तांडव

अनंत खासबारदार
बाहेरच्या सृष्टीचाच धीर जणू सुटला होता. धीरानं-नेटानं आजवर उभी राहिलेली झाडं… या तांडवात कस्पटासारखी! उन्मळून-विखरून… विचित्र आवाजात तुटणारे त्यांचे बुंधे… त्यांचा आवाज त्यातच विरून जाणारे आणि चित्कार, पक्षांचे त्यानं गिळलेल्या सगळ्यांच्याच घुसमटीचे, तडफडीचे आवाज. आणि एक कुंद वास पसरून राहिलेला…
*************************************************************************************************************

शिवलीलामृताची पोथी कपाटात ठेवून माई वळाली…. मघाशीच दिवा अचानक शांत झाला होता. पोथीतल्या टाईपवरून नजर फिरतानाच, मघाशीच त्यांना मंद वाटलं. ते त्यामुळचं! वर्षानुवर्षे पाठ असणारं शिवलीलामृत! पण समोर जीर्ण पानं असली की सवयीला दिलेला तो एक नमस्कारच ठरायचा.
ती पोथी नव्हतीच जणू त्याच्या देव्हार्‍याचंच एक अगदी कागदी वैभव! आप्पांनी एक हजार वेळा सांगितलं… नव्या मोठ्या टाईपातलं वाच! पण ती पोथी समोर आली की आपोआपच उच्चार बाहेर पडायचे! जशी पोथी सवयीची… तसंच या घरात पाऊल टाकल्यापासूनचं सारं जगणं! साडी जशी विरत जाते हळूहळू तसं! साडीच्या घट्टवीणीच्या, वेलबुट्टीच्या, चमचमत्या पदरातून धागे जसे नंतर काळे पडत जातात… तसं… पहिला भर ओसरून गेलेल्या पारिजातकाच्या झाडासारखं… सारं!
आप्पाशी झालेला संसार पोथीसारख्याच… छापील… पुढच्या पानावर काय याची उत्सुकता संपलेलं!
गावापासून दूर असणारं घर… झाडी… पलीकडं असणारी वेताळटेकडी. नाही म्हणायला हवा चांगलीच होती इथं! पण माणसंच नाहीत… त्यात आप्पांचा हा असा स्वभाव…
काय? रोज रोज तेच वाचतेस गं? काय उपयोग होतो का? हजारवेळा वाच… शंकर काय तुझं ऐकतो काय? आप्पांनी स्वयंपाक घरात येत येत नेहमीचेच शब्द उच्चारले! या शब्दांचीही सवयच झाली जणू…
नको ऐकू दे! एखाद्यानं नाही ऐकलं तरी आपण सांगत जायचं… हाक ऐकेल हो तो! नक्की ऐकेल! तिकडं पशुपतिनाथापर्यंत माझं बोलणं जायचं म्हणजे मलाच सारखं विचारावं लागणार ना? आणि नाही ऐकलं त्यानं तरी नाही दु:ख वाटणार आता!
आप्पांनी हातात बॅटरी घेतली… अन् काठी घेऊन ते परसदारी निघाले.
हळू जावा म्हणते मी! पावसानं निसरडं झालंय! गवत वाढलंय. अन् हो! दहा पावलांवर गेला की हळू जावा.. मुंग्यांचं वारुळ उठलंय त्या रानात! दिवेलागणीच्या वेळी जरा जपून माणसानं! आप्पांनी हातातल्या टॉर्चकडं चष्म्यातून पाहीलं. दोनवेळा बॅटरीची उघडझाप केली. माईच्या चेहर्‍यासमोर बॅटरी दोनवेळा ओवाळली आणि ते वळाले… माई बघत राहीली.
काळकुट्ट शरीर! पाठीवर जरा कुबडं आलेलं! सायकलच्या प्रवासानं अंगावर मांस असं धरलच नाही! पाडवा दिवाळीला पाट टाकून तेल लावताना पाठीवर आपला हात गेला की जाणवणारी कृशता… 40 वर्षांचा झालेला संसार… आल्याआल्या संपून गेलेलं माहेरपण! आप्पांच्या चक्रात अडकून गेलेलं स्वत:चं अस्तित्व!
त्यांची शिस्त, त्यांची माणसं, त्यांचा विचार, त्यांची इभ्रत, त्यांचे शब्द, त्यांची आवड-स्वभाव, जातकुळी.
विहिरीच्या आत डोकावलं तरी प्रतिबिंबावर तेच येतील अचानक असं वाटायचं!
माई पुन्हा आत गेली. आषाढाचा महिना, यावेळी आभाळ सतत कोसळतयं! श्रावणाच्या तयारीला गावात जायचं तरी एवढा पल्ला चालायचं जीवावर उठलंय! पिंडर्‍यातील वेदनांना काय? उन पावसाळा सारखंच या वयात!
देवघरातून येणार्‍या प्रकाशाकडं पाहून माईनं पुन्हा हात जोडले. इनमिन दोघांचाच तर स्वयंपाक! मुठभर तांदूळ उकडायला कितीसा वेळ? आणि आता जीभेसाठी अन्न नाहीच! उपासतपास, व्रतवैकल्य यातून शरीरालाही सवय लागली. आप्पांच्या खाकरण्यानं माईंनी न्हाणीत जाऊन गरम पाणी ठेवलं.
खडीसाखर देऊ?
आप्पांनी हातानच नको म्हणून न्हाणीघरात पाय ठेवला…
आता रेडिओ ऐकण्याचा कार्यक्रम! न चुकता! वर्षानुवर्ष! बाहेरच्या चटईवर हळूवार बसकणं मारत आप्पांनी कातडी आवरणातील ट्रॉन्सिस्टर लावला… आणि तसेच भिंतीला टेकून त्यांनी समाधी लावली…
दूरवरच्या शहरातील घटनांचं वर्णन, भजन, बाजारभाव, काहीही लागलं तरी संध्याकाळ ही अशीच. बाहेर रेडिओ आणि आप्पा. आणि आत माई!
उन्हाळ्यात आप्पा उघडेच. कंबरेला फक्त धोतर गुंडाळलेलं आणि पुस्तकानं वारा घेत घेत अशाच कित्येक सांजवेळा संपलेल्या. काहीच बोलायचे नाहीत. फक्त रेडिओ ऐकत रहायचं… प्रतिक्रिया नाही, गाण्यावर ताल धरणं नाही, ना गुणगुणणं! फक्त एकदाच त्यांनी ‘माई! ऐक गं- तुला आवडेल हे गाणं’ एवढंच म्हटलं होतं! गाणं विसरून गेलं – पण त्यांचे ते शब्द जसेच्या तसे कानावर होतेच!
रेडिओवरून काही सुचना सुरू होत्याच. आप्पांनी रेडिओला मागून थाप मारली दोन वेळा! अन् आवाज स्पष्ट आला! सातच्या बातम्या! हिमालयात झालेल्या भूकंपाचा हाहा:कार! घटनेचं वर्णन, आप्पांनी रेडिओ तसाच टेबलावर ठेवला! आणि माईसमोर आले! जरा लगबगीनेच!
ऐकलसं? ऐकलंस? तुझा महादेव जिथे राहतो? तिथं आता काहीही शिल्लक नाही! ऐक… दहा सेकंदात सारं ढासळलं! आणि तुझा शंकर पण! माईनं हातातली जपाची माळ खाली ठेवली.
तुला हजारदा सांगितलयं माई! जपजाप, उपासतपास, देवबीव सगळं झूट! बघ निसर्गापुढं तुझा पशुपतिनाथ अनाथ होऊन ढासळला… आणि हे सगळं सायन्समुळं आपल्याला समजतंय – या- या रेडिओमुळं दिडशे रुपयात! आहे तुझ्या शंकराजवळ ही हिंमत? माईनी आप्पांकडं थेट न पाहताच पाट मांडला, ताटं घेतली… शंभो शंभो असं पुटपुटतचं त्यांनी वाढून घेतलं…
आप्पा पहिल्यापासून असेच! थेट बोलणारे! मागंपुढं न पाहणारे आणि श्रद्धाहिन! हिशोबी नव्हे पण कोरडे! कशातही न रमणारे कोणावरही विश्‍वास नसणारे! या त्यांच्या विरळेपणाची सवय लागायला माईला बरेच कष्ट घ्यावे लागले! तुळशीकट्ट्यावर लावलेला दिवा जर विझला तर आप्पा सांगायचेच नाहीत किंवा सणासुदीला नुकत्याच काढलेल्या रांगोळीवरून पावलं टाकत थेट आत यायचे.
माणसाचे स्वभाव आणि वर्तणूक याचं गणित नेहमी उत्तरे शोधणारच असतं, जमवून घेत गेलं की या गणिताची शहर भाषा बनते. चुकीची, स्वत:ची. तडजोडीची. अबोल. आकड्यांच्या बेरीज वजा बाकीपेक्षा ही भाषा बरी असते. तसच.
जगात कित्येकांना मुलबाळ नसतं म्हणून का ते असे कोरडे जगतात? आप्पांसारखे? लग्नानंतर वर्षभरातच तालुक्याच्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आपल्याला.. माई! अवघड आहे हो!
ढासळलेल्या स्वप्नांना नंतर खूप शोधलं… आप्पा कोरडेच! रोज नव्या भिंतीमागं लपत गेले… पण जरब तीच, हट्ट तोच. असं पुरुषत्व असतं? कोंडून घेत घेत दुरावा वाढणारं? अगतिक? क्रूर? शुष्क?
ताटं आवरत माई आपणहून बोलली
असं कसं हो हे आक्रीत? आज कैलासवर काय काय घडलं असेल नाही? दूरवरून गेलेल्या आया-बायका, लहान पोरं, म्हातारी-कोतारी काय झालं असेल त्यांचं?
तांब्यातलं पाणी भांड्यांत ओतत आप्पा म्हणाले… त्यांच्या कर्मानं मेली असतील… अडाणचोट भाविक! कशाला जायचं तिथं! थांब! नव्या बातम्या ऐकून सांगतो हं तुला- किती मुर्ख लोक मेलेत ते!
तीळ तीळ कापत जाणारे शब्द. आप्पा इतक्या सहजतेने बोलतात? माईनं कष्टानं त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला… हातात माळ होतीच! पुन्हा मनात धावा करत त्या माजघराच्या उंबरठ्यावरच टेकल्या…
आज बाहेर खूप अंधार होता, दूरवरचे रस्त्यावरचे दिवे तर लागलेच नव्हते. संध्याकाळी झालेल्या पावसानं गार वारा, रातकिडे, बेडकांचं ओरडणं तिथं होतच… सवयीप्रमाणं! दोन दिवसांपूर्वीच घराकडं येणारा रस्त्यावरचा बांधही विस्कटला होता एवढा पाऊस! टेकडीकडेची भिंत मागच्या गणपतीला ढासळत गेलेली… नाही म्हणायला दिवाणखोलीत तेवढं कमी गळायचं… नाहीतर अख्खं घर टिपटपायचं! कोणासाठी दुरुस्ती? कोण राहणार इथं पुढं?
हौसेने लावलेल्या घोसावळ्याच्या वेल, सासर्‍यांचा मोडका जुनाट सागवानी पलंग, दोन चार तपेली आणि आपण माहेरुन आणलेलं वीणकाम- तेही आता विरून गेलेलं!
अरसिक संसाराची लक्तरंसुद्धा नाहीत इथं! कधी कधी म्हणून हौसेनं काही नाही आणलं! आणि मूल होणारचं नाही हे कळल्यावर एखाद्या मोडक्या यंत्राकडं बघावं तशी त्यांची नजर बनली.
गावकर्‍यांच्या नजरेत त्यांचा विक्षिप्तपणा चेष्टेचा तर होताच. पण माईंना भेटणारी प्रत्येक बाई उगाचंच कणवेनं काहीबाही विचारायची… नंतर तेही सवयीचं झालं…
जांभळ्या रंगाची, चंदेरी वेलबुट्टी असणारी साडी कधी श्रावणाच्या उन्हात झळाळलीच नाही. हनुवटीवरचे गोंदलेले तीन ठिपके, हळूहळू सुरकुतलेल्या कातडीत विरून पडले, जीभेची चव गेली… आरशाची सोबत गेली, उसवलेल्या, फाटलेल्या आकाशकंदिलासारखं विदीर्ण आयुष्य ओच्यात वेचत वेचत इथपर्यंत हा ओढलेला शरीराचा गाडा… टिकेल तोपर्यंत भरवसा…
दाटत जाणारी रात्र… दाटत जाणारे-गुंतत जाणारे धागे, बाहेर आप्पा रेडिओशी झटापट करत होते… कातडी कव्हर काढून आतील रेडिओशी काही करत होते…
अहो! त्यातले सेल असतील ना संपलेले! आता कसा लागेल तो? जादांचे तेच तर हे! उद्या आणायला सांगू! हणमंताला येईल तो!
अगं! अगं! पण आज हे अचानक कसे संपले?
म्हणजे आता सेलनं सुद्धा जाण्याआधी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं काय? माईंनी जरा हसतचं विचारले. झालेल्या धाडसानं पुढच्या आणात त्यांनी जीभ चावली सुद्धा!
आप्पांनी रेडिओ तसाच उघडा ठेवला आणि अस्वस्थ होऊन त्यांनी दिवाणखान्यातच येरझार्‍या मारायला सुरुवात केली… हात मागे बांधून त्यांची सावली मोठी होत जाई… चित्रविचित्र! जणू काही अभद्र आकारच रेषारेषातून माजघराच्या उंबरठ्यात येऊन जाताहेत! गतीनं, तिरक्या चालीनं त्यात आणि तडे गेलेल्या फरशा विस्कटलेले जमिनीचे चौकोन, आप्पांसारखे अस्वस्थ भारणारे!
या घरात पूर्वी पोस्टमन यायचा… दुरचे पाहुणे ख्यालीखुशाली कळवायचे… क्वचित आप्पांच्या गोतावळ्यातून कुणी प्रत्यक्षात यायचा. आप्पा नसायचे दिवसभर सायकलवरून लांब इलाक्यात… सर्वेअर म्हणून!

10-1
मग आलेला पाहुणा जुजबी बोलायचा… तुटत जाणार्‍या दोर्‍याला गाठ बांधायचा तो प्रयत्न फक्त! हळूहळू कोणच येईना. ज्याचे त्याचे फुललेले संसार. मुलं, सुना, जावई, नातवंडं यातच गर्क झाले सगळे. एकमेकांकडून समजत गेलं अक्कीच्या थोरल्या मुलीचं डोहाळजेवण, पुण्याच्या आत्याची मुलं विदेशात कायमची राहिली. अशा बातम्या समजत गेल्या. वर्तमान अवघड बनवत गेल्या…
मोठ्या हौसेनं माईनं इथं टाकलेलं पाऊल कधी सुखावलच नाही… अशा बातम्यांनी मनात मोहोळ उठायचं- घोंघावत! डंख डंख देऊन जायचं. गावात कृष्ण जन्म असला की, यायचा निरोप. एकदा माई गेली पण… पाळण्यातल्या बाळकृष्णावर हळदकुंकू वाहताना, कोणी छदमीपणानं हसल्याचा भास झाला… आणि घराकडं परतताना दाटलेले हुंदके कृष्णजन्माचं फलित म्हणून डोळ्यात वाहते झाले.
आप्पांनी हे सारं स्वीकारलं होतं. पण कधी त्यांनी आपणहून काहीच नाही व्यक्त केलं.
झाडं तोडायला येणार्‍या कातकरी बायका काही जडीबुटी घ्या म्हणून सांगायच्या… अंगावर फाटकं लुगडं असणार्‍या त्या बायकांच्या काखोटीत शेंबडी पोरं असायची तेव्हा माडाच्या झाडावर सरसर चढणारे कभिन्न काटक पुरुष पाहिले आणि त्यांनी वरून नारळ खाली टाकले की तेच त्या बायकांच्या ओटी भरून देताहेत आणि या सार्‍या जड पोटाने त्यांच्या मागोमाग जाताहेत. जड पावलानंी असा भास व्हायचा!
कसं का असेना? पण एखादं काळबेंद्रं मूल देवानं द्यायला पाहिजे होतं आपल्या ओटीत! अधिक नव्हतं मागणं… हट्ट तर नव्हताच! गेली… ती ही वेळ निघून जाऊन पंधरा-वीस वर्ष झाली…
नीळकंठ असणार्‍या शंकरानं पिलेल्या विषानं त्याचा कंठ तरी निळाजांभळा झालाय. आपल्या दु:खानं केवळ मंगळसुत्र आणि एक कायमचा न फुटलेला हुंदका…
पाषाणाचे करिती देव।
रंकांचेही करिती राव।
मंत्राक्षता टाकिता नवपल्लव।
कोरड्या काष्ठा फुटेल की।
आपण लावलेल्या घोसावळ्याच्या वेलालाही नुसतीच पानं फुटत गेली… जन्मभर! माईनं पोथी मिटली. आप्पांच्या लागलेल्या धापेचा आवाज ऐकून परत दिवाणखान्यात आली!
नका अस्वस्थ होऊ असं! बातम्या नाहीत तर नाही… त्यात काय एवढं? सेल आणूया उद्या जादाचे पण. देणार आहे यादी. माई दिवाणखान्याचं बाहेरचं दार बंद करत बोलली.
कसला विचार करताय? हे घ्या मफलर. झोपा आता. माई परत आप्पांजवळ येत बोलली.
अचानक कडाडलेल्या विजेनं क्षणभर लख्ख निळा प्रकाश पडला. अगदी क्षणभरच. अन् वीज नाहीशी झाली. माजघर, दिवाणखाना, सारं घर अंधारलं, आप्पांनी विजेरी लावली… पण तीसुद्धा मंदावली गेली.
माई! मेणबत्ती तर आहे ना? की ती पण उद्याच आणणार? अंधारातून शब्द आले.
वारा घोंघावत असतानाही माईनं एकुलती एक खिडकी ढकलली. न लागणारी मोठी काठी तिरकी ठेऊन दार दाबलं आणि त्यांनी फडताळ चाचपडत मेणबत्ती लावली. मघाच्या सावल्या आता जमिनीऐवजी भिंतीवर होत्या. स्थिर विचित्र आकार.
झोपा आता हं! मी पडते आत. माईनी खुर्ची भिंतीकडेला सारली पुन्हा मोठी वीज कडाडली. अचानक वारा घुसला कोठून? मेणबत्ती पडल्याचा आवाज ऐकला दोघांनीही!
अहो! एवढा पावसाळा गेला ना की काही तरी बघूया हं खिडकीचं माई बोलली. आणि पुन्हा देवघराकडं वळाली. वात पुन्हा लावून, पळीभर तेल घालून गुडघ्यावर हनुवट ठेवून पोथी आपोआप उघडली गेली! पण मन? मन विचित्र गतकाळाच्या सावल्यांच्या कवडश्यात अडकलं.
मुंग्यांच्या वारूळांना उजाडणार्‍या, झाडांच्या अस्तित्वाला झिडकारणार्‍या राक्षसी आकांक्षेनं!
पुढचं पुढचं येणारी पावसाची अजस्त्र पावलं…
अजगराच्या विळख्यात चित्कारणार्‍या प्राण्यांसारखं एकेक झाडं जणू चित्कारत शरणागती पत्करत होतं.
घरामागची पडवी कलेवर होऊन वा-याला तोंड देत होती. तिचे बांबू, लाकडी आकार, तट्ट्याची जीर्ण फडफड प्राण जाणार्‍या श्‍वापदासारखी..
असाही असतो पाऊस? आकाशानं सूड घ्यावा असा? बेकाबू?
पक्षांच्या चोची भरणारा घरटी उद्ध्वस्त करत जातो, शरणागती पत्कारणार्‍या विशाल वृक्षांना वाटेतून दूर सारत? पावसाचे वेताळ अंगविक्षेप करत जणू खदाखदा हसत पुढे सरकत होते.
टेकडीमागून जणू तरसांची विशाल टोळीच दात दाखवत, खिदळत, धस्स धस्स करत, क्रूर, तर कधी छदमीपणाने घराकडे सरकत होती.
कडकन मोडलेल्या बांबूमुळे झटकन निष्प्राण झालेलं ओसरीचं छत, वेड्या वाकड्या सपका-यांनी भिजलेली पूर्ण जीर्ण शीर्ण भिंत! कधीही ढासळून मृत्यूशय्येवरच्या श्‍वासाचं गणित मोजणारी.
वेगानं वाढत जाणारं पाणी… जणू चहुभुजांनी आकाशचं गिळू पाहतेय.
आप्पा आणि माई भेदरून दिवाणखान्यातल्या खुर्चीपाशी उभे होते. या पावसाच्या आवाजात मदत तरी करणार कोण? किंचाळी ऐकू, तरी कोणाला जाणार? थैमानात कधी हाक ऐकू जात असते?
अशा पावसात आप्पाचं दुखणं डोक वर काढायचच!
जीवघेणी धाप. प्रत्येक धापेसोबत तोंडातून निघणारे विचित्र आवाज. तरारून आलेली बुबळांची हालचाल.
वरखाली होणारी मान आणि छातीवरच्या पांढ-या केसातून स्पष्ट जाणवणारी तगमग- श्‍वासांसाठी तडफडणारी पेशी न पेशी!
आज याबरोबरचं न थांबणारं हे पाऊस थैमान!
मनात शिरलेली भिती आणि कृश शरीराला न मिळणारा श्‍वास सहनशक्तीची परीक्षाच जणू!
विचार-बुध्दि, भावना, शब्द, वर्तन हे सगळं श्‍वास सुरू असताना…
माईनं आप्पांना कधी इतकं भ्यालेलं पाहिलं नव्हतं. मृत्यु असा असतो? हळूच येतो-जातो? मग हे काय?
अंधारातून झडप घालणारा? कोणत्याही क्षणी पाणी आत शिरेल आणि
अक्राळ विक्राळ जबड्यात आपण खेचलो जाऊ…
माई! इतक्या दूर घर बांधून चूकच झाली बघं! कापरां आवाज!
अहो! जाईल हा ही पाऊस. धीर नका ना सोडू असा!
बाहेरच्या सृष्टीचाच धीर जणू सुटला होता. धीरानं-नेटानं आजवर उभी राहिलेली झाडं… या तांडवात कस्पटासारखी!
उन्मळून-विखरून… विचित्र आवाजात तुटणारे त्यांचे बुंधे… त्यांचा आवाज त्यातच विरून जाणारे आणि चित्कार, पक्षांचे त्यानं गिळलेल्या सगळ्यांच्याच घुसमटीचे, तडफडीचे आवाज. आणि एक कुंद वास पसरून राहिलेला.
या मध्यरात्री पूर्ण अपरिचित टेकडीच्या उतारावरून वाहत आलेले अवशेष. सर्पानं अचानक दिशा बदलावी तसा अचानक वळलेला वरचा प्रवाह,
बाजूची शेती कधीच पाण्याखाली गेलेली. लाईटचे खांबही निम्मे अधिक बुडालेले. चिमणीच्या तोंडात जाईल एवढ्या थेंबाने पडणार्‍या आकाशाला आज सगळीच घरटी जणू गिळायची होती… आकाशपण विसरून!
मुळांची वीण उलटी करून पडलेल्या झाडांतून भयायलेले, वाचलेले रानकिडे आधार शोधताहेत! आकांतही करून झालाय… पांढर्‍या शुभ्र पंखांची पाखरं वाहतावाहता अडकली आहेत. निष्प्राण!
कडाडणार्‍या विजेच्या लोळात त्यांचं पांढरं अस्तित्व घोळक्यानं तरंगत चाललयं! दिशाहिन.
दिर्घायुष्याचं वरदान संपलेला विशाल पिंपळ जेव्हा खचतो, तेव्हा फक्त तोच कोसळत नसतो, तर उन-वारा-पावसाचे नाते कोसळतच तो उन्मळतो. कुठं जातो परस्परांवरचा विश्‍वास?
ऋतूंचा गणितात, आवर्तनात एकमेकांत गुंतलेले अस्तित्वाचे लक्ष पुरावे जेव्हा छिन्नविछिन्न होऊन नियतीच्या सारीपाटावर झोकून देतात तेव्हा, पृथ्वीवरच्या कालचक्रावर चरा उमटतो, कायमचा ठसठसत राहतो. भळभळतो… रक्ताच्या घोटातून, मांसांच्या चिखलातून, अस्फुट स्वप्नांच्या अवशेषातून नवं उगवेपर्यंत गिधाडे घुमटतच राहतात. ऋतुंच्या बदलाची चेष्टा करत.
आप्पा तरीही धपापतच राहिले… एवढ्या मोठ्या आवाजातही त्यांचा उरस्फोट, धाप स्पष्ट ऐकू आली माईला!
अहो! औषध आणू का पटकन! जाते चाचपडत… सवयीचा तर उंबरठा! आलेच हं!
माई भिंतीला धरून जणू सरपटतच माजघराकडं गेली. धापणार्‍या छातीवर हात फिरवत आप्पा खुर्चीवरून उठले आणि सरळ जमिनीवर बसले. थंडगार फरी… हवेतला ओलावा, भयाण वारा हे सारं सहन नव्हतं होत… जीवाची तगतम!
स्वत:चं हे असं ढासळत जाणं त्यांना अपेक्षित नव्हतं!
आजवर आपण चुकीचे का असेना? पण स्वत:च्या तालावर जगलोय, पण मघाशी रेडिओचे सेल संपल्याचं लक्षात आलं अन् ‘क्षणभंगूरता’ काय असते? हे आलं ध्यानात!
काय दोष होता भाविकांचा? निसर्गानं आपलं भयाण रुप उघडं केलं आणि त्यात ती गेली ही वस्तुस्थिती! पण आपण माईला लागेल असं बोललो!
या बाहेर पडणार्‍या पावसानं थरकाप उडालाय जीवाचा! भूकंपात गेलेल्या सर्वांना एवढी संधीसुद्धा नसेल मिळाली! अचानकच कोसळले असतील पर्वतांचे सुळके. बर्फाचे पहाड… थंडगार! आपण चुकलोच! घडणार्‍या प्रत्येक घटनेला आपण केवळ क्षुद्रतेनं पाहिलं वेदनांच्या कल्लोळात आता पश्‍चातापानं प्रवेश केला होता.
अचानक खांद्याला माईचा स्पर्श झाला.
घ्या! औषध आणलयं! एकदम नका हं संपवू! ठसका लागेल!
खरंतर या औषधांनी आप्पांना गुंगी यायची. पण आज त्यांनी माईचं ऐकलं.
औषधांचा ग्लास असणार्‍या माईच्या हाताला घट्ट पकडत आप्पा ढासळत राहिले…
अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पावसाचा आवाज तर होताच पण एका अनामिक वातावरणानं जणू सार्‍या जगाला कवटाळायच ठरवलं होतं!
‘‘माई’’ आप्पा बोलू लागले.
बोलू नका हो! मला समजतय सगळं! काही बोलू नका!
नाही माई! तुला काहीच समजलं नाही. माई! तुला आज सांगतो… आपल्याला जर मुलगा झाला असता ना? तर त्याचं नाव मी ‘कैलास’ ठेवणार होतो… फार ठरवलं होतं आधिच! तसं खूप काही मनात होतं बघ आधि!
पण सगळा उत्साहच गेला… निसर्गानं जे द्यायचं मला तेच पूर्ण नाही करता आलं त्याला!
आप्पांच्या धापणार्‍या चेहर्‍यावर असणार्‍या भावना माईला अंधारात दिसल्या नाहीत. स्वरांमागची कातरता… दोघांचेही काळीज जणू मांडत होती…
आप्पा नव्हे बोलत… एक उन्मळून गेलेलं निष्पर्ण झाड जमिनीला जणू मनातलं काही सांगत होतं…
माईनं ग्लास खाली ठेवला आणि ती हळूहळू हसू लागली.
अहो! यामागं कधी बोलला नाही? आणि आता जे बोलताय ते परत नका बोलू… कैलास म्हणे! आता अशा मध्यरात्री बोलायचं नाही हं…
माई डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसू लागली, अंधारात तिला जणू देव्हारा दिसू लागला. माजघराकडं तोंड करत ती हसू लागली… थांबून थांबून! जणू तिथं कोणी होतं. तिचं गुपित ऐकू गेलंलं!
हसता हसता हुंदके उमटू लागले. एका पाठोपाठ!
ऐकतोस ना महादेवा? की या पावसात तू पण आमच्या सारखाचं? हतबल? माईनं अंधारात दिवाणखानाच्या दरवाजाकडे जोराने चाल केली आणि अधिक वार्‍याने थडथडणारा दरवाजा ताकदीनं उघडला…
सपासप पावसाचे थेंब आत येत होते… वार्‍याने भिंतीवरच्या तस्बिरी हसल्या टेबलावरचा तांब्या उघडा झाला…
सोसाट्याचा वारा जाऊन देवघरातील मंद दिवाही झटकून शांत झाला.
घुसलेला वारा थैमान घालत असतानाही, माईनं आप्पांचा हात सोडला नाही.
धापता धापता अर्धवट गुंगीत असणार्‍या आप्पांच्या अंगावर जाड पांघरून. माई जवळच तशीच बसली. ओणवी. न दिसणार्‍या आप्पांकडे बघत… आता ना तोंडात शिवस्त्रोत होतं की कोणतीही इच्छा! स्वत:चच अंग दुमडून घेत तिनं मोठा श्‍वास घेतला.
जसा वारा आला अचानक, तसा गेलाही! उद्ध्वस्त करून!
आप्पांना झोप लागली होती. माईला उठून दार लावण्याचंसुद्धा भान नव्हतं.
बसल्या जागीच ती मनानं कैलासावर पोचली होती.
हिमालय पर्वत – मग जीवघेणी थंडी वाजणारच! तीच जणू अनुभवत होती ती!
तो पांढरा शुभ्र पर्वत! लकलकणार्‍या त्या सोनेरी कडा!
जन्मभर ज्याचा जप केला, ठाव घेतला तोच हा! कैलास!
एवढ्या प्रलयातून तरलेला…
माईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पहाटेची वेळ होती. थैमान तर थांबलं होतं.
आप्पांची छाती लयीत वर खाली होत होती. त्याच लयीत दिवाणखान्याचा दरवाजा मंद वार्‍याने आत बाहेर होत होता, त्याच… त्याच लयीत चिप्प भिजलेल्या तुळशीकट्ट्यातील वाकलेली-टिकलेली तुळस डोलत होती.
हीच लय घेऊन जणू सृष्टी जागी होत होती.
वाहून गेलेल्या घोसावळ्याच्या वेलीच्या जागी हीच लय पकडून बुडबुडे जमिनीतून बाहेर पडत होते, आणि याच लयीच्या तालावर माईंच्या डोळ्यातील पाणी थेंबाथेंबानं जमिनीकडं झेपावत होतं!

*************************************************************************************************************

अनंत खासबारदार
जाहिरात विश्‍वातील अत्यंत कल्पक निर्माते. आशयघन योगदानासाठी प्रसिद्ध ‘निर्मिती ग्राफिक्स’ या संस्थेचे संचालक. स्वच्छ भारत अभियानाच्या बोधचिन्हाची निर्मिती यांचीच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष पारितोषिकाने गौरव.
Email: nitmiti231@rediffmail.com

www.nirmitiindia.com
Mob: 98223 21442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *