Warning: curl_exec() has been disabled for security reasons in E:\HostingSpaces\abab42631\choufer.com\wwwroot\2016\wp-includes\Requests\Transport\cURL.php on line 162
तुतुल: महाश्वेता देवी

तुतुल: महाश्वेता देवी

महाश्वेता देवी

प्रख्यात बंगाली लेखिका महाश्‍वेता देवी या प्रथम कार्यकर्त्या व नंतर लेखिका होत्या. भारतभरच्या आदिवासींसाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी त्यांना ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळाला होता, तर साहित्यातील कामगिरीसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ व ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ने सन्मानित झाल्या. त्यांनी मुख्यत्वे कथा व कादंबर्‍या लिहिल्या. त्या या लेखात त्यांनी आपल्या वडिलांचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यांच्यासंदर्भातील काही मजेशीर किस्सेही सांगितले आहेत. महाश्‍वेता देवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या लेखनातून त्या अमर आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन…
बंगालीतून अनुवाद – विलास गीते

*************************************************************************************************************

सगळे म्हणतात, आपल्या बाबांच्याबद्दल लिहा. म्हणूनच ‘तुतुल’बद्दल लिहितेय. आता बाबांची गोष्ट सांगायला बसल्यावर हे ‘तुतुल’ काय, असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आहे, त्यामागचीही गोष्ट आहे. माझा जेव्हा जन्म झाला, 1926 साली, तेव्हा बाबा आणि त्यांचे मित्र सगळे मॉरिस मेटरलिंक या नाटककाराचं ‘ब्ल्यू बर्ड’ हे नाटक वाचीत होते. बाबांचे मित्र पवित्रदा, म्हणजे पवित्र गंगोपाध्याय यांनी त्या नाटकाचा सुंदर अनुवाद केला. ते ‘नील पाखी’ नावाचं बंगाली पुस्तक आता उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हाला ते वाचायला मिळणार नाही, याचं मला फार वाईट वाटतं. आमच्या लहानपणी आम्ही जी छान-छान पुस्तकं वाचली ती आता तुम्ही मोठे असताना वाचायला मिळत नाहीत, या विचाराने वाईट वाटणारच, नाही का?

tutul-1
तर, त्या ‘नील पाखी’ (निळा पक्षी) पुस्तकातल्या दोन लहान मुलांची नावं होती तिलतिल आणि मितिल.
मी जेव्हा जन्मले, तेव्हा तर चोहीकडून नावं येऊ लागली. बाबांच्या जुन्या डायरीत कितीतरी नावं लिहून ठेवलेली मी पाहिली आहेत. ती सगळी नावं नंतर कुठे निघून गेली, कुणाकडे गेली, कोण जाणे. बाबांनी ठेवलेलं माझं ‘महाश्‍वेता’ हेच नाव राहिलं. बाबा मला ‘तिलतिल’वरून ‘तुतुल’ म्हणून हाक मारीत आणि माझा स्वभाव बालपणी असा होता की, जी व्यक्ती मला ज्या नावाने हाक मारीत असे, त्याच नावाने मीही त्या व्यक्तीला हाक मारीत असे. मी बाबांना कायम ‘तुतुल’ म्हणूनच जीवनभर हाक मारीत राहिले. माझे मधले काका सुधीश घटक मला लाडाने ‘मुमताज’ म्हणत. त्यामुळे मीसुद्धा त्यांना कायम ‘मुमताज’ अशीच हाक मारी. माझी इतर भावंडंही त्यांना ‘मुमताज’ म्हणत. पण बाबा मात्र सर्वांचेच बाबा होते. फक्त एकट्या माझे मात्र ‘तुतुल’ होते. नंतर माझं हाक मारण्याचं नाव ‘खुकू’ (छोटी) होऊन गेलं. अद्यापही मी खुकूच आहे. अर्थात, मला ‘खुकू’ म्हणणारी बहुतेक माणसं आता देवाघरी गेली आहेत.
म्हणूनच या लेखाला मी ‘तुतुल’ असं नाव दिलंय. कुणाकुणाला वाटतं की, तुतुलची गोष्ट सगळ्यांना आवडेल. हे खरं की खोटं मला ठाऊक नाही. ते तुम्हीच मला आता सांगणार.

तुतुलचं नाव होतं मनीष घटक. माझ्या आजोबांचं नाव होतं सुरेशचन्द्र घटक. तुतुलना चार भाऊ होते, चार बहिणी होत्या. तुतुल सगळ्यांत वडील होते. त्यांचा जन्म झाला होता 9 फेबु्रवारी 1902 रोजी. मुमताजबद्दल आधीच सांगितलंय. आता ज्याप्रमाणे सगळे उठसूठ परदेशी जातात, तसं पूर्वी नव्हतं. विदेशी कुणी गेलं की, सगळे म्हणत, ‘विलायतेला गेला.’ मुमताज विलायत म्हणजे खास विलायत – इंग्लंडला गेले होते. त्यांच्याबरोबर होते बिमल राय. दोघेही सिनेमाच्या कॅमेर्‍याचं काम शिकायला गेले होते. आमच्या घरी बरेच दिवस एक फोटो मी पाहिलाय. लंडनच्या एका मैदानात मुमताज, बिमल राय आणि अगदी छोट्या वयातले डेव्हिड लीन असा तो फोटो होता. डेव्हिड लीन नंतर जगप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक झाले. संधी मिळाली, तर तुम्ही त्यांचे ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ हे चित्रपट पहा. बिमल राय हे सुद्धा नंतर भारतातले एक अग्रणी असे सिनेदिग्दर्शक बनले. तुम्ही त्यांचा ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट जरूर पहा.
त्या वेळी मुंबई किंवा चेन्नई नव्हे, तर कोलकाता हे चित्रपट व्यवसायाचं केंद्र होतं. कोलकात्याच्या ‘न्यू थिएटर्स स्टुडिओ’ला प्रचंड मान होता. बिमलबाबूंचं नाव लिहिताना त्यांचा त्या काळी प्रचंड गाजलेला ‘उदयेर पथे’ हा बंगाली चित्रपट आठवतो. त्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा पहिला शो पाहायला गेल्याचं आठवतं. ते बहुधा 1944 साल असावं. आम्ही डबल-डेकर बसने गेलो होते हेसुद्धा आठवते.
आम्ही दोन नंबरच्या बसने ‘उदयेर पथे’चा सकाळचा शो पाहायला गेलो होतो. बिमलबाबू होते, नीहाररंजन राय होते. माझे मधले मामा देबू चौधुरी मला घेऊन गेले होते. मला खूप उत्सुकता होती, कारण चित्रपटाची नायिका विनता बसू (नंतर ‘राय’ झाली) ही माझी वर्गमैत्रीण निवेदिता हिची धाकटी बहीण होती. चित्रपट पाहायला जाताना सगळे गप्प-गप्प होतो. सगळेजण चित्रपट चालेल की, चालणार नाही हाच विचार करीत होते. बिमलबाबू मुळात खूप सभ्य गृहस्थ, त्यात खूप कमी बोलणारे, ते अगदीच चूपचाप होते. आम्ही गेलो श्यामबाजारातल्या ‘चित्रा’ चित्रपटगृहात. ते चित्रपटगृह न्यू थिएटर्सच्या मालकीचं होतं. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांचा उल्हास जणू उतू जात होता. प्रेक्षकांनी चित्रपट स्वीकारला आहे हे लक्षात आलं. आजच्या काळात जसं चित्रपट ‘चालेल’ की ‘चालणार नाही’ असं म्हणतात, तसं त्या काळी म्हणत, ‘दर्शकरा नेबे-कि-नेबे ना’ म्हणजे, प्रत्येक चित्रपट ‘घेतील’ की ‘घेणार नाहीत’ आणि वर्तमानपत्रातली बातमी लोकांच्या लक्षात राहील की राहणार नाही असं म्हणायचं असेल, तर त्या काळी म्हणत, ‘ए खबर पब्लिक खाबे, ओटा खाबे ना’ म्हणजे, ‘ही बातमी लोक खातील, ती खाणार नाहीत’, काळाबरोबर भाषा बदलते. आता लोक काय म्हणतात, ते मला ठाऊक नाही.
मुमताजबद्दल सांगताना बिमल राय यांच्याच गोष्टी खूप आठवल्या. काय करणार, सांगा! माणूस म्हातारं झालं की जादा बकबक करतं. तर मुमताजनीसुद्धा कॅमेरामन म्हणून बरंच नाव कमावलं. तुतुलच्या भावांच्यामध्ये ते सर्वांत छोटे होते, ते ऋत्विक घटक चित्रपट दिग्दर्शक म्हणून खूप प्रसिद्ध झाले.
तुतुल सर्वांत मोठे. ते जन्मले 1902 साली. ऋत्विक आणि प्रतीती हे जुळे बंधू-भगिनी जन्मले 1925 सालच्या नोव्हेंबरमध्ये. मी माझ्या भावंडांमध्ये सर्वांत मोठी. जन्मले 1926 सालच्या जानेवारीत. ऋत्विक किंवा प्रतीतीला ‘काका’ किंवा ‘आत्या’ म्हणण्याचा प्रश्‍नच आला नाही. मी त्यांना कायम ‘भबा’ आणि ‘भबी’ असंच म्हणत आलेय. ती दोघेही माझ्या आईजवळच बराच वेळ असत, म्हणून मला वाटे की ती दोघेसुद्धा माझी भावंडेच आहेत. तुतुलच्या इतर भावंडांबद्दल काही सांगितलं नाही खरं, पण सगळेच कलाकार होते, त्यात तुतुल सर्वांत अधिक छांदिष्ट. माझी मधली आत्या डॉ. लिमा वयाच्या ऐंशीव्या वर्षी आजही चित्रे काढते, गाणी गाते, चित्र-प्रदर्शनं पाहण्यासाठी उत्सुकतेने जाते.
तीस वर्षांपूर्वी डॉ. लिमाने आकाशात ढग आलेले पाहून ‘पाऊस येणार, गोवर्‍या मिळणार नाहीत’ या विचाराने सव्वीस हजार गोवर्‍या विकत घेतल्या होत्या. त्या काळी आम्ही शेगड्या वगैरेंसाठी कोळसे आणि गोवर्‍याच वापरीत असू. तिने सव्वीस हजार गोवर्‍या विकत घेतल्या हे ऐकून आम्हाला मुळीच आश्‍चर्य वाटलं नव्हतं. डॉ. लिमाचे पती त्या काळी मध्य प्रदेशातल्या दुर्गम अशा बस्तर भागात काम करीत. डॉ. लिमा कोलकात्याला आल्यावर एकाच वेळी टाल्कम पावडरचे पंचवीस डबे, शंभर सुया, दोर्‍याची शंभर रिळं, साबणाच्या तीनशे वड्या अशी खरेदी नेहमी करीत असे. जंगलात राहायच्या वेळी जे करीत असे, म्हणजे जशी खरेदी करीत असे, तशीच कोलकात्याला राहतानाही करीत असे. डॉ. लिमा आणि तुतुल हे भाऊ-बहीण म्हणून लगेच ओळखू येत. तुतुलना माझे आजोबा कधीही वयाने मोठा मानीत नसत. तसा विश्‍वासही ठेवीत नसत. सगळ्या आवश्यक गोष्टी ते आईजवळ बोलत. तुतुलना म्हणत, ‘‘मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये.’’ विश्‍वास ठेवण्याचं तर काही कारणच नव्हतं. तुतुल प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी होते, तेव्हा हिंदू होस्टेलमध्ये राहात होते. तेव्हा त्यांनी आपल्या वर्गमित्रांची जबरदस्त गँग बनवली होती. होस्टेलचे सुपरिंटेंडेंट एरवी खूप कटकट करीत असले, तरी एकदा झोपी गेल्यावर त्यांना सहज जाग येत नसे. त्यांना धडा शिकविण्यासाठी तुतुलनी त्यांच्या खाटेला दोरी बांधून त्यांना दुसर्‍या मजल्यावरून खाली अंगणात उतरवून दिलं. जवळच दरवानाची गाय बांधलेली होती. 1920-22 सालातील गोष्ट. सुपरिटेंडेंटना अर्थातच हे आवडलं नाही. हे काम केलं होतं तुतुलनी, पण का कुणास ठाऊक, सुपरिटेंडेंटना वाटलं की हा उद्योग बिमल भट्टाचार्य यांनीच केला असणार. उमाप्रसाद मुखोपाध्यायसुद्धा तुतुलचे वर्गमित्र होते. त्यांच्याकडूनही मी हे सगळे किस्से ऐकले आहेत. तर त्या घटनेनंतर बिमल भट्टाचार्य (पुढे ते नंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले) यांना होस्टेलमधून काढून टाकण्यात आलं.
तुतुलनी आणखी एक प्रताप केला होता. बिमल भट्टाचार्य देवाघरी गेले असा प्रचार करण्यात आला. फुलांनी सजवलेले बिमल भट्टाचार्य उताणे पडलेले आहेत. डोळे मिटलेले, त्यांच्याजवळ बसून तुतुल शोक करताहेत असा फोटोसुद्धा काढण्यात आला. सुपरिंटेंडेंटनाही समजलं की बिमल वारला.

tutul-2
आणि त्यानंतर एका रात्री बिमल स्वत: सुपरच्या खोलीत हजर! म्हणाला, ‘‘सर तुमची खूप आठवण येत होती, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय!’’
सुपरची काय अवस्था झाली असेल विचार करा.
एकदा कॉलेजच्या कंपाऊंड वॉलवरून तुतुलच्या मित्रांपैकी एकजण छत्री उघडून फिरत होता. तुतुल त्याला उद्देशून ओरडले, ‘पॅराशूट जंप मार!’
या सगळ्या गोष्टी आजोबांच्या (म्हणजे तुतुलच्या वडिलांच्या) कानी येत.
1926 साली कोलकात्यात जातीय दंगल झाली. त्या दंगलीवरतीच शरदिन्दु बंदोपाध्याय यांनी ‘विषेर धोंवा’ (विषारी धूर) नावाची कादंबरीही लिहिली.
त्या वर्षी माझा जन्म झाला. तुतुल का कोलकात्याला आले, कशासाठी हिंदू होस्टेलमध्ये राहिले ते आजही मला माहीत नाही. स्वत:बद्दल ते फारसं बोलत नसत, विचारलं तरी स्वत:बद्दल बोलणं टाळीत. सतत काही ना काही कामात असत. 1977 साली त्यांना हार्ट-ऍटॅक आला, त्यामुळे ते घरकैदी झाले. तेव्हाच त्यांना पहिल्यांदा माझ्याशी बोलण्यासाठी वेळ मिळाला. तेव्हाच आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्या.
तर तुतुल होस्टेलमध्ये राहात होते, कोलकात्यात प्रचंड दंगा चालू होता. अचानक समजलं की, कुणातरी मित्राला निरोप द्यायला म्हणून होस्टेलमधून फक्त शर्ट आणि लुंगीवर बाहेर पडले आणि परत आलेच नाहीत.
सगळ्यांना खूप काळजी वाटू लागली. तुतुलबद्दल काहीच बातमी नाही, ठावठिकाणाही समजेना. अखेर माझे आजोबा माझ्या आईच्या वडिलांकडे गेले. माझ्या आजोबांना मी ‘दादा’ म्हणते आणि आईच्या वडिलांना म्हणते, ‘दादू.’ दादा आणि दादूंचा जन्म एकाच गावात झाला होता, ते बरोबरच शिकले. दोघे बालमित्र. आपल्या मुला-मुलीचं लग्न लावून दिलं आणि व्याही-व्याही झाले. दादू ढाक्यात वकील होते, त्या वेळी दादाही ढाक्यात होते. दादा सरकारी नोकरीत होते. एस.डी.ओ.पासून ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झाले होते. दोघांनी चर्चा करून अखेर वृत्तपत्रात जाहिरात दिली. त्यानंतर काही दिवसांनी तुतुल येऊन हजर झाले.
दादा त्यांना प्रचंड रागावले.
तुतुलनी सर्वांना समजावून सांगितलं की, ते गया गावी गेले होते.
गया इथे माझी थोरली मावशी राहात होती. तुतुल शर्ट आणि लुंगीवर जेव्हा हावड्यापर्यंत गेले, तेव्हा गया गावी जाणारी ट्रेन सुटत होती. आता गाडी निघाली असताना गयेला न जाण्यात काही अर्थ होता का? छान होते तुतुल तिथे. करामत शिंप्याने तुतुलच्या मापाचा (तुतुल सहा फुट तीन की चार इंच उंच होते) शर्टही शिवून दिला होता. तो शर्ट आणि आखूड धोतर हा कपड्यांवरच ते गया येथे राहिले होते. बुद्धगयाच्या मार्गावर घर, बक्कळ शेतजमीन, फळबागा; मस्त खाणं-पिणं, जंगलात शिकारीला जाणं… त्यांना काहीच त्रास झाला नाही.
दादा रागवले की एकदम लाल होऊन जात. खूप गोरे होते ते. प्रचंड रागावून दादा तुतुलना म्हणाले, ‘‘अरे, पण आम्हा सगळ्यांना काळजी लागून राहिली होती ना! कुणी असं बेजबाबदारपणे वागतं का?’’
आई म्हणाली, ‘‘परत का आलास?’’
‘‘का? पेपरमधली जाहिरात बघून!’’
दादा आपल्या थोरल्या मुलावर विश्‍वास ठेवत नसत. ते का, हे आता तुम्हाला समजलंच असेल.

tutul-3

मी तुतुलना शिकार करताना पाहिलं, ते खूप नंतर. मी खूप छोटी होते, तेव्हा दादांची बदली मेदिनीपूरला झाली. ते ज्या घरात राहात होते, त्या घराला सगळे जण ‘अगस्ती साहेबांचं घर’ असं म्हणत. बहुधा खूप मोठे गृहस्थ असावेत. ते घर मी नंतर 1936 साली पाहिलं. घरासमोर बाग होती, मोठं तळं होतं. घरामागेही मस्त बाग होती, माळी आणि रखवालदार यांच्या खोल्या होत्या.
1936 सालीच काय, त्याच्या पूर्वीसुद्धा मेदिनीपूर हे खूप छोटं शहर होतं. त्याच्या आसपास सालाच्या आणि पळसाच्या झाडांचं जंगलच होतं. दादांचे घर होतं शहराच्या बाहेर. नंतर, ‘बार्ज टाऊन’ झाल्यावर ते घर शहराजवळ आलं.
तर याच घरात, एका उन्हाळ्याच्या संध्याकाळी एक चांगला पट्टेदार वाघ, मागचा दरवाजा उघडा बघून तळमजल्यावरच्या बाथरूममध्ये शिरला आणि तिथे मस्त विश्रांती घेत बसला.
घरात बंदूक होती, पण तुतुलकडे तर तेव्हा बंदूक चालवण्याचं लायसन्स नव्हतं. दादा घरी नव्हते. आता वाघाचा बंदोबस्त कोण करणार? आणि अगदी दादा असते, तरी त्यांनी वाघ मारला असताच, असं काही मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. ते तर कुणाला एखादी झापडसुद्धा मारू शकत नसत. त्यामुळे बंदुकीच्या साहाय्याने काही मारतील असा विचारसुद्धा करता येत नाही. वाघ निघून गेला असता, तरी त्यांना हायसं वाटलं असतं. वाघाने बाहेर येऊन नुसती एक उडी मारली असती, तर साल झाडांच्या जंगलात तो हरवून गेला असता. पण आता तर तो बाथरूममध्ये बसलाय. काय बरं करावं? आधी त्याला सद्बुद्धी सुचावी, म्हणून पत्र्याचे डबे जोरजोरात वाजवणे, ओरडणे असे नाना प्रयत्न करून झाले, पण वाघाला काही सुबुद्धी होत नव्हती. उलट तो संतापला आणि डरकाळ्या फोडीत त्याने उडी मारली. तुतुल म्हणाले, ‘‘अखेर मी त्या वाघाला गोळी घालून मारलं. इच्छा नव्हती, पण नाईलाज होता.’’ नंतरही त्यांनी वाघ मारलेले मी पाहिले आहेत, पण तेही त्यांनी नाइलाज म्हणूनच मारले.

इथंपर्यंत तुम्हाला मी तुतुलच्या ज्या गोष्टी म्हणा, किस्से म्हणा, सांगितले, ते सगळे मी ऐकलेले किस्से होते.
मला समजू लागल्यापासून मी ज्या तुतुलना पाहात होते, त्याच्या आधीच ते ‘युवनाश्‍व’ नावाने ‘कल्लोळ’ मासिकात लिहीत होते, त्यांनी ख्याती मिळवली होती या गोष्टी तर मला ऐकून ऐकून ठाऊक होत्या. नंतर वाचून-वाचून समजल्या. तुतुलच्या लेखनाबद्दल सांगताना एक गोष्ट आठवली. ती सांगितल्याशिवाय राहवत नाही. ‘पॅब्लोनेरुदा’ हे जगप्रसिद्ध कवी होते हे आज सर्वांना ठाऊक आहे, पण 1922 साली नेरूदांचं नाव भारतात कितीजणांना ठाऊक होतं हे काही मला ठाऊक नाही. नेरूदाही तेव्हा तरुण होते आणि तेव्हापासूनच ते विद्राही कवी म्हणून ओळखले जात. तुतुलच्या डायरीत मी पाहिलंय, तुतुलची एक ऑटोग्राफ वही होती. तुतुल 1923 साली बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:च लिहिलं की, ऑटोग्राफ बुक ठेवणं म्हणजे जुनी प्रथा मान्य करणं, जुन्या काळानुसार वागणं. ‘जुना काळ’ यासाठी बंगालीत म्हणतात, ‘मांधाताचा काळ’. मांधाता हा खूप जुना, पौराणिक काळातला राजा होता. तुतुलनी ठरवलं की, मांधाताच्या काळापासून ज्या प्रथा चालत आल्या आहेत, त्या मी पाळणार नाही. कुणाचाही ऑटोग्राफ (स्वाक्षरी) घेणार नाही.
तुतुलना सगळ्या प्रकारचे नियम-प्रथा मोडायला आवडे. त्यांनीच लिहिलंय, ‘‘म्हणूनच कथा लिहिताना मी ‘युवनाश्‍व’ हे टोपण नाव घेतलं.’’ युवनाश्‍व हे मांधाताच्या वडिलांचं नाव होतं. तुतुलचा युक्तिवाद असा होता. ज्यांना जुन्या चालीरीतींनुसार वागायला आवडतं, ते मांधाताच्या काळातले आहेत. युवानाश्‍व हे तर त्या मांधाताचेही वडील होते. त्यांच्यावर तर काही मांधाताचे नियम लागू होणार नाहीत. तुतुलच का, तुतुलच्या काळातल्या सगळ्या तरुणांना जुने रीतीरिवाज मोडून धाडसी व्हायची इच्छा असे.
तुतुलनी हा निर्णय घेतला 1923 साली. 1922 साली तुतुल जेव्हा इडन हिंदू होस्टेलमध्ये राहात होते, तेव्हा प्रेसिडेन्सी कॉलेजात कशा प्रकारे अध्यापन केलं जातं हे पाहण्यासाठी काही विदेशी विद्यार्थी आले. ते विद्यार्थ्यांच्याच खोल्यांमध्ये राहणार होते. पॉल क्रोगर नावाचा एक चेक विद्यार्थी काही दिवस तुतुलच्या खोलीत राहिला. परत जाताना त्याने तुतुलच्या ऑटोग्राफ बुकमध्ये ‘नेरूदा’ नावाच्या कवीच्या एका कवितेतील दोन ओळी लिहून दिल्या होत्या. तुतुलना नेरूदांचं नाव ठाऊकच नव्हतं. आपण त्यानंतर बावन्न वर्षांनी नेरूदांच्या कवितांचा अनुवाद करणार आहोत आणि ते अनुवादाचं पुस्तक ‘युवनाश्‍वेर नेरूदा’ (युवनाश्‍व यांचे नेरूदा) या नावाने 1974 साली प्रकाशित होणार आहे, हेसुद्धा त्यांना ठाऊक नव्हतं.
तुतुल शांतिनिकेतनमध्येही जात. रवींद्रनाथ कोलकात्यात आल्यावरही जात. आईने एकदा खूप हट्ट धरला की, शांतिनिकेतनमध्ये जाऊन मला रवींद्रनाथ टागोरांना भेटायचंय.
मी तेव्हा चार वर्षे वयाची होते. माझी धाकटी बहीण मितुल तेव्हा सहा महिन्यांची होती. ‘मितुल’ हे नाव तिला मीच दिलं होतं. तिचं तुतुलनी ठेवलेलं ‘शाश्‍वती’ आणि आजीने ठेवलेलं ‘अदिती’ ही नावं इतर काय, खुद्द मितुलसुद्धा विसरून गेली आहे. आता ती मितुल नागचौधुरी आहे.
तुतुलबरोबर कुठे परगावी जाणं म्हणजे अगदी ऐशआरामात जाणं. फर्स्टक्लासने प्रवास, बास्केट भरून खाणं आणि पाण्याची बाटली असणार, क्लासमध्ये चहा असणार. तेव्हाच्या रेल्वेच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये वरती दोन बाक असत, खाली दोन बाक असत. तुतुल मितुलला घेऊन वरच्या बाकावर झोपी गेले. मी वरच्या दुसर्‍या बाकावर आणि आई खालच्या बाकावर. तुतुलच्या खालच्या बाकावर एक अबंगाली गृहस्थ झोपले होते. तुतुल झोपले होते, त्यांनी मितुलसाठी एखादं अंथरूण किंवा टॉवेलसुद्धा घेतला नव्हता. त्यामुळे मितुलला जे करायचं होतं ते तिनं केलं आणि खालच्या बेंचवरचे गृहस्थ त्यामुळे भिजले. तो डिसेंबरचा की नोव्हेंबरचा महिना होता. त्या थंडीत असला प्रकार झाल्याने ते गृहस्थ संतापले. त्यांनी आमचा चांगलाच सूड उगवला. आम्हाला उतरायचं होतं बोलपूरला, तर बोलपूरच्या आधीचं भेदिया हे स्टेशन आल्यावर ते तुतुलना म्हणाले, ‘बोलपूर आ गया!’
काही विचार न करता तुतुल घाईघाईत सगळ्यांना घेऊन ट्रेनमधून खाली उतरले. त्या गृहस्थांनीच आमचं सामान बाहेर आणून दिलं. तुतुलनी त्यांना धन्यवादसुद्धा दिले. ट्रेन तर निघून गेली. थंडीच्या उत्तररात्री, थंडीनं कापत-कापत आईने तुतुलना विचारलं, ‘‘हेच का तुमचं बोलपूर स्टेशन? बदलून गेलंय वाटतं. बघा बरं, स्टेशनचं नाव काय आहे ते!’’
त्या काळी स्टेशनवर चौकोनी काचांचे दिवे लावलेले असत. त्या काचांवर लिहिलेलं होतं, ‘भेदिया’. त्यानंतर तर प्रचंड तमाशा झाला. तुतुल म्हणे स्टेशनमास्तरना संतापून म्हणाले, ‘‘मला बोलपूरला जायचंय. हे स्टेशन भेदिया कसं काय? अर्थ काय याचा?’’ आता ते स्टेशन भेदिया असल्यानेच तिथे भेदिया असं लिहिलेलं होतं, हे तुतुलना कोण समजावणार? शेवटी त्या स्टेशनमास्तरांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला एक बैलगाडी मिळाली. बैलगाडीत बसून, थंडीने कापत-कापत आम्ही शांतिनिकेतनला पोहोचलो. आई जेव्हा रवींद्रनाथांच्या दर्शनाला गेली, तेव्हा रवींद्रनाथ आणि ‘प्रवासी’ व ‘मॉडर्न रिव्ह्यू’ या मासिकांचे प्रसिद्ध संपादक रामानंद चट्टोपाध्याय जवळजवळ बसलेले होते. आईबरोबर मीसुद्धा गेले होते. मी पाहिलं, दोन वृद्ध माणसे बसलेली आहेत, दोघांनाही दाढी-मिश्या आहेत. मी रामानंद चट्टोपाध्याय यांनाच विचारलं, ‘‘तुम्ही रवि ठाकूर ना?’’ लहानपणी फारच मूर्ख होते मी कबूल करायलाच हवं. रामानंदबाबूंना ‘‘तुम्ही रवि ठाकूर ना?’’ असं विचारल्याबद्दल आई-बाबांनी माझा कान पिळला नाही, हेच नशीब! झापडही मारली नाही मला. ही अशी रवींद्रनाथांच्या दर्शनावेळची गंमत!

*************************************************************************************************************
अनुवादक : विलास गीते
सुप्रसिद्ध लेखक, बंगाली साहित्याचे अभ्यासक, महाश्‍वेता देवींचे साहित्य बंगालीतून मराठीत आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
Email: vilasgitay@gmail.com
Mob: 97643 16921

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *