाग्यवान रिचर्डसनला काय वाटेल (म्हणजे जिवंत असेपर्यंत) – हाच तो लेखक आरॉन हिलबरोबर गृहीत धरलेल्या फिल्डिंगच्या पतनाविषयी मिटक्या मारीत भाकीत करी. (फिल्डिंगला मानवी स्वभावाचा गद्य होमर महाकवी समजत.) तो (रिचर्डसन) काय म्हणाला असता. फ्रेंच राजकुमारीच्या संडासापासून (पहा बॉसवेलचे जॉन्सनचे चरित्र.) दुकानदाराचा काऊंटर व खुनी जिप्सीच्या डुकराच्या मांसाच्या गोळ्यापर्यंत त्याची पाने त्याला आढळली असती.
(‘कलेचे कातडे’ मराठीत वरील रोजनिशीतील लेखकांच्या फॅमिली रोमान्सपेक्षा फारच गुंतागुंतीचे आहे हे लक्षात येईल. लेखकांचे हेवेदावे, स्पर्धा व जळफळाट सर्वत्र सारखाच. ते सृजनाचे खाद्यच असते!)
मराठीतील ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा आदर्श इंग्रजीतील पहिला शब्दकोश तयार करणार्‍या डॉ. सॅम्युएल जॉन्सनचा (1709-84) होता. त्याचा चाहता आयरिश बॉसवेल त्याच्या सावलीसारखा 27 वर्षे त्याच्या सहवासात होता. त्याने लिहिलेले ‘लाईफ ऑफ जॉन्सन’ जगातील श्रेष्ठ चरित्र मानले जाते. जॉन्सनचे चरित्र म्हणजे किस्से, दंतकथा, नाट्यमय घटनांची मालिकाच आहे. तो फार गरिबीत वाढला. त्याचे बूट फार फाटले होते. ते त्याला भेट दिले तर नवे बूट तो घेणार नाही याची वसतिगृहातील मित्रांना खात्री होती. त्यांनी गुपचुप नवा बुटाचा जोड वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्या खोलीत ठेवला आणि जुने बूट फेकून दिले. ही वल्ली नवा जोड पाहून भडकली. नवा जोड कचर्‍याच्या टोपलीत टाकून अनवाणी पायपीट करू लागली. लेखन करणे शक्य व्हावे म्हणून त्याने आपल्यापेक्षा वयाने जास्त पण श्रीमंत मुलीशी लग्न केले. महात्मा फुले यांनी पुण्यात ग्रंथकार संमेलनाला जायला नकार देताना न्या. रानड्यांना लिहिलेल्या पत्राआधी सव्वाशे वर्षे त्याने चेस्टरफील्डच्या नबाबाला लिहिलेले परखड पत्र स्वाभिमानी लेखकाचा आदर्श म्हणून जगभर मानले जाते. नोबेल पुरस्कार विजेता आर्थर कोसलरने ‘कॉल गर्ल’ ही कादंबरीच विद्वान, लेखक व पत्रकारांवर लिहिली आहे. डॉ. जॉन्सनने शब्दकोश काढायला आर्थिक मदत मिळावी म्हणून नबाबाला कौतुकाने ती योजना मांडणारे सविस्तर पत्र लिहिले होते. पण कथा-कादंबर्‍या, काव्य अथवा नाटक अर्पण केले तर समाजात कीर्ती वाढते असा नबाबाचा समज होता. तो चुकला. त्याने शब्दकोश तयार होण्यापूर्वी जॉन्सनला तिरस्काराने दोनवेळा भेट नाकारली होती.
मोठ्या जिद्दीने (ज्ञानकोशकार केतकरांनी हेच केले.) त्यांनी शब्दकोशाचा पहिला भाग प्रसिद्ध केला. तेव्हा इंग्लंडमध्ये त्याचे स्वागत जोरात झाले. नबाबाने ‘द वर्ल्ड’ मासिकात डॉ. जॉन्सनची अफाट स्तुती करणारे दोन लेख लिहिले. त्याला भेटीला बोलावले. स्वाभिमानी विद्वान लेखकाने अत्यंत संयत भाषेत नबाबाला खालील पत्र पाठवले. –
योग्य सन्माननीय चेस्टरफील्डचे नबाब यांना
माय लॉर्ड, फेबु्रवारी 7, 1755
मला अलीकडेच ‘द वर्ल्ड’च्या मालकांनी कळवले आहे की माझ्या शब्दकोशाची शिफारस जनतेला करणारे दोन लेख आपण लिहिले आहेत. अशी प्रसिद्धी मिळणे हा सन्मानच. थोरामोठ्यांकडून मिळणार्‍या अशा पसंतीची फार कमी सवय असल्यामुळे तो कसा स्वीकारावा किंवा कोणत्या शब्दात आभार मानावे हेच नीट कळत नाही.
किंचित थोडेसे उत्तेजन मिळाले म्हणून प्रथम राजेसाहेबांना मी प्रथम भेटायला आलो. तेव्हा मी इतर लोकांप्रमाणे आपल्या बोलण्याने मी पुरता भारावून गेलो. मला ही इच्छा सहन होईना की मी प्रौढी मिरवेन.’’ङश र्ींरळर्पिींशी र्वी र्ींरळर्पिींशरी वश श्रर ींरीीश; मला तो आदर मिळेल की सारे जग समाधानी झाल्याचे मला दिसले. पण माझ्या लक्षात आले की, माझी उपस्थिती एवढी उपेक्षिली जात आहे ना गर्व ना नम्रता मला तिथे तो प्रकार चालू ठेवून सहन करू देईल. मी एकदा महाराजांना पब्लिकमध्ये बोललो. तेव्हा एखाद्या सेवानिवृत्त व अशिष्ट विद्वानाकडे असेल तेवढी प्रशंसेची सर्व कला पणाला लावली. मला जे शक्य होते ते सर्व केले आणि कुणीही माणूस त्याचे सर्वच उपेक्षिले गेले तर चांगला खूष होत नाही.
माननीय महाराज, आपल्या बाहेरच्या खोल्यात थांबलो किंवा आपल्या दरवाजातून धिक्कारून हाकलला गेलो त्याला आता सात वर्षे उलटली. या काळात मी माझे कार्य अडचणीतून पुढे रेटत आलो आहे. त्याबद्दल तक्रार करणे व्यर्थ आहे. अखेर ते कुठल्याही मदतीविना, एखादा उत्तेजनाचा शब्द अथवा एखादे पसंतीचे हास्य याशिवाय प्रकाशनाच्या काठावर आणले आहे. अशी वागणूक मी अपेक्षिली नव्हती. कारण यापूर्वी मला कधीच कुणी आश्रयदाता नव्हता.
व्हर्जिलच्या काव्यातील धनगर शेवटी प्रेयसीच्या परिचयात वाढला.
आणि तो पत्थरावरचा रहिवासी असल्याचे त्याला आढळले.
माझे स्वामी, पाण्यात जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपडणार्‍या माणसाकडे जो निर्विकारपणे पाहात बसतो तोच आश्रयदाता ना? तो जेव्हा जमिनीवर पोहोचतो तेव्हा त्याच्यावर मदतीचा भार टाकतो तोच आश्रयदाता ना? माझ्या कार्याची नोंद घेऊन आपणाला जो संतोष वाटला तेच थोडे आधी घडते तर दयाळूपणाचे झाले असते. मी निर्विकार होईपर्यंत ते ताणले गेले आहे. मी प्रसिद्धी पावेपर्यंत त्याला विलंब केला गेला आणि मला त्याचा आनंद घेता येत नाही. मी आता एकटा आहे आणि ते कुणाला सांगू शकत नाही. (17 मार्च 1752 रोजी जॉन्सनच्या पत्नीचे निधन झाले.) जेथे कसलाच फायदा मिळाला नाही अशा उपकारांची कबुली न देण्यात फार तुच्छतावादी कर्कशता नाही असे मला वाटते. मला स्वत:ला जे करण्याची शक्ती दिली ते मी आश्रयदात्याचे ऋण मानावे असे जनतेला वाटावे असे करण्याची अनिच्छा असणे कर्कशतेचे नसावे. विद्वत्तेच्या कुठल्याही चाहत्याच्या कोणत्याही उपकाराशिवाय इथपर्यंत हे कार्य केल्यानंतर जर मी हा शेवट केला तर माझा अपेक्षाभंग होणार नाही. जर कमीत कमी बरोबर कमी शक्यता असेल तर अपेक्षेच्या स्वप्नातून फार पूर्वीच उठलो आहे. एके काळी त्या स्वप्नात मी खूप चेकाळून एकदा शेखी मिरवली होती.
माय लॉर्ड, महाराजांचा अत्यंत नम्र, सर्वांत जास्त आज्ञाधारक सेवक,
सॅम. जॉन्सन
अशाच एका धीरोदात्त व लोकप्रिय नाटककारांच्या जीवनातील चित्तरकथा पाहू. रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन (1751-1816) हा आयरिश नाटककार त्याच्या ‘द क्रिटिक’, ‘द स्कूल फॉर स्कॅन्डल’ व ‘द रायव्हल्स’ या उपरोधी व विनोदी नाटकासाठी प्रसिद्ध आहे.
24 फेबु्रवारी 1809 रोजी ‘हाउस ऑफ कॉमन्स’च्या सभागृहात श्री. पॉन्सॉनबीच्या स्पेनशी चाललेल्या युद्धावरील चर्चा सुरू होती. लोकप्रतिनिधी रिचर्ड शेरिडनही काही बोलायच्या उद्देशाने तेथे हजर होता. रात्री एकाएकी प्रकाशाच्या झोतात सभागृह उजळून निघाले. सभागृहातील वादविवादात व्यत्यय आला. ड्रूअरी लेन नाट्यगृहाला आग लागल्याचे निश्‍चित झाले. ठराव स्थगित करण्यात आला. शेरिडन शांतपणे म्हणाला, ‘‘खाजगी संकटाचे स्वरूप कसे का असेना, त्याचा हस्तक्षेप देशाच्या सार्वजनिक कामात होता कामा नये असे मला वाटते.’’ नंतर तो सभागृहातून निघून गेला. ड्रूअरी लेनकडे गेला. धीरगंभीरपणे सगळा प्रकार पाहिला. त्याच्याकडे बारकाईने पाहणार्‍या सर्वांना त्याचे फार नवल वाटले. त्याची संपूर्ण संपत्ती जळून खाक झाली होती. असे म्हटले जाते की जोवर जाळ पेटत होता तोवर तो पिझ्झा कॉफी हाउसमध्ये बसून राहिला. थोडाफार फराळ केला. आपल्या दुर्दैवाचा आघात ज्या तात्त्विक शांततेने त्याने झेलला त्यावर त्याच्या एका मित्राने शेरेबाजी केली. शेरिडनने उत्तर दिले,
‘‘स्वत:च्या चुलीजवळ बसून माणसाला खात्रीने ग्लासभर दारू पिण्याची परवानगी दिली जावी.’’
चारुता सागर हे ग्रामीण कथाकाराचे टोपण नाव आहे आणि भोसले कुलोत्पन्न लेखक सैन्यात होते एवढी अपूर्ण माहिती आपणाला असते. पण त्यांचे लेखकपण व फौजी बाणा यांच्या झटापटीचा एकही प्रसंग आपणाला माहीत नसतो. कितीही नाकारले तरी लेखकाच्या चरित्रातील प्रसंग त्याच्या कथा / काव्य अथवा अन्य लेखनाशी जोडता आल्यास त्या लेखनाचे गुणधर्म अधिक चांगले लक्षात येतात. चाळीस वर्षे एखादा इंग्रजीचा प्राध्यापक एस.टी. कोलरिज (1772-1834) या कवीची ‘कुब्ला खान’ ही गाजलेली कविता शिकवतो. चंगीजखानाचे चरित्र वाचून अर्धवट झोपेत त्याला ती कविता स्वप्नात सुचली. अंधारात तो उठून तिच्या 24 ओळी लिहून पूर्ण करीत असताना दारावर टकटक झाली. पेम्ब्रोकचा पाहुणा अचानक टपकल्यामुळे तो ‘मास्टरपीस’ अपूर्णच राहिला. वर्डस्वर्थ निसर्गाशी संबंधित विषयांना अद्भुत रूप देणार होता आणि कोलरिज हा त्याचा मित्र अद्भुताला नैसर्गिक रूप देणार होता. अशा अल्पशा माहितीपेक्षा जोसेफ कॉट्टेलेने कथन केलेली पुढील कथा वाचल्यानंतर त्याच कवितेकडे वेगळ्या परिपेक्ष्यातून आपण कसे पाहू लागतो ते पाहू.
आमची खूप करमणूक ज्यांनी केली अशा केंब्रिज विद्यापीठातील अतिरेकी चावटपणाच्या गोष्टींपैकी एक श्री. कोलरिजने आता आम्हाला सांगितली. तो म्हणाला की, खर्च करून त्याने आपले पत्ते कुणा तरुणीला पाठवले होते. (मला वाटते, ए मेरी इ – ट्रव्हॅन्स). तिने त्याने सुचविलेली ‘ऑफर’ नाकारली. त्यामुळे त्याचा क्रोध एवढा अनावर झाला की तो विद्यापीठातून थेट लंडनला पळाला. त्या बेदरकार मनाच्या अवस्थेत त्याने आपले नाव घोडदळात एक सामान्य सैनिक म्हणून नोंदवले. त्याची उंची अथवा वय यावर कुठलाच आक्षेप कुणीच घेतला नाही. अशा प्रकारे स्वीकारल्यानंतर त्याला त्याचे नाव विचारले गेले. पूर्वी त्याने पूर्णपणे ‘कमश्‍चा रिकअन’ हे एक नाव सांगायचा निश्‍चय केला होता. पण सकाळी लिंकन्स इन फिल्डस् (किंवा द टेम्पल)च्या दारावर ‘कम्बरबॅच’ (नॉट कोम्बरबॅक) हे नाव पाहिले होते. त्यामुळे तो शब्द त्याला पूर्णपणे गावंढळ वाटला आणि त्याने उत्तर दिले, ‘सिलास टॉम्केन कम्बरबॅच.’ अशा प्रकारे त्याच्या सैन्यदलातील प्रवेशाची नोंद हजेरीबुकात झाली. असे दिसते की श्रीमान कोलरिज त्याच्या सर्व उणिवांसह लोकांना आवडत होता. जरी तो सगळ्या सैन्याचा विषय होता तरी आपला जवळचा नातेवाईक म्हणून लाडका मानीत. जरी त्याला विशेष समजत तरी स्वाभाविक बोलत. प्रेमज्वराने ग्रासलेल्या तरुणाने त्यांच्या या कल्पनेला जोरदार प्रतिकार केला, पण सैन्याच्या तर्काचा विजय झाला. ते जे काही निपुणतेने करीत ते त्याला मुळीच जमत नसे. अहम एवढा स्वाभाविक नसतोच ना? सिलास टॉम्केन कोम्बरबॅच एवढ्या वेळा घोड्यावरून खाली आपटलेला एकही माणूस सैन्यात नव्हता. कमी अचूकतेने तो बर्‍याच वेळा आपला तोल सांभाळी. एका बाजूने आरूढ होताना (कदाचित चुकीची रिकीब) संभव होता की विशेषत: त्याचा घोडा जरी थोडा हलला तरी त्याचा तोल ढासळे. जर का तो ह्या बाजूला मागे ढळला नाही तर दुसर्‍या बाजूने तो धाडकन खाली कोसळे! मग गड्यात हास्याची लाट पसरे, ‘सिलास पुन्हा गडगडला!’ बर्‍याच वेळा श्रीमान सीने मोहिमांच्याविषयी ऐकले होते. पण पूर्वी त्याला कठीण सेवेची एवढी योग्य कल्पना आली नव्हती.
श्री. सी.साठी विलक्षण सनकी परिस्थितीने निर्माण केलेले काहीसे अवमूल्यन बॉल नृत्य खोलीजवळ वाढून ठेवले होते. त्याला कोण्या एका हॉटेल / रिसॉर्टच्या बॉलडान्स खोलीजवळ की रिसॉर्टच्या सार्वजनिक ठिकाणी पहारेकरी नेमले होते. दोन लष्करी अधिकारी त्या खोलीत जाताना श्री. सी.जवळ थोडा वेळ थांबले. ते नाटककार युरिपिडीसविषयी बोलत होते. त्यांच्यापैकी एकाने दोन ओळी पुन्हा म्हटल्या. ग्रीकचा आवाज येताच पहारेकर्‍याचे कान अंत:प्रेरणेने तिकडे वळले. सर्व सन्मान राखून आपल्या उंच टोपीला स्पर्श करीत तो म्हणाला, ‘‘मला वाटतं, आपण मला क्षमा कराल. आपण पुन्हा म्हटलेल्या ओळी बरोबर म्हटल्या नाहीत. ह्या त्या ओळी आहेत.’’ म्हणून त्याने अधिक बरोबर म्हटल्या. श्री. सी. पुढे म्हणाला, ‘शिवाय, त्या युरिपिडीसच्या नसून सोफोक्लीसच्या ‘इडिपस’च्या दुसर्‍या प्रतिसंवादात त्या सापडतील.’’ ‘‘का, तू द कोण – आहेस?’’ अधिकारी बरळला, ‘‘थेरडा फॉस्टस पुन्हा तरुण झाला का?’’ आपल्या टोपीला पुन्हा स्पर्श करीत श्री. सी. म्हणाला, ‘‘मी केवळ आपला नम्र सेवक पहारेकरी आहे साहेब.’’
घाईने ते दोन अधिकारी खोलीत घुसले. दरवाजाजवळच्या त्या ‘वल्लीविक्षिप्त ऑड फिश’बद्दल चौकशी करू लागले. तेव्हा एकाने (तो सर्जन होता असे वाटते) सांगितले की तो त्याच्यावर लक्ष ठेवून होता. पण तो कुठून आला किंवा कम्बरबॅचच्या कुटुंबाविषयी काही सांगू शकत नव्हता. पण तो पुढे सांगू लागला, ‘‘पण जी विक्षिप्त वल्ली असण्यापेक्षा, मला संशय वाटतो की ऑक्सफर्ड अथवा केंब्रिज विद्यापीठाच्या पक्षीशाळेतील ‘भटका-पंछी’च असला पाहिजे. बर्‍याच वेळा घोड्यावरून आपटल्यामुळे अंगभर वारंवार झालेल्या खरचटल्याच्या खुणांच्या हास्यास्पद वस्तुस्थितीची माहिती त्यांना मिळाली. ‘‘वा रे वा!’’ एक अधिकारी म्हणाला. वेगवेगळ्या वेळी आमच्या सैन्याच्या तुकडीत ह्या ‘विद्यापीठ पंधी’पैकी दोन-तीन पक्षी आमच्यात आले होते. तथापि, त्यांनी या ‘गरीब विद्वानावर’ दया दाखवली. श्री. सी. ची बदली औषध विभागात झाली. तेथे सैन्याच्या दवाखान्यात ‘साहाय्यक’ म्हणून नेमणूक केली गेली. श्री. सी. च्या परिस्थितीत बरीच सुधारणा करणारा हा बदल होता. तो हजर झाला तो दिवस आजार्‍यांकरिता आनंदाचा होता. कारण ते म्हणाले, ‘‘सिलास टॉम्केन कम्बरबॅचच्या रंजक गोष्टींनी त्यांच्यासाठी सर्व ‘डॉक्टरांच्या शरीरशास्त्रा’पेक्षा बरेच काही चांगले केले!…’
अशाच एका रोचक गप्पाटप्पांत श्री. सी. एका कॉटच्या बेडच्या पायाशी बसला होता. त्याच्या तोंड वासून ऐकणार्‍या सोबत्यांनी त्याला घेरले होते. (त्याला नेहमीच हा मान मिळे. ते काळजी नसे, त्याच्या कथांची) एकाएकी दरवाजा खाडकन् उघडला आणि दोन-तीन सभ्य गृहस्थ (त्याचे मित्र) गणवेशात आले. त्यांना हव्या त्या माणसाला थोडा वेळ शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. बर्‍याच वेळानंतर त्यांनी श्री. सी.वर झडप घातली आणि त्याचे हात पकडून शांतपणे त्याला खोलीबाहेर नेला (विल्कीसाठी खरोखर खास चित्र!). पळपुटा भित्रा समजला गेलेला उंबरठा ओलांडून गेला तसा आश्‍चर्यचकित एक श्रोता नि:श्‍वास टाकून म्हणाला, ‘बिच्चारा सिलास! मी अपेक्षा करतो ते त्याला दंड पाचशे घेऊन सहीसलामत सोडून देवोत!’ लवकरच श्री सी.साठी खंडणी देण्याची जुळणी झाली. पुन्हा एकदा त्याला विद्यापीठात सुखरूप पाठवण्याचा आनंद त्याच्या मित्रांना मिळाला.
एका प्रसंगी त्याच्या तुकडीचा तपासणी अधिकारी सैनिकांच्या बंदुकीची तपासणी करीत होता. परीक्षा घेताना गंजलेल्या भागाजवळ आला. अधिकाराच्या आवाजात त्याने आवाज दिला, ‘‘ही बंदुक कोणाची?’ तेव्हा श्री सी. म्हणाला, ‘‘फारच गंजलीय का ती सर?’’ ‘‘होय श्री कम्बरबॅच, ती सडलीय.’’ अधिकारी कठोरपणे बोलला. ‘‘मग सर,’’ श्री सी. ने चाचरत उत्तर दिले, ‘‘ती माझीच असली पाहिजे.’’ या विक्षिप्त उत्तराने अधिकार्‍याची शस्त्रे गळून पडली. ‘बिचार्‍या स्कॉलरची’ सुटका शिक्षेशिवाय झाली होती.
‘ख्रिस्ताबेल’ व ‘एन्शन्ट मॅरिनर’सारख्या अभिजात कविता आणि जर्मन तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ‘बायोग्राफिया लिटरेरिया’सारखा मैलाचा दगड ठरलेला ग्रंथ लिहिणार्‍या कोलरिजच्या जीवनातील ही घटना रंजक तितकीच उद्बोधक आहे. ‘कुब्ला खान’मधील चांदण्या रात्रीचे ते अप्रतिम वर्णन आणि त्याला युद्धाचे भाकीत सांगणार्‍या पूर्वजांचे दूरवरचे आवाज त्या ‘गंजलेल्या’ बंदुकीतून तर आले नसतील?
लेखकांच्या साहित्यकृतीच्या जन्मकथा ह्या ‘युद्धस्य कथा रम्य:’ म्हणतात या तशाच असतात. त्यांच्या टोपण नावाच्या, ग्रंथ प्रकाशनाच्या अनुभवाच्या चित्तरकथा त्यापेक्षाही धमाल असतात. स्त्री लेखिकांच्या ग्रंथ प्रकाशनाच्या जगभरच्या अनुभवात बरेच साम्य दिसते. उदाहरणार्थ, एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये ब्रॉन्टे भगिनी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यनगरीतील मालतीबाई बेडेकर यांना कादंबरी लेखनासाठी सारखेच दिव्य करावे लागले. विभावरी शिरूरकर या टोपण नावाने बेडेकरांना (माहेरचे खरे नाव लपवून) ‘बळी’ प्रसिद्ध करावी लागली. एमिलीने जॉर्ज इलियट हे पुरुषी नाव धारण केले होते, पण चार्लट ब्रान्टे (1816-55) च्या ‘द प्रोफेसर’ या कादंबरीच्या हस्तलिखितावर ‘कुरेर बेल’ हे अपरिचित नाव घालून ती अनेक प्रकाशकांकडे पाठवल्याची कहाणी जॉर्ज स्मिथने सांगितली आहे.
1847 च्या जुलैमध्ये हस्तलिखिताचे पार्सल आमच्या प्रकाशनाकडे आले. त्यात तीन ते चार प्रकाशकांचे खोडलेले पत्ते होते. ते पूर्वी इतर प्रकाशकांकडे सादर केले होते हे ते दर्शवीत होते. त्या हस्तलिखिताला पसंती मिळावी अशा हिशेबाने ते पाठवलेले नव्हते. अन्यत्र पूर्वीच नाकारलेले आमच्याकडे दिले हे स्पष्ट होते.
‘कुरेर बेल’च्या ‘द प्रोफेसर’चे हस्तलिखित त्या पार्सलमध्ये होते. ते चार्लट ब्रॉन्टेच्या निधनानंतर प्रसिद्ध झाले. श्री. विल्यम्स हे प्रकाशनाचे ‘वाचक’ होते. त्यांनी ते वाचले आणि म्हणाले की, ते मोठी वाङ्मयीन शक्ती दर्शविते. पण एक प्रकाशन म्हणून त्याच्या यशाबद्दल त्यांना शंका होत्या. आपण त्या ‘कुरेर बेल’ला ससंग्रहणात्मक टीका करून ते नाकारल्याचे कळवावे असे आम्ही ठरवले. पण जे पुस्तक यश खेचून आणेल असे पुस्तक तो लिहू शकेल हे मत व्यक्त करायचे योजिले. तथापि, आमचे पत्र पोस्टात टाकण्याआधीच ‘कुरेर बेल’ पोस्टाची तिकिटे पाठवल्याशिवाय उत्तर पाठवत नाहीत अशी सूचना ‘मित्राने’ दिल्यामुळे त्याने या हेतूची पूर्तता केली होती! आमच्या पत्राचा तिच्यावर झालेल्या परिणामाचे वर्णन खुद्द चार्लट ब्रॉन्टेने केले आहे :
एक अनाथ अपेक्षा म्हणून त्याने आणखी एक प्रकाशनाकडे प्रयत्न केला. फार दीर्घ काळ त्याला अनुभवाने हिशेब करायला शिकवले होते त्यापेक्षा बर्‍याच कमी अवकाशात उत्तराचे पत्र मिळाले. ‘कळविण्यात येते की ‘मेसर्स स्मिथ, एल्डर ऍन्ड कं. हस्तलिखित प्रकाशित करू शकत नाही!’ या दोनच ओळी पाहण्याची स्वप्नाळू पूर्वकल्पना बाळगून त्याने ते उघडले. पण त्याऐवजी त्याने पाकिटातून दोनपानी पत्र बाहेर काढले. थरथरतच त्याने ते वाचले. व्यावसायिक कारणासाठी त्यांनी ते प्रकाशित करायला खरोखर नकार दिला. पण त्या पत्रात त्याच्या गुणवत्तेची व दोषांचीही एवढ्या आपुलकीने, एवढ्या विचारपूर्वक, एवढ्या विवेकी चैतन्याने, एवढ्या प्रबुद्ध साम्यभेदाने चर्चा केली की हा नकारच लेखकाला उत्तेजन देऊन गेला. त्याच्या असभ्यपणे केलेल्या स्वीकाराने जेवढा आनंद झाला असता त्यापेक्षा हा नकार बरा होता.
आमच्या त्या पत्राचा लेखक, मी म्हणालो त्याप्रमाणे श्री. डब्ल्यू स्मिथ विल्यम्स होता. श्री. विल्यम्सच्या पत्राला उत्तर म्हणून ‘कुरेर बेल’चे छोटे टिपण आहे. त्यात हस्तलिखिताकडे बारकाईने लक्ष देऊन रसग्रहण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. दुसरे पुस्तक लिहून संपवण्याच्या बेतात लेखक असण्याचा उल्लेख केला होता. ते लवकरात लवकर पूर्ण होताच आमच्याकडे पाठवू असे म्हटले होते.
दुसरे हस्तलिखित ‘जेन आयर’ या कादंबरीचे होते. या हस्तलिखितासोबतच्या पत्रातसुद्धा लंडनमधील प्रकाशकांच्या पोस्टाच्या तिकिटासंबंधीच्या कृपणपणाविषयीचा ‘कुरेर बेल’चा संशय व्यक्त झाला. तिने लिहिले :
मला वाटते, मला या पार्सलच्या वाहतुकीचा खर्च पुन्हा देणे शक्य नाही. ते जेथे दिलेय त्या छोट्या स्टेशनात त्यासाठी पैसे स्वीकारीत नाहीत. जेव्हा आपण हस्तलिखिताची पोच द्याल तेव्हा कृपा करून त्यासाठी झालेल्या खर्चाचा आकडा कळवावा. मी तातडीने तेवढ्या किमतीची पोस्टाची तिकिटे पाठवेन.
श्री. विल्यम्सने यथावकाश ‘जेन आयर’चे हस्तलिखित वाचले. तो ते घेऊन शनिवारी माझ्याकडे आला आणि म्हणाला की मी ते वाचलेले त्याला आवडेल. त्या काळी शनिवारी अर्धी सुट्टी नव्हती. नेहमीप्रमाणे मी फार उशिरा घरी पोहोचलो. रविवारी सकाळी मी मित्राला भेटीची वेळ दिली होती. बाराच्या दरम्यान मी त्याला भेटणार होतो. आमच्या घरापासून ते अंतर दोन किंवा तीन मैलांवर होते. तेथून त्याच्याबरोबर खेड्यात घोड्यावर जायचे होते.
माझ्या छोट्या अभ्यासिकेत ‘जेन आयर’चे हस्तलिखित घेऊन मी रविवारी नाश्ता केल्यानंतर गेलो. कथानकाने मला तत्काळ कैदी केले. बारा वाजायच्या आधीच माझा घोडा दाराशी आला. पण मी हस्तलिखित खाली ठेवू शकलो. मी मित्रासाठी दोन-तीन ओळी खरडल्या : आपल्या भेटीपासून परावृत्त करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे, क्षमस्व. ती चिठ्ठी मी नोकरामार्फत पाठवून दिली आणि हस्तलिखित वाचत बसलो. आता माझा नोकर दुपारी जेवण तयार असल्याचे सांगायला आला. सॅन्डविच व मधाचा पेला माझ्यासाठी आणायला मी त्याला सांगितले आणि सलग ‘जेन आयर’चे वाचन चालू ठेवले. रात्रीचे जेवण झाले. माझ्यासाठी ते जेवण फार घाईत झाले. त्या रात्री झोपी जाण्यापूर्वी मी हस्तलिखिताचे वाचन संपवलेले होते.
दुसर्‍या दिवशी आम्ही पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारीत असल्याचे ‘कुरेर बेल’ला पत्राने कळवले. त्या ग्रंथाने मिळवलेले यश आणि तो पुरुष की स्त्रीने लिहिला या विषयीची मतमतांतरे याविषयी मी काहीही बोलायला नको. माझ्यापुरते बोलायचे तर लेखकाच्या लिंगाविषयी माझ्या मनात कधीच शंका नव्हती. सर्वसाधारण जनतेपेक्षा लेखकाचे हस्ताक्षर माझ्यासमोर असणे हा तेव्हा माझा फायदा होता. शैलीचे गुणदेखील होते आणि अभिव्यक्तीच्या वळणांनी मला ‘कुरेर बेल’ स्त्रीच असल्याचे ओळखल्याचे समाधान दिले. श्री. विल्यम्स माझ्या मताशी सहमत झाला. तथापि, लेखकाची अनामिकता जपणे आमच्यावर बंधनकारक होते. आमची पत्रे ‘कुरेर बेल’ला उद्देशून लिहिणे चालूच ठेवले. इलिस व ऍक्टन बेलचे लेखन एका श्री. न्यूबायने प्रकाशित केले होते. त्यांच्या अटी लेखकांची थैली मोकळीच ठेवणार्‍या होत्या. जेव्हा आम्ही ‘शिर्ले’ प्रकाशित करण्याच्या बेतात होतो तेव्हा आम्ही अमेरिकेतील प्रकाशकाशी त्याच्या विक्रीची व्यवस्था केली. 1948 च्या उन्हाळ्यात ‘जेन आयर’ पाठोपाठ ती कादंबरी आली. अगोदरच त्या प्रकाशकाला कादंबरीचे छापील कागद पाठवले. त्यामुळे अमेरिकेतील इतर प्रकाशकांपेक्षा वेळेच्याबाबत त्याचा जास्त फायदा मिळाला. त्या काळी अमेरिकेत ग्रंथाच्या हक्काचा कायदा अर्थात नव्हता. आमच्या चर्चेच्या काळात अमेरिकेतील व्यवहार पाहणार्‍याचे एक पत्र मिळाले. न्यूबायने त्यांना कळवले होते की तो ‘जेन आयर’च्या लेखकाचे पुढचे पुस्तक प्रसिद्ध करणार होता. ऍक्टन बेल – कुरेर इलिस व ऍक्टन बेल हे पेा वश श्रिूाश होते. ही एकच व्यक्ती होती. आम्ही ‘कुरेर बेल’ ला कळवले की, त्या पत्राला छेद देण्याची संधी मिळाली तर आनंद वाटेल. श्री. न्यूबायचे खात्रीलायक म्हणणे खोटे होते याची आम्हाला खात्री असल्याची पुस्ती त्याचवेळी जोडली. त्या पत्राचा परिणाम तिच्यावर कसा झाला याचा उलगडा चार्लट ब्रॉन्टेने केला आहे. तिच्या मानावर गदा आल्याचे तिला पटवले गेले. सौ. गास्केल ‘द लाईफ ऑफ चार्लट ब्रॉन्टे’मध्ये म्हणतात, ‘‘घाईत निर्णय घेऊन त्याच दिवशी चार्लट व तिची बहीण ऍनने लंडनला जायला निघायचे ठरविले. मेसर्स स्मिथ, एल्डर व कं. ला त्यांची वेगळी ओळख पटवून देण्यासाठी त्या निघाल्या.’’
त्या बहिणींनी घाईने व ऊर्जेने त्यांच्यासाठी गंभीर असलेल्या मोहिमेत झोकून दिले. त्या लंडनला शनिवारी सकाळी आठ वाजता कशा पोहोचल्या, पॅटरनॉस्टर रोमधील ‘चॅप्टर’च्या कॉफी घरात राहायला गेल्या आणि त्रस्त अवस्थेत नाश्ता केला, कॉर्नहिलमधील माझ्या ऑफिसच्या तीर्थयात्रेला कशा निघाल्या हे सारे सौ. गास्केलने त्या चरित्रात लिहिले आहे.
त्या विशिष्ट शनिवारी सकाळी मी माझ्या खोलीत काम करीत होतो. तेव्हा क्लार्कने निरोप आणला की, दोन महिला मला भेटू इच्छितात. मी फार कामात होतो. मी त्याला त्यांची नावे विचारायला सांगितले. त्या नावे सांगायचे नाकारतात. पण खाजगी बाबतीत माझी भेट घ्यायचे इच्छितात असे सांगायला तो परत आला. कांकू करीतच मी त्यांना आत पाठवायची परवानगी त्याला दिली. मी पत्रे चाळण्याचे अर्धे काम उरकले होते. ‘कुरेर बेल’ व ‘जेन आयर’पासून फार दूरवर माझे विचार भरकटत होते. निस्तेज चेहर्‍याच्या, चिंताग्रस्त अशा काहीशा विलक्षण वेशातील किरकोळ बांध्याच्या महिला चालत माझ्या खोलीत आल्या. त्यांच्यापैकी एकीने माझ्या स्वत:च्या हातांनी पत्ता लिहिलेले पत्र पुढे येऊन दिले. ते ‘कुरेर बेल’ला लिहिले होते. ते पत्र फोडल्याचे माझ्या लक्षात आले. मी जरा धारदार आवाजात विचारले, ‘‘हे तुम्हाला कुठे मिळाले!’’, ‘‘पोस्ट ऑफिसातून!’’ उत्तर मिळाले. ‘‘ते मला लिहिलेय. आपणाला दृश्य पुरावा मिळावा की आम्ही किमान दोघी आहोत म्हणून आम्ही दोघीही आलो.’’ याचा अर्थ ‘कुरेर बेल’ हीच ती व्यक्ती. मी चेकाळलो असे नाही, पण मी चटकन पुरता भाळलो, हे सांगायची जरुरी नसावी. श्री. विल्यम्स खाली बोलावून त्याची ओळख करून दिली गेली. पाहुण्याकडे सर्व प्रकारे लक्ष पुरवण्याच्या योजना करायला मी सुरुवात केली. आमच्या घरी येऊन राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न मी केला. याला त्यांनी नकार दिला. पण मी सायंकाळी माझ्या बहिणीला बोलावून ऑपेरा बघायला त्यांना न्यायला संमती दिली. त्या प्रसंगीच्या तिच्या व बहीण ऍनाच्या भावनांचा वृत्तांत : साधा व गळ्यापर्यंतचे वेष कसे घालून ऑपेरासाठी गेले- तिने स्वत: दिला आहे.
देखण्या ललना व सद्गृहस्थ आमच्याकडे जसे आम्ही बॉक्सच्या दरवाजाजवळ थांबलो तसे दृष्टिक्षेप टाकत होते. दरवाजा अजून उघडला नव्हता. ते शिष्ट घमेंडीने, परिस्थितीने पूर्ण अधिकाराने बघत होते. तरी पण मला डोकेदुखी, आजार व उघड विदुषकीपणा असूनही सुखदपणे उत्तेजित झाल्यासारखे वाटले. ऍना शांत व सभ्य असल्याचे मला दिसले. ती नेहमी तशीच असते. रोस्सिनीच्या ‘बार्बर ऑफ सेव्हिले’चा प्रयोग होता. खूप देदीप्यमान, जरी मी कल्पना लढवते मला अधिक चांगल्या वाटाव्या अशा बाबी जगात आहेत. त्या रात्री आम्ही एक वाजता घरी पोहोचलो. आदल्या रात्री आम्ही झोपलोच नव्हतो. चोवीस तास सातत्याने उत्तेजित होतो. आम्ही पार थकून गेलो होतो याची कल्पना करा.
माझ्या आईने दुसर्‍या दिवशी त्यांची भेट घेतली. केवळ तीन दिवस लंडनमध्ये राहिल्यानंतर त्या भगिनी हॅवर्थला परतल्या. चार्लटने स्वत: त्या फार कमी दिवसांत मन व देहाच्या कोणत्या अवस्थेत त्यांना सोडले याचे सजीव वर्णन केले आहे.
श्री. स्मिथने दिलेल्या पुस्तकांचे ओझे वागवत आम्ही मंगळवारी सकाळी लंडन सोडले आणि सुखरूप घरी पोहोचलो. मी दिसते त्यापेक्षा सर्वांत थकलेली अभागी बाई याची कल्पना करणे कठीण ठरेल. मी जेव्हा गेले तेव्हा सडपातळ होत, पण परतले तेव्हा खरोखर कृश झाले. माझा चेहरा विलक्षण खोल सुरकुत्या पडल्याने फिकट व फार वृद्ध दिसत होता. माझे डोळे अनैसर्गिकपणे एकटक बघणारे. मी अशक्त आणि तरीही अस्वस्थ.
ऍना ब्रॉन्टेला मी भेटलो तो हाच एक प्रसंग. ती नम्र, शांत, बरीच मंद व्यक्ती, सर्वार्थाने सुंदर, तरी दिसायला प्रसन्न. तिच्या वागण्याची पद्धत रक्षण व उत्तेजनाची अपेक्षा उत्कंठेने व्यक्त करणारी होती. सहानुभूतीला निमंत्रण देणारे एक प्रकारचे सततचे ते मागणे होते.
हे सारे वाचताना मला ‘सत्यकथे’चे संपादक राम पटवर्धन यांची आठवण येत होती. त्यांच्या पत्रांच्या आधारे मी लेखक-संपादकाच्या नात्याविषयी दीर्घ लेख लिहिला होता. साहित्यकृती ही फक्त लेखकाची निर्मिती नसते. संपादक, प्रकाशक, इतकेच काय अक्षरे जुळणार्‍याचाही या प्रक्रियेत सहभाग असतो. फ्रेंच रॉब ग्रिलेटने ‘स्नॅपशॉट’ नावाची कादंबरी छापायला पाठवली. घाईत तिच्या प्रकरणांचा क्रम बदलला. ती उत्तराधुनिक प्रयोगक्षम कादंबरी म्हणून गाजली? ‘गडदा’ नावाची कथा मी घाईत पोस्टाने पटवर्धनांच्याकडे पाठवली. तिचे हस्तलिखित वाचून ना. सी. फडकेप्रणित निरगाठ, सूरगाठ व उकलगाठ तंत्राचा बळी ठरलेल्या प्राध्यापकाने मला रूढ ‘क्लोज’ शेवट करायचा सल्ला दिला होता. तो मी मानला नाही, पण कथेत काहीतरी कमी वाटते. शेवट अपूर्ण का? एखादे पान पाठवायचे राहिलेय का? अशी विचारणा पटवर्धनांनी केली. खरोखरच शेवटचे एक पान माझ्या टेबलावरच्या गर्दीत मिसळून गेले होते. ते मी पाठवले आणि ‘गडदा’ ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाली. अशा गमती जमती आणि वाङ्मयातील अपघात होतच राहतात.
*************************************************************************************************************
डॉ. आनंद पाटील
इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांवर विपूल ग्रंथसंपदा प्रकाशित झाली. आहे
Email: dr_anandpatil@rediffmail.com
Mob: 9404140995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *