सहोदर

वैशाली चिटणीस

आमच्या कुणाच्यातरी लक्षात आलं की त्याच्या हातावर एक नंबर गोंदला आहे. एसटीडी कोडही आहे. टेलिफोन बूथवाल्यानं सांगितलं की, तो चेन्नईमधला कोड आहे. त्या नंबरवर मी एक दिवस फोन लावला, तर त्यांना माझी भाषा येईना आणि मला त्यांची. मग मी एक तमिळ येणार्‍या माणसाला शोधून आणला. त्याला फोनवर बोलायला लावला तर तो तिथल्या एका प्रसिद्ध उद्योगपतीचा फोन होता.
*************************************************************************************************************

मी आजूबाजूला नजर टाकली. कुणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं.
कुणी ओळखीच्यातल्यानं बघितलं की, आली पंचाईत. ताबडतोब नीतूला रिपोर्ट जातो आणि मग माझं काही खरं नसतं. घरी जाईपर्यंत तवा चांगला तापलेला असतो… आणि मग चांगली निघते आमची. बोल बोल बोलते नीतू आणि मग शेवटी दमून म्हणते, ‘‘अवि, मला कळतं तू असं का करतोस ते. पण चार लोक मला ज्या पद्धतीनं येऊन सांगतात ना, त्यातून तुझी चेष्टाच व्हायची शक्यता आहे बघ.’’ जास्त आणि काही झालं तरी मला ते नकोय आणि त्यामुळे आजकाल नीतूला टाळावं लागतं आणि त्यासाठी लोकांनाही टाळावं लागतं. पण ते किती अवघड आहे हे मला माहीत आहे.
परवा तर नीतूसमोरच झाला हा रस्त्यावरचा एपिसोड.
म्हणजे तो माणूस… त्याला बघून मी जागच्या जागीच खिळून राहिलो.
कित्येक वर्षे अंगाला पाणी लागलं नसेल त्याच्या. अतोनात पिंजारलेले केस, वाढलेली दाढी, अंगावर चिंध्या. त्यानंच पांघरलेल्या की इतरांनी कुणास ठाऊक. त्याला कसलंच भान नव्हतं. आपल्याच नादात तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या उकिरड्यावरचं घेऊन खात होता. बाजूला फिरणारी कुत्री, डुकरं, घोंघावणार्‍या माशा… त्याच्या दृष्टीनं असं काही नसावंच अस्तित्वात. ते सगळं बघून असं तुटलं माझ्या पोटात.
माझा चेहरा बघून अगदी हतबल होऊन नीतू मला म्हणाली, ‘‘अवि, इतकी वर्षे झाली. असा कसा सापडेल तुला दादू.’’
वेडीच आहे. तिला वाटतं, मी दादूला शोधण्यासाठी असं करतो.
दादू आता कधीच सापडणार नाही, हे स्वीकारलं त्यालाही किती वर्षे झाली.
दादू हरवला त्यालाच आता पंचवीस वर्षं झाली असतील.
तेव्हा तो असेल दहा वर्षांचा आणि मी सहा.
इतक्या वर्षांनंतरही तो दिवस माझ्यासमोर तसाच्या तसा उभा आहे.
पुण्याहून आम्ही सगळे ठाण्याला आलो होतो. म्हणजे आई-बाबा, मी-दादू.
मावशीच्या घराची वास्तुशांत होती ठाण्यात. वास्तुशांतीचा सगळा पसारा आटोपल्यावर अर्थातच मुंबई दर्शन.
त्या दिवशी बोरिवलीच्या नॅशनल पार्कचा प्लॅन होता. लायन सफारी बघून, भरपूर खेळून, बोटिंग करून खाऊन पिऊन धमाल मूडमध्ये होतो आम्ही.
आई आणि मावशी एकमेकींमध्ये. आम्ही मुलं म्हणजे मी आणि दादू आणि मावशीचा सोहम आणि अंजली आमच्या दंग्यात. बाबा आणि काका त्यांच्या-त्यांच्या नादात असं सगळं चाललं होतं.
बोरिवलीहून आम्ही निघालो. उलटं जायचं असल्यामुळे गर्दी कमी. त्यामुळे सगळे एकत्रच बसलो. दादरला उतरून ट्रेन बदलायची होती. त्यासाठी वेस्टर्नला उतरून सेंट्रलला आलो. चार नंबर प्लॅटफॉर्मवरून ठाण्याची फास्ट ट्रेन पकडायची होती. संध्याकाळची वेळ. सगळ्या चाकरमान्यांची गर्दी.
‘‘आता मात्र तुम्ही लेडीजमध्ये जा बरं का ग.’’ काका मावशीला म्हणाले.
मावशीनंही मान डोलावली. ट्रेन पाच ते दहा मिनिटं उशिरा येणार आहे, अशी अनाउंन्समेंटसारखी होत होती. तेवढ्यात काकांनी जाऊन चार फ्रुटी आणल्या.
‘प्या रे पोरांनो. आधीच इतकं उकडतंय. प्या प्या.’ म्हणाले.
मग आम्हाला तर काय… कोण सगळ्यात आधी संपवतो अशी कॉम्पिटिशनच लावली आम्ही. आमची फ्रूटी संपत असतानाच ट्रेन आल्याचा गलका झाला.
‘जा गं तुम्ही तिकडे… चला पोरांनो घुसा तुम्ही…’ काका सराईत मुंबईकरासारखे ओरडले.
मग आम्हाला काय, आम्ही जे काही घुसलो ट्रेनमध्ये… सगळी ट्रेन गच्च भरलेली तरीही आम्हाला खिडकीत उभं रहायला जागा आरामात मिळाली. ठाणं आल्यावर काकांनी आम्हाला बकोटीला धरून खेचलं. आई, मावशी आणि अंजलीही लेडीजमधून उतरून आमच्याकडे येत होत्या.तेवढ्यात आमच्याकडे बघत बघत आई किंचाळली… ‘दादू… दादू कुठाय…’
‘दादू… दादू आमच्याबरोबर कुठे होता… त्याला तूच तर घेऊन गेलीस ना लेडीजमध्ये…’ बाबा म्हणाले.
‘छे आम्ही समजतोय पोरं तुमच्याबरोबर आहेत…’ मावशी म्हणाली.
ट्रेन आली तेव्हा आईला वाटलं की दादू बाबांबरोबर चढला. बाबांना वाटलं तो नेहमीप्रमाणे आईबरोबर गेला. आम्ही सगळेजण दादूला न घेताच चढलो होतो.
हे लक्षात आल्यावर तिथं प्लॅटफॉर्मवरच आईनं जो काही हंबरडा फोडला…
दादूला ते दोघंहीजण तळहातावरच्या फोडासारखं जपायचे. मी दादूपेक्षा चार वर्षांनी लहान असूनही त्यांचं दादूला सांभाळणं बघून मलाही आपोआपच ती समज आली होती.

19-1
दादूचं मतिमंदपण त्यांनी कधी झाकलंही नव्हतं आणि त्याचा कधी फारसा बाऊही केला नव्हता. त्यामुळे दादूला जपणं हे आमच्या सगळ्यांचं अलिखित कर्तव्य असल्यासारखंच होतं आणि आता ऐन कसोटीच्या क्षणाला असं कसं झालं… काका पुढे झाले… तुम्ही दोघीजणी स्टेशन मास्तरांच्याकडे जा. कम्लेंट द्या. अनाऊन्समेंट करायला सांगा. तोपर्यंत आम्ही दोघंही दादरला जाऊन दादूला घेऊन येतो आणि हे बघ आता ही चारही पोरं तुमच्याबरोबर असू द्या… सापडेल दादू… आलोच आम्ही… बाबांचा हात धरून ते दादरची ट्रेन पकडायला धावलेसुुद्धा…
स्टेशनमास्तरांनीही आईची अवस्था बघून ताबडतोब दादर स्टेशनशी संपर्क साधला. अनाउन्समेंट करायला सांगितल्या.
‘सापडेल हो तुमचा मुलगा, नक्की सापडेल. आमचा रोजचा अनुभव आहे हा.’ ते म्हणाले.
आम्हाला मुलांना तर अगदीच बावरल्यासारखं झालं होतं. मावशीनं उभं केलं त्या कोपर्‍यात एकमेकांना घट्ट धरून उभे होतो. आई सारखी रडत होती. मावशी स्टेशन मास्तरांना प्रश्‍न विचारून भंडावून टाकत होती. बाबा आणि काका दादरला पोहोचले आणि प्लॅटफॉर्म नंबर चारवर धावले. पण जिथे आम्ही थांबलो होतो, तिथे दादू नव्हता.
दादर वेस्टर्नला आम्ही सगळे एकत्रच उतरलो. तेव्हा तो आमच्याबरोबर होता. बाबांना पक्कं आठवत होतं. आपण चार फ्रूटी आणल्या आणि चारही जणांना दिल्या, हे काकांना आठवत होतं. मग नंतर काय झालं नेमकं… असं कसं झालं… बाबांच्या पोटात गोळाच आला. त्यांनी तिथेच बसकण मारली.
‘अहो त्याला काहीच सांगता यायचं नाही आणि तो काही बोलेल तर इतरांनाही नीट कळायचं नाही.’ ते काकांना कसंबसं म्हणाले.
काकांनी बाबांना एका बाकावर बसवलं आणि सगळ्या प्लॅटफॉर्मभर फेरी मारली. तेवढ्यात त्यांना कुणीतरी मित्र भेटला. त्याला बाबांपाशी बसवून त्यांनी रेल्वे पोलिसांना गाठलं. स्टेशनमास्तरची भेट घेतली. सगळे प्लॅटफॉर्म धुंडाळले. पुलांवर फिरले. स्टेशनबाहेर इस्टला स्वामीनारायण मंदिरापासून…स्टुडिओपर्यंत चक्कर मारली. वेस्टला कबुतरखान्यापासून प्लाझापर्यंत फिरले. रात्री केव्हातरी ते रिकाम्या हातांनी घरी परतले, तेव्हा आम्ही मुलं कुठेतरी कोपर्‍यात एकमेकांमध्ये गुरफटून झोपलो होतो. मावशीचे शेजारीपाजारी येत-जात होते. आई भकास डोळ्यांनी डोक्याला हात लावून बसली होती. मावशी तिची अखंड समजूत काढत होती. बिल्डिंगमधली मुलं सकाळी दादूच्या शोधमोहिमेत येणार होती. वास्तुशांतीचे फोटो आले होते. त्यात दादूचा फोटो होता. तो घेऊन सकाळी सगळे दादर धुंडाळायला बाहेर पडले. पोरांनी स्टेशनवरचा, स्टेशनबाहेरचा कानाकोपरा पालथा घातला. प्लॅटफॉर्म नंबर चारवरचा तो फ्रूटी स्टॉलवाला म्हणाला, ‘‘रोज कितने लोग आ जाते है साब, कितने लोगों को ध्यान मे रखने का…फिरभी ढुंढो मिल जाएगा बच्चा. जाएगा कहॉं.’’ ‘‘सापडेल की पोरगं, त्यात काय एवढं ’’, असं म्हणणारा कालचा रेल्वे पोलीस म्हणाला, ‘‘अहो एक-दोन दिवस तर लागणारच की.’’ रात्री सगळे तसेच परतले.
तिसर्‍या दिवशी बाबा आणि काका पुन्हा दिवसभर दादर स्टेशनवरच.
आईची अवस्था तर बघवत नव्हती. रडून रडून थकून ग्लानी यायची तिला. दादू हरवला त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मला दात घासताना बघून ती मावशीला म्हणाली, ‘‘दादूमागं धावावं लागतं गं दात घास म्हणून. आता येईल तेव्हा नीट दात घासून द्यावे लागतील त्याचे…’’ दिवस वर येईल तसतसं तिचं असंच चाललं होतं.
‘‘दादूला चहाबरोबर बिस्कीट लागतंच गं… अगं जराही थंड पाणी चालत नाही त्याला अंघोळीला. दादूला भूक जराही सहन होत नाही गं. काय खाल्लं-पिलं असेल गं पोरानं. मी किंवा यांनी थोपटल्याशिवाय झोपच येत नाही गं दादूला.’’ खरंच होतं ते सगळं. दादूचं सगळं करणं, त्याची शाळा यात सगळा दिवस जायचा तिचा. गेली दहा वर्षे ती त्याच्यातच गुरफटली होती आणि आता असं अचानक समोर येऊन ठेपलेलं सुन्न रितेपण. आम्ही असाच जवळजवळ महिना मावशीकडे काढला. सुरुवातीला काही दिवस काकांनी सुट्टी टाकलेली. बाबा आणि काका दोघंही रोज पोलीस स्टेशनला जायचे. हरवलेली मुलं सापडण्याच्या शक्यता असलेली ठिकाणं लक्षात घेऊन फिरत राहायचे. रात्री रिकाम्या हातांनी दमूनभागून परतायचे. आई आणि मावशी त्या दोघांची वाट बघत बसून राहिलेल्या असायच्या. आम्हा पोरांचं काय… कुणीकुणी शेजारपाजारचे आम्हाला घेऊन जायचे, खायला प्यायला घालायचे. मावशी आणि काकांना एकप्रकारचा गिल्ट आला होता. पण तो तरी किती दिवस बाळगणार… हळूहळू काकांनी कामावर जायला सुरुवात केली. अंजली आणि सोहम शाळेत जायला लागले. कॉलनीतल्या कुणाकुणा मुलांना बरोबर घेऊन बाबा दादूला शोधायला, पोलीस स्टेशनात चौकशीला जाऊन यायचे. महिनाभरानंतर एक दिवस आले आणि आईला म्हणाले, ‘‘बॅग भर, उद्या निघायचंय आपण. आपल्या घरी.’’
‘‘दादूशिवाय…’’ आईनं विचारलं. ‘‘आणि तो आपण गेल्यावर सापडला तर…’’
बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी मावशीच्या मदतीनं आमच्या बॅगा भरल्या आणि दुसर्‍या दिवशी आम्ही पुण्याला परतलोदेखील. दादूशिवायच.
महिनाभरानंतरही काहीच होत नव्हतं. दादूबद्दल काहीच कळत नव्हतं. आम्ही रोजच समोर दिसत असल्यामुळे मावशी काकांचा गिल्टपण कमी होत नव्हता. असं किती काळ राहणार तिथं, म्हणून बाबांनी धाडकन घरी परतायचा निर्णय घेतला होता. आम्ही परत आलो. चाराचे तीन होऊन. त्या महिनाभरात जख्ख म्हातारी झालेली आई, हताश झालेले बाबा आणि भांबावलेला मी.
आमच्या घरातलं चैतन्यच हरवून गेलं होतं. आणि आता आम्हाला कळत होतं, ते चैतन्य दादूच होता. माझा दादू. त्याचं खरं नाव… पण मी त्याला दादू म्हणायला सुरुवात केल्यावर तो सगळ्यांचा दादू झाला. दादूच्या जन्माच्यावेळी आई एका शाळेत शिकवायची. तिच्या वर्गात राकेश कुलकर्णी नावाची दोन मुलं होती. एकाला म्हणायचे छोटा राकेश आणि दुसर्‍याला मोठा राकेश. दोघंही प्रचंड हुशार. पहिला दुसरा नंबर त्या दोघांनीच वाटून घेतलेला. त्यांना बघून आईला वाटायचं आपलं बाळपण असंच हुशार व्हावं. म्हणून तिनं त्याचं नाव ठेवलं होतं, राकेश. आणि त्याचं पुढे दादू झाला. मतिमंद. पण कसा का असेना, दादू आमचा होता. त्याची बौद्धिक वाढ म्हणजे आय क्यू दोन वर्षांच्या मुलाएवढा आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं. म्हणजे बुद्धीनं दादू माझ्यापेक्षाही लहान. मी चौथ्या-पाचव्या वर्षी सहज करून टाकत असलेल्या गोष्टी त्याला आठव्या वर्षीही यायच्या नाहीत. पण कोणतंही म्युझिक लागलं की, त्या तालावर खूपच मस्त थिरकायचा. अमिताभ बच्चनचा कोणताही सिनेमा लागला की, हे महाशय बसलेच टीव्हीसमोर. त्याच्याबरोबर असणारी हिरॉईन बघून म्हणायचा, ‘‘ती ना ताई आहे त्याची.’’
अमिताभसारखं जसंच्या तसं नाचून दाखव म्हटलं की स्वारी खूष.
बाबांसारखा हातात पेपर घेऊन बसायचा. त्यांचा चश्मा हळूच लावायचा आणि इतर कुणाचंही लक्ष गेलं की खुदुखुदु हसत बसायचा. हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या टेबलखुर्चीवर बसून चहा प्यायचा म्हणजे त्याचा चेहरा जो काही फुलायचा. त्याची अंघोळ, त्याचं कपडे बदलणं, त्याचं खेळणं, त्याचं त्याच्या स्पेशल शाळेत जाणं, आल्यावर खेळायला जायची ती लगबग, सगळे सोहळेच असायचे आमच्या घरात.
मी दादूपेक्षा चार वर्षांनी लहान होतो. हे सगळं बघतच वाढलो. पण कशी कोण जाणे, दादूबद्दल कधी असूया वाटलीच नाही मला. आई-बाबा त्याच्याकडे जास्त लक्ष देतात, हे मला कधी त्या वयातही कधी खटकलं नाही. ते गृहीत धरतच मी बहुतेक वाढलो होतो आणि आता अचानक ते चैतन्यच हरवलं होतं. सकाळी उठल्यावर दादूची कोणतीच कामं करायची नाहीयेत… मग करायचं काय हा प्रश्‍न पडायचा आई-बाबांना.
बाबांनी हळूहळू ऑफिसला तरी जायला सुरुवात केली आणि मी शाळेत. पण आईचं काय…
दादूचे कपाटातले कपडे, त्याची खेळणी बाहेर काढून दिवसभर त्यांच्याकडे बघत बसायची ती.
‘नीट जेवशील ना रे बाळा, रात्री लागली का झोप चांगली’, असं स्वत:शीच बोलत राहायची.
तिला तिच्याच काय आमच्याही असण्याचं भान नसायचं. रोज रात्री बाबा घरी आले की ‘दादूला नाही आणलंत’, हा प्रश्‍न असायचा.
त्या सगळ्या काळात मी कसा जगत होतो कुणास ठाऊक. बाबा तर असेच जड पावलांनी ऑफिसला जायचे आणि यायचे. सुरुवातीला आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जायचं, पोलीस स्टेशनला फेरी मारायची, दादर स्टेशनचा परिसर पिंजून काढायचा हे त्याचं व्रतच झालं होतं. मग हळूहळू ते आणखी हताश होत गेले आणि त्यांनी ते सगळं करणं अचानक सोडूनच दिलं.
बाबा असे हताश होत गेलेले. आई दिवसेंदिवस खंगत चाललेली. माझ्याशी तर तिचं बोलणंही बंद झालं. जणू काही मी नव्हतोच अस्तित्वात. बाबा कसंबसं घरातलं जमेल तसं करायचे. मला जेवायला घालायचे. शाळेत पाठवायचे. आईला डॉक्टरकडे घेऊन जायचे. त्यांच्या ऑफिसला जायचे. सुरुवातीला फेर्‍या मारणारे आत्या, काका, मावशा तरी किती दिवस येणार… हे सगळं असं जेमतेम दोन वर्षे चाललं आणि एक दिवस अचानक आईही गेली.
खरंतर अचानक तरी कसं म्हणणार… आपण ज्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं त्यालाच ऐन कसोटीच्यावेळी आपण हरवून बसलो. आता सगळ्या उघड्या जगात त्या अश्राप जीवाचं काय झालं असेल, या कल्पनेनंच ती पोखरत गेली होती. त्यात मुलांना पळवून नेऊन त्यांचं कायकाय करतात याच्या कहाण्या ऐकलेल्या. दादूसारख्या दोन वर्षांच्या मुलाचा आयक्यू असलेला पोर अशा लोकांच्या हातात सापडला असेल तर त्याचं काय झालं असेल या कल्पनेनंच तिचं पाणीपाणी व्हायचं.
तिचं ते असं रोजचं झिजत जाणं बघूनच बाबा बहुतेक त्यांची वेदना गाडून ठेवून उभे राहिले असावेत. माझ्यासाठी. मला रोजचं घरातलं हे सगळं दिसत होतं. कळत होतं. दादू हरवण्याचं दु:ख अर्थातच मलाही होतं. ती वेदनाच होती आमच्या तिघांचीही. पण शाळेत जायचो, मित्राबरोबर असायचो. सोसायटीतल्या कुणाकुणाकडे, आत्याकडे, काकूकडे असायचो. त्यामुळे माझ्या वेदनेवर काळाची हळुवार फुंकर घातली गेली. आईची मरणाने सुटका केली. बाबा मात्र तसेच. पण सगळा भूतकाळ गाडून टाकल्यासारखे. मला सगळं कळायचं आणि कळायचंही नाही असं काहीतरी झालं होतं.

त्या दिवशी सकाळी सकाळी मी कुठेतरी चाललो होतो. नेहमीप्रमाणे एकटाच. सकाळी सात-आठची वेळ.
सुरेख ऊन पडलेलं. तुरळक रहदारी. निवांत रस्ता. तेवढ्यात समोरचं दृश्य बघितलं आणि मी थबकलोच.
छोटी छोटी दोन मुलं होती ती. एक असेल पाच-सहा वर्षांचा आणि दुसरा आठ-नऊ वर्षांचा. मळके कपडे. त्यांच्या दोघांच्याही खांद्यावर निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या मोठ्या थैल्या होत्या. कचरापेटीत कागद, काच गोळा करतात ना त्यापैकी मुलं होती ती. त्यातला मोठा धाकट्याला रस्त्यावर सापडणार्‍या कागदांपैकी कुठला कागद घ्यायचा, कुठला नाही हे दाखवत चालला होता. जणूकाही धाकट्याचं ट्रेनिंगच चाललं होतं. ते बघून मी जागच्या जागी खिळून उभा राहिलो.
मला माझी आणि दादूची जोडीच आठवली. आम्ही खेळायचो, दंगामस्ती करायचो तर आमचं केवढं कौतुक व्हायचं आणि इथं तर त्याच वयाच्या मुलांचं हे काय चाललं होतं. कचरापेटीतून कागद कसा निवडायचा याचं दहा वर्षांचा भाऊ त्याच्या पाच-सहा वर्षांच्या भावाला ट्रेनिंग देत होता.
पुढे जाऊन त्यांना नाव विचारावं, त्यांच्याशी बोलावं, असंही क्षणभर वाटलं, पण मी तसाच पुढे निघून आलो. पण त्या दृश्यानं काही माझी पाठ सोडली नाही. बरेच दिवस माझ्या डोळ्यांसमोर तीच दोन मुलं येत राहिली. हळूहळू त्यांचे चेहरे दिसेनासे होऊन त्या जागेवर मला मी आणि दादू दिसायला लागायचो आणि मी दचकायचो.
‘काय हे, काय बघितलं आपण’, असं वाटायचं.
मग मला हळूह़ळू ही सवयच लागली. कागद, काच गोळा करणार्‍या, कचरापेटीच्या आसपास असणार्‍या मुलांचे चेहरे निरखायची.

नीतूनं मला सांगितलं होतं, आज तुला एका स्पेशल माणसाला भेटवायचंय. संध्याकाळी नक्की भेट. संध्याकाळी तिच्या ऑफिसवर गेलो तर ती खांद्याला बॅग अडकवून माझी वाट बघत उभीच होती. मग आम्ही दोघंही बोरिवलीला एका घरी गेलो.
‘‘हे मनसुखलाल कामदार’’ नीतूनं माझी ओळख करून दिली.
गोरापान, उंचेला. साधारण पासष्टीचा माणूस. त्यानं दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला. मीही केला.
‘‘यांचं काम फार इंटरेस्टिंग आहे अवि.’’ नीतू म्हणाली.
हे मूळचे सिंधमधले. फाळणीच्या वेळी भारतात, मुंबईत आले. निघाले होते कुटुंबाबरोबर, पण एकटेच येऊन पोहोचले. वाटेत अगदी मिळेल त्या अन्नावर कशीबशी जुगराण करत इथे पोहोचले.
‘‘काका, असं करा ना, तुम्हीच सांगा ना तुमच्या कामाविषयी…’’
‘‘काय सांगू बेटा, आजही ते दिवस आठवले की गलबलून येतं. कोण कुठे कुठे गेले काय माहीत. मी असा इथे पोहोचलो येऊन. मी माझ्या मातीपासून, माझ्या माणसांपासून तुटलो, पण तेव्हा ठरवलं, मी माझी दुनिया परत उभी करू शकलो, कधी आयुष्यात बरे दिवस आले, तर दुनियेसाठी मी काहीतरी करणार.’’
मग… मी न राहवून विचारलं.
अरे ते गेली पाच वर्ष त्यांनी आपला सगळा व्यवसाय मुलांच्या हातात सोपवला आहे आणि ते रस्त्यावरच्या माणसांसाठी काम करतात.’’
‘‘हां, बेबी, थांब असं नको सांगू. मला नीट सांगू दे.’’
‘‘बेटा, मी ना हे सगळे असे रस्त्यावर भणंग फिरणारे लोक असतात ना, त्यांना पकडून माझ्या घरी घेऊन येतो. माझ्या या बिल्डिंगमागे नळ आहे. तिथं त्यांना अंघोळ घालतो. म्हणजे त्यासाठी माणूस ठेवला आहे. मग त्यांना नीट खायला-प्यायला देतो. इथे जवळ एक आश्रम आहे, तिथे नेऊन ठेवतो. त्यांच्या मदतीने औषध पाणी केलं जातं. पंधरा दिवस महिनाभरानंतर या बिचार्‍या लोकांना आपण कोण, कुठून आलो, हे सगळं आठवायला लागतं. म्हणजे प्रत्येकाला आठवतं असं काही नाही. पण आतापर्यंत पंचाहत्तर टक्के लोकांना आठवलं आहे. खाणं वगैरे नीट मिळायला लागलं, औषधं सुरू झाली की त्यांची मानसिक अवस्था पण हळूहळू सुधारायला लागते. मग ते हळूहळू सांगायला लागतात…’’
‘‘मी आंध्रमधला. पंधरा वर्षे झाली, नोकरी शोधायला, सिनेमात काम करायला कोणत्याही कारणाने मुंबईत आलो. आधी वाटायचं, सगळं सहज होऊन जाईल. माझे पैसे मारले गेले, कागदपत्रं हरवली. काम मिळत नव्हतं. घरी तरी परत कसं जायचं? हळूहळू मनावर परिणाम होत गेला. काहीच समजायचं नाही.
प्रत्येकाची कहाणी थोड्याफार फरकानं सारखीच असायची. मग मी त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडून येतो.’’
‘‘कुठे?’’
‘‘कुठेही… जिकडे त्यांचं घर असेल तिकडे… ओडिशा, मध्य प्रदेश, अगदी कोलकात्यापासून बर्‍याच लांब खेड्यातही मी एकाला सोडून आलो आहे.’’
‘‘कसे जाता तुम्ही?’’
‘‘ रेल्वेनंं… माझं हे काम बघून रेल्वेमंत्री जयंत नाईकांनी मला फर्स्ट क्लासचा दोन माणसांचा पास दिला आहे.’’ ‘‘असा पंधरा वर्षांनी आपला माणूस घरी आलेला बघून घरच्यांना काय वाटतं काका?’’ मीही आता काकावर आलो होतो.
‘‘आनंदानं रडतात. काय सांगू तुला… एक उदाहरण तर असं आहे की तूही रडशील. अरे असाच एक पस्तीस वर्षांचा तरुण आमच्या भागात कचरापेटीवर नवीन दिसतो आहे, अशी खबर मला लागली होती. मी माझ्या माणसांना घेऊन त्याला पकडून आणलं, अंघोळ-बिंघोळ घातली. केस कापले. तो अगदी मतिमंद मुलगा होता. त्याला त्याचं नावदेखील सांगता येत नव्हतं. त्याच्यावर औषधं सुरू केली.
आमच्या कुणाच्यातरी लक्षात आलं की त्याच्या हातावर एक नंबर गोंदला आहे. एसटीडी कोडही आहे. टेलिफोन बूथवाल्यानं सांगितलं की, तो चेन्नईमधला कोड आहे. त्या नंबरवर मी एक दिवस फोन लावला, तर त्यांना माझी भाषा येईना आणि मला त्यांची. मग मी एक तमिळ येणार्‍या माणसाला शोधून आणला. त्याला फोनवर बोलायला लावला तर तो तिथल्या एका प्रसिद्ध उद्योगपतीचा फोन होता. दहा वर्षांपूर्वी त्याचा मतिमंद मुलगा चेन्नईमधूनच हरवला होता. तो आम्हाला सापडला आहे, म्हटल्यावर तो माणूस फोनवर रडायलाच लागला. दुसर्‍या दिवशी ते लोक त्याचा फोटो वगैरे ओळखीचा पुरावा घेऊन आले आणि तू विश्‍वास ठेवणार नाहीस. पण जो गेली दहा वर्षे या पद्धतीने उकिरड्यावर जगत होता, तो मुलगा विमानानं घरी परतला.’’
माझ्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं. माझा दादूही येईल असाच परत, पण त्याच्या हातावर किंवा शरीरावर असे ओळखीचे कुठलेच पुरावे नव्हते. का नाही ठेवले आम्ही असे काही पुरावे… मला त्या क्षणी अगदी भरून आलं… मी ढसाढसा रडायलाच सुरुवात केली.
*************************************************************************************************************
वैशाली चिटणीस
साप्ताहिक लोकप्रभामध्ये वरिष्ठ मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. ‘बूधन बोलता है’ या दक्षिणछारा यांच्या पुस्तकाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.
Email: vaishali.chitnis@gmail.com
Mob: 99303 60502

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *