श्रमिकांचा सिनेमा

अमोल उदगीरकर
हल्ली सर्वत्र काही विशिष्ट भित्तिपत्रके लक्ष वेधून घेतात. भोजपुरी नट-नट्यांचे स्टेज शो सध्या ठिकठिकाणी जोरात आहेत. जरा खोलात जाऊन चौकशी केली, तर असं आढळून आलं की या कार्यक्रमांना तुफान गर्दी लोटत असते. तिकिटांचे रेट सर्वसामान्य श्रमिक कामगारांना परवडतील असेच असतात. या कार्यक्रमांना स्थलांतरित उत्तर भारतीय श्रमिक वर्ग हजेरी लावतात. या श्रमिकांच्या सिनेमाच्या अंतरंगात डोकावताना दिसलेले अनेक पैलू…
*************************************************************************************************************
भोजपुरी चित्रपटसृष्टी
पूर्व उत्तर प्रदेश, पश्‍चिम बिहार आणि दक्षिण नेपाळ या भौगोलिक प्रदेशांत भोजपुरी भाषा बोलली जाते. त्याशिवाय भोजपुरी भाषिक मोठ्या प्रमाणावर ब्राझील, फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन देशांमध्ये विखुरले आहेत. पहिला भोजपुरी सिनेमा ‘गंगामैया तोहे पियारी चढईबो’1963 मध्ये प्रदर्शित झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती आणि बिहारी भाषिक राजेंद्र प्रसाद ह्यांची इच्छाशक्ती आणि प्रयत्न यासाठी कारणीभूत ठरले. हा चित्रपट चांगला चालला. भोजपुरी सिनेमाचं ‘गंगामैया’सोबत असणारं फिक्सेशन अजूनही चालूच आहे. अजूनही सरासरी दहापैकी तीन चित्रपटांच्या नावामध्ये गंगामैया हटकून हजर असतेच, पण भोजपुरी फिल्म इंडस्ट्री म्हणून आज जे काही बघतो, त्याचा उदय व्हायला साल उजडावं लागलं 1980 पर्यंत भोजपुरी फिल्म्स मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने बनायला लागल्या. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘नदिया के पार’ चित्रपटाने भोजपुरी चित्रपट देशभर पोहोचविला. पण, कथानकांमधला तोच तोचपणा, फसलेली आर्थिक गणितं, हिंदी चित्रपटांचं अतिक्रमण या कारणांमुळे दहा वर्षांच्या आतच ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री मरणपंथाला लागली. याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टी यांच्यात खूप साम्यस्थळं आढळतात. मराठी सिनेमादेखील मध्यंतरी काही काळ अडचणीच्या अवस्थेत होता. भोजपुरी सिनेमाच्या पतनाला जी कारणं कारणीभूत होती, तीच थोड्याफार प्रमाणात मराठी सिनेमाला लागू होती. पण, ‘श्‍वास’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेमाने कात टाकली. तसाच प्रकार भोजपुरी सिनेमाच्या बाबतीतही घडला. 2001 साली ‘सैंया हमार’ चित्रपट प्रदर्शित झाला. रवीकिशन अभिनित या चित्रपटाने तिकीट खिडकीवर तुफान धंदा केला.
या चित्रपटामुळे मृतप्राय भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीला नवसंजीवनी मिळाली. नंतर भोजपुरी सिनेमाने कधी मागे वळून पाहिलं नाही. आपल्या प्रेक्षकांना काय पाहिजे आहे, याचा आता भोजपुरी चित्रपटांच्या निर्माते आणि दिग्दर्शकांना अंदाज आला होता. त्यानुसार मागणीनुसार पुरवठा या नियमाने भोजपुरी चित्रपटांच्या निर्मात्यांनी घाऊक प्रमाणावर चित्रपटांची निर्मिती सुरू केली. प्रेक्षकांना खूश करण्याच्या या अट्टाहासातून भोजपुरी चित्रपटांचं स्वतःचं असं एक टेम्प्लेट तयार झालं आहे. भोजपुरी चित्रपटांचा प्रभाव देशभर वाढत आहे. भोजपुरी नट-नट्या अनेक जाहिरातींमध्ये दिसतात. ‘बिग बॉस’ हा सध्याचा सर्वांत लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. त्यात दरवर्षी एक तरी भोजपुरी सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून हमखास हजर असतो. निरहुआ, मनोज तिवारी, रवीकिशन हे आघाडीचे भोजपुरी नट, तर मोनालिसा, राणी चॅटर्जी या भोजपुरी नट्या देशभर ओळखल्या जातात. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गजांनी भोजपुरी चित्रपटांत भूमिका बजावल्या आहेत. नुकतेच प्रियांका चोप्रासारखी आघाडीची अभिनेत्री भोजपुरी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उतरली आहे.

6-1
भोजपुरी लोक म्हणजे मस्तमौला. आयुष्याचा रसरसून उपभोग घेणारे. भोजपुरी बोलल्या जाणार्‍या भागातली अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. बहुसंख्य जनता शेतात घाम गाळणारी. श्रमिक. या लोकांना दोन गोष्टींत रस असतो. पहिलं म्हणजे राजकारण. तिथली लहान पोरंदेखील कोणत्या जातीचं किती मतदान किती आहे, याचे आकडे सटासट तोंडावर फेकून मारतात. दुसरं म्हणजे गाणंबजावणं. दिवसभर शेतात काबाडकष्ट केल्यावर विरंगुळा म्हणून या भागात रात्री गाण्याचे आणि नृत्याचे कार्यक्रम होत. चित्रपट या माध्यमाने भोजपुरी भाषिकांना मनोरंजनाचा अजून एक सक्षम पर्याय दिला आहे. भोजपुरी चित्रपटांमध्ये जे गीत, संगीत असतं, त्याच्यावर या रात्रीच्या जलशांचा मोठा प्रभाव आहे. भोजपुरी लोकांना जे देशी मेलोडियस संगीत आवडतं तसंच भोजपुरी चित्रपटांमधून ‘सर्व’ केलं जातं. दिवसभराच्या श्रमापासून आणि सतत भासणार्‍या आर्थिक विवंचनापासून चार घटका सुटका, असा भोजपुरी प्रेक्षकांचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. त्यांना ते सामाजिक संदेश वगैरे देणारे कंटाळवाणे चित्रपट नको असतात. भोजपुरी सामाजिक व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे. कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय पिढ्यान्पिढ्या घरातले पुरुष घेत असतात. भोजपुरी चित्रपटांमध्येही या पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. भोजपुरी चित्रपट हे नायकप्रधान असतात. तेच गाणी गातात, पोरी पटवतात, खलनायकाला धू धू धुतात आणि बरंच काही करतात. या चित्रपटांमध्ये नायिका फक्त शो पीस असते. चांगले कपडे घालायचे आणि नाचायचं, एवढंच काम ते काम असतं तिला. नायिकेला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनलाय असं सहसा घडत नाही.
भोजपुरी चित्रपटांचं ‘टेम्प्लेट’
सामान्यतः भोजपुरी चित्रपट म्हटलं की बुद्धिजीवी वर्ग नाक मुरडतो. भोजपुरी चित्रपट म्हणजे अश्‍लील गाणी, नायिकांचे अनावश्यक अंगप्रदर्शन, बटबटीत संवाद, तेच तेच दळण दळणारी कथानकं, अशी या चित्रपटांची प्रतिमा देशभर आहे. खरं तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये तरी काय वेगळी परिस्थिती आहे? पण, नायकाला ‘लार्जर दॅन लाईफ’ अवतारात दाखविणारे मसाला चित्रपट देशाच्या इतर भागांत बनत असले तरी तिथे प्रायोगिक सिनेमाचे अस्तित्वदेखील आहे. काही तरी ‘हटके’ करण्याच्या इर्ष्येने झपाटलेली मंडळी प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीमध्ये आढळतात. पण, भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये असे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देखील नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे, हे जाणून बहुसंख्य प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात भोजपुरी चित्रपटांचा हातखंडा आहे. चित्रपटाची निर्मिती करताना भोजपुरी चित्रपटांचे निर्माते -दिग्दर्शक कायम पिटातला प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवतात. सिंगल स्क्रीनमध्ये चित्रपट पाहणारा प्रेक्षक हा त्यांच्या धंद्याचा केंद्रबिंदू आहे. यात रोजंदारीवर जगणारा, कष्टकरी श्रमिक वर्ग ज्याला चित्रपटात आउट अँड आउट मनोरंजन हवं असतं, अशा प्रकारचा प्रेक्षक अपेक्षित असतो . याबाबतीत भोजपुरी चित्रपटांचं मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याने मागच्या दशकात विकसित केलेल्या ‘बिझनेस मॉडेल’शी साधर्म्य आढळते. या चित्रपटांचा दर्जा काय होता, हे अर्थातच सांगायची गरज नाही. या चित्रपटांमध्ये कुठल्याही वैश्‍विक जाणिवा झळकत नव्हत्या. चित्रपट माध्यमांची सामाजिक जबाबदारी वगैरे शब्दबंबाळ गोष्टींशी त्यांचा दुरान्वये संबंध नव्हता. आपल्या प्रेक्षकाला काय पाहिजे ते द्यायचं आणि नफा कमवायचा, या निव्वळ आणि निव्वळच व्यावसायिक उद्देशातून हे सिनेमे बनत होते. यातल्या बहुतेक चित्रपटांत मिथुन एक तर प्रामाणिक सरकारी अधिकारी असे किंवा श्रमजीवी वर्गातला (मिथुनचा मोठा चाहतावर्ग यातलाच आहे) असे. सर्व पात्रं काळ्या आणि पांढर्‍या रंगात असत. नायिका बहुतेक आखीव, रेखीव आणि भरीव अशी दाक्षिणात्य अभिनेत्री असे. काळी कृत्ये करणार्‍या खलनायकाचा एकदा नायकाने एकहाती नि:पात केला की, चित्रपटाचं सूप वाजत असे आणि प्रेक्षक पैसे वसूल झाले, या कृतार्थ भावनेने बाहेर पडत असे. भोजपुरी चित्रपटही हीच रुळलेली वाट चोखाळत आहेत. मात्र, काही वेगळं किंवा यथार्थ न करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भोजपुरी चित्रपटसृष्टीला मारक ठरत आहे. त्याच त्याच विषयावरचे तेच तेच कथानक आलटून पालटून वापरणारे चित्रपट पाहून भोजपुरी प्रेक्षक ह्या सिनेमापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रायोगिक चित्रपट हे ‘बॅलन्सिंग ऍक्ट’साठी जसे महत्त्वाचे असतातच तसे ते चित्रपटसृष्टीच्या गुणात्मक वाढीसाठीसुद्धा आवश्यक असतात. नजीकच्या भविष्यकाळात ही परिस्थिती बदलावी ही अपेक्षा. चित्रपट हा प्रेक्षकाभिमुख तर असावाच, पण त्यासोबतच तो काळानुसार योग्य ते बदल स्वतःमध्ये घडवून आणणारा असावा तरच तो टिकतो, हे भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या धुरिणांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

6-2
पाटणा विरुद्ध मुंबई
भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे नट, तंत्रज्ञ, निर्माते मुंबई आणि पाटणा या दोन शहरांत राहतात. या दोन शहरांत राहणार्‍या लोकांचा भोजपुरी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. ही भोजपुरी चित्रपटसृष्टीवर कोणाचे वर्चस्व असावे याचीपण सुप्त लढाई आहे. बॉलिवूड ही हिंदी चित्रपटसृष्टी असूनदेखील त्याचे मुख्य केंद्र ‘हिंदी हार्टलँड’मध्ये नसावे, याची खंत पटण्यामध्ये राहणार्‍या लोकांमध्ये दिसते. मुंबईमधल्या बिहारी नसलेल्या तंत्रज्ञांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आपण ‘उपर्‍यांवर’ अवलंबून आहोत, ही भावना स्थानिक निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये बळावत चालली आहे. शिवाय बॉलिवूड चित्रपटांकडे ते आपले प्रतिस्पर्धी आहेत या दृष्टिकोनातून पाहिले जाते. चित्रपट निर्मितीसाठी लागणार्‍या मूलभूत सुविधांचा अभाव हा बिहारमधला मोठा प्रश्‍न आहे. त्यासाठी त्यांना मुंबईच्या तोंडाकडे बघावे लागते. त्यासोबतच शूटिंग करण्यासाठी बिहार ही काही फारशी सुरक्षित जागा मानली जात नाही. मुंबईवरचं आपलं अवलंबित्व कमी व्हावं म्हणून रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर बिहारमध्येदेखील मोठी फिल्म सिटी उभारण्याच्या हालचाली सध्या जोरात चालू आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बॉलिवूडचे स्वरूप होते त्याचे आजच्या भोजपुरी सिनेमाच्या स्वरूपाशी मोठ्या प्रमाणात साम्य आहे. सत्तरच्या दशकात बॉलिवूड अनियमित पतपुरवठा, आर्थिक अनियमितता, बेभरवशाच्या आर्थिक स्रोतांकडून आलेला पैसा या कारणामुळे कुप्रसिद्ध होते.
मराठी चित्रपटसृष्टीशी तुलना
मराठी आणि भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही साम्य आढळतात. दोन्ही प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटसृष्टींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होत आहे. कधी कधी एकाच आठवड्यात या भाषांमधले चार चार चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. पण, मराठी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या आर्थिक उलाढालीत वाढ होताना दिसत असली तरी ह्या वाढीच्या दर्जात मुळातच फरक आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे स्वतःचे असे काही प्रश्‍न असले तरी मराठीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग होताना दिसतात. ‘कोर्ट’सारखा मराठी चित्रपट ऑस्करला भारतीय प्रवेशिका म्हणून गेला होता. ‘फॅन्ड्री’, ‘किल्ला’, ‘सैराट’ आणि इतर अनेक मराठी चित्रपटांनी प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. मराठी चित्रपट अनेक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवत आहेत. भोजपुरी चित्रपट या परीप्रेक्षात कुठे आहेत? तर कुठेच नाहीत, हेच उत्तर ऐकायला मिळेल. एखादा भोजपुरी चित्रपट फिल्म फेस्टिव्हल गाजवत आहे, असे चित्र औषधालादेखील आढळत नाही किंवा एखाद्या भोजपुरी चित्रपटावर समीक्षकांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे, असेदेखील आढळत नाही. उच्चभ्रू प्रेक्षक वर्गसुद्धा भोजपुरी चित्रपटांपासून हातभर अंतर राखून आहे. पण, भोजपुरी चित्रपटांकडे जे आहे, ज्याचं स्वप्नच फक्त मराठी चित्रपटसृष्टी पाहू शकते, ती गोष्ट म्हणजे प्रचंड लोकाश्रय. ‘सैराट’सारखे काही वेचक अपवाद वगळता तिकीट खिडकीवर उडालेली प्रेक्षकांची झुंबड ही मराठी चित्रपटांसाठी दिवास्वप्नच ठरली आहे. भोजपुरी चित्रपटांच्या यशाची सरासरी मराठी चित्रपटांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. भोजपुरी चित्रपट मोठ्या प्रमाणावर महसूल कमवत असल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा तिथल्या नट मंडळींना आणि तंत्रज्ञांना होत आहे. आज रवीकिशन, मनोज तिवारी, निरहुआसारखे आघाडीचे अभिनेते प्रत्येक चित्रपटामागे पन्नास ते साठ लाख रुपये मानधन आकारतात. तिथले दिग्दर्शक आणि तंत्रज्ञपण चांगले पैसे कमावतात. शिवाय वितरणाच्या साखळीचा महत्त्वपूर्ण भाग असणारे वितरकसुद्धा चांगले पैसे मिळवतात. अनेक मराठी कलावंत पैशासाठी भोजपुरी चित्रपटांकडे वळलेले दिसतात. इतकंच काय, भोजपुरी चित्रपट निर्मात्यांमध्ये मराठी भाषिक नावं आढळतात. थोडक्यात, काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी चित्रपटांना ‘क्लासेस’च्या पसंतीची मोहोर आहे, तर भोजपुरी चित्रपट ‘मासेस’च्या मनावर राज्य करत आहेत, असं एक सरसकटपणे विधान करता येईल. थोडक्यात काम, तर दोन्ही फिल्म इंडस्ट्रीजनी एकमेकांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
भोजपुरी चित्रपटांची जी एक ‘विशिष्ट’ इमेज तयार झाली आहे, त्याचा फटका त्यांना कसा बसत आहे, यावर प्रकाश टाकणारा हा किस्सा. रवीकिशन आणि मनोज तिवारी या आघाडीच्या भोजपुरी अभिनेत्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली. रवीकिशन कॉंग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशमधून, तर मनोज तिवारी भाजपच्या तिकिटावर दिल्लीमधून उभे होते. त्यावेळेस उसळलेल्या मोदीलाटेत रवीकिशन पडला, तर मनोज तिवारी दिल्लीमधून भरघोस मतांनी जिंकला. टेक्नोसॅव्ही असणार्‍या नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लगेच मनोज तिवारीचं अभिनंदन केलं. पण, सोबतच एक आज्ञावजा सूचना केली. ती म्हणजे, यापुढे मनोज तिवारी यांनी डबल मिनिंग किंवा अश्‍लील अशी भोजपुरी गाणी करू नयेत. पंतप्रधान मोदी हे काही त्यांच्याचित्रपटप्रेमाबद्दल फारसे प्रसिद्ध नाहीत. पण, त्यांच्या कानापर्यंतदेखील भोजपुरी चित्रपटांची ‘प्रसिद्धी’ गेली होती म्हणजे बघा. मात्र एक आहे. श्रमिक वर्गाला त्याच्या हक्काचं आणि त्याला हवं असलेलं मनोरंजन वाजवी किमतीमध्ये देण्याचं श्रेय भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीला द्यावंच लागतं. भोजपुरी सिनेमाचा इतिहास हा एकप्रकारे भारतीय सामाजिक वास्तवाचाच इतिहास आहे.अनेक पिढ्यांचं मनोरंजनच नव्हे, तर सिनेसाक्षरता जोपासण्याचं काम या सिनेमांनी केलं. भोजपुरी सिनेमानं तर ए आणि बी मधली दरीच मिटवून आजही हा सिनेप्रकार जिवंत ठेवलाय. भोजपुरी कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांनी खरंतर वंचितांचा समांतर सिनेमाच घडवला. त्याचं समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र लिहिलं जाण्याची नितांत गरज आहे, म्हणून हा लेख प्रपंच.
*************************************************************************************************************
अमोल उदगीरकर
लहान पण परभणीमध्ये. शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात वास्तव्य. पत्रकारितेची पदवी. मीडिया कन्सल्टंट म्हणून काम. विविध नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेखन.
Email: amoludgirkar@gmail.com
Mob: 99213 50455

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *