संपादकीय

तेजाचे पर्व

दिवाळीनं सारा आसंमत उजळला आहे आणि नव्या वर्षाच्या आवर्तालाही प्रारंभ झाला आहे. जगण्याचं प्रत्येक अंग आणि सगळेच संदर्भ झपाट्यानं कुस बदलू लागले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि न्यूजर्सी ते सिडनीपर्यंत माणूस गाव, देश आणि खंडात विभागला असला तरी तो एक ग्लोबल खेड्यात जगतो जगतो आहे. आणि एक समान धाग्याने जोडला आहे. त्याचं जगण येशूच्या क्रुसापासून लुंबिनी वृक्षाखालच्या बोधीसत्व बुद्धांपर्यंत वेदनेच्या आणि चिंतेच्या जातकुळीत हे सारे एकच आहे. अनादीकाळापासून भाकरीच्या शोधातला माणूस अनेक संक्रमणातून जातो आहे. आता या सगळ्यांचे संदर्भ कुस बदलायत. भाकरीची लढाई आता आण्विक आणि जैविक युद्धापर्यंत कशी पोहोचली हे काळाच्या आवर्तालाही समजलंच नाही.
मित्रांनो निराशावादाचा सूर मला आळवायचा नाही. पण भाकरी हवी, शांतता हवी की दहशतवाद हे ठरवायचा हा निर्वाणीचा काळ मात्र आता आपल्या दाराशीच येऊन ठेपला आहे. मोहक फुलांच्या गुच्छात काटेही लपले आहेत. आणि त्यांचा मोहक गंधही साद घालत आहे. या आवर्तात आपण सृजनशील आणि सकारात्मक साद घालूया आणि विशुद्ध आनंद वाटुया..
‘चौफेर समाचार’ दिवाळी अंक गेली पंधरा वर्षे अविरतपणे आम्ही प्रकाशित करीत आहोत. या आनंद उत्सवात आजवर आपले जाहिरातदार, वाचक, लेखक यांनी मोलाची साथ दिली. आपल्या पाठबळावर आम्ही १६व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. यंदाच्या अंकात जगण्याच्या अनेक अंगांना स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कथा, ललित, इतिहास, विज्ञान, चित्रकला, दृश्यकला, अनुभवकथन ते कविता अशा विविध विषयांसह प्रज्ञावंत आणि ताज्या दमाचे नवे लेखन आणि त्यांची सर्जनशीलता या अंकात पानोपानी बहरली आहे. ही वैचारिक वाङ्मयीन मेजवानी आपणासमोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.
दिवाळीचा उजेड तर आसमंतात पसरलाय. तो आता अंतःकरणातही घेऊया. मनातून उजळुया. हे तेज दुसऱ्यालाही देऊया… शुभेच्छा…!

अरुण नाईक
अतिथी संपादक

arunsakal@gmail.com