राऊंड द वर्ल्ड

संदीपा आणि चेतन
एका मराठी तरुणाची जग प्रदक्षिणा…
मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातलं एक मराठी दाम्पत्य. स्वत:चं मुंबईतील घर विकून पैसे उभे केले आणि या ध्यासापोटी चांगली नोकरीही सोडली. त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं जगप्रवासाला जायचं. मग खुणावू लागला नवा प्रदेश, नव्या वाटा, या भटकंतीतून त्यांना आलेला थरारक अनुभव, माणसं, प्रदेश, तिथल्या चालीरिती अशा असंख्य अनुभवांची ही रोमांचकारी सफर…
– संदीपा आणि चेतन

*************************************************************************************************************

माणूस प्रवासाला का निघतो? घरात बसून त्याचं सगळं उत्तम चाललेलं असतं की! गावात लोक ओळखत असतात, मान देत असतात. मित्रमंडळी, नातेवाईक जात-येत असतात. तरीही एका क्षणी माणूस उठतो आणि म्हणतो मी अमुक ठिकाणी जाणार. ह्याचं कारण त्याला जगाविषयी कुतूहल असतं. त्याला ह्या पृथ्वीवर किती वेगवेगळा निसर्ग आणि माणसं राहतात हे पाहायचं असतं. माणसं गोरी, काळी, लाल आणि पिवळी! त्यांनी उभारलेलं विश्‍व, त्यांचं जगणं; आणि निसर्ग, कधी दयाळू, उदार तर कधी रौद्र भीषण, बेदरकार! माणसाला सगळं जवळून बघायचं असतं. हे करताना तो हळूच तुलना करायला लागतो. अरे हे तर आपल्यासारखं आहे, हे आपल्याहून छान आहे, सोयीचं आहे किंवा हे तर फार वाईट आहे. ह्या प्रचंड कुतूहलातून, कुठे काय गमतीचं जगणं ंआहे, वारा, ऊन, पाऊस कसे दिसतात ह्यातून हा प्रवासाचा छंद सुरू होतो. आमचा हा छंद बघता बघता कधी आमचं जगणं होऊन गेला हे कळलंच नाही. आम्ही शहर मुंबईचे चाकरमाने. म्हणजे आधी होतो! आता नाही. एका प्रचंड वेडानं आम्हाला झपाटून टाकलं. नवीन वाटा, नवीन प्रदेश आणि एका अनोख्या अनुभवाचं वेड. आम्ही प्रवासी झालो ते कायमचेच. त्याचीही कथा.
मी चेतन, जाहिरात-डिझाईन क्षेत्रातला तर संदीपा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर. घरात कशालाही कमी नाही. सुखवस्तू. आम्ही जेव्हा लग्नाआधी भेटलो तेव्हा गप्पांतून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. आम्हा दोघांनाही निसर्गाची ओढ होती. माणसानं फावल्या वेळात जाऊन काहीतरी करावं. झरे बघावेत, तारे बघावेत, फुलं पाहावीत. अगदी गेला बाजार रस्त्यावरून जाणारी मुलं पाहावीत, पण घरात बसून आता काय करायचं असं एकमेकांकडे बघत राहू नये! त्यातून नात्यात बर्फ साठत जातं. झालं! ह्यावर एकमत झाल्यावर लग्न करून टाकलं! लग्न झाल्यावर आमची भटकंती प्रचलित आणि अप्रचलित ठिकाणी सुरू झाली. नोकरीच्या वेळा सांभाळून दर शनिवार आणि रविवार असे आम्ही बाहेर पडायला लागलो.मुंबईपासून जवळच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी किंवा जास्तीची सुट्टी काढून लांबचा पल्ला गाठायला लागलो. आम्हाला ह्यात मजा येत होती पण फिरण्याची भूक वाढत होती. घरी परत आल्यावर वाटायचं की अजून जायला पाहिजे होतं. ह्याचं कारण होतं इंटरनेट!

3-round-1
ज्या ठिकाणी चाललो आहोत त्याविषयी माहिती गोळा करताना आपुल्या जातीचे अजून कोण आहेत हे आम्ही नेटवर शोधू लागलो आणि थक्क झालो. सहा महिने, वर्ष, दोन वर्षं अशी मॅरेथॉन प्रवास करणारी अनेक मंडळी आम्हाला नेटवर भेटली. संपूर्ण जगभर ती फिरत होती. त्यातले काही भारतीय आणि बरेचसे परदेशी पाहुणे होते. आपले हे भन्नाट प्रवास ते ींीर्रींशश्रिेव.लेा ह्या संकेतस्थळावर मांडत होते आणि आम्ही ते वाचून अजूनच पेटत होतो!
तरीही मनात एक मध्यमवर्गी विचार डोकावायचाच. बरं भागतंय यांचं. नोकरी, पैसे, संसाराचे ताप; काही नको. मनासारखं फिरावं, फोटो काढावे, लिखाण करावं, एक निर्भेळ आनंद. मग लक्षात आलं त्यांना त्यांच्या कॉर्पोरेट संस्कृतीत सॅबॅटिकल लीव्हचा पर्याय आहे. (सलग दोन महिने ते एक वर्ष आपल्या आवडीच्या कार्यक्रमासाठी नोकरीतून घेतलेली सुट्टी) आम्ही मात्र मुकाट्यानं दोन-तीन दिवस, फार तर आठवडा फिरायचं आणि दुधाची तहान ताकावर भागवायची. नाहीतर नोकरी सोडायची!… ते कसं जमायचं… असो… ह्या टोचणीला उतारा म्हणून आम्ही दोन वर्षांच्या प्रवासाच्या कथा ह्या संकेतस्थळावर लिहायला सुरुवात केली. जिकडे जाऊन आलो त्याचे फोटो आणि थोडं वर्णन असं त्याचं स्वरूप होतं. हळूहळू प्रतिक्रिया मिळू लागल्या, लिहायचा उत्साह कायम राहिला. त्याच सुमारास आमच्या मनात एका स्वप्नाचं धूसर बीज पेरलं गेलं.
नेटवर किंवा इतर माध्यमातही आमचं टूरिंगविषयीचं वाचन हे नेहमीचंच झालं. नवे ब्लॉग्ज, वेगवेगळी माहिती आणि जगातली अजून जायचं राहिलेली अगणित अद्भुत स्थळं यांनी आमच्या पर्यटनज्ञानात रोजची भर पडत होती. हळूहळू लक्षात आलं की असं फिरत राहणं दिसतं तितकं साधंसोपं नाही. पण आपला विचार साधा असला तर हे शक्य आहे. पैशासाठी नोकरी, नोकरीतून पैसा ह्या गरगरत्या चक्रातून कायमचे बाहेर पडलेले अनेक अवलिये नेटवर ओरडून सांगत होते, अरे सगळं होतं, करून तर बघा. समजा वडाळा- दादर स्टेशनला टॅक्सी ऐंशी रुपये घेत असेल मग आपण रुपयात बसने गेलो तर? असं जगणं कायमचं बदलणारे निर्णय! थोडी सोय, थोडी गैरसोय. गरजाकमीत कमी आणि सहज भागणार्‍या. शक्य आहे हे? आमच्या मनाची तयारी सुरू झाली.
त्या दरम्यान couchsurfing.com या पर्यटकांसाठी असलेल्या खास संकेतस्थळावर आम्ही नाव नोंदवलं. ह्याची कल्पना अतिशय सुंदर आहे. तुमच्या शहरात येणार्‍या परदेशी पर्यटकांचं तुम्ही यजमान म्हणून आदरातिथ्य करा. त्याचा मोबदला काहीही नाही हीच पूर्वअट. त्या बदल्यात नवे परदेशी मित्र, अचाट अनुभव आणि नव्या देशातलं सहज मुक्कामाला जाता येणारं एक घर कमवा. युरोप, कॅनडा ते अर्जेन्टिना, कोस्टारिकामधले भटके आमच्याकडे अधूनमधून आपली पथारी पसरू लागले. आमच्याबरोबर हसू-खेळू-जेवू लागले. आम्ही एकमेकांना फिरण्याचा अनुभव सांगू लागलो. दिवसागणिक ते जगाच्या वारीचं स्वप्न गडदच होत गेलं. त्याभोवती आमचं सगळं जगणं एकवटलं आणि ते प्रत्यक्षात उतरवायची तयारी आम्ही सुरू केली.
एका आगळ्या मुशाफिरीसाठी आम्ही सज्ज होत होतो. जवळच्या सेव्हिंग्जचा ताबडतोब आढावा घेतला. तेवढ्यावर भागेल असं लक्षात आल्यावर आम्ही दोघांनीही आमच्या स्वीकृत कामाला कायमचा रामराम ठोकला. आता आमचे आम्ही आणि अज्ञात ठिकाणी नेणार्‍या सुरेख नागमोडी वाटा. मुंबईमधील घर विकून आवश्यक असलेला पैसा उभा करण्याचा आमचा विचार पक्का होता. त्याप्रमाणे पेपरात फ्लॅट विक्रीसाठी जाहिरात दिली, पण समाधानकारक किंमत मिळेना म्हणून काही महिने हा घरविक्रीचा कार्यक्रम पुढे ढकलला. एक मोठा अडथळा; घसघशीत पोकळी. अचानक एक कल्पना चमकून गेली. आता नोकरी नव्हती, काम नव्हतं. सगळा वेळ संपूर्णपणे आमचा होता. आम्ही ठरवलं ह्या राउंड-द-वर्ल्डची देशी रंगीत तालीम करू. कसं वाटतंय बघू. मे महिन्याचे दिवस.

3-round-3
आम्ही तातडीनं जम्मू-काश्मीरला प्रयाण केलं. आम्हाला वेगळा अनुभव घ्यायची जणू तहानच लागली होती. म्हणून फारशा प्रचलित नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरू झाला. दक्षिण काश्मीरमधील कोकेर नाग, अचबल, दकसुम, सिन्थनटॉप, वेरीनाग हा पल्ला पूर्ण केला. आमच्या शिकवणीचा पहिला धडा वीज नसलेल्या छतपाल ह्या गावातून सुरू झाला; जगण्यासाठी वीज अत्यावश्यक नाही! मग अमरनाथ यात्रा घडली. कुपवाराजवळ रेशवारी, लोलाब खोर्‍यात फिरलो.
अनुभवांचं तळं थेंबेथेंबे साचत होतं. किती अनुभव. म्हणजे प्रवासाला चार चाकं असलेलं कोणतंही वाहन चालतं. उदाहरणार्थ इंडियन ऑईलचा ट्रक वगैरे! तो पण शिवनेरी एसी बसइतकाच सुखाचा असतो. प्रवास संपला की नदीच्या काठाशी त्या ट्रकमध्ये रात्रभर झोपायची सोयपण होते. हा झाला परका चिकतेझंस्कार प्रवास. हे झंस्कार म्हणजे थोरच प्रकार. संडास, बाथरूम हा विषयच नाही. वीस ते पंचवीस उंबर्‍यांचं गाव खूप मोठं झालं इथे. सगळ्या प्रदेशात मिळून एकच पेट्रोलपंप. आणि नकाशे काही ठिकाणी चक्क इथून पुढे रस्ता संपला हे सांगणारे. आम्ही खरोखर काश्मीरच्या सुदूर भागात पोहोचलो याची जाणीव झाली. ह्या गैरसोयींचा विसर पाडायला लावत होता तिथला निसर्ग. झाडं, पानं, फुलं, रस्ते, तळी, वळणदार वाटा, हिरवंगार गवत आणि प्रेमळ माणसं. पाहण्यासारखं अजून काय असतं जगात? सुरू आणि झंस्कार खोरी झाल्यावर मग फुलतात, लडाख आणि मग मनाली, चंदीगड, अमृतसर, आग्रा, दिल्ली असा परतीचा प्रवास झाला.
आम्ही तीन महिने प्रवासात होतो! शरीराचं आणि मनाचं भरपूर वजन घटलं. आम्ही हलके झालो. अनुभवांनी काठोकाठ भरलो. कफर्ट झोनच्या बाहेर येऊन आम्ही खुल्या दिलानं जगण्याला पुकारलं आणि त्यानं आम्हाला निराश केलं नाही. खांद्यावर संसार घेऊन फिरणं, असेल ते खाणं, कुठेही राहणं, परक्या लोकांवर सहज विश्‍वास ठेवणं; किती शिकलो आम्ही. ‘वर्ल्ड कॅन बी अ सेफ प्लेस’ ह्याचा प्रत्यय आला. आमची रंगीत तालीम जोरात पार पडली. मुख्य प्रयोगाची धडधड वाढू लागली.
राउंड द वर्ल्डची तयारी सुरू झाली. घराचे पैसे येणारच होते. सोशल मिडियामध्ये आम्ही आमचे अनुभव व फोटो शेअर करू लागलो. आमचं स्वतःचं संकेतस्थळ ीरपवशशरिलहशींरप.लेा तयार केलं व सजवलं. नॅशनल जिऑग्राफीक आणि याहू ट्रॅव्हलनं आमच्या फोटोची आणि प्रवासाची दखल घेतली. येणार्‍या प्रतिसादांनी आमचा आत्मविश्‍वास वाढला. मार्गदर्शन करा म्हणून मेल्स आल्या. परदेशी मित्रांच्या लवकर या, वाट पाहतोय अशा हाका अजून जोरात ऐकू येऊ लागल्या. भारताच्या पासपोर्ट धोरणातील गुंतागुंत लक्षात घेता सलग एक वर्ष फिरता  येणार नाही हे कळलं. म्हणून आम्ही पहिल्या प्रवासाला लॅटिन अमेरिका निवडलं. ह्याची कारणं अनेक होती.
एरवी थोड्याच दिवसांत घाईघाईनं हा टूर कार्यक्रम उरकला जातो. वेळ आणि अंतराचं गणित बसत नाही. आम्हाला वेळ पण होता आणि अंतराचा फरक पडत नव्हता. त्यात पुन्हा खर्चही इतर देशांच्या तुलनेत कमी येणार होता. ह्या निमित्तानं मुख्यत्वे ब्राझील, अर्जेन्टिना, बोलिव्हिया आणि इक्वेडोरमधील अप्रचलित ठिकाणांना भेट देण्याचा आमचा हेतू सफल होणार होता. सगळी तयारी झाली. व्हिसा आला. आता हुरहुर होती आपल्या देशापासून लांब जाण्याची, संपूर्ण अपरिचित निसर्गाची, संस्कृतीची, माणसांच्या अगणित वाणांची आणि उत्तरोत्तर समृद्ध करीत जाणार्‍या एका कोवळ्या अनुभवाच्या उबदार घोंगड्याची!

3-round-4
ब्राझीलच्या जमिनीवर पाऊल पडल्याक्षणी नजर भिरभिरू लागली. आम्ही साओपावलो ह्या ब्राझीलच्या शहरात दाखल झालो होतो. इमिग्रेशन ऑफिसर नामक इसमानं आमच्याकडं एकदा बघून आमच्या पासपोर्टवर शिक्के उमटवले आणि ‘वत्सा तुजप्रत कल्याण असो’ थाटात आमचं ब्राझीलमध्ये स्वागत केलं. इथून सुरू झाला पाच महिन्यांच्या प्रवासाचा अखंड आनंद. आम्ही अटलांटिक महासागराच्याकडेनं जाणार होतो. ब्राझीलमधून अर्जेंटिना आणि तिथून बोलिव्हिया (सुदैवानं आम्हाला नंतर पेरूचा व्हिसाही मिळून गेला!) असा जोरदार कार्यक्रम होता. इतके दिवस यजमान, होस्ट होतो ते आता पाहुणे झालो. काऊच सर्फिंग ह्या अचाट संकल्पनेनं आम्हाला सगळ्या प्रवासभर उदारपणे आश्रय दिला. बर्‍याचजणांच्या घरात जाऊन घरच्यासारखे राहिलो. अनेक गोष्टी कुतूहलानं टिपल्या, त्यातल्या काही कायमच्या आठवणीत राहिल्या.
देशानुसार प्रवासाचे टप्पे पडले गेले. पहिल्या टप्प्यात आम्ही ब्राझीलमध्ये फिरलो. रिओ हे शहर जगातल्या प्रत्येक माणसाला ऑलिम्पिकमुळे माहिती झालं आहे. ऑलिम्पिक तयारीची धांदल चालू असताना आम्ही रिओला भेट दिली होती. आपल्या घरी कार्य काढल्यावर जशी लगबग असते तशीच लगबग रिओत दिसून आली! जगातल्या सर्वांत मोठ्या क्रीडा उत्सवाचा जणू मांडव घातला जात होता आणि मांडवाचे बांबू रोवले जात असताना आम्ही बघत होतो. तसल्या कडाक्याच्या थंडीत सगळे कामाला जुंपले होते.
रिओ हे किनार्‍यांचं शहर आहे. बाहादातीज्जुका, कोपाकबाना, इपानेमा हे किनारे अतिशय सुंदर आणि ओढ लावणारे. समोर अथांग अटलांटिक महासागर आपलं निळंशार वैभव मोठ्या दिमाखात मिरवतो आहे आणि आम्ही नजरबंदी झाल्यासारखे ते पाहात उभे! समुद्राचं इतकं निळं पाणी बहुधा पहिल्यांदाच बघत होतो. आणि पांढरी शुभ्र वाळू. पाण्यात पाय बुडवायचंही सुचलं नाही. जेव्हा सुचलं तेव्हा गार पाण्यानं खाडकन जमिनीवर आणलं. नाहीतर आम्ही चक्क तरंगत होतो! अनवाणी पायांनी हे रिओचे किनारे आम्ही तुडवले.
रिओत ख्राईस्ट द रिडीमर हा तब्बल बत्तीस मीटर उंच ख्रिस्ताचा पुतळा कुठूनही दिसतो! कोर्कव्हॅडो पर्वतावर उभ्या असलेल्या ह्या ख्रिस्ताची भव्यता अनावर आहे. ह्या देवदूताशेजारी कुणीही क्षणभर अंतर्मुख होतो. पण दुसर्‍याच क्षणी त्याच्याबरोबर लगेच सेल्फी काढून घेतो! सेल्फी विथ ख्राईस्टमध्ये हा ख्रिस्त एकदम कूल पोज देतो. वर जायला रस्तादेखील इतका रसिकपणे आखला आहे की बस्स! पर्वतावरून चारी दिशांना पसरलेलं अफाट शहर, बाजूला घनदाट तिजुका जंगल, क्षितिजापर्यंत जिकडे तिकडे निळा समुद्र आणि पाठीशी ख्रिस्त. तिकडे गेल्यावर आमची तंद्री लागली होती.
आमचा प्रवास ब्राझीलकडून अर्जेंटिनाच्या दिशेनं चालू राहिला. ह्या दोन देशांना विभागणारा अद्भुत नैसर्गिक चमत्कार म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक इगुआसू धबधबा. ह्याला ‘डेव्हिल्स थ्रोट’ असं म्हणतात! नायगार्‍याच्या तिप्पट मोठा. इगुआसू नॅशनल पार्कनं धबधब्यापर्यंत जायला सुरेख वाटा आखल्या आहेत. पुढं गेलो आणि पाण्यानं तयार केलेला एक प्रचंड मोठा पांढरा पडदा दिसायला लागला.! धायधाय पाणी येऊन त्या कड्यावरून सैतानाच्या घशात पडत होतं. पाणी जबरदस्त वेगानं खाली येत होतं आणि जवळजवळ तेवढ्याच उंच वर उसळत होतं. त्यापासून इतके लांब असून आम्ही चिंब भिजलो होता, पण त्याचं भानच नव्हतं. ह्या सगळ्यावर कळस म्हणून की काय, ढग कुणीतरी सांगितल्यासारखे पांगले आणि उन हळूच झिरपू लागलं. जादू घडावी तशी इंद्रधनुष्याची कमान त्या भव्य दृश्यावर चमकू लागली. इतकं विस्मयकारी चित्र रेखाटणारा तो अदृश्य चित्रकार सैतान नक्कीच नव्हता!
त्याच तंद्रीत आम्ही ब्राझीलची सीमा ओलांडून अर्जेंटिनात पातागोनिया नावाच्या विशाल भूमीकडे निघालो. देशाचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापलेला एक निसर्ग-आविष्कार. वाळवंटांचा, मैदानांचा, पर्वतांचा, समुद्रांचा आणि हिमखंडांचा. वाट वेगानं सरत होती आणि आमच्या अनुभवात सतत भर पडत होती. ह्या अनुभवांना आव्हान देणारा एक नवाच अनुभव आमची वाट पाहात होता. जगाचं तापमान राखायला तत्पर असलेला एक रांगडा हिम-शिलेदार! पेरितोमोरेनोग्लेशियर. अर्जेन्तिनो ह्या विशाल तळ्याच्या दक्षिणेला अनादि काळापासून हे बर्फ उभं आहे. ते कसं दिसतं ह्या आमच्या उत्सुकतेचा कडेलोट होऊ लागला होता. आणि तेव्हाच तो बेलाग कडा डोळ्यांवर आघात करून गेला! पेरितोमोरेनो ग्लेशिअर! नजर जाईल तिथपर्यंत फक्त निरनिराळ्या निळ्या छटांचा बर्फ ! काही क्षणांपुरते आम्ही बोटीच्या डेकवर उभे आहोत हे विसरलो. मनात काहीही उमटेना. फक्त तो हिमकडा आणि आम्ही. एकमेकांत जणू मिसळून गेल्यासारखे झालो! तो दिवस आमच्या अनुभवांना खरोखर एक आव्हान होता!
आता मुक्काम बोलिव्हिया! सीमा ओलांडून प्रवास नव्या उत्साहानं चालू राहिला. मजल दरमजल करत आम्ही एका महासागराकडे चाललो होतो. तो होता एक सपाट, सरळ मीठसागर! सालारदेउयुनी नावाचा. क्षार साठून तयार झालेला. जगातलं सर्वांत मोठं पठार. भल्या पहाटे तिथं जाऊन पोहोचलो. इतक्या लांबवर फक्त क्षार पसरले आहेत ह्यावर विश्‍वास बसेना. केवळ प्रचंड. सूर्य उगवला आणि ते शुभ्र मीठ आता उगवत्या सूर्याच्या प्रकाशात गुलाबी होत गेलं. ती गुलाबी झाक क्षितिजाला जाऊन भिडलेली, म्हणजे आम्हीच असं म्हणत होतो! कारण कुठे जमीन संपून आकाश कुठे सुरू होतं हे कळत नव्हतं. गाडीमधून त्या विस्तीर्ण पठाराच्या बरेच आत गेलो. वेळ कसा गेला ते कळालंच नाही.
आम्हाला अर्जेंटिनात असताना सुदैवानं पेरू देशाचा व्हिसा मिळून गेला होता. पेरूत जायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माचूपिचू हे इन्का संकृतीचं प्राचीन शहर. इथं इन्का नावाची एक मोठी संस्कृती नांदली. ती संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडावर अतिशय मोठा प्रभाव टाकून गेली. कुस्को ह्या शहरातून माचूपिचूला जाता येतं. या महत्त्वाच्या, वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या ऐतिहासिक स्मारकाला आम्ही भेट दिली. बसमधून नागमोडी हिरव्यागार वळणावळणाच्या रस्त्यानं माचूपिचूच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. पर्वतांमुळे खोगीरासारख्या खोलगट झालेल्या भागात हे प्राचीन शहर वसलेलं होतं. राज्य कारभार, शेतकी आणि निवासी असे ह्या शहराचे तीन मोठे भाग पडले आहेत. आम्ही हिंडत होतो. हे शहर ज्या पर्वताच्या कुशीत वसलं आहे त्याच्यावर चढून वरून हा नजारा कसा दिसतो हे पाहायचं ठरवलं. आम्ही चढण चढू लागलो. त्या चढणीनं आमचा चांगलाच दम काढला. ह्या इतक्या उंचावर अजून एक वेगळाच किस्सा झाला.

3-round-5
सगळेजण हाशहुश्श करत वर चढत होते. खाली येणार्‍यांना अजून किती राहिलं विचारत होते. सगळेजण, झालं! थोडं राहिलंय, वरून मस्त दिसतं सगळं! असं म्हणत धीर देत होते. त्या तसल्या ठिकाणी आम्ही शेजारून चाललेल्या एका माणसाशी बोलू लागलो आणि चाटच पडलो. तो माणूस इराणी होता आणि त्याची मुळं भारतात रुजलेली होती! त्याच्या आजोबांचं मुंबईत चक्क इराणी कॅफे होतं. आता कॅनडात असलेला हा माणूस काही महिने भारतात येऊन गेला होता. आमच्या आणि त्याच्या ब्रिटानिया, के रुस्तम अशा मुंबईतल्या आवडीच्या खाद्य ठिकाणांची कुंडली जुळली आणि गप्पांमुळे ती चढण सोपी वाटायला लागली. त्याची बायको इराणमध्ये वाढली होती, पण पुण्यात शिक्षणासाठी जावं अशी फँटसी तिच्या मनात होती! ते भरभरून आमच्याशी बोलत होते.
आता आमचा परतीचा पण अतिशय उत्कंठा वाढवणारा नदीप्रवास सुरू होणार होता! ऍमेझॉन ह्या जगातल्या सर्वांत मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या नदीपात्रातला प्रवास युरीमागुआस नावाच्या छोट्या शहरातून सुरू होतो. इथून बोटीनं निघालं की इकी तो सह्या मोठ्या शहरापर्यंत ऍमेझॉनच्या काठावर असंख्य खेडी आणि माणसं वसली आहेत. त्या सगळ्यांचं रोजचं जगणं ह्या शहरातून येणार्‍या बोटींवर अवलंबून आहे. त्यामुळे इथून रोज यच्चयावत गोष्टींचा पुरवठा केला जातो. आम्हीही अशाच एका बोटीतून प्रवास करणार होतो! तिथं जाऊन पोहोचलो तेव्हा एकच धमाल उडाली होती. सामान धडाधड बोटीवर चढवलं जात होतं. ह्या बोटीला तीन-चार मजले.
तळात आणि पहिल्यावर माल ठासून भरलेला, आमच्यासारखे प्रवासी दुसर्‍या मजल्यावर आणि सगळ्यात वर सुकाणू. दुसर्‍या मजल्यावर धर्मशाळेतला वतोतशी आमची झुल्याची पथारी लावली. इथे खायची प्यायची व्यवस्था आहे, फक्त जेवायला आपापली भांडी घेऊन जायचं म्हणे! इथून पुढचा प्रवास खरोखर अद्भूत असा होता. दिवस रात्र फक्त ऍमेझॉनचं लालसर पाणी, हिरवंकंच अरण्य, निरनिराळे प्राणी आणि मनात भिनलेली बोटीची लय. तरीही इथला अनुभव रोज निराळा होता. कधी नदीतले डॉल्फिन्स पाहणं, कधी मासेमारी तर कधी काठावर उतरून घनदाट अरण्यातून भटकंती. कधी आदिवासी वस्त्यांना भेट तर कधी प्राणी अनाथालयाला. नदीच्या काठावर मानव नावाची जात इतक्या निवांतपणे इतक्या कमी सुविधा असताना कशी राहते ह्याचं राहून राहून आश्‍चर्य वाटत राहिलं. एखाद्या स्वप्नात असल्यासारखं आम्ही ऍमेझॉनच्या प्रवासातून वाहात निघालो आहोत असं वाटत राहिलं. हे ऍमेझॉन अजब जातीचं, स्वतःतच रमलेलं आणि अगणित, अगम्य रंग दाखवणारं वाटलं आम्हाला! त्याची तंद्री इतकी होती की आम्ही केव्हा देशाची सीमा ओलांडून ब्राझीलच्या मनाऊस शहरात येऊन पोहोचलो कळलंच नाही.
तिथून थेट रिओ आणि मग साओपावलो. आमची परतीची विमानाची तिकिटं वाट पाहात होती. भरल्या मनानं विमानात जाऊन बसलो. ऍमेझॉनचा भरजरी पदर आठवत असताना विमानानं आकाशात झेप घेतली. आमच्या दक्षिण अमेरिका प्रवासाची सांगता झाली. मनाला एक शून्य व्यापायला लागलं. आता काहीही करायचं नाहीये. इथून फक्त घरी जायचं. ह्या काय, कुठल्याच प्रवासाची सांगता अशी शून्यात व्हावी ही गंमत जगण्याची. पाच देशांचा, 23000 किमीहून अधिक रस्त्याचा, अनेक बर्‍या-वाईट अनुभवांचा, सागरांचा, महासागरांचा, नद्यांचा, तळ्यांचा आणि अरण्यांचा, पशु-पक्ष्यांचा आणि माणसांचा हा घसघशीत प्रवास. आम्ही ज्यासाठी सारं आयुष्य पणाला लावलं त्याचं जोरदार समर्थन करणारा एक समृद्ध अनुभव! माणूस कुतूहलापोटी प्रवासाला निघतो आणि त्याला चुकत धडपडत जे उदंड आयुष्य रस्त्यावर दिसतं त्यातून त्याची अधिकाधिक पाहण्याची ओढ अजून वाढतच जाते. कधी घरात निवांत पडलेलं असताना अचानक धबधब्याची नाही तर समुद्राची गाज ऐकू येते, एखादा रस्ता दिसू लागतो. तात्पुरतं काढून ठेवलेलं विंचवाचं बिर्‍हाड पुन्हा पाठीवर चढतं आणि घराला कुलूप लावून आम्ही कुठं भटकायला निघतो!
*************************************************************************************************************
संदीपा आणि चेतन
चेतन जाहिरात आणि डिझाईन क्षेत्रात कार्यरत होते. संदीपा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम करीत होत्या. सध्या हे दोघेही आपली नोकरी सोडून जगप्रदक्षिणेवर आहेत.
शब्दांकन : अभय अरुण इनामदार
Email: rtw@sandeepachetan.com
Mob: 98205 57663

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *