Warning: curl_exec() has been disabled for security reasons in E:\HostingSpaces\abab42631\choufer.com\wwwroot\2016\wp-includes\Requests\Transport\cURL.php on line 162
मोठ्या जगातील

मोठ्या जगातील

संजीव खांडेकर

सांगलीसारख्या छोट्या गावातून
मोठ्या जगात येण्याचा,
तुझा उद्देश काय होता?
त्यांनी विचारले.

सांगलीसारख्या छोट्या गावातून
मोठ्या जगात येताना,
मला इथे एक मोठी जागा हवी होती.
मी सांगितले.

मोठ्या जगातील मोठी जागा कशासाठी हवी होती?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील मोठ्या जागेत एक
मोठे घर बांधायचे होते,
मी सांगितले.

मोठ्या जगातील मोठ्या जागेत एक मोठे घर
बांधण्यामागे हेतू काय होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील मोठ्या जागेतल्या
मोठ्या घरातली
एक मोठी खोली मिळवायची होती
मी सांगितले.

मोठ्या जगातील मोठ्या जागेतील,
मोठ्या घरातील
मोठी खोली कशासाठी मिळवायची होती?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेतील,
मोठ्या घरातल्या, मोठ्या खोलीमध्ये
एक बीळ खणायचे होते.
मी सांगितले.

21-1

मोठ्या जगातील, मोठ्या जागेतील
मोठ्या घरातील मोठ्या खोलीमध्ये
एक बीळ खणण्यामागे उद्देश काय होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेतील
मोठ्या घरातील मोठ्या खोलीमध्ये
खणलेल्या बिळामध्ये
आणखी एक बीळ खणायचे होते
मी सांगितले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेतील
मोठ्या घरातील मोठ्या खोलीमध्ये
खणलेल्या बिळामध्ये,
आणखी एक बीळ कशासाठी?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामध्ये आणखी बिळामध्ये
एक मोठा पलंग टाकायचा होता.
मी सांगितले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत खणलेल्या
बिळामधील बिळामध्ये
एक मोठा पलंग टाकण्यामागे काय उद्देश होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील बिळामध्ये
टाकलेल्या मोठ्या पलंगासमोर
एक मोठे भिंग लावायचे होते,
मी सांगितले.
मोठ्या जगातील, मोठ्या जागेमध्ये
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील बिळामध्ये
टाकलेल्या पलंगासमोर
एक मोठे भिंग लावण्याचा हेतू काय होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमध्ये
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील बिळामध्ये
टाकलेल्या पलंगासमोर
लावलेल्या मोठ्या भिंगापाठी,
मला गाढ झोपी जायचे होते.
मी सांगितले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील बिळामध्ये
टाकलेल्या पलंगासमोर
लावलेल्या मोठ्या भिंगापाठी,
गाढ झोपी जाण्यामागे उद्देश काय होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील बिळामध्ये
टाकलेल्या पलंगासमोर
लावलेल्या मोठ्या भिंगापाठी,
बाहेरच्या जगाला मी भलामोठा
झोपलेला दिसलो असतो
मी सांगितले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील दुसर्‍या बिळामध्ये
टाकलेल्या पलंगावरती
भलेमोठे भिंग समोर लावून
बाहेरच्या जगाला
भलामोठा झोपलेला दाखवण्यामागे उद्देश काय होता?
त्यांनी विचारले.

मोठ्या जगातील, मोठ्या जागेमधल्या
मोठ्या घरातील मोठ्या खोलीत
खणलेल्या बिळामधील दुसर्‍या बिळामध्ये
टाकलेल्या पलंगावरती
भलेमोठे भिंग समोर लावून

बाहेरच्या जगाला
भलामोठा झोपलेला दिसल्यामुळे
डिवचून डिवचून कुणी उठवणार नाही
मी म्हणालो.

आणि तंगड्या वर करून झोपी गेलो.

*************************************************************************************************************

संजीव खांडेकर
जगण्याच्या पसार्‍यात हरवलेली परंपरागत मूल्यं आणि बदलतं कार्पोरेट जग या दोहोंना एकाच कवेत घेणारा उत्तरआधुनिकवादी कवी, चित्रकार व इन्स्टॉलेशन रचनाकार.
Email: sanjeev.khandekar@gmail.com
Mob: 93234 69824

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *