मृगजळ

लक्ष्मीकांत देशमुख

त्या मध्यरात्री त्यांच्या घरात चार बुरखा घातलेले नक्षली शिरले होते. एकानं मोठ्यानं ‘चंद्राण्णा’ अशी हाक मारत लाथेनं दोघांच्या अंगावरचं पांघरूण काढलं व टॉर्चचा प्रकाशझोत टाकीत तो चंद्राण्णाच असल्याची खात्री करून घेत त्याच्यावर रायफलनं चार गोळ्या घातल्या. त्याच्या मर्मांतक विव्हळण्यानं व सुखदाईच्या ओरडण्यानं खुशी जागी झाली व तिनं भोकाड पसरलं. तिच्या तोंडावर हात ठेवीत तिला सुखदाईनं गप्प करत छातीशी धरलं…
*************************************************************************************************************

‘पोलिस अधिकार्‍याचा खून करून सुखदाईचं जंगलात पलायन. मांगी या नक्षली दलममध्ये पुन्हा सामील – सूत्रांची माहिती.’
दंडकारण्यातील घनदाट जंगलातील छोट्या टेकडीवजा जागेत आज मांगी दलमचा मुक्काम होता आणि झोपी जाण्यापूर्वी रेंज असेल तर मोबाईलवर ‘ई-पेपर्स’च्या बातम्या पाहायची कॉम्रेड सुखदाईची सवय होती. पोलिसांना तीन वर्षांपूर्वी शरण गेल्यावर गडचिरोलीत राहताना जडलेली सवय.
जंगलात परतल्यावर आणि पुन्हा तिच्या जुन्या मांगी दलममध्ये प्रवेश घेतल्यावरही ती कायम होती. मात्र, रोज रात्री मुक्कामाचं स्थळ सुरक्षेसाठी बदलायचे हा दलमचा कटाक्ष असल्यामुळे कधी कधी रेंज मिळायची नाही. पण, आजच्या मुक्कामाची जागा ही बस्तरच्या जवळच्या जंगलात असल्यामुळे छत्तीसगडच्या राज्य सरकारनं म्हणजे नक्षली भाषेत लुटी सरकारने विकासाच्या नावाखाली मोबाईल टॉवर्स व सडकांचं जाळं निर्माण केलं होतं. त्यामुळे सुखदाईला स्लिपिंग बॅग अनझिप करीत त्यात शिरल्यावर झोपण्यापूर्वी मोबाईल पाहता आला. आपल्या संदर्भातली ती बातमी तिनं या तीन महिन्यांत डझनभर वेळा तरी पाहिली-वाचली होती. आजही चाळा म्हणून पाहत होती. तिचं हे जिगरबाज धाडस होतं, म्हणून तर समर्पणानंतर मांगी दलात तिला थेट दुसर्‍या क्रमांकाचं स्थान परतल्यावर देण्यात आलं होतं! त्याचा एक सार्थ अभिमान तिला आजही जाणवत होता.
पण… पण त्यासाठी चंद्राण्णाच्या जीवाचं मोल द्यावं लागलं होतं, ही त्या अभिमानाला दु:खाची अशी एक गडद झालर होती.
सुखदाईनं एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि प्रथम अजाणतेपणी मग विचार व निष्ठेनं आपलंसं केलेल्या सशस्त्र क्रांतीद्वारे लोकांचे जनताना (जनता) सरकार आणण्यासाठी असे वेळोवेळी किती तरी प्राणांचे मोल द्यावे लागले होते व भविष्यात द्यावे लागणार होते. क्रांती नाही तरी मानवी रक्त व प्राण मागतेच… तेच तिचं खाद्य. पण, ‘जनताना’ सरकाररूपी प्रसाद कधी मिळणार आम्हा शोषितांना?
अलीकडे हा प्रश्‍न सुखदाईला पुन:पुन्हा पडू लागला होता. तो कुणाशी बोलून दाखवणंही दलममधील नवे सहकारी-खास करून बायका तेवढ्या निकट आल्या नसल्यामुळे शक्य नव्हतं आणि जुने सहकारी तिच्या दलममधील क्रमांक दोनच्या स्थानामुळे जरा दबूनच वागत होते. तिच्या वाढलेल्या अधिकाराचा आणि पोलिस अधिकार्‍याचा भर पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या दिवसाढवळ्या खुनाच्या धाडसामुळे निर्माण झालेला दबदब्याचा परिणाम होता. तो सुखदाई अभिमानाने भोगत होती. सहकार्‍यांच्या नजरेतील आदर झेलीत होती तृप्त होत होती. सत्तेची नशा काही औरच असते. आता तिला आतून वाटत होतं की, दलमच्या प्रमुख कमांडरपदी विराजमान व्हावं. सध्याचा मांगी दलमचा कमांडर महेंद्र बाबू आपल्या वाढत्या वयानं कंडम होत चाललाय. त्यामुळे तो दिवसही फार दूर नाही.
पण त्याची आपल्या प्रतीची अभिलाषा. त्याची अद्यापही कमी न झालेली खाज आणि मनचाहे स्त्रीला जवळ करण्याचा दलमच्या वरिष्ठांचा अलिखित नियम. त्याचं… त्याचं काय?
मोबाईलच्या फोटो गॅलरीत चाळा म्हणून सुखदाई गेली. तिथे स्टोअर केलेले मार्क्स व माओचे फोटो पाहिले. मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेल्या त्यांच्या प्रतिमेवर तिनं अतीव आदरानं ओठ टेकले. हे खरे क्रांतिदर्शी! महिलांचे मसिहा… दंडकारण्य विभागाचे प्रमुख कॉम्रेड वेणू प्रसादही तसेच आदर्श. आणि स्त्री-पुरुष समतेसाठी किती आग्रही आहेत… पण विकेंद्रित स्वरूपात विखुरलेल्या दलममध्ये काय चाललं आहे, हे त्यांना कळतंच असं नाही. मात्र ते तक्रार येताच त्याची दखल घेऊन कारवाईपण करतात. आपण तेव्हा अशीच त्यांच्यापुढे थेट तक्रार केली. पण, त्याची केवढी किंमत चुकवावी लागली नंतरच्या काही महिन्यांतच.
पण आता असं होणार नाही. मी… मी ते तसं करू देणार नाही… होऊ देणार नाही.
तिनं हाक मारताच तंबूच्या बाहेर जागता पहारा देणारा कॉम्रेड विनोद आदबीनं आत आला आणि तिचा ताठरलेला कठोर चेहरा मऊ सौम्य झाला. हा तिच्या भागातला नव्यानं सामील झालेला उच्चशिक्षित, पण दंडकारण्यातील आदिवासींच्या शोषण व पोलिस अत्याचाराविरुद्ध संताप व कळवळ्यानं सामील झालेला. बुकं वाचणारा. क्रांतीची गाणी रचणारा व बुलंद आवाजात म्हणत गावोगावी स्थानिक नक्षली सशस्त्र दलम उभारून जंगलातील नेत्यांसाठी संरक्षक भिंत उभारणारा व मदतगट उभे करण्यात कार्यरत असणारा विनोद सुखदाईला जवळचा वाटायचा. एक स्त्री म्हणून इतकं काही सुखदाईनं भोगलं होतं की, आताशी पुरुषांचं तीळमात्रही आकर्षण उरलं नव्हतं. आपण आता आपलं स्त्रित्व त्याज्य केलंय. निखळ लिंगविरहित माणूस झालो आहोत. खरे कॉम्रेड. पण, विनोदचा त्याला अपवाद का करावासा वाटतोय? त्याच्याबद्दल आपणास काय वाटतं? ममतामयी वत्सल भाव? तसंच काही असावं.
कॉम्रेड सुखदाईनं विनोदला तिनं तंबूत बोलावलं. पण, स्लिपिंग बॅगमध्ये पहुडलेली सुखदाई कसल्या तरी विचारात गर्क झाली असल्यामुळे आपल्याला त्याला काय सांगायचं हेच विसरून गेली वाटतं. आपण तंबूत आलो हे तरी तिला कळलं का? या विचारात तो लक्ष वेधून घेण्यासाठी उगाचच जरा मोठ्यानं खाकरला. तशी सुखदाई भानावर येत त्याला म्हणाली,
‘कमांडर साहेबांना आत मुळीच येऊ देऊ नकोस. समजलं?’
‘होय कॉम्रेड. पण त्यांना ते आले तर कसं अडवणार मी?’
त्याचा प्रश्‍न रास्त होता. विनोद लष्करी प्रशिक्षणासाठी अलीकडेच मांगी दलममध्ये सामील झाला होता. तो सत्तर जणांच्या दलममध्ये तसा कनिष्ठच. जरी कला मंचचा प्रमुख शाहीर असला तरी. गोर्‍यांच्या ऐवजी गेली साठ वर्षे राज्य करणार्‍या ‘काळ्यांच्या’ ‘लुटी’ भारत सरकारनं दंडकारण्याची चार राज्यांत- महाराष्ट्र, आंध्र, छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये विभागणी केली असली तरी त्यांच्या पीपल्स वॉर ग्रुपसाठी तो एकसंघ भाग होता – घनदाट जंगलाचा. सार्‍या आदिवासींच्या जगण्याचा मूलाधार. इथल्या ‘जल-जंगल-जमीन’वर त्यांचाच जन्मसिद्ध अधिकार. आधी गोर्‍या सरकारनं जंगल संपत्तीची लूट करण्यासाठी छिनावून घेतल्या, आता भारताचं ‘लुटी’ सरकार तेच काम अधिक जोमात व पोलिसांच्या दंडुका वापरून करतंय… पण या दंडकारण्यावर आम्हा आदिवासींचा अधिकार आहे. तो त्यांना परत मिळावा म्हणून तर सुखदाई किशोरवयापासून इथं परत येण्यापूर्वीची तीन वर्षे सोडली तर त्या उदात्त ध्येयासाठी पूर्ण समर्पित आहे. ती दंडकारण्याची कन्या आहे… गोंड कन्या ! पूर्वी गदरची गीतं तिला प्रेरणा द्यायची, आता विनोदची नवी आधुनिक क्रांतिगीतं. त्यामुळे विनोद समोर आला की, सुखदाईच्या मनात ती प्रेरणादायी क्रांतिगीतं रुंजी घालायची. आताही तसंच झालं होतं क्षणभर. पण, त्याच्या नेमक्या प्रश्‍नानं ती क्षणार्धात भानावर येत म्हणाली,
‘अशा वेळी कॉम्रेड महेंद्र बाबूला माझा हा असा निरोप आहे हे स्पष्टपणे सांगायचं. त्यांची नशा उतरून ते माघारी जातील…’
‘ठीक आहे कॉम्रेड. पण तरीही…’
‘ते… ते तंबूत शिरले तर काय? मी… मी पाहून घेईन काय करायचं ते.’
तिच्या शब्दाशब्दांत स्वत:बाबतचा ओतप्रोत भरलेला आत्मविश्‍वास विनोदला जाणवल्यावाचून राहिला नाही. तो तिच्याबाबत त्यामुळे आश्‍वस्त होत तंबूच्या बाहेर जाऊन खडा पहारा देऊ लागला. त्याच्यासोबत त्याच्या कलामंचचे दोन कॉम्रेड अनुसया आणि रामनाथ होते. ते दोघे अर्धवर्तुळात सायंकाळी मारलेल्यापाच-पंचवीस तंबूंवर नजर ठेवीत लष्करी शिस्तीत लेफ्टराईट करीत या टोकापासून त्या टोकापर्यंत खाड खाड जायचे. त्यांचा दोन भिन्न दिशेनं येत विरुद्ध दिशेला जाण्याचा मीटिंग पॉईंट म्हणजे कॉम्रेड महेंद्र बाबू व कॉम्रेड सुखदाईचे दोन जवळजवळ उभारलेले तंबू.
अनू व रामनाथ स्थिर पहारा देणार्‍या विनोदजवळ एकाच वेळी तो सुखदाईच्या तंबूतून येताना पाहून थांबले. अनूने त्याला गोड बोलीत विचारलं, तसा काही उत्तर न देता त्यानं सुस्कारा सोडला. तेव्हा तो उत्तर देणार नाही, हे जाणून ते दोघे परत लष्करी पद्धतीचा खाड् खाड् असा गुडघाभर उंचीच्या बुटाचा आवाज करत पांगले आणि विनोद सुखदाई व महेंद्रबाबूच्या तंबूवर नजर ठेवीत नव्यानं सुचलेले क्रांतिगीत अधिक लयदार करण्यासाठी गुणगुणत त्यातले शब्द मागे-पुढे व क्वचित काटछाट करत दुरुस्त करू लागला…
‘लाल सलाम हा लाल सलाम,
शूरवीर कॉम्रेडना लाख सलाम!
जल, जंगल, जमीन परत मिळविण्यासाठी
रक्त देणार्‍या कॉम्रेडना लाख सलाम,
लाल सलाम हा लाल सलाम!’
क्रांतिगीत मनासारखं जमत होतं. लय व चाल पण वेगळी लयपूर्ण होतेय असं विनोदला ते नवं गीत गुणगुणताना जाणवत होतं. आणि त्या नवनिर्माणशाली प्रतिभेच्या साक्षात्कारानं त्याला दिवसभर अंग मोडून चूर चूर करणारा कठोर आठ तासांच्या कडक लष्करी प्रशिक्षणामुळे झालेल्या दुखर्‍या देहाचा विसर पडला होता.
विनोद तंबूच्या बाहेर गेल्यावर सुखदाई पुन्हा अंगावर पांघरूण घेत डोळे मिटून पडली. पण, झोप येत नव्हती. अजूनही एकटेपणाची सवय झाली नव्हती. खास करून रात्री अंथरुणावर पाठ टेकली की प्रकर्षानं एकटेपणा जाणवायचा. प्रथम याच दंडकारण्यात वेणू गोपालच्या परवानगीनं लग्न केलेल्या चंद्राण्णाची रात्रीची घट्ट असोशीनं घातलेली तन-मन पुलकीत करणारी मिठी आठवायची. मग आत्मसमर्पण केल्यावर गडचिरोलीच्या सरकारनं दिलेल्या इंदिरा आवास योजनेच्या एका खोलीच्या घरातही त्याच्या सोबतच्या शृंगारात स्वर्ग अवतरायचा. त्याची परिणती म्हणजे खुशीचा झालेला जन्म! चंद्राण्णाचं प्रेम आणि खुशीमुळे लाभलेलं मातृत्व यामुळे संसार सफल झाल्यासारखा तिला वाटत होता. पण… पण ते अखेरीस मृगजळच ठरलं… काही काळ, हिशोब करायचाच झाला तर, जेमतेम साडेतीन वर्षे ते प्रत्यक्षात साकारलं असलं तरीही…!
खुशीला आपल्या म्हातार्‍या आईच्या हवाली करून परत आपण जंगलात आलो खरे, पण तिची आठवण येत नाही अशी एकही रात्र जात नाही… सुखदाईनं पुन्हा हात लांब करीत चार्जिंग लवकर संपू नये म्हणून बंद करून ठेवलेला मोबाईल पुन्हा स्वीच ऑन केला व फोटो गॅलरीतली खुशीच्या गोंडस हसर्‍या चेहर्‍याची तिनं वेळोवेळी टिपलेली छायाचित्रं पाहू लागली आणि रोजच्या प्रमाणे आजही तिच्या नकळत तिचे डोळे ओलसर झाले…
त्याची जाणीव होताच भानावर येत सुखदाईनं बोटांनी पुशीत डोळे व त्यासोबत मनही कोरडे करण्याचा प्रयत्न केला. नक्षली प्रशिक्षणात मन नियंत्रणात ठेवण्याचंही प्रशिक्षण अंतर्भूत असल्यामुळे त्याचं तंत्र वापरीत सुखदाई अशा वेळी भानावर येत पुन्हा नॉर्मल व्हायची. आजही ती झाली, पण थोडा अधिक वेळ लागला एवढंच. पण… पण इतका वेळ लागणं बरं नाही… हरघडी मृत्यू पाठलाग करीत असताना, अखंड सावधानता हा मंत्र विसरणं आणि विचारांच्या आवर्तात हरवून जाणं आपल्या उपकमांडर पदाच्या स्थानाला शोभत नाही. ती स्वत:शीच उपकमांडर पदाच्या पुन्हा झालेल्या जाणीवेनं तृप्त समाधानी हसली.
होय. आता पूर्वीसारखी मी काही साधी नक्षल सैनिक नाही. डेअरिंगबाज उपकमांडर आहे. दोन दलमचा कणा मोडणार्‍या त्या पोलिस उपअधीक्षकाचा त्याच्या कार्यालयात जाऊन आपण केलेल्या खुनामुळे हा भाग किती सेफ व संरक्षित झाला आहे… त्याला मी कारण आहे. म्हणून मला मुलीच्या आठवणीनं अश्रू ढाळणारी सामान्य बाईमाणूस होणं परवडणारं नाही… नव्हे, आता मी स्वत:ला स्त्री न समजता लिंगनिरपेक्ष माणूस समजते…. होय, मी आता निखळ माणूसच आहे.
पण… पण लष्करी शर्टामध्ये दीड वर्षाने पण दुधानं भरून येणारे तटतटणारे स्तन पाहणार्‍या पुरुष सहकार्‍यांच्या चोरट्या पण भुकेल्या नजरा सुखदाईचं स्त्रित्व पुन:पुन्हा अधोरेखित करत असतात. त्याचं काय करायचं?
अगदी किशोरवयात घरदार सोडून जंगलात मृत्यू पाठीशी घेत रोज मुक्कामाची स्थळं बदलताना भर तरुणपणात विसाव्यासाठी व नैसर्गिक भूक म्हणून साथीदार लागतील म्हणून परंपरेचं ओझं न बाळगता, आपखुशीनं स्त्री-पुरुषांनी एकत्र येण्याचा दलमनं रिवाज पाडला होता. पण, अशी उदाहरणं मोजकीच असायची. क्रांतिकारी नक्षली कॉम्रेड झाल्या तरी पीपल्स वॉर ग्रुपमधल्या दंडकारण्यातल्या बायका अजूनही स्त्रित्व जपण्यावर विश्‍वास ठेवणार्‍या होत्या… त्यामुळे एखादा आवडला व प्रेम जमलं तर लग्न करायची परवानगी विभागप्रमुख द्यायचे. पण, त्यासाठी अट असायची पुरुषांच्या नसबंदीची. स्त्रीऐवजी पुरुषांनी लग्न होण्यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याचा रिवाज सुखदाईला किती पुरोगामी व समतेचा आहे, हे समर्पणानंतर दाई म्हणून एका आरोग्य उपकेंद्रात काम करताना, केवळ स्त्रियांच्या मूल बंद करण्यासाठी होणार्‍या त्रासदायक ऑपरेशनला डॉक्टरांना मदत करताना प्रकर्षानं जाणवलं होतं. तिनं आणि डॉक्टर – नर्सनं नवरे मंडळींना कितीही समजावून सांगितलं तरी क्वचितच एखादा पुरुष नसबंदीला तयार व्हायचा. कारण रूढ असलेल्या मर्दानगीच्या खोट्या पुरुषी लिंगाभोवती फिरणार्‍या कल्पना… पण इथं हुकुमामुळे म्हणा वा स्त्रियांना आठवडाभर तरी दवाखान्यात ऑपरेशननंतर राहणं सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं असल्यामुळे दंडकारण्यात विभागप्रमुखानं पुरुषांची नसबंदी विवाहाला परवानगी देताना सक्तीची केली होती. तरीही त्यांची परंपरागत पुरुषी मानसिकता नक्षली क्रांतिकारी झाले तरी थोडीच पूर्णपणे गेली होती? त्यामुळे जंगलात आत दूरवर वावरताना आवडलेल्या सहकारी स्त्रीच्या सहमतीनं वा प्रसंगी धाक-अधिकार गाजवत संग करणार्‍या पुरुषांची संख्या अलीकडे दलममध्ये वाढत चालली होती.
अशा मानसिकतेच्या पुरुषांच्या मनात आपली मुलगीदूर असल्यामुळे व तिला स्तनपान देता येत नसल्यामुळे येणार्‍या दुधानं आपली वक्षस्थळं लटलटून शर्टातूनही ठसठशीत दिसतात आणि त्यांचे उन्नतत्व वैषयिक भावना सहकारी पुरुषांच्या मनात पेरते, हे आता स्वत:ला निखळ माणूस समजणार्‍या सुखदाईला चीड आणायचं. आपलं बाईपण ही पुरुष मंडळी का आपणास विसरू देत नाहीत? स्वत:ही विसरत नाहीत? हीच का मार्क्सच्या विचारातली व तत्त्वज्ञानातली स्त्री-पुरुष समानता म्हणायची?

7-1
कॉम्रेड वेणू प्रसाद नक्षलीचं वैचारिक प्रबोधन करीत त्यांच्याकडून मार्क्सवाद, माओवाद घटवून घेत. ते मनावर पक्क बिंबविताना किती मनापासून व तळमळीनं स्त्री-पुरुष समानतेचं व लिंगनिरपेक्ष भावाबद्दल बोलायचं. सुखदाई त्यानं भारावून जायची. तसाच चंद्राण्णाही. निदान त्या वेळी तिला तसं वाटत होतं. तो भ्रम होता, हे आत्मसमर्पणानंतर संसार थाटताना प्रत्ययास आलं होतं. जंगलात पोटासाठी स्वयंपाकाचं काम तिच्या व इतर बायकांसोबत आपणहून करणार्‍या चंद्रण्णावर विधिवत लग्न होत संसार थाटला जाताच नवरेपणाचे परंपरागत संस्कार पुन्हा हावी झाले होते. त्यामुळे तो मारला जाईपर्यंत एकदाही त्यांनं पुन्हा कधी चुकूनही भाकर्‍या थापल्या नाहीत. अपवाद फक्त आपल्या वाढदिवसाचा. त्या दिवशी तो स्वत: पकवून तिला खिलवायचा. पण, ही जाणीव देत की, हे तुझ्यावरील प्रेमामुळे करतोय. चंद्रण्णाच्या त्या प्रेमातही मालकी हक्क असायचा. खुशीच्या जन्मानंतर आपल्याला संगात रस वाटेनासा झाला होता. पण, तो वासनादग्ध झाला की बळजबरीनं भोग घ्यायचा. अशा वेळी खुशी जागी झाली तरी त्याला पर्वा नसायची. कार्यभाग उरकल्यावर पाठ वळवीत झोपी गेल्यावर टक्क उघड्या डोळ्यांनी भेदरलेल्या अवस्थेत पाहणार्‍या खुशीकडे लक्ष गेलं की, ती शरमिंदी व्हायची. खुशीच्या अबोध मनात एका नग्न देहानं दुसर्‍या नग्न देहावर घातलेल्या झडपेचा काय ठसा उमटला असेल? उद्या मोठेपणी त्याची तिला जाणीव होईल तेव्हा काय वाटेल? या विचारानं सुखदाईचं स्त्रित्व विव्हळ व्हायचं.
आताही जाणीव झाली की, आपले स्तन दुधानं तटतटले आहेत. सुखदाईला त्याची वेदना पेलवेना. जवळ खुशी कुशीमध्ये असली असती तर इवल्याशा ओठांनी स्तनांना लोचत तिनं दूध प्यायलं असतं व आपणही मोकळे ताणरहित झालो असतो… पण ….
सुखदाईची आत्मसमर्पणानंतर तीन वर्षेे गडचिरोलीत राहताना जंगलातील कठोर शरीर श्रमाची सवय गेली होती. ती परतल्यावर तीन महिने झाले तरी पुन्हा पूर्णांशानं आत्मसात झाली नव्हती. रात्री अंथरुणावर पडलं की, शरीर ठणकायचं – कोकलायचं. आजही अंग ठणकत होतं. थोडं जास्तच. कारण काय, संध्याकाळी पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागल्यामुळे मांगी दलावर हल्लाबोल केला होता. त्यापासून प्रतिकार करत व बचाव करीत रात्रभर जंगलातील घनदाट भागातून पळताना आणि आज दिवसाही पोलिसांच्या पाठलागाची भीती असल्यामुळे अखंड वीस तास अपरिचित जंगलवाटा तुडवून पोलिसांना चकवा दिला होता. त्यामुळे शरीर चूर चूर झालं होतं ! तिचा थकलेला व घामेजलेला चेहरा पाहून कमांडर महेंद्र बाबूंनी टोमणा पण मारला होता, ‘कॉम्रेड, आपल्याला सुखासीनता व शरीरमांद्य परवडणारं नाही. अखेर हे युद्ध आहे. आपलं आणि सरकारचं!’ त्याचा इशारा मातृत्वानंतर तिच्या भरलेल्या मांसलतेकडे होता. त्यामुळे सुखदाईला स्वत:च्या शारीरिक दुर्बलतेची व त्याला कारणीभूत असलेल्या किंचित स्थूल व पुष्ट झालेल्या देहाची प्रकर्षानं लाज व चीड आली होती. खरं तर दंडकारण्यात परतल्यानंतर तीन महिन्यांच्या जंगलातील कवायत, प्रशिक्षण आणि असं सुरक्षेसाठी मुक्कामाची स्थळं बदलताना होणारी पायपीट यामुळे पुन्हा ती पूर्वीची होत चालली होती. सशस्त्र क्रांतीसाठी फीट व सक्षम! पण मधल्या काळातलं लग्न, मातृत्व व स्थिर घरगुती संसार यामुळे तिच्यातला बदल या प्रक्रियेत बाधा म्हणून येत होता आणि मऊपणा देत होता…. मुख्य म्हणजे लग्न व मातृत्व मानवल्यामुळे आकर्षक व ठसठशीत झालेलं आपलं बाईपण अजून बरचसं कायम होतं. जंगलात परतल्यावर तीन महिन्यांनंतरसुद्धा! ते तिला नकोसं होतं. त्याचं ओझं वाटतं होतं. कारण सहकारी पुरुषांच्या नजरेत ते बुभुक्षित पद्धतीनं जाणवत होतं, टोचत होतं. कॉम्रेड महेंद्र बाबूंचा टोमणा जरी खरा असला तरी त्या वेळी त्याची नजर तिच्या भरलेल्या छातीवर स्थिरावली होती, हे तिला कळत होतं. आणि त्यामुळे तिच्या सहकार्‍यांच्या पुरुषी नजरेची व स्वत:च्या ठसठशीत स्त्रित्वाची घृणा वाटत होती.
आपल्याला लिंगनिरपेक्ष माणूस व्हायचं आहे. मार्क्सच्या नावानं आपलं दल समतेच्या गप्पा मारतं, पण दलमच्या पुरुषांना स्त्री-पुरुष समता व लिंगनिरपेक्ष कॉम्रेडपणा का मनापासून एवढी वर्षे झाली तरी आत्मसात होत नाही?
या प्रश्‍नाचं एकदा वेणू प्रसादांनी उत्तर दिलं होतं, ते तिला आजही चांगलं आठवतंय. ‘कॉम्रेड, जगात सर्वत्र पुरुषसत्ताक समाजरचना आहे. एकप्रकारे नवरेशाही आहे. म्हणजेच पुरुषी वर्चस्व आहे आणि स्त्रीला दुय्यम ठरविण्यासाठी जाणीवपूर्वक तिचं शरीर, तिचं मातृत्व आजवर तिला ठेचण्यासाठी व वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी वापरलं गेलं. मार्क्सवादी खरी समता मानतो. ती पूर्णपणे आत्मसात करण्याची आपल्या दलममध्ये – क्रांतीसेनेमध्ये प्रक्रिया निरंतर चालू आहे… पण मला मान्य केलं पाहिजे की, त्याची गती फार कमी आहे. पण, शोषणरहित समाजरचना आणि विकासाचं स्थानिक गरजापूर्तीचं निसर्गाशी संवाद साधत सिद्ध करणारं आपलं मॉडेल साकारताना, त्यासाठी लढा देताना, संघर्ष करताना मार्क्सला अभिप्रेत असणारी व तुझ्यासारख्या बुद्धिमान कॉम्रेडला हवी असणारी स्त्री-पुरुष समता पण नक्कीच एक दिवस आपल्या दंडकारण्यातील राज्यकारभारात आपण साकार करू, हा माझा दृढ विश्‍वास आहे.’ त्या वेळी त्यांच्या ठाम आशावादानं ती भारावून गेली होती.
पण अलीकडे आपली चळवळ प्रदूषित झाली की काय? असा प्रश्‍न सुखदाईला पडायचा. जंगलतोड करणारे ठेकेदार व परदेशी मदतीनं आलेली पैशाची सूज नक्षली साथीदारांना पदभ्रष्ट करतेय, हे स्पष्ट दिसत होतं. दलममध्येही सत्ता संघर्ष, भ्रष्टाचार, वर्चस्व गाजविणं आणि स्त्री साथीदाराला भोगवस्तू या पलीकडं न मानणं हे वाढत चाललंय. सुखदाईला दलममध्ये परतल्यापासून प्रकर्षानं हे जाणवू लागलं होतं. कारण बाहेर नागरी वस्तीत गडचिरोलीमध्ये संसार करताना आणि दाई म्हणून आरोग्य उपकेंद्रात काम करताना वर्तमानपत्रं व टीव्हीवर नक्षली अत्याचार, निर्घृणतेने पोलिस व निष्पाप माणसांचे केलेले खून, स्त्रीवरील बलात्कार, व्यापारी अधिकार्‍यांकडून बंदुकीची नळी मानेवर ठेवून होणार्‍या खंडणी वसुलीच्या बातम्या कानावर पडायच्या, वाचनात यायच्या. इतर दलमच्या समर्पण केलेल्यांची आत्मकथनंही भडकपणे वृत्तपत्रांत छापली जायची. सुखदाई व चंद्राण्णा त्यावर अनेक वेळा भोजनोत्तर चर्चा करायचे आणि त्यांचं जवळपास एकमत व्हायचं की, या बातम्यांत सत्यांश मोठ्या प्रमाणात आहे. मूळची ध्येयधुंद क्रांती प्रेरीत चळवळीचं आता सत्तांध लुटारू टोळीत रूपांतर झालं आहे. पण, चंद्राण्णा हेही म्हणायचा की, सरकारी यंत्रणाही तेवढीच क्रूर व मदांध आहे. त्याचं शोषणही भयानक आहे. तिला मात्र तेव्हा ते पटायचं नाही. कारण ज्या उपकेंद्रात तिला सरकारनं दाई म्हणून नोकरी दिली होती, तिथले वडीलधार्‍या व्यक्तिमत्त्वाचे कनवाळू डॉक्टर तिला मुलीसारखं कामात चुकलं तरी सांभाळून घ्यायचे. त्यांनीच चंद्रण्णाची ‘रिव्हर्स व्हॅसेक्टोमी’ शस्त्रक्रिया करून त्यांना आई-बाप केलं होतं ! पण…
सुखदाई अवस्थपणे कुस बदलत होती आणि मनात आठवणीची गर्दी झाली होती. आपलं आजवरचं जीवन तिच्या नजरेसमोरून चलचित्राप्रमाणे तरळून जात होतं! बस्तर तिचं आजोळ. बापाच्या मृत्यूनंतर आई गडचिरोली भाग सोडून भावाच्या आसर्‍याला आली होती. मामानं तिला शाळेत आग्रहानं घातलं होतं आणि सुखदाईलाही अक्षरांचा लळा व पाटी-पेन्सिलीचं प्रेम जडलं होतं. ती मॅट्रिक पास झाली होती. पुढे शिकायचं होतं, पण जवळपास कॉलेज नसल्यामुळं तिचं शिक्षण बंद झालं होतं. त्यामुळे ती आई-मामासोबत शेतावर कामाला जायची.
त्या भागात स्टील कारखाना येणार होता. त्यासाठी सरकारी अधिकारी शेतकर्‍यांना जमिनी देण्यासाठी जोरजबदरस्ती करत होते. गावच्या मुखियाला त्यांनी पैसे देऊन फितविले होतं. त्यानं गावचं दोनशे एकर जंगल स्टील कारखान्यासाठी देण्यास ग्रामपंचायतीची व ग्रामसभेचीपण मान्यता आहे, असा गावकर्‍यांना अंधारात ठेवून अशिक्षित ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या कोर्‍या कागदावर घेऊन त्यावर हा ठराव लिहिला. जेव्हा हे गावकर्‍यांना समजलं तेव्हा असंतोषाचा एकच भडका उडाला होता आणि गावात सर्वत्र ग्रामपंचायत इमारतीसह अनेक घरांच्या भिंतीवर एके सकाळी ‘नक्षली आवो, गाव, जंगल, जमीन बचाओ’ अशा मजकुराची पोस्टर्स लागली.
सुखदाईला नक्षली प्रभावाची ती पंधराव्या वर्षी झालेली पहिली ठळक जाणीव होती. तिनं मग शाळेच्या मास्तरांना त्या वेळी विचारलं. तेव्हा त्यांनी नक्षली हे आदिवासींचे कसे तारणहार व जुलमी जमीनदार, भ्रष्ट अधिकार्‍यांचे कर्दनकाळ आहेत हे सांगितले. ‘बेटी, मला माहीत नाही ही पोस्टर्स कुणी लावली ती. पण खरंच आपलं जंगल व शेतजमिनी वाचवायची असतील तर नक्षल्यांनी इथं आलंच पाहिजे…!
आणि एक दिवस गावाच्या मुखियाला नक्षल्यांनी हल्ला करून समोरून गोळी घालीत ठार केलं व सरकारी अधिकार्‍यांना संदेश दिला की, गावची जमीन आणि जंगल स्टील कारखान्याला द्यायचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही उडवलं जाईल…
बालपणापासून शाळेव्यतिरिक्त आई-मामासोबत जवळच्या जंगलात जाऊन लाकूडफाटा आणणं, मध व रानफळं गोळा करणं, तेंदू पत्ते वेचणं यामुळे तेथील वृक्ष-वेली व प्राणी संपदेशी तिचं एक अतूट नातं जडलं होतं. त्यामुळे जंगल व जमीन हिरावून तेथे कारखाना उभारणं तिलाही पटत नव्हतं. त्यामुळे नक्षलींचं हे धाडस तिला प्रभावित करून गेलं होतं.
आणि एके दिवशी नक्षलींच्या चेतना नाट्यमंचाची संगीत टोळी गावात आली. त्यांनी सादर केलेली क्रांतिगीतं व गाण्याच्या जोडीनं आदिवासींचे अधिकार आणि शासनाच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगत प्रेक्षकांच्या मनात क्रांतीचं आकर्षण पेरलं… सुखदाई मंत्रमुग्ध झाली होती. चेतना नाट्यमंचाबरोबर ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लष्करी बनावटीचा ड्रेस घातलेले दोन पुरुष व दोन स्त्रिया बंदुका रोखून कार्यक्रम स्थळी रक्षणासाठी उभे होते. सुखदाई त्या दोन नक्षली तरुणींकडे भारावून जात विस्फारलेल्या नेत्रानं पाहत होती. एका तरुणीनं तिला त्या अवस्थेत पाहून इशार्‍यानं जवळ बोलावलं. किशोर सुलभतेनं तिनं त्या तरुणीची बंदूक हाताळत विचारलं, ‘तूही कुणाला मारलं आहेस?’ तेव्हा ती हसत म्हणाली, ‘होय, सरकारी दमन यंत्रणेला फक्त बंदुकीची भाषा कळते.’ सुखदाई मग अधिकच प्रभावित होत म्हणाली, ‘मला… मला तुमच्यासोबत काम करायला मिळेल?’ तिला त्या तरुणीने कारण विचारलं. तेव्हा सुखदाई गंभीर होत म्हणाली, ‘दीदी, ती फार मोठी कहाणी आहे. तिकडं गडचिरोलीत माझ्या बापाची शेतजमीन रस्त्यात गेली. पण, एक पैसादेखील मोबदला मिळाला नाही. कारण काय तर सात-बारावर आमचं नाव नव्हतं. पणजोबाचं नाव होतं… बाप ठार अशिक्षित होता. त्याला लिखापढी कळायची नाही. म्हणून का आमची जमीन छिनून घ्यायची? मला त्या पटवार्‍याला गोळी घालायची आहे…!’
आणि त्या रात्रीच ती नक्षली गटासोबत जंगलात आईच्या रडण्याकडे दुर्लक्ष करीत आणि तिच्या ममतेचे पाश तोडीत निघून गेली. लष्करी शिक्षण पूर्ण होताच तिनं एका चकमकीत नेमकेपणानं तिच्या बापाची जमीन छिनावणार्‍या पटवार्‍याला उडवलं. तिच्या या पराक्रमामुळं ती दलममध्ये एक पायरी वर चढली… आणि उपकमांडर कॉम्रेड माधवच्या नजरेत भरली…
सुखदाई एकदम स्प्रिंगप्रमाणे उसळत उठून उभी राहिली आणि तंबूचा पडदा बाजूला सारत बाहेर पाहिलं. बाहेर आकाशात लक्षावधी चांदण्या उगवल्या असल्यामुळे किर्रर्र जंगलातला अंधारही फिकट उजळत होता आणि एका बाजावर विनोद उताण्या हाताची उशी करून वर आकाशात पाहत पहुडला होता. सुखदाई क्षणभर बाहेर पाहत विमनस्क थांबली व पुन्हा आत आली.
तिचं नीट्स रूप आणि तारुण्यानं फुलत चाललेला देह पाहून माधव तिच्याशी वेळोवेळी सलगी करायचा प्रयत्न करू लागला. वय कोवळं असलं तरीही तिचं उपजत स्त्रित्व तिला सावधतेचा इशारा देत होतं. पण, माधव लोचटाप्रमाणे तिच्यामागे लागला होता. तेव्हा धाडस करून दंडकारण्य प्रमुखाकडे तिनं त्यांच्या मांगी दलाचं प्रशिक्षण व लढ्याची तयारी कितपत झाली आहे, हे पाहण्यासाठी ते आले असताना माधवची तक्रार केली. तेव्हा स्त्री कैवारी वेणू प्रसादनी माधवची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानं त्यांच्या आज्ञेवरून सुखदाईची माफीपण मागितली. पण, वेणू प्रसाद परत गेल्यावर एके रात्री तिच्यावर पाळत ठेवत भल्या पहाटे ती प्रातर्विधीसाठी दूर डोंगराआड गेली असता, तिथं तिला गाठून माधवनं तिला शिव्यांची लाखोली वाहत तिच्यावर चक्क बलात्कार केला. पुरुषाचा पहिला निकट संबंध हा असा अघोरी, किळसवाण्या पद्धतीनं आला होता की, सुखदाई त्या अनुभवानं मिटून गेली.
पण तिला सावरलं ते तिच्यासोबत तिच्या मामाच्या नात्यातल्या व तिच्या सोबतच दलममध्ये भरती झालेल्या चंद्रकांतनं. पुढे ओळख लपविण्यासाठी तेलगू बोलत त्यानं चंद्राण्णा हे नाव सुरक्षेसाठी धारण केलं होतं. त्याला माधवनं तिच्यावर केलेल्या बलात्काराचं कळलं होतं. तिला धीर व हिंमत देत तो पुन्हा वेणू प्रसादकडे घेऊन गेला. तिनं घडलेला प्रकार सांगितला, तसं वेणू प्रसादनी माधवला दलातून बडतर्फ केले आणि खबर्‍यामार्फत पोलिसांना सूचना देऊन तो मारला जाईल याची पण काळजी घेतली… तिला वेणू प्रसाद आभाळाएवढे मोठे वाटले होते त्या वेळी.
सुखदाईच्या मनातला सल बराच कमी झाला होता आणि चंद्राण्णा तिच्याशी पूर्वीच्याच सहजतेनं व प्रेमानं वागत होता. मग त्यांनी परस्परांशी विवाह करायचा निर्णय घेतला. वेणू प्रसादांनी आशीर्वादासह संमती दिली आणि त्यांच्या दलममधला दररोजच्या भटकंतीसह विंचवाचा संसार सुरू झाला.
तिच्या मनात काही महिन्यांतच शांत व स्थिर संसाराची स्वप्नं जागृत झाली. पण, चंद्राण्णा परत नागरी जीवनात जायला नाही म्हणायचा. कारण सशस्त्र क्रांतीनं दंडकारण्यातलं आपलं जनता सरकार आणायचं व आदिवासींना सुखी करायचं, हे त्याचं ध्येय बनलं होतं आणि त्यावर तो ठाम होता. तिचंही ते स्वप्न होतं, पण तरीही आता तिला संसार सुख हवंसं होतं, आईही व्हायचं होतं… इथं काम करत जंगलात ते शक्य नव्हतं.
पोलिसांनी दलमवर हल्ला चढवून चौघांना मारलं. तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी व त्यांच्याजवळील शस्त्रसाठा व दारूगोळा लुटण्यासाठी रायपूरहून बस्तरला जाणार्‍या दोन पोलिस व्हॅनवर दलमच्या शंभरजणांनी हल्ला करून सतरा पोलिसांना कंठस्नान घेतलं व दारूगोळा आणि हत्यारं हस्तगत करून जंगलात परत सुखरूप जाण्यात यश मिळावलं. या हल्ल्यात सुखदाई आणि चंद्राण्णा दोघेही सामील होते. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात त्यांचा एक सहकारी वर्मी गोळी लागून ठार झाला होता व सुखदाईलापण दंडाला निसटती गोळी लागून जखम झाली होती. तेव्हा चंद्राण्णानं तिला पाठीवर घेत जंगलात दलममध्ये सुखरूप आणली होती. पण, हाच प्रसंग चंद्राण्णाचं मतपरिवर्तन व्हायला कारणीभूत ठरला.
‘कॉम्रेड सुखदाई…’ तो तिला लग्न झालं तरी ‘कॉम्रेड’च म्हणायचा. ‘तुला गोळी लागलेली पाहून व विव्हळताना ऐकून क्षणभर वाटलं, तू जर मेलीस तर माझं कसं होणार? आणि जाणीव झाली की, तुझ्यावाचून मी राहूच शकत नाही.’ आणि काहीसा निश्‍चय झाल्याप्रमाणे विचारपूर्वक गंभीर स्वरात तो पुढे म्हणाला, ‘मला तुझं आता पटलंय. आपण संधी साधून पळायचं आणि महाराष्ट्र पोलिसांना शरण जात आत्मसमर्पण करायचं व शांत सुखाचा संसार करायचा…’
…आणि सुखदाईच्या बंद डोळ्यांसमोर तलवार कट मिशी राखणार्‍या सावळ्या व हसर्‍या चंद्राण्णाचा चेहरा साकारला… तिच्या ओठावर एक मंद स्मित झळकलं.
आणि मग दुसरा त्याचा मर्मांतक विव्हळणारा रक्तबंबाळ चेहरा नजरेसमोर आला आणि त्याचं आर्त आक्रंदन… ‘माझ्या जुन्या सहकार्‍यानं डाव साधला. ते सरेंडर नक्षलींना कधीच माफ करत नाहीत. हे… हे मी संसार करताना विसरलो होतो…!’
त्या मध्यरात्री त्यांच्या घरात चार बुरखा घातलेले नक्षली शिरले होते. एकानं मोठ्यानं ‘चंद्राण्णा’ अशी हाक मारत लाथेनं दोघांच्या अंगावरचं पांघरूण काढलं व टॉर्चचा प्रकाशझोत टाकीत तो चंद्राण्णाच असल्याची खात्री करून घेत त्याच्यावर रायफलनं चार गोळ्या घातल्या. त्याच्या मर्मांतक विव्हळण्यानं व सुखदाईच्या ओरडण्यानं खुशी जागी झाली व तिनं भोकाड पसरलं. तिच्या तोंडावर हात ठेवीत तिला सुखदाईनं गप्प करत छातीशी धरलं. तिच्यावर रोखलेली बंदूक दुसर्‍या बुरखेवाल्यानं हातानं बाजूरा करत म्हटलं, ‘तिला सोड. छोटी पोर आहे तिची…’ हा… हा आवाज तिला ओळखीचा वाटला. तो नक्कीच कमलाक्काचा असणार, जिनं तिच्या लग्नात तिला सजवलं होतं व तिची बहीण म्हणून चंद्राण्णाचा कानही पिळला होता. पण, आज समर्पण केलेल्या पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांना जिवंत ठेवायचं नाही या दलमच्या शिरस्त्याप्रमाणे चंद्राण्णाला कमलाक्कासह चारजण मारायला आले होते. सुखदाईला पण उडविण्याचा दुसर्‍या सहकार्‍याचा इरादा होता, पण ऐनवेळी कमलाक्कानं त्याला रोखलं व तिच्याकडे एक जळजळता कटाक्ष टाकीत ते चौघे निघून गेले… त्या वेळी आपणही खुशीसह मारले गेलो असतो तर…
…सुखदाईला आताही मनात नव्यानं उमटलेला तो विचार असह्य झाला. तिनं स्वत:च्या थोबाडात चापटी मारत म्हटलं, ‘मी… मी आई आहे का वैरी आहे या पोरीची?’
पण खुशीचं आता भवितव्य काय राहणार आहे? आपण जंगलात परतलो आहोत. पुन्हा माघारी जाणं शक्य नाही. ते परतीचे दोर आपणच आपल्या हातानं कापून टाकले आहेत. पुन्हा आयुष्यात खुशीची भेट होईल का, हाही प्रश्‍नच आहे. वेणू प्रसादच्या स्वप्नातला आणि आशावादातला दंडकारण्याचा स्वतंत्र ‘जनताना’ देश साकार झाला तरच आपल्या जीवनात कदाचित खुशीला तिथं आणता येईल… पण भारत सरकारच्या निर्घृण, एकेकाला वेचून मारण्याच्या मोहिमेनं दलममागून दलम खलत होत आहेत, आपली शक्ती कमी होतेय… कितीही लढा दिला तरी, पोलिसांच्या प्रचंड ताकदीपुढे पीपल्स वॉर ग्रुप कमी पडतोय… देशाचं एवढं मोठं पोलिस दल व त्यांची अफाट शस्त्रं आणि ताकद असतानासुद्धा आपण चिवटपणे लढत आहोत, तग धरून आहोत हेेही तितकंच खरंय. पण… पण आपल्या कल्पेनतलं स्वतंत्र असं आदिवासींची सत्ता असणारं दंडकारण्याचं आपलं जनता राज्य साकार होईल का? तिला त्याची शक्यता कितीही आशावादी विचार केला तरी जाणवत नव्हती.
तरीही ज्याबाबत आपला वैचारिक भ्रमनिरास झाला आहे व ज्यांनी दलममध्ये माझ्याप्रमाणे अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण केलं आहे व आपल्या नवर्‍याला झोपेतून जागं करून आपल्या घरात आपल्या नजरेसमोर मारलं, त्याच दलात आपल्याला परत यावं लागलं… ही बाब किती विदारक आहे! दलमपेक्षाही शासन जास्त दमन करणारं व स्त्रियांचं शोषण करणारं आहे, हे पुन:पुन्हा प्रसंगाप्रसंगानं सिद्ध झालं आहे. दलममध्ये अजूनही कमी झाला असला तरी ध्येयवाद कायम आहे आणि शोषणरहित समाजाचं व आदिवासींच्या पूर्ण रक्षणाचं स्वप्न व धडपड बरीचशी जिवंत आहे. त्या तुलनेत देशात व राज्यात सरकारनामक यंत्रणेचं दमन व शोषण अधिक भयानक आहे आणि तिथं वेणू प्रसादांनी माधवबाबत जसा झटपट न्याय दिला, तसा झटपट न्याय नागरी जीवनात कोर्टाद्वारे एक तर मिळत नाही, मिळविण्यासाठी पुन्हा बराच पैसा व वेळ लागतो. पुन्हा आरोपीला शिक्षा झाली तरी तो तुरुंगात जाईलच ही खात्री नाही…
आपल्याला खरा न्याय ही शासनयंत्रणा थोडीच देणार होती? ‘छट् ! ते – ते केवळ अशक्य आहे…’
चंद्राण्णाला शरणागती पत्करल्यावर गृहमंत्र्यांनी जाहीर करूनही पोलिस दलात काही शेवटपर्यंत सरकारी बाबूंनी नोकरी दिली नव्हती. ती दिली असती तर त्यांना पोलिस कॉलनीतील सरकारी घरात राहता आलं असतं आणि तिथं नक्षली येऊन त्याला मारू शकले नसते…
चंद्राण्णाच्या मृत्यूला पोलिस दलच जबाबदार आहे. आपण त्या पोलिस अधिकार्‍याला संतापानं बेभान होत, पुन:पुन्हा आक्रंदत विचारत होतो, ‘मंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा कॉम्रेड चंद्राण्णाला नोकरी का दिली नाही तुम्ही? नाही तर तो मेला नसता…!’
एक पूर्वाश्रमीची नक्षली स्त्री आपल्याला बेडरपणे जाब विचारते, यानंच त्या पोलिस अधिकार्‍याचं पित्त खवळलं होतं. आणि तिचा विवाह व मातृत्व मानवल्यामुळे भरलेला देह पाहून तिला कसा धडा शिकवावा याचे विकृत विचार त्याच्या मनात त्याक्षणी शिजले होते.
मग एके संध्याकाळी तिला आपल्या कार्यालयात बोलवून दार बंद करून कोचात खुशीला ढकलून तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष करीत तिचे कपडे पाशवी बळानं फाडत तिच्यावर अपमानाचा सूड उगवण्यासाठी चाबकानं नग्न पाठ व नितंबांवर फटके मारीत असुरी बलात्कार केला… आणि तृप्त होत कुत्सित हसत व मिशीला पिळ देत फक्त पँटवर खुर्चीत बसून तिचा चोळामोळा केलेला देह तो पाहत राहिला…
काही वेळानं असलं-नसलेलं बळ गोळा करीत ती उठली व फाटलेले कपडे लज्जा रक्षणासाठी अंगावर चढवले. एव्हाना खुशी रडून रडून निपचित होत झोपी गेली होती. तिला कुशीत घेण्यासाठी ती वाकली आणि अंगातून एक तीव्र्र वेदनेची कळ उठली व ती विव्हळली. ‘ओरड. खुशाल ओरड साली. माझा अपमान करतेस… मला तुझ्या त्या शरण आलेल्या नवर्‍याला नोकरी का दिली नाही म्हणून नाक वर करीत जाब विचारतेस? या… या पोलिस अधिकार्‍याला? आता बोल.’
कानात जणू तप्त शिशाचा रस ओतावा, तसे ते विखारी उद्गार शिरले आणि सुखदाई विद्युत वेगानं खुशीला न उचलता मागे वळत त्या पोलिस अधिकार्‍यासमोर येऊन थांबली. तिच्या डोळ्यांत संतापाबरोबर रक्तही भरून आलं होतं. एवढे ते दोन डोळे गुंजासारखे लालबुंद झाले होते. त्याला खाऊ की गिळू की आणखी काय करू, असा तिचा अविर्भाव होता. तिच्या त्या प्रतिक्रियेनं तो पोलिस अधिकारी अवाक झाला होता. मनोमन काहीसा भेदरलाही होता. हिनं आरडाओरडा करून जमाव गोळा केला तर… तर असा विचार करीत तो खाली पडलेला शर्ट घेण्यासाठी गुडघ्यावर बसला.
तेवढ्यात सुखदाईचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या त्याच्या पिस्तुलाकडे गेलं. तिच्या अंगात आता नक्षली सैनिक संचारला होता… तिनं झडप घालून ते पिस्तुल उचललं आणि ट्रिगरवर बोट ठेवलं.
तो पोलिस अधिकारी आपला खाकी शर्ट घेत उठला आणि तिच्या हातातलं ट्रिगरवर बोट ठेवलेलं पिस्तुल पाहून भयचकीत झाला. त्याला आठवलं की, सुखदाईनं नक्षली असताना, सशस्त्र हल्ल्यात अनेकदा भाग घेतला होता… तिला पिस्तुल चालवायचं चांगलंच ज्ञान आहे आणि या क्षणी तिच्या डोळ्यांत अंगार पेटलेला आहे.
‘भाड्या, थूत तुझी…! फसवून बळजबरी करणं हीच का तुझी मर्दानगी? असा कसा रे तू शेंदाड शिपाई? मर आता.’ असं म्हणून तिनं पिस्तुलात असलेल्या सहाच्या सहा गोळ्या त्याच्या कपाळ, छाती, दोन्ही दंड, पोट आणि नाकावर अचूक नेम करीत झाडल्या… पहिल्या गोळीच्या व त्याच्या विव्हळण्याच्या हाकेनं पोलिस स्टेशनमध्ये आणि आसपास असलेले पोलिस व नागरिक जमा झाले होते आणि स्तंभित होत पाहत होते. गोळ्या संपल्यानंतर भानावर येत तिनं खुशीला उचलत भिंतीवर टांगलेली लोडेड गन घेतली व ‘खबरदार माझ्या वाट्याला आलात तर..!’ असं धमकावत बाहेर पडली आणि पळत गावात आईच्या घरी गेली. खुशीला तिच्या स्वाधीन केलं आणि जंगलात परतत मांगी दलममध्ये सामील झाली.
…काही क्षणात तिच्या मनामध्ये हे सारे प्रसंग विद्युत वेगानं साकार झाले होते. किती वेळ तरी ती सुन्न मनस्क अवस्थेत स्लिपिंग बेडवर बसून होती. त्या बलात्काराच्या आठवणीनं मनोमन त्यावेळी उद्ध्वस्त झालेली स्थिती सुखदाईला पुन्हा उदास करून गेली होती. पहिल्या दलममधील कॉम्रेड माधवनी केलेल्या बलात्काराच्या उद्ध्वस्ततेमधून सावरायला तेव्हा चंद्राण्णा पुढे आला होता. पण, आता या दुसर्‍या बलात्काराचं कसं परिमार्जन करायचं?
उपकमांडर पद… मग मागे-पुढे कमांडर पद यामुळे? छट् स्त्रीला गुलाम समजत मालकी हक्कानं बळजबरी करायच्या पुरुषी मानसिकतेचं काय? मार्क्सचं नाव घेणार्‍या नक्षल गटातही ती आहे व बाहेर दमनकारी शासन यंत्रणेत तर आहेच आहे. कुठल्याही स्त्रीला खरंखुरं समतेचं जीवन व सामाजिक स्थान कधी मिळणारच नाही का? आणि त्याच वेळी कुणीतरी तंबूत विनोदला, ‘डोंट स्टॉप मी पिग!’ असं म्हणत शिरल्याची सुखदाईला जाणीव झाली. तिनं समोर पाहिलं तर नशेत तर्रर्र कॉम्रेड महेंद्र बाबू उभा होता.
‘मला किती दिवस अशी झुलवणार आहेस कॉम्रेड सुखदाई? दलममध्ये आता फ्री सेक्स आता आम आहे… मला तू आवडतेस…आज मला तू फार फार हवी आहेस आणि मी आता काहीही केलं तरी परत जाणार नाही… अंडरस्टँड?’
आणि पुन्हा तेच घडलं… तंबूबाहेर विनोद सुन्न होऊन तिचं आक्रंदन ऐकत होता… तिला स्लिपिंग बेडवर टाकून महेंद्र बाबू उठला आणि अंगावर पँट चढवू लागला… तेवढ्यात सुखदाई भानावर आली आणि एका झटक्यात उठत तिनं त्याच्या पँटला खोचलेलं रिव्हॉल्व्हर खेचून घेतलं आणि त्याला शिव्याशाप देत त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. तो भेसूर ओरडत खाली जमिनीवर कोसळला.
विनोद आत शिरला तेव्हा, हातात रिव्हॉल्व्हर घेतलेली व मृत पडलेल्या महेंद्र बाबूवर दातओठ खात, थुंकत उभी असलेली सुखदाई दिसली. ती पूर्ण नग्न होती आणि तिच्या शरीरावर अत्याचार्‍याच्या अनेक पुरुषी जखमा दिसत होत्या. विनोदने डोळे मिटून घेतले.
तिचं त्याच्या विदीर्ण सुस्कार्‍याच्या हलक्या आवाजामुळे लक्ष गेलं. विनोदला समोर उभं पाहून तिचं बळ ओसरलं. ती स्फुंदू लागली व थरथरत्या स्वरात बोलू लागली,
‘डोळे उघड कॉम्रेड विनोद. पहा, माओ व मार्क्सचं नाव उठता-बसता घेणार्‍या दलममधल्या पुरुषी वासनेनं माणूसपण नाकारलेल्या एका बाईचं जिवंत कलेवर पाहा… काय सांगू तुला पोरा. अरे, त्या…. त्या मेलेल्याला कॉम्रेड म्हणायची मला शरम वाटते. त्यानं माझ्या खुशीसाठी… माझ्या मुलीसाठी साठवलेले थानातले दूधही आसुरीपणानं गाईची धार काढावी तसे पिळून काढले रे…! इथं येण्यापूर्वी तेच ते काम तिथल्या सरकारी पोलिस अधिकार्‍यानंही केलं होतं. इथं एक वेणू प्रसाद आहेत, स्त्री जातीचे मसिहा… तिथं तर कोणी… कोणी नाही. असंच का बाईला बळी पडावं लागणार आहे हमेशा? आपल्या स्वप्नातल्या, ध्येयातल्या समतेच्या दंडकारण्यातही ज्यासाठी गदर व तू क्रांतिगीतं लिहिता, बाईला मादी-भोगवादी म्हणूनच पाहिलं जाणार असेल तर… तर मला जगायचंच नाही एक क्षणभरही…’ आणि सुखदाईनं ते रिव्हॉल्व्हर आपल्या कानावर टेकवलं. ‘थांबा कॉम्रेड सुखदाई’ असं म्हणत विनोद वेगाने पुढे आला, पण तोवर ट्रिगर दाबला गेला होता आणि क्षणार्धात विव्हळत सुखदाई कोसळली होती. विनोदनं तिला जमिनीवर पडू न देता बाहूत घेतलं व गदगद स्वरात म्हणाला, ‘का… का हे केलंत तुम्ही कॉम्रेड?’
सुखदाई किंचित वेदनामय हसत पुटपुटली, ‘मार्क्सबाबा, तुमचं समतेचं स्वप्न कधीच का हो नाही साकार होणार?’
आणि विनोदच्या बाहुत तिनं अखेरचं श्‍वास सोडला. तो थरथरत्या स्वरात आर्त होत पुटपुटला, ‘कसा करू मी लाल सलाम तुम्हाला कॉम्रेड? आमचं पुरुषपण गळल्याखेरीज तुम्हा स्त्रियांना इथं दलममध्ये आणि बाहेरही समता नाही मिळणार कधीच!’ तरीही म्हणतो, ‘कॉम्रेड सुखदाई… लाल सलाम!’
*************************************************************************************************************

लक्ष्मीकांत देशमुख
दोन दशकांहून अधिक काळ लेखन क्षेत्रात मुशाफिरी. वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित. सामान्य माणसाची जगण्याची लढाई आणि मूल्यसंघर्ष हा लेखनाचा केंद्रबिंदू आहे. भारतीय प्रशासन सेवेत असताना ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली आहे.
Email: laxmikant05@yahoo.co.in
Mob: 93252 97509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *