त्या दोघी आणि त्यांचे वडील

डॉ. सुबोध नाईक
ह्या कथेमधले विज्ञानतज्ज्ञ वडील आपल्याला भेटतात ते दररोज आपल्या स्वयंपाकघरात आणि विज्ञान, कला, संशोधन, संस्कृती अशा बर्‍याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ अशा ह्या दोन मुलींच्या आयुष्याचे शिल्पकार म्हणून! आणि ह्या दोन मुलीही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात तर भेटतातच. पण, आपल्या जीवनाच्या बाकीच्या बर्‍याचशा महत्त्वाच्या अंगांमध्येही! ‘मी करत असलेल्या कोणत्याही गोष्टीने भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता त्याचा फायदाच होतो आहे ना,’ असा प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक क्षणाला विचार करणार्‍या ह्या दोन मुलींची आणि त्यांच्या तशाच तेजस्वी वडिलांची ही ओळख.
************************************************************************************************************

‘अगदी खडकावर टाकलात तरी तिथेही तुम्ही रुजायला हव्यात’ असे आपल्या मुलींना म्हणणार्‍या आणि त्यासाठी आपल्या मुलींच्या मागे मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक आधारासाठी उभा राहणार्‍या वडिलांची आणि त्यांच्या दोन मुलींची ही कथा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच सुरू होणारी ही कथा संपूर्ण विसावे शतकभर महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि काही प्रमाणात जगाच्याच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, क्रीडा, आहार, संशोधन, वैज्ञानिक, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आपला कधीही न पुसता येण्यासारखा ठसा उमटवते. वेगवेगळे आयाम असलेली ही कथा तशी एका लेखात जाणून घेणे फार अवघड! संयमित आणि तरीही आक्रमक, समंजस आणि तरीही हट्टी, अतिशय प्रेमळ आणि तरीही अत्यंत खाष्ट, पुरोगामी असूनही जुन्याचा आदर करणार्‍या माणसांची ही कथा एखाद्या गोष्टीतल्या वाईटावर धो धो कोसळून टीका करतानाही त्यातल्या चांगल्यावरही आभाळभर प्रेम करायला आपण शिकले पाहिजे, हे आपल्याला शिकवते. नीरक्षीर सागरातले ‘क्षीर’ ओळखून त्याचे प्राशन करणार्‍या, पण त्याचबरोबर त्यातल्या नीराचीही किंमत जाणून त्यालाही महत्त्व द्यायला शिकविणार्‍या माणसांची ही कथा. ह्या कथेमधले विज्ञानतज्ज्ञ वडील आपल्याला भेटतात ते दररोज आपल्या स्वयंपाकघरात आणि विज्ञान, कला, संशोधन, संस्कृती अशा बर्‍याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ अशा ह्या दोन मुलींच्या आयुष्याचे शिल्पकार म्हणून! आणि ह्या दोन मुलीही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात तर भेटतातच. पण, आपल्या जीवनाच्या बाकीच्या बर्‍याचशा महत्त्वाच्या अंगांमध्येही! ‘मी करत असलेल्या कोणत्याही गोष्टीने भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता त्याचा फायदाच होतो आहे ना,’ असा प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक क्षणाला विचार करणार्‍या ह्या दोन मुलींची आणि त्यांच्या तशाच तेजस्वी वडिलांची ही ओळख.

8-1
कोण आहेत ते तिघे? काही ओळखता येतेय? बहुधा येणारंच नाही. कारण अशा तेजस्वी आणि कर्तव्यतत्पर लोकांची ओळख ठेवायला आपला महाराष्ट्र सध्या विसरला आहे. एकेकाळी नेहमीच ‘हिमालयाच्या मदतीला’ धावून जाणार्‍या ‘सह्याद्री’च्या सध्याच्या ढासळत्या सामाजिक अनारोग्याचे ते कारण आहे. चला, आपल्याच हितासाठी त्यांना जाणून घेऊ या, त्यांचे स्मरण करू या! ही कथा आहे मराठी सारस्वताची सरस्वती खाष्ट विदूषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गाबाई भागवत, परदेशात शिकलेल्या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक कमलाबाई सोहोनी आणि वनस्पती तुपाचा शोध पारतंत्र्यातल्या भारतात लावणार्‍या ह्या दोघींचे वडील नारायणराव भागवतांची!
भागवत घराणे मूळचे पंढरपूरजवळच्या वाखरीचे. वारीतले शेवटचे रिंगण जिथे होते, तिथेच त्यांचा वाडा होता. पण, आपल्या आईचा आपल्याच वडिलांनी केलेल्या अनन्वित छळात मृत्यू झाला, हे बघून बारा वर्षांच्या बाळाजी भागवतांनी पित्याच्या घराचा आणि संपत्तीचा त्याग केला. ‘आबाजी’ हे सर्वसामान्य नाव त्यांनी पित्याच्या नावाच्या ठिकाणी घेतले आणि स्वकर्तृत्वावर आपले भविष्य घडविण्यासाठी पुणे गाठले. हे बाळाजी भागवत दुर्गाबाई-कमलाबाई ह्यांचे आजोबा! त्यांचे कष्ट आणि हुशारी बघून राजारामशास्त्री भागवत ह्या त्या काळातील विद्वान माणसाने त्यांना आधार दिला. पुढे खरे तर बाळाजी आपले महाविद्यालयातील सहाध्यायी लोकमान्य टिळक आणि आगरकर ह्यांच्याबरोबर केसरी, मराठा आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी ह्या कामात सहभागी होणार होते, पण ते झाले नाही. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली. एक उत्तम, नावाजलेला वकील म्हणून लवकरच त्यांचे नाव सर्वदूर झाले. त्याचवेळी राजारामशास्त्री भागवत ह्यांच्या चुलत बहीण मथुराबाई ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मथुराबाई ह्या त्या काळातल्या मॅट्रिक. मथुराबाईंचा स्वतःचा असा इंग्रजी पुस्तकांचा संग्रह हाच त्यांच्या लग्नातला हुंडा! मथुराबाईंचे वडील हे प्रार्थना समाजाच्या मूळ संस्थापकांपैकी एक होते, त्यामुळे व घरात भरपूर वाचन आणि मुक्त विचार करायची संस्कृती असल्याने ह्या आजी-आजोबांची ‘स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य आणि बालविवाहविरोधी तसेच जाती-धर्मभेदविरोधी’ अशी खास मते होती. सर्वार्थाने सुधारक असूनही ‘हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती त्याज्य’ असा बाणा मात्र बाळाजी आणि मथुराबाई ह्यांचा कधीही नव्हता. भारतीय परंपरा, सण आणि रूढी ह्यांचे विज्ञान, इतिहास, आहार, समाजविज्ञान अशांसारख्या सर्व नजरांमधून विश्‍लेषण करून मग तो साजरा करण्याची परंपरा भागवतांच्या घरात होती. सगळ्यातले चांगले निवडून काढून ते बुद्धीच्या तर्कावर घासून घेऊनच ते स्वीकारणार्‍या ह्या आजी-आजोबांचा भागवत कुटुंबावर फार मोठा प्रभाव राहिला आहे; हे मात्र ह्या सगळ्या भागवत कुटुंबीयांचा अभ्यास बारकाईने केल्यावर सहज लक्षात येते. किंबहुना सर्व भागवतांची तीच ‘जीवनपद्धती’ राहिली आहे.
1910 च्या आसपास जेव्हा स्त्री शिक्षण तसे बाल्यावस्थेतच होते, तेव्हा दुर्गाबाईंच्या चार आत्या उच्चशिक्षित होत्या. साहजिकच स्त्री शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या ह्या घरातून ‘सदैव शिकत रहा’ हा सल्ला दुर्गाबाई आणि कमलाबाई ह्यांना मिळत गेला ह्यात नवल ते काय? जेव्हा स्त्रीने घराच्या दिवाणखान्यात जाणेदेखील फारसे समाजमान्य नव्हते, त्या काळात दुर्गाबाईंच्या आत्या शिक्षणानंतर नोकरीसाठी बाहेरगावी, कर्नाटक, अलाहाबाद, नगर, नाशिक येथे एकट्या राहिल्या आहेत. तेच स्वातंत्र्य पुढच्या पिढीतल्या ह्या दोघींना मिळाले आहे. आपल्या अभ्यासासाठी दुर्गाबाई मध्य प्रदेशातल्या आदिवासी लोकांमध्ये जाऊन राहू शकल्या आणिकमलाबाई पुढच्या शिक्षणासाठी प्रथम बेंगळुरू आणि नंतर अमेरिका, डेन्मार्क आणि केम्ब्रिज येथे जाऊन राहू शकल्या ते ह्या संस्कारांमुळेच! अगदी लहान वयातच दुर्गाबाई आणि कमलाबाई ह्यांच्यावरचे जाती आणि धर्मभेदाचे सामाजिक बंधन गळून पडले होते. म्हणूनच तर आपल्या भारतीय संस्कृतीविषयक अभ्यासासाठी दुर्गाबाई विविध जातीपातींच्या माणसांच्या स्वयंपाकघरापर्यंत सहज जाऊ शकल्या आणि परदेशात शिकताना पूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी व डॉ. श्रीनिवास रामानुजन ह्यांना जसा त्रास झाला तसा कमलाबाईंना झाला नाही. दुर्गाबाईंची एक आत्या तर त्या काळात फ्रेंच भाषेचे शिकवणी वर्ग घेत असे आणि पंडित पलुस्कर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गाणे शिकत असे. घरातले हे सर्वंकष स्वातंत्र्य दुर्गा आणि कमला ह्यांच्या प्रगतीचा मूळ पाया आहे असे नक्कीच वाटते.
ह्या दोघी बहिणी पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत त्यांनी कोणती इंग्रजी पुस्तके वाचावीत हे त्यांची आजीच ठरवत असे. तसा दंडकच आजोबांनी ह्या मुलींना घालून दिला होता. दुसरी मजेशीर गोष्ट तर सध्याच्या काळातही निरोगी पालकत्वाच्या दृष्टीने आचरणात आणण्यासारखी! सध्याच्या काळातही कोणतीही आजी आपल्या नातींशी ‘स्त्री पुरुष संबंध’ ह्या विषयावर बोलणे फारच कठीण! पण 1930 च्या आसपास ही आजी ‘एखाद्या स्त्रीने आपल्या आवडत्या पुरुषाशी लग्न न करता त्याच्या मुलास जन्म द्यावा की नाही’, अशा विषयावर बोलत असे. ह्या घरातल्या मोकळ्या वातावरणाचा खूप फायदा दुर्गाबाई आणि कमलाबाई ह्यांना झाला. पुढे उच्चशिक्षित, रूपवान आणि स्वतंत्रपणे विचार करणार्‍या ह्या दोघींना पुरुषांच्या बरोबरीने प्रामुख्याने पुरुषप्रधान अशा क्षेत्रांत एकटीने काम करताना पुरुषांकडून भरपूर वेळा एक स्त्री म्हणून त्रास दिला गेला. पण, प्रत्येक वेळी ह्या दोघी बहिणी आपल्या वडिलांशी व भावाशी मोकळेपणाने ह्या विषयावर बोलू शकल्या आणि म्हणूनच त्या त्या संकटांतून, त्रासातून त्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर पडू शकल्या.
अशा ह्या ‘मर्यादापुरुषोत्तम सुधारक’ असलेल्या बाळाजी आबाजींचे ज्येष्ठ पुत्र नारायणराव! पण बाळाजींचे पुत्र आणि दुर्गाबाई व कमलाबाई ह्यांचे वडील एवढीच ओळख नारायणरावांची नाही. त्यांची खरी ओळख जाणून घेण्याआधी त्यांच्या कर्तृत्वाचा पाया असणारी एक घटना जाणून घेऊ या.
जणू ‘सरस्वतीचेच मंदिर’ असणार्‍या भागवतांच्या घरात मोठे झालेल्या नारायणरावांना मॅट्रिकच्या परीक्षेत आपल्या पित्याप्रमाणेच आपल्यालाही ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळावी असे वाटणे स्वाभाविकच होते. त्याप्रमाणे त्यांचा झटून अभ्यास करणे पाहून राजारामशास्त्रीनीं त्यांना सांगितले,
‘‘नानू, वडिलांसारखी ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळवायला प्रयत्न करतो आहेस ते चांगले. पण, तुझ्या वडिलांना शिष्यवृत्ती मिळणे ही त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठीची गरज होती. पण, तुझ्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम आहे तुला शिष्यवृत्तीची पुढच्या शिक्षणासाठी तशी गरज नाही. पण, ज्याचे पुढील शिक्षण पैशावाचून अडणार आहे, अशा गरीब पण होतकरू मुलाला शिष्यवृत्तीची जास्त गरज आहे. आयुष्यात काही लाभ डोळ्यासमोर ठेवून कोणतेही काम करू नकोस. आयुष्याची परीक्षा देताना कोणतेही काम नेहमी स्वानंदासाठी कर, स्वतःशीच कधी सामना खेळू नकोस. मगच आयुष्यातल्या कसोटीच्या क्षणांच्या वेळी स्थिर बुद्धीने निर्णय घेऊ शकशील.’’ ही घटना आणि सल्ला नारायणराव व त्यांच्या भावंडांसाठी जन्मभर मार्गदर्शन करीत राहिली.
मॅट्रिकच्या परीक्षेनंतर नारायणराव मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून संस्कृत, इंग्रजी आणि रसायनशास्त्र ह्या विषयांतून एम.ए. झाले. एकेदिवशी एका शेजार्‍याने, तेव्हा त्याने नुकत्याच पाहिलेल्या ग्लिसरीन साबणाचे, त्याच्या पारदर्शकतेचे आणि त्याबद्दल ब्रिटिशांचे कौतुक केले. नारायणराव तेव्हा शांत बसले. पण, दुसर्‍याच दिवशी त्यांनी स्वतःच घरी तयार केलेला मोठ्या आकाराचा ग्लिसरीन साबण एका लेखावर ठेवून त्या साबणामधूनच तो लेख शेजार्‍याला वाचून दाखविला. भागवत पिता-कन्यांची देशभक्ती त्यांच्या धमन्यांमधूनच वाहते.
लवकरच नारायणराव हे स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने उभ्या राहिलेल्या व नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झालेल्या बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या पहिल्या तुकडीत दाखल झाले आणि ‘ऑईल्स आणि फॅटस्’ ह्या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला. तिथून आल्यावर लगेच आपल्या वडिलांचे मित्र इब्राहिम लालजी ह्यांच्या साबण कारखान्यात काम करायला ते एडनला रवाना झाले. 1919 मध्ये आपल्या पत्नीचे निधन झाल्यावर आपल्या चार मुलांचा सांभाळ करायला ते मुंबईला परत आले आणि टाटांच्या ‘टाटा ऑईल मिल्स’मध्ये काम करू लागले.
टाटा कंपनी आणि भागवत कुटुंबीय ह्यांचा काहीतरी मागील जन्माचा ऋणानुबंधच असावा! ह्याच कंपनीतले त्यांचे वरिष्ठ कपिलराम वकील आणि नारायणराव ह्यांनी दोघांनी मिळून तेलापासून तूप बनवायची अचूक पद्धत शोधून काढली. जगभर, विशेषतः जपान आणि अमेरिकेत त्यासाठी प्रयत्न सुरू असताना पारतंत्र्यातल्या भारताच्या ह्या दोन ‘नेटिव्ह’ लोकांनी ही अचूक पद्धती शोधलेली पाहून टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन ह्यांनी ह्या पद्धतीचा अधिकृत हक्क ब्रिटनला मिळावा म्हणून त्याची मागणी ह्या दोघांकडे केली. परंतु, देशभक्त असणार्‍या ह्या दोघांनी त्याला साफ नकार दिला. खवळलेल्या पीटरसन ह्यांनी ह्या ऑईल मिल्सची आर्थिक नाकेबंदी करून ती कंपनी बंद पाडली. सात वर्षे उच्चशिक्षित नारायणराव बेकार होते. आर्थिक बेकारी, मोठे कुटुंब, शिकणार्‍या मुली, घरातल्यांची मोठी आजारपणे असे असूनही नारायणरावांनी ह्या तूप बनविण्याच्या पद्धतीचा‘स्वामित्वहक्क’ घ्यायचे साफ नाकारले.
सात वर्षे बेकार राहिलेल्या नारायणरावांनी नंतर कपिलराम वकील ह्यांनी स्वतः गुजरातमध्ये ‘ओखा’ येथे सुरू केलेल्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. नारायणरावांचे धाकटे अविवाहित भाऊ माधवराव हेदेखील ह्याच कंपनीत काम करत होते. काही वर्षांनंतर टाटांनी ती कंपनी ताब्यात घेतली आणि वाढविली. सध्या ‘टाटा केमिकल्स’ म्हणून ती ओळखली जाते. त्या कंपनीच्या जागेपासून, कंपनी प्रत्यक्ष उभारण्यापासून ते अगदी अंतर्गत सुव्यवस्थेपर्यंत सर्वच ठिकाणी ह्या दोन भावांनी लक्ष घातले. त्याबद्दल आणि वनस्पती तूप तयार करण्याच्या पद्धतीची माहिती भारतीय कंपन्यांसाठी पर्यायाने टाटांसाठीच राखून ठेवल्याबद्दल जे.आर.डी. टाटा भागवतांचे सदैव आभारी राहिले. तशा अर्थाची त्यांची कृतज्ञतापत्रे दुर्गाबाईंनी त्यांच्या संग्रही ‘मर्मबंधाची ठेव’ म्हणून जपून ठेवली होती. पुढे निवृत्त झालेल्या माधवरावांना जे.आर.डी. टाटा ह्यांनी त्याच दिवशी ‘टाटा केमिकल्स’चे जागतिक स्तरावरचे मानद सल्लागार म्हणून नेमले.
परंतु लवकरच आई-वडिलांच्या आजारपणामुळे नारायणराव मुंबईला परत आले आणि आपल्या मित्राबरोबर त्यांनी ‘अनार’ ही साबणाची कंपनी सुरू केली. उत्तम टेनिस खेळणारे नारायणराव हे वेस्टर्न इंडिया हार्ड कोर्ट टेनिस चॅम्पियन होते. स्वतः 68 वर्षांचे होईपर्यंत समोरच्या तरुण खेळाडूच्या तोंडाला फेस येईल इतक्या शिताफीने नारायणराव खेळत असत. भागवतांच्या घरचा प्रत्येक दिवस घरासमोरच्या पारशी अग्यारीतील मंत्र व नारायणरावांच्या आवाजातील ऋग्वेदपठण ह्यांच्या एकत्रित नादात उजाडत असे अगदी 1964 मधे नारायणरावांचे निधन होईपर्यंत!
दररोज देवासमोरच्या निरांजनात आणि दोन वेळच्या जेवणात आपल्याला हमखास भेटणार्‍या नारायणरावांना आपण कसे विसरू !
दुर्गा नारायण भागवत ! दुर्गाबाई म्हटले की मला आठवण येते ती सतत काहीतरी शिकत राहणार्‍या सरस्वती, आपल्या भक्तांना सदैव ज्ञानाच्या मोहरा देत जाणार्‍या लक्ष्मी आणि देशाच्या तसेच समाजाच्या शत्रूंवर तुटून पडणार्‍या काली ह्या तीन देवींची! ह्या तिन्ही भूमिका दुर्गाबाईंनी अशा सार्थ बजावल्या की, प्रत्येक बाबतीत दुर्गाबाईंचा शब्द हा भारतात अखेरचा ठरला. कोणत्याही बाबतीत वाद घालायला अग्रेसर असणार्‍या भारतात ‘दुर्गा वाक्यम् प्रमाणं’ अशी स्थिती येण्यासारखी साधनाबाईंनी अगदी लहानपणापासून ते अगदी शेवटपर्यंत केली. रूढार्थाने बाईंनी ‘आत्मचरित्र’ लिहिलेच नाही. ‘माझा तेवढा आवाका नाही’ दुर्गाबाई त्याबाबत नम्रपणे नोंदवतात. पण, ‘ज्ञान म्हणजेच दुर्गाबाई’ असेच असल्याने त्यांच्या सर्व पुस्तकांमधून दुर्गाबाई आपल्याला भेटत राहतात आणि समजत राहतात. मग ते लिखाण मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृती, वेगवेगळ्या जीवनशैली, कला, आदिवासी आणि नागरी लोक, हिंदू आणि बौद्ध धर्म, शंकराचार्य आणि भगवान बुद्ध असे जड वाटणार्‍या विषयांवर असो वा स्वयंपाक, कशिदाकारी, निसर्ग, त्यांना भेटलेली लहानथोर माणसे अशा हलक्या-फुलक्या विषयांवर असो! मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी असणार्‍या अदृश्य पण अतूट परस्परसंबंधाचा अभ्यास बाईंनी आयुष्यभर केला. साहजिकच अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यात बाईंचा लाडका मनुष्यही आला, मनुष्यजीवन आले, त्याची कला, संस्कृती आणि इतिहास आला आणि म्हणूनच बाईंचे आयुष्य त्यांच्या पुस्तकांतून समजते असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

8-3
बाईंच्या ‘आठवले तसे’ ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच बाईंनी आपल्या ज्ञानप्रवासाचे रहस्य अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. ‘विद्येचे मला उपजत वेड!’ अशी कोणतीही गोष्ट मला दररोजच्या व्यवहारात आढळली नाही की जी शिकायला काही कौशल्य लागत नाही. म्हणून अगदी सुरुवातीपासूनच मी प्रत्येक गोष्ट शिकत आणि समजून घेत गेले आणि शेवटी ज्ञान म्हणजे काय हो? ‘का , केव्हा आणि कसे’ ह्या जिज्ञासेमुळे हाती असलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या एका लहानशा तिरिपेत अंतिम सत्याच्या शोधासाठी सुरू झालेला प्रवास म्हणजे ज्ञान! ज्ञानसाधनेच्या प्रत्येक टप्प्यावर हाती आलेले ज्ञान आपल्याला अजून अंतिम सत्याकडे जाण्यासाठी आकर्षित करते आणि हा प्रवास कधी थांबतच नाही. त्यामुळेच अंतिम सत्याचा हा अप्राप्य शोध सतत नावीन्यपूर्ण आणि त्यामुळेच सौंदर्यवान असतो. सौंदर्य आणि नावीन्य मला नेहमीच आवडत असल्याने मी हा प्रवास अतिशय आनंदाने करते. किती सुंदर शब्दांत बाईंनी आपले आयुष्यरहस्य मांडले आहे!
दुर्गाबाईंचा हा ज्ञानप्रवास सुरू झालाय अगदी लहानपणापासून आणि घरातच! पीठ भिजवणे, भाकरी करून चुलीत टाकणे, भाज्या कापणे, आगकाडी पेटविणे ह्यांसारख्या घरगुती गोष्टींतही कौशल्य लागते, हे बाईंच्या अगदी लहानपणीच लक्षात आले आणि ते कौशल्य लहान वयातच आत्मसात करण्यातच त्यांचा हा प्रवास सुरू झाला. कोणत्याही प्रकाराने अधिकृत अक्षरओळख झालेली नसताना आपल्या समवयस्क काकाच्या घरी होणारी शिकवणी ऐकूनच दुर्गाबाई पाढे, अक्षरे आणि कविता शिकल्या. घरातल्या कोणालाच न सांगता शाळेत जाऊन आपले नाव दाखल करून आल्या. ‘हो चूक आमचीच! तुला शाळेत घातले नाही ह्याची. जाऊ दे गं ही पीडा उद्यापासून शाळेत.’ कृतकरागाने आजोबा म्हणाले आणि दुसर्‍याच दिवशी दुर्गाबाईंना अधिकृतरीत्या शाळेत घातले गेले. शाळेत असतानाच त्यांना ‘ख्रिस्त’ आणि त्याच्या ‘पापाच्या भयाची’ ओळख झाली. पण, इतक्या लहान वयातही घरच्या देशभक्तीच्या संस्कारांमुळे ‘ख्रिस्ताचे साम्राज्यशाहीचे असणारे नाते’ बाईंनी ओळखले आणि त्यामुळे हा ख्रिस्त त्यांना कधी आपला वाटलाच नाही. आपली भक्ती, आपले पूर्वग्रह बाजूला सारून प्रत्येक गोष्ट तर्काच्या आणि अभ्यासाच्या तलवारीवर घासूनच स्वीकारायची लहानपणीच लागलेली सवय दुर्गाबाईंनी आयुष्यभर जपली आणि वाढवली.
लहान वयातच मातृछत्र हरपल्याने दुर्गा आणि कमला ह्या बहिणींना त्यांच्या सीताआत्यानेच लहानाचे मोठे केले. घरासाठी अविवाहित राहिलेली उच्चशिक्षित सीताआत्या मुलींसाठी इंग्रजी शाळा काढण्याच्या सरकारी नोकरीत होती. तिच्याबरोबर ह्या दोघी बहिणी नगर आणि नाशिक येथे राहिल्या. स्त्रियांना संसारोपयोगी अशी स्वयंपाक, शिवणकाम, कशिदाकारी अशी कामे तिने ह्या दोघींना शिकवलीच. पण, खेळ, निसर्गात फिरायला जाणे, बेडकाचे सांगाडे, पिसे गोळा करणे अशांसारख्या तत्कालीन पुरुषी गोष्टीही तिने ह्या दोघींना शिकविल्या. प्रत्येक गोष्टीतून ह्या दोघींवरचे स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि राष्ट्रप्रेम ह्याचे संस्कार गडद करण्यावरच आत्याने जातीने लक्ष दिले. स्वतः अजिबात सोवळेओवळे आणि शिवाशिव न पाळणारी सीताआत्या दुसर्‍याच्या घरी मात्र त्यांची शिवाशिव आणि सोवळे पाळत असे. दुसर्‍यांच्या मताचाही आदर करायला ह्या दोघींना सीताआत्याने शिकविले ते असे! आत्याची शिस्त, तिचे संस्कार आणि तिने लावलेल्या आवडी ह्या दोघींच्या पुढील आयुष्याचा पाया ठरल्या.
पुढे सीताआत्याच्या निधनानंतर दुर्गाबाई व कमलाबाई मुंबईला आल्या. बी.ए.ला आद्यशंकराचार्यांच्या ‘ब्रह्मसूत्रभाष्याचा’ अभ्यास करताना आचार्यांनी जगातल्या अंतिम सत्याची व्यावहारिक आणि पारमार्थिक पातळीवर विभागणी केल्याचे लक्षात येताच दुर्गाबाई चक्रावल्या. अंतिम सत्ये दोन कशी असू शकतात ह्या प्रश्‍नाने पछाडल्या गेलेल्या दुर्गाबाईंनी शंकराचार्यांच्या ग्रंथावरच्या कोणत्याही टीकेचा, समीक्षेचा अभ्यास न करता, प्रत्यक्ष ग्रंथाचाच अभ्यास सुरू केला. बाईंचा अभ्यास हा असा होता अगदी मुळापासून केलेला! ‘ईश्‍वरवादी’ आचार्यांना गवसलेले अंतिम सत्य समजून घेतल्यावर ‘निरीश्‍वरवादी’ भगवान बुद्ध अंतिम सत्याबाबत काय म्हणतात ते समजून घेण्यासाठी दुर्गाबाईंनी एम.ए. करताना बुद्धाचे साहित्य अभ्यासाला घेतले. त्यांचा विषय होता – एरीश्रू र्इीववहळीीं र्गीीर्ळीिीीवशपलश! भगवान बुद्धांनी त्यांच्या मठात केलेल्या न्यायनिवाड्यांचा आणि मठातल्या नियमांचा तो अभ्यास ! कोणताही अभ्यास मुळापासूनच करणार्‍या दुर्गाबाईंनी ह्या ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावर अवलंबून राहण्याचा आपल्या प्राध्यापकांचा सल्ला धुडकावला. पाली आणि अर्धमागधी भाषा शिकून बाईंनी मूळ ग्रंथाचाच अभ्यास केला. तेव्हा मॅक्समूलरने पालीतल्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करताना काही भाग अश्‍लील म्हणून गाळून टाकला आहे, असे बाईंच्या लक्षात आले. भगवान बुद्धांच्या ‘पातिमोक्ख’ विनय नियम’मधल्या लैंगिक आचारांसंबंधीच्या सूचनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाईंनी एलिस आणि वेल्सचे लैंगिकता सेक्स याविषयीचे सर्व ग्रंथ वाचले. अविवाहित आणि तरुण मुलीने ‘लैंगिकता’ ह्या शब्दाचा उच्चार करणेही ज्या काळात पाप होते, त्या काळात बाईंनी लैंगिकतेचा अभ्यास केला. ह्या विषयात भगवान बुद्धांची नियमावली अतिशय प्रांजळ आणि नेटकी असल्याचे लक्षात आल्यावर बाई आपल्या अभ्यासावर ठाम राहिल्या. लैंगिकता ह्या विषयाचा अभ्यास केल्याने दुर्गाबाईंच्या विरोधात गदारोळ उडाला. केम्ब्रिज विद्यापीठाने हा प्रबंध नावाजलाच, पण आंतरराष्ट्रीय बौद्ध मिशनरी संघटना महाबोधी सोसायटीनेसुद्धा नावाजला. जपानी बौद्ध भिक्षूंनीसुद्धा ह्या अभ्यासाचे कौतुक केले. इथे पहिल्यांदा भेटलेला गौतम बुद्ध बाईंना अभ्यासासाठी जन्मभर गुंतवून ठेवत गेला. पुढे विपश्यना साधनेचे जगप्रसिद्ध अभ्यासक सत्यनारायण गोएंका ह्यांनी स्वतः दुर्गाबाईंना आपल्या विपश्यना साधनेत सहभागी होऊन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रण दिले होते.
1930 मध्ये हुतात्मा जतींद्रदास ह्यांचे प्राणांतिक उपोषणात तुरुंगातच निधन झाल्यावर विद्यार्थिनी दुर्गाबाई श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाल्या, ‘‘जतींद्रनाथ, तुमच्या त्यागाची आणि देशप्रेमाची सर आम्हाला नाही. पण, देशासाठी तुमचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवून आमच्या अल्पशक्तीप्रमाणे आम्ही देशासाठी काम करू, सतत काम करू.’’ भाषण झाल्यावर दुर्गाबाई रडायला लागल्या, ‘‘हे न पेलवणारे वचन आपण जतींद्रनाथांना देऊन बसलो काय?’’ पण पुढील प्रत्येक प्रसंगात दुर्गाबाई अशा वागल्या की देशहिताच्या विरोधात कोणतीही घटना घडली की, अगदी भारतभरातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले सगळे ‘मुंबईच्या गिल्डर लेनमधल्या दुर्गाबाई आपल्यावर काय कडाडत आहेत’ ह्याचीच काळजी करत असत; अगदी दुर्गाबाईंच्या शेवटच्या दिवसापर्यंत! त्यामुळेच दुर्गाबाई अभिमानाने म्हणू शकल्या, ‘‘हे वचन मी पाच टक्के का होईना पण पाळू शकले. देशहिताचा प्रश्‍न समोर आल्यावर हे वचनच मला स्वार्थ टाकायला शिकवते, धैर्य देते.’’ पुढे आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष दुर्गेसारख्याच लढणार्‍या दुर्गाबाईंची ही मूळ विचारचौकटही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेताना लक्षात घेतली पाहिजे.
1920 नंतरच्या गांधीयुगात महात्मा गांधींना त्यांनी आपला नेता मानले . ‘गांधी ह्या माणसाचा सर्वांनाच मोठा धाक होता,’ दुर्गाबाई अगदी आवर्जून सांगतात. घरातली आर्थिक स्थिती खराब असली आणि खादी महाग असली तरी घरात सर्वांच्या अंगावर खादी आली. त्यासाठी समवयस्क लोकांकडून होणार्‍या टिंगलटवाळीकडे दुर्गाबाईंनी ढुंकून दुर्लक्ष केले. ‘कोणत्याही साधनेचा मार्ग हा विरोधाने आणि अडचणींनी भरलेला असणारच’ हे तत्त्व बाई बुद्धाकडूनच शिकल्या होत्या नं! टाइम्सच्या ऐवजी घरात क्रोनिकल येऊ लागला. आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून बाई काही काळ गांधीजींच्या चळवळीतदेखील सामील झाल्या. गांधीप्रेमी आणि गांधीविरोधक ह्यांच्या होणार्‍या संघर्षात दुर्गाबाईंना न. चिं. केळकर, दादाभाई नौरोजी ह्यांची नात पेरीन भरूचा ह्यांच्यासारख्या मोठ्या माणसांशी पण जाहीर आणि कडाक्याचा वाद गांधींच्या बाजूने घालावा लागला. पण, तिथेही न. चिं. केळकरांना गांधीविरोध करण्याची वेळ गांधीजींच्या केळकरांप्रती झालेल्या पक्षपाती वर्तनामुळेच आली, हे कटू सत्य जाहीर मान्य करायला न बाई चुकतात ना त्यांचे वडील! ज्ञानकोशकार केतकर ह्यांना महात्मा गांधींच्या भाषिक गोंधळामुळेच आर्थिक विपन्नता आली, हे समजल्यावर जन्मभर महात्मा गांधींच्या निष्ठावान अनुयायी असलेल्या बाई महात्मा गांधींवर टीका करायला पण अजिबात कचरल्या नाहीत. ‘जे चुकले त्याला चुकलेच म्हणायला हवे, तिथे काय गांधीभक्ती कामाची!’ असे कोणाचाही मुलाहिजा न राखता बाई म्हणतात. जन्मभर गांधीवाद जगलेल्या दुर्गाबाई पुढे 1978 चा स्वातंत्र्यदिन क्रांतिकारक जगन्नाथ पोतदार ह्यांच्याबरोबर साजरा करायला मिळाल्याने त्या दिवसाला ‘सुफळ संपूर्ण स्वातंत्र्यदिन’ म्हणतात. देशासाठी लढलेल्यांची दुर्गाबाई कधीच विभागणी करीत नाहीत आणि चांगल्याला चांगले व चुकीला चुकलेलेच म्हणतात. ह्या अशा गुणांमुळेच दुर्गाबाई पुढच्या काळात समाजाच्या ‘दिशादर्शक, मार्गदर्शक’ झाल्या.
दुर्गाबाईंनी पीएच.डी. करताना ‘मध्य प्रांतातील आदिवासी जीवन’ हा विषय आपल्या संशोधनकार्यासाठी निवडला. मुंबई विद्यापीठाचे संशोधन सहाय्य घेऊन दुर्गाबाई बर्‍याच वेळा एकट्याच आदिवासींमध्ये जाऊन राहिल्या. त्यांची संस्कृती, सण, त्यांचा आहार, राहणे, लग्न, मृत्यू, चालीरीती, त्यांची गाणी अशा अनेक बाबतींत बाईंनी सखोल अभ्यास केला. पण, शेवटच्या फेरीत दुर्गाबाईंना तिथे विषारी सुरणाची बाधा झाली. खरेतर प्रबंध पूर्ण झालाच होता. त्यात थोडीशीच भर टाकायची बाकी होती. लिहून झालेला प्रबंध विद्यापीठाकडे सादर करणे सहज शक्य होते. पण, दुर्गाबाईंचे अभ्यासातले मार्गदर्शक जी. जी. घुर्ये ह्यांनी दुर्गाबाईंवर ताशेरे ओढले. ते सहन न झाल्याने दुर्गाबाईंच्या वडिलांनी विद्यापीठाने संशोधनासाठी दिलेले आर्थिक सहाय्य विद्यापीठाला परत केले. नैराश्येच्या त्या काळात ‘दगडावर जरी तुला टाकली तरी तिथेही तू रुजून येशील! हेही दिवस जातील,’ असे सांगणारे दुर्गाबाईंचे वडील दुर्गाबाईंच्या मागे उभे राहिले. तीन-चार वर्षे मुरलेला हा आजार बघून दुर्गाबाईंनी कधीच लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली. आपल्यानंतर आपल्या मुलीचे आर्थिक हाल होऊ नयेत म्हणून आपल्या छोट्याशा साबणाच्या कारखान्यात दुर्गाबाईंच्या वडिलांनी दुर्गाबाईंना भागीदारी दिली. आपल्यापाठी सतत हिमालयासारखे उभे राहणार्‍या वडिलांना दुर्गाबाई अगदी शेवटपर्यंत कधीच विसरू शकल्या नाहीत.
ह्याच आजाराने तीन वर्षे बिछान्यात पडून राहिलेल्या दुर्गाबाईंना एकेदिवशी आभाळाचा छोटासा तुकडा दिसला. हळूहळू बाहेर येऊन दुर्गाबाईंनी बाहेरचा पाऊस, पशुपक्षी, झाडे बघितली. त्या चैतन्यरूपी निसर्गाने बाईंच्या आजारी शरीरावर व निराश मनावर फुंकर घातली आणि तिथेच दुर्गाबाईंचा पुनर्जन्म झाला. तोपर्यंत मानववंश, संस्कृती, बुद्ध, शंकराचार्य, वेगवेगळे धर्म अशा तुलनेने अवजड विषयांवर लिहिणार्‍या दुर्गाबाई आता निसर्ग, त्यातले उत्पती-स्थिती-लय यांचे चक्र यांसारख्या विषयांवर लिहू लागल्या. ‘पराडकरांकडे आजोळ असले तरी तुझ्या लिखाणाची भाषा मोरोपंतासारखी अवघड असू देऊ नकोस,’ हा आजोबांचा सल्ला पुढच्या लेखनासाठी दुर्गाबाईंनी आयुष्यभर पाळला.
त्यानंतर बाईंनी कधी मागे वळून बघितलेच नाही. आपल्या अ-पूर्वग्रहदूषित, प्रेमभरीत आणि जिज्ञासू नजरेने शोधलेले सत्य शब्दांकित करणार्‍या बाईंना त्यासाठी तसा कोणताच विषय वर्ज्य नव्हता. अगदी फळे, फुले, पक्षी, जायफळाची लागवड, खापूरल्यासारखे जुने पदार्थ, मासे कापताना विळीवर बसणार्‍या पाचकळशी जमातीतल्या बायका, हातावरच भाकरी थापणारी स्त्री, आपल्या आजीबरोबर साजरा केलेला शेवटचा सण, आपल्या वडिलांचा झालेला आकस्मिक मृत्यू, केतकरांचा वारसा पुढे चालविणारे गणेश रंगो भिडे, पोळी, लोणची, गाणगापुरातल्या भस्माच्या टेकड्या, सौंदर्यमूल्यं टिपणारे पु. शि. रेगे असे विविध विषय बाईंना चालले. कोणत्याही गोष्टींमधले चांगले, सुंदर किंवा लक्षवेधी असे काहीही बाईंच्या नजरेत आले की बाईंनी ते टिपलेच म्हणून समजा! ‘माझ्या देशातली ती कला श्रीमंती आणि ती टिपण्यासाठी असलेले माझे भिकारीपण कधी संपूच नये,’ अशा शब्दांत ह्यामागची भूमिका बाई स्पष्ट करतात. अगदी शेवटच्या दिवसांत आपल्या घराच्या गल्लीतच चक्कर मारू शकणार्‍या दुर्गाबाई तिथल्या चांभाराचे चप्पल शिवणे तासन्तास बघत बसत. निरीक्षण आणि अभ्यास ह्या आपल्या गुणांच्या साहाय्याने बाईंनी भरपूर साहित्य प्रसवले.

8-4
पण अभ्यासपूर्ण गद्यलिखाण करणार्‍या बाईंचा मूळ प्रांत ‘कविता’! अगदी तरुण वयातच बाई कविता लिहीत आणि त्यांचे त्या काळातील त्यांचे श्रोते होते त्यांचे वडील! रवींद्रनाथांचे ‘गीतांजली’ हे काव्य बाईंनी पूर्णपणे संस्कृतमध्ये रुपांतरीत केले होते. देशबंधू चित्तरंजन दासांच्या समुद्रावरील कवितादेखील बाईंनी भाषांतरीत केल्या होत्या. पण, बाईंनाच स्वतःच्या कविता न आवडल्याने त्यांनीच त्या फाडून टाकल्या. इथे दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. बाईंना गद्यसाहित्याकडे आणले ते साने गुरुजींनी! आपल्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदरच गुरुजींनी हे फार सुंदर काम केले आणि दुर्गाबाई बहुभाषातज्ज्ञ असल्याने, (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, बंगाली, फ्रेंच, जर्मन आणि गुजराथी) त्यांना आपल्या अभ्यासाचा विस्तार आणि खोली सहज वाढविता आली. गुरुजींच्या आंतरभारतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दुर्गाबाई!
वाचन, लिखाण याशिवायही दुर्गाबाईंच्या दोन विशेष आवडी म्हणजे स्वयंपाक आणि कशिदाकारी! सीताआत्यानेच ह्या दोघींना लहानपणी शिकविलेल्या! राजा नलाने लिहिलेले स्वयंपाकाचे पुस्तक त्यांनी शोधून काढले. पूर्वी स्वयंपाक हे पुरुषांचेच काम होते, लोणचे आणि श्रीखंड ह्या पदार्थांचा शोधक महाभारतातला भीम, ईडली हा फार प्राचीन खाद्यपदार्थ आहे, असे खूप ज्ञानवर्धक शोध दुर्गाबाईंनी लावले. पण, बाईंचा स्वयंपाक हा फक्त पुस्तकापुरता मर्यादित नव्हता. वेगवेगळे वाचून वेगवेगळ्या पदार्थांत वेगवेगळे बदल बाई आपल्या स्वयंपाकघरात घडवून आणत. त्याची चव घेऊन त्याला दाद देणारा म्हणून बाईंचा भाचा मोहन त्यांचा खूप लाडका होता. बाईंचे दुसरे भाचे डॉ. शिरीष ह्याबद्दल दुसरीच गंमत सांगतात. ज्यांची भेट व्हावी म्हणून मोठमोठे लोक प्रयत्न करत त्या दुर्गाबाई एकदा एका गरीब पण सुग्रण बाईला भेटायला शिरीष ह्यांच्या मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेल्या होत्या. ते ‘चिरोटे’ कसे करायचे हे समजून घेण्यासाठी! लेखकाची आजी लीलाताई, दुर्गाबाईंना चाळीस वर्षांनंतर भेटली. पण, तेव्हाही ‘तो तुमचा मसालेभात!’ अशी आठवण दुर्गाबाईंना चाळीस वर्षांनंतरही आली. शाकाहारी असलेल्या बाई आपल्या मांसाहारी भाचेसुनेने शिजवलेल्या मटणाच्या वासावरूनच तिचे कौतुक करत आणि तिला, चारुताईंना आपल्या मांसाहारी पाहुण्यांसाठी ते पदार्थ राखून ठेवायला सांगत. गांधीयुगात खादीचे कपडे घालणार्‍या दुर्गाबाई खादीवरही कशिदाकाम काम करत असत. कोणतेही कशिदाकाम आणि ते करणार्‍या लोकांची संस्कृती याचा काय संबंध आहे ते ही बाई अगदी सहज शोधून काढत. नवा पदार्थ किंवा कशिदाकामाची नवीन पद्धत कुठे शिकायला मिळतेय, हे कळले की बाई तिकडे गेल्याच म्हणून समजावे.
‘कला आणि संस्कृतीबरोबरच त्यांचे जतन करणारा माणूस हा दुर्गाबाईंचा खूप आवडता! माणसाशिवाय त्या कधी राहूच शकल्या नाहीत. उदंड प्रेम केले त्यांनी माणसावर आणि म्हणूनच ‘साहित्य परिषदेची’ अध्यक्षा झाल्यापेक्षा ‘तमाशा परिषदेची’ अध्यक्षा झाल्याचा त्यांना जास्त अभिमान होता. त्याचवेळी वेश्यांशी ओळख झालेल्या दुर्गाबाई त्यांचीही दुःखे जाणून घ्यायला, त्यांच्याशी बोलायला अजिबात कचरल्या नाहीत. दुर्गाबाईंच्या लहानपणीच तमाशा म्हणजे नेमके काय, हे घरातल्या सर्वांना दाखविण्यासाठी आपल्याच घरात तमाशाचा विशेष खेळ घडवून आणणार्‍या वडिलांचे त्या आभार मानतात. ‘भागवतांच्या घरात जन्म न होता त्या घरात जन्म झाला असता माझा तर माझी नियतीही हीच होती,’ अशा शब्दांत तथाकथित नीतिमान लोकांकडून ह्याबाबत दुर्गाबाईंना झालेला विरोध त्यांनी मोडून काढला.
एक सत्यप्रिय, अभ्यासू आणि देश-विदेशांत कीर्ती प्राप्त झालेल्या दुर्गाबाईंचा परत एकदा पुनर्जन्म झाला तो आणीबाणीच्या काळात!’ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर’ पडलेला घाला बघून तोपर्यंतच्या सरस्वतीने अगदी रणरागिणी कालीचे रूप घेतले. ‘ओपिनियन’चे संपादक गोरवाला आणि ‘साधना’ साप्ताहिक ह्यांच्याव्यतिरिक्त कोणीही आणीबाणीच्या विरोधात स्पष्ट शब्दांत आवाज उठवत नव्हते. मोठमोठ्या साहित्यिकांनी आणीबाणीचा साधा निषेध करायचीसुद्धा हिंमत दाखविली नाही. त्यामुळे दुर्गाबाई जास्तच खवळल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि आणीबाणीचे खरे स्वरूप काय, हे लोकांना सांगायला त्यांनी गावोगाव दौरे सुरू केले. कराडच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना आणीबाणीच्या निषेधार्थ आणि जयप्रकाशजींच्या ढासळलेल्या तब्येतीला आराम पडावा म्हणून सगळ्यांनाच दुर्गाबाईंनी दोन मिनिटे उभे रहायला लावले. ही घटना भलतीच गाजली. आयोजकांपैकी कोणीतरी ‘तुमचा आगाऊपणा थांबविला नाही तर संमेलनाचा मंडपच जाळून टाकीन’ ह्या दिलेल्या धमकीला हसून ‘मंडपाशिवाय आहे तरी काय तुमच्या ह्या संमेलनात? खुशाल जाळा,’ असे बाणेदार उत्तर दुर्गाबाईंनी दिले. गावोगावच्या भाषणांमध्ये दुर्गाबाई काय बोलतात, हे जाणण्यासाठी दुर्गाबाईंवर चोवीस तास पाळत ठेवण्यासाठी दिल्लीवरून खास गुप्तहेर नेमण्यात आला होता. दुर्गाबाईंबद्दल खडान्खडा माहिती दररोज इंदिराबाईंच्या समोर सादर होत होती. दुर्गाबाईंना पकडण्यास स्थानिक सरकारने असमर्थता दाखविल्याने शेवटी दिल्लीच्या तीन पोलिसांच्या पथकाने दुर्गाबाईंना जणू त्यांचे दुसरे घरच असणार्‍या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातून अटक केली. तुरुंगात बाईंनी त्यांच्या आवडत्या गौतम बुद्धाच्या ‘जातककथांचे’ मराठीत भाषांतर केले. तुरुंग अधिकार्‍याच्या ‘भारतातील तुरुंग’ ह्या विषयावरील अभ्यासासाठी दुर्गाबाईंनी तेथेही मार्गदर्शन केले. तुरुंगातदेखील आपला दररोजचा अठरा तासांच्या अभ्यासाचा नियम दुर्गाबाईंनी पाळला.
तुरुंगातून सुटल्यावर दुर्गाबाईंनी जनता सरकारने देऊ केलेली मानाची आणि जबाबदारीची सर्व पदे नाकारली. किंबहुना जनता सरकारमध्ये ज्या पद्धतीने भांडणे झाली ते बाईंना अजिबात रुचले नाही. स्वतः कोणत्याही सरकारचे अजिबात मिंधे राहू नये म्हणून सर्वप्रकारची सरकारी बक्षिसे आणि सरकारी लाभ घेण्याचे दुर्गाबाईंनी कायमसाठी बंद केले ते त्याच काळात! तसेच साहित्यिकांना प्रत्यक्ष जनतेकडूनच बक्षिसे दिली जावीत म्हणून जनतेकडूनच पैसा गोळा करायला दुर्गाबाईंनी ‘वंदे मातरम्’ संस्था स्थापन केली; परंतु सामान्य जनतेत शब्दाला मान असणार्‍या आणि हे काम पुढे नेऊ शकतील अशी आशा असणार्‍या साहित्यिकांनीच त्याबद्दल मदत करायला असमर्थता दर्शविल्याने दुर्गाबाईंना ही संस्था बंद करावी लागली. आणीबाणीनंतरच्या दुर्गाबाईंच्या लिखाणात त्यांची देशाची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजीच सदैव व्यक्त होत राहिली. शेवटी जतींद्रनाथांना वचन दिले होते ना दुर्गाबाईंनी! ‘न ब्रूयात सत्यं अप्रियं’ हा सल्ला दुर्गाबाईंनी कधीच मानला नाही. समाजाचे आणि देशाचे हित ज्यात असेल ते सर्व अगदी स्पष्टपणे दुर्गाबाई वेळोवेळी बोलतच राहिल्या. कित्येक वेळा त्याबद्दल हल्ल्याची धमकी बाईंना दिली गेली. त्यासाठी सरकारने देऊ केलेले पोलिस संरक्षण बाईंनी प्रत्येक वेळी नाकारले, पण बाई बोलतच राहिल्या. बाईंच्या प्रत्येक शब्दाची दखल सरकारला सदैव घ्यावीच लागली.
‘खाष्ट विदुषी’ म्हणून प्रसिद्ध असणार्‍या दुर्गाबाई सामान्य माणसाला मात्र सदैव उपलब्ध राहिल्या. त्याच्याकडून शिकणे आणि त्याला शिकविणे, हाच तर मुळी त्यांचा जीवनानंद होता. परंतु, धाकट्या बहिणीच्या, कमलाबाईच्या मृत्यूनंतर ढासळलेल्या दुर्गाबाईंनी त्यानंतर मात्र आत्मकोशातच राहणे पसंत केले. मृत्यूला स्वरचित ‘देहोपनिषदा’द्वारे ज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवणारी व ‘आपल्या प्रिय माणसांचे हात हातात असतानाच मृत्यू येणे भाग्याचे’ असे मानणारी भागवत कुटुंबाची दुर्गुताई आपल्या भाच्यांचे आणि भाचेसुनांचे हात हातात असतानाच ‘सुखवेडी’ होऊन 7 मे 2002 रोजी ज्ञानाच्या आपल्या दुसर्‍या प्रवासासाठी निघून गेली.
शेवटी एकच म्हणतो- दुर्गाबाईंचा सर्वव्यापी अभ्यास दुर्गाबाईंच्या प्रत्येक कांगोर्‍याला स्पर्श करून एका लेखात मांडणे हे दुर्धरच. कारण, शेवटी सरस्वतीला शब्दांत कसे बांधणार किंवा मांडणार?

ज्ञान आणि अभ्यास ह्यांचे मूर्तिमंत प्रतीक असणार्‍या दुर्गाबाईंनी अभ्यास केला नव्हता तो विज्ञान आणि गणित ह्या विषयांचा… आणि जणू तीच उणीव भरून काढली त्यांच्या बहिणीने, परदेशात शिकलेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ असणार्‍या कमलाबाई सोहोनी ह्यांनी.
दुर्गाबाईंबरोबरच आजी-आजोबा, वडील, आत्या प्रामुख्याने सीताआत्या ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली बालपण घालविलेल्या कमलाबाईंची पहिली उत्तुंग ओळख आपल्याला होते ती त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी (1933). मुंबई विद्यापीठातून विज्ञानाच्या पदवी परीक्षेत पहिल्या आलेल्या कमलाबाईंना बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेने पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारला होता तो केवळ त्या स्त्री आहेत म्हणून ! आपल्या वडिलांबरोबर संस्थेचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन ह्यांच्या कार्यालयात गेल्यावर अजूनच स्पष्ट झालेल्या ह्या अन्यायाच्या निषेधार्थ कमलाबाईंनी रामन ह्यांच्या कार्यालयासमोरच सत्याग्रह करण्याची तयारी केली. ते बघून कमलाबाईंना एका वर्षासाठी फक्त उमेदवारी तत्त्वावर प्रवेश दिला गेला. थोडक्यात, जर त्या एका वर्षातले कमलाबाईंचे काम संस्थेला पसंत पडले तर आणि तरच त्यांना दोन वर्षांचा अभ्यासक्रम पुढच्या एका वर्षात पुरा करण्याची परवानगी मिळणार होती.
जीवरसायन विभागाचे प्रमुख असलेल्या श्रीनिवासय्या ह्यांच्या हाताखाली काम करण्यास कमलाबाईंनी सुरुवात केली. रोज सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत! रात्रीचे वाचन वेगळेच! जन्मजात खेळाडू असलेल्या कमलाबाईंनी दररोज संध्याकाळी चार ते सहा ही वेळ मात्र स्वतःसाठी मागून घेतली, दररोज टेनिस खेळण्यासाठी. पुढे वयाच्या चौसष्ठाव्या वर्षापर्यंत कमलाबाई टेनिस खेळतच राहिल्या. अगदी पहिल्याच दिवशी प्रयोगासाठी उपकरणे मागविल्यावर श्रीनिवासय्या ह्यांनी, ‘लहानसहान गोष्टीसाठी अडून राहील तो शास्त्रज्ञ कसला?’ असे सांगून काचेच्या नळ्या कमलाबाईंच्या हातात दिल्या आणि त्यापासून स्वतःच आपली उपकरणे बनवायचे शिक्षण दिले. जीवरसायनशास्त्रात लागणारे विशिष्ट पडदे (membranes) तयार करायला आणि त्यांची सच्छिद्रता (Porosity) काढायला त्यांनी कमलाबाईंना शिकविले. थोडक्यात, जीवरसायनशास्त्राचा पायाच त्यांनी भक्कम करून टाकला. कमलाबाईंच्यातला शास्त्रज्ञ जणू स्वयंभू करायचा, असाच श्रीनिवासय्या ह्यांचा विचार असावा. शिकायला आलेल्या कमलाला खरेच शिकायचे आहे का, ह्या तांत्रिक मार्गदर्शनाने ती वैतागून जाणार आहे. ह्यासाठी श्रीनिवासय्या ह्यांनी घेतलेल्या तीन महिन्यांच्या परीक्षेत कमलाबाई हसत हसत उत्तीर्ण झाल्या आणि मग श्रीनिवासय्या ह्यांनी जणू आपले दुर्वासांचे रूप टाकून देऊन ते कण्व झाले आणि पित्यासारखी काळजी ते आपल्या ह्या लाडक्या विद्यार्थिनीची घेऊ लागले.
लहान बाळाचे अन्न असणार्‍या दुधावर केलेल्या संशोधनात कमलाबाईंना आढळले की, बाळाला सर्वांत चांगले दूध असते ते त्याच्या मातेचेच. त्यानंतर गाढविणीचे, नंतर गाईचे आणि सर्वांत शेवटी म्हशीचे. परंतु देशातील म्हशीच्या दुधाची व्यापक उपलब्धता बघून कमलाबाईंनी म्हशीचे दूध आईच्या दुधासारखेच सकस (Humanisation of Buffalo Milk) करण्याच्या पद्धतीचा शोध आपल्या अभ्यासाअंती लावला. जेणेकरून पूर्ण देशातल्या माता-बालकांना ह्याचा लाभ घेता येईल. परंतु, ह्या शोधाला जास्त प्रसिद्धीच दिली गेली नाही. लोकांसमोर तो आणलाच गेला नाही आणि एक दूरगामी व बहुपयोगी संशोधन फक्त कागदावरच राहिले. नंतरचे कमलाबाईंचे संशोधन होते भारतीयांच्या आहारात मोठ्या प्रमाणात असलेल्या कडधान्यांवर. कडधान्यांवर संशोधन करणार्‍या कमलाबाई जगात पहिल्या! सर्व कडधान्यांत मटकी सर्वांत चांगली. कडधान्यांना मोड आणल्याने त्यांच्यात ‘क’ व ‘ब’ जीवनसत्व तयार होते. कडधान्ये मोड यायला लागल्यावर पहिल्या अठ्ठेचाळीस तासांतच खायला जास्त चांगली आणि लहान मुलाचे आईचे दूध सोडवल्यावर त्यांना मटकीच मोठ्या प्रमाणावर द्यावी, अशा निष्कर्षांचे ते संशोधन होते. ह्याच काळात श्रीनिवासय्या ह्यांनी कमलाबाईंकडून निरनिराळ्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधकांचे लेख वाचून घेऊन आपल्या शंका खुद्द लेखकालाच विचारायला प्रोत्साहन दिले. कमलाबाईंचे ज्ञान व शिकायची तळमळ त्यांच्या प्रश्‍नांतून सहजपणे व्यक्त होत असल्यानेच त्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनीसुद्धा कमलाबाईंनी, एका मागास देशातल्या विद्यार्थिनीने विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे दिली. एका वर्षातील कमलाबाईंची ज्ञानतपस्या बघून सर सी. व्ही. रामन ह्यांनीदेखील ‘आपण स्त्रियांना प्रवेश नाकारत होतो ही आपली चूकच होती,’ हे स्पष्ट शब्दांत मान्य करून त्याच वर्षापासून स्त्रियांनादेखील प्रवेश देण्यास सुरुवात केली. कमलाबाईंची खरी ओळख पटल्यावर रामन यांनी आपल्या ह्या लाडक्या मुलीला मग कितीतरी वेळा घरी जेवायला बोलावले, तिच्याबरोबर ते टेनिस खेळू लागले. पंडित नेहरू, सरदार पटेल ह्यांच्यासारखे मोठे नेते घरी जेवायला आल्यावरदेखील त्यांनी मदतीला आपल्या ह्या लाडक्या मुलीलाच घरी बोलावले. थोडक्यात, कमलाबाईंचे सुरुवातीचे सगळे विरोधक नंतर कमलाबाईंच्या ज्ञानतळमळीचे आणि ज्ञानसाधनेचे चाहते झाले, प्रोत्साहक झाले.

8-5
1936 च्या मार्चमध्ये मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झालेल्या कमलाबाईंना खरेतर आपले गुरू श्रीनिवासय्या ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करायची होती. पण, नेमके तेव्हाच श्रीनिवासय्या आपल्या पुढच्या शिक्षणासाठी स्वीडनला गेले. कमलाबाईंनी मग मुंबईला येऊन हाफकिन संशोधन केंद्रात काम करायला सुरुवात केली. पण, वर्षभरातच मुंबई विद्यापीठाने कमलाबाईंना त्यांच्या परदेशी शिक्षणासाठी ‘स्प्रिंगर रिसर्च’ आणि ‘मंगलभाई नथूभाई फॉरीन स्कॉलरशिप’ ह्या शिष्यवृत्या दिल्या. कोणत्या महाविद्यालयात शिकायचे आणि इंग्लंडमध्ये राहायचे कुठे, याचा विचारही करायला वेळ न मिळालेल्या कमलाबाई इंग्लंडला जायला निघाल्या ते केवळ ज्ञानतळमळीने! इंग्लंडल सल्ला घेण्यासाठी आपले गुरू श्रीनिवासय्या ह्यांना भेटण्यासाठी त्या डेन्मार्कला गेल्या. डेन्मार्कमध्येच जागतिक कीर्तीचे जीवरसायनशास्त्रज्ञ प्रो. सोरेन्सन ह्यांना त्या भेटल्या. बंगळुरू येथून लिहिलेल्या शास्त्रशंकांच्या पत्रांद्वारे ओळख झालेले सोरेन्सन प्रत्यक्षात भेटतील असा कमलाबाईंनी कधी विचारच केला नव्हता. पूर्वी वाचलेली सोरेन्सन यांची ‘लॅब इन बॅग’ (पिशवीतील प्रयोगशाळा) कमलाबाईंना प्रत्यक्षात पहायला आणि हाताळायला मिळाली. पुढे हीच संकल्पना कमलाबाईंनी ग्राहकांच्या हितासाठी भारतात वापरली.
नंतर कमलाबाई केम्ब्रिजला परत गेल्यावर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सर एफ गॉलन्ड हॉपकिन्स यांची त्यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची परवानगी मिळावी म्हणून भेट घेतली. ज्या प्रयोगशाळेत सर हॉपकिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला जगभरचे नामवंत शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे आपल्या संधीची वाट बघत त्या प्रयोगशाळेत कमलाबाई आयत्या वेळी येऊन प्रवेश मागत होत्या. काम करण्यासाठी एकही टेबल उपलब्ध नसल्याचे बघून कमलाबाई गोंधळून गेल्या, निराश झाल्या. पण, त्याचवेळी नेहमीसारखे आपले दैव आपल्या मदतीसाठी धावून आल्याचा एक विलक्षण अनुभव कमलाबाईंना आला. जगप्रसिद्ध जीवरसायनतज्ज्ञ डॉ. डेरिक रिक्टर त्यांच्या मदतीला आले. एका मागास देशातल्या (तेव्हा युरोपियन लोक भारताला ‘मागास देश’ म्हणून संबोधायचे, ‘विकसनशील’ नाही.) लहानखुर्‍या कमलाबाईंची त्यांना दया आली आणि त्यांना आपल्या टेबलवर दिवसा काम करायची परवानगी डॉ. रिक्टर यांनी दिली. पण, थोड्याच दिवसांत कमलाबाईंची ज्ञानतळमळ बघून कमलाबाईंचे पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून काम करायला त्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्याच काळात कमलाबाईंना अमेरिकन शिष्यवृत्तीद्वारे युरोपातील ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये भारत, इंग्लंड आणि अमेरिका ह्या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायचा मान मिळाला. अमेरिकेत असतानाच आपल्या मैत्रिणीचे पती म्हणून डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (नोबेल पारितोषिक विजेते) ह्यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनीच नंतर कित्येक वेळा कमलाबाईंना भारतात न परतण्याचा आग्रह केला.
केम्ब्रिजमधल्या आपल्या संशोधनात वनस्पतींच्या श्‍वसनातील महत्त्वाच्या ‘सायटोक्रोम सी’चा शोध कमलाबाईंना लागला. सर गॉलन्ड हॉपकिन्स यांच्या आग्रहानुसार कमलाबाईंनी हेच संशोधन आपल्या पीएच.डी.साठी विद्यापीठाला सादर केले. बाकीच्या विद्यार्थ्यांचे प्रबंध हजारो पानांचे असताना कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या चाळीस पानांचा होता. नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांसमोर त्यांनी आपले संशोधन मांडले आणि सगळ्यांनी कमलाबाईंच्या ह्या मूलभूत संशोधनाचे कौतुक केले.
दुर्गाबाईंसारखाच कमलाबाईंचाही एक विशेष म्हणजे त्यांना येणारी ‘पूर्वसूचनेची प्रचिती’ (Clairvoyance)! आपल्या तोंडी परीक्षेच्या आधीच थकलेल्या आणि त्यामुळे अर्धवट झोपेत असलेल्या कमलाबाईंच्या डोळ्यासमोर तोंडी परीक्षेत विचारले जाणारे 85 प्रश्‍न येऊन गेले. त्याची उत्तरेही आपल्याला येत असल्याचे कमलाबाईंना झोपेतच जाणवले. आणि नेमके तेच प्रश्‍न तोंडी परीक्षेत विचारले गेले. प्रबंध तर आधीच संमत झाला होताच. तोंडी परीक्षाही त्या सहज उत्तीर्ण झाल्या आणि प्रवेश घेतल्यापासून अवघ्या चौदा महिन्यांत 1939 च्या मार्च महिन्यात कमलाबाईंना जीवरसायनशास्त्रात केम्ब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली. हा बहुमान मिळविणार्‍या कमलाबाई पहिल्या भारतीय महिला होत!
पण आपल्या ज्ञानाचा फायदा माझ्याच देशाला झाला पाहिजे, ह्या गांधीवादी तत्त्वानुसार कमलाबाई पुढील शिक्षण आणि संशोधनासाठी लगेच भारतात परतल्या. आपले गुरू डॉ. गॉलन्ड ह्यांच्या सूचनेनुसार दिल्लीच्या लेडी हार्डिंग्स वैद्यकीय महाविद्यालयात तिथेच नव्याने सुरू झालेल्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कमलाबाईंनी वर्षभर काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणारी पहिली भारतीय स्त्री म्हणजे महात्मा गांधींच्या शिष्या, प्यारेलाल ह्यांच्या भगिनी आणि पुढे भारताच्या आरोग्यमंत्री झालेल्या श्रीमती सुशीला नायर. पण, तिथे मूलभूत संशोधनाला वाव नसल्याने कमलाबाईंनी वर्षभरातच दिल्ली सोडली आणि कुन्नूरला भारतीय आहार संशोधन प्रयोगशाळेत त्या सहाय्यक मार्गदर्शक पदावर रुजू झाल्या.
तोपर्यंत जीवरसायनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या कमलाबाईंना आहारशास्त्राची ही पहिली ओळख खूपच आवडली. ह्या विषयावर सपाटून वाचन करून कमलाबाईंनी आपल्या पुढच्या संशोधनाचा पाया भक्कम केला. वेगवेगळ्या पदार्थांमधील वेगवेगळी जीवनसत्वे, त्यांचे प्रमाण आणि त्याचा आहारात होणारा वापर ह्याचा अभ्यास करायचा जणू कमलाबाईंना छंदच लागला. प्रयोगशाळेतील प्रयोगासाठी वापरल्या जाणार्‍या उंदीर, ससे, कबुतरे ह्या प्राण्यांऐवजी त्यांनी तांदळातली पोरकीड वापरायची पद्धत विकसित केली आणि अस्तित्वात आणली. त्यामुळे ह्या प्राण्यांपायी होणारा मोठा खर्च वाचला. दुसर्‍या महायुद्धातील सैनिकांच्या आहारात तोरुला यीस्टचा समावेश करून त्या आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढविली ती कमलाबाईंनी इथे अभ्यास करूनच! तसेच भुईमुगाच्या पेंडेचा आहारात समावेश करावा. कारण, ती पेंड ‘ब’ जीवनसत्वाचे कोठार असते, हे टाटांना कमलाबाईंनी सुचविले ते येथूनच. कुत्रे चावल्यावर द्याव्या लागणार्‍या रेबीज प्रतिबंधक लसीच्या माध्यमात गरजेचे असलेले बायोटीन हे ‘ब’ जीवनसत्व बदकाच्या अंड्यापासून कमलाबाईंनी तयार करून दिले ते इथेच.
उच्चशिक्षित, केम्ब्रिज रिटर्न्ड, स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रप्रेमी, गांधीवादी, साध्या आणि सरळ असणार्‍या तसेच मुख्यत्वे ज्ञान आणि संशोधन ह्यांची जात्याच आवड असणार्‍या कमलाबाई ह्या आहार संशोधन प्रयोगशाळेच्या संचालक व्हाव्यात ही खरेतर स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताची त्याच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने गरजच होती. अशी संधी दोनदा आलीही. परंतु, कोणत्याही पुरुषाला त्याच्यापेक्षा वयाने लहान पण कर्तृत्वाने आणि ज्ञानाने मोठ्या स्त्रीच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, ह्या रहाटगाडग्याच्या सत्य पण कटू नियमाप्रमाणे दोन्ही संधी कमलाबाईंना नाकारण्यात आल्या, केवळ त्या स्त्री होत्या म्हणूनच! ज्ञानाने आणि कर्तृत्वाने फार खुजी माणसे ह्या पदावर बसविली गेलीत आणि ती ही स्वातंत्र्य आणि समता ह्याचा चोवीस तास जप करणार्‍या देशभक्त पुढार्‍यांकडून. ह्या खुज्या आणि बाकीच्याही काही माणसांनी कमलाबाईंना एक अविवाहित, एकटी राहणारी, सुंदर स्त्री म्हणून त्रास दिला. पण, आपल्या भावाची आणि वडिलांची मदत घेऊन कमलाबाईंनी हे कट उधळून लावले. आपली लायकी असूनही आपल्याला व्यवस्थित मान दिला जात नाही, ह्याबद्दल कमलाबाई दुःखी झाल्या हेनक्की, पण त्याचा परिणाम त्यांनी आपल्या अभ्यासावर आणि कामावर होऊ दिला नाही. ‘क’ जीवनसत्वाच्या कमतरतेने होणार्‍या स्कर्व्ही ह्या रोगात कृत्रिम ‘क’ जीवनसत्व औषधातून देण्यापेक्षा हरभर्‍याद्वारे दिले तर त्याचा जास्त प्रभावी उपयोग होतो. कारण हरभर्‍यात ‘क’ जीवनसत्वाबरोबर ‘प’ हे जीवनसत्वही असते. हे पुढे 1977 साली रशियात झालेले संशोधन कमलाबाईंनी 1943 सालीच भारतात केले होते. ‘कृत्रिम मणभराने जे साधत नाही, ते नैसर्गिक कणभराने सहज साधते’ हाच तर कमलाबाईंच्या संशोधनाचा पाया होता. हेच तर त्यांना सीताआत्याने शिकविले होते. केम्ब्रिजला जाऊन शिक्षण घेतल्याच्या ‘अर्ध्या हळकुंडात पिवळ्या’ झालेल्या कमलाबाई कधीच नव्हत्या. अगदी ब्रिटिशदरबारी मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर काम करत असतानाही त्यांनी आपला खादीचा पोशाख कधीच सोडला नव्हता. ‘सध्या आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काहीही भाग घेत नाही,’ अशी हुरहुर असणार्‍या कमलाबाईंचा संबंध तेव्हा तिथेच नजरकैदेत असणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस आणि लाला भरतराम ह्यांच्याशी आला. त्यांचे एक पत्र चेन्नईतल्या एका दुसर्‍या नेत्याला कमलाबाईंनी गुप्तपणे नेऊन दिले आणि त्यांची ही हुरहुर संपली. शरदबाबूंनीपण नंतर त्या संस्थेत केला जाणारा अन्याय कमी करायला कमलाबाईंना मदत केली.
कुन्नूरलाच त्यांचे भावी पती माधवराव सोहोनी त्यांना भेटायला आले आणि त्यांनी रीतसर कमलाबाईंना मागणी घातली. माधवराव विमातज्ज्ञ होते. कुन्नूरच्या नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईत येऊन 4 सप्टेंबर 1947 ला कमलाबाई माधवरावांशी विवाहबद्ध झाल्या. लग्नातच मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त बलसारा ह्यांनी कमलाबाईंना मुंबई पालिकेत पब्लिक ऍनालिस्ट डॉक्टरची नोकरी दिली. महापालिका प्रांतात विकत मिळणार्‍या सर्व खाद्यपदार्थांचा दर्जा योग्य आहे आणि त्याच्यात काहीही भेसळ नाही, याची खात्री करणे हे ह्या नवीन पदावरचे मुख्य काम होते. एका मोठ्या दुग्धशाळेत दुधाची भेसळ पकडल्याचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी त्याच्या मालकाने, एका मोठ्या नेत्याने बाईंना त्या काळात म्हणजे 1948 च्या आसपास पंचवीस हजार रुपये लाच देऊ केली आणि न ऐकल्यास धमकीपण दिली. पण, त्या पैशांचा क्षणभरही लोभ न झालेल्या कमलाबाईंनी उत्तर दिले, ‘कर्तव्य बजावणे ह्याला मी आयुष्यात फार महत्त्व देते. मग ते करताना कोणताही प्रसंग आला तर त्याला तोंड द्यायची तयारी हवीच.’ संशोधनाला अजिबात वाव नसलेल्या ह्या कामात कमलाबाईंना अजिबात रस नव्हता.
तुमच्या आमच्या सुदैवाने त्याच वेळी मुंबईच्या विज्ञान संस्थेत जीवरसायन विभाग उघडला गेला. कमलाबाई तिथे आनंदाने प्राध्यापक म्हणून काम करू लागल्या. जीवरसायनशास्त्र विभागाची स्वतःची अशी अतिशय सुसज्ज अशी प्रयोगशाळा कमलाबाईंनी स्वतः जातीने लक्ष घालून तिथे उभी केली. केम्ब्रिजमध्ये ज्या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते तसाच शिक्षणाचा आराखडा कमलाबाईंनी येथे उभा केला. थोड्याच दिवसांत भारताचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद ह्यांनी या विज्ञान संस्थेला (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) भेट दिली. त्यांच्याच आग्रहानुसार संपूर्ण भारताला सध्या खूपच वरदायी ठरलेल्या ‘नीरे’वर संशोधन करायला कमलाबाईंनी सुरुवात केली. आरोग्यास बहुपयोगी अशा नीरेवरच्या ह्या अथक आणि अमौलिक संशोधनाबद्दल कमलाबाईंना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देण्यात आले. पुढे बहुगुणी ताडगुळावर सुरू असलेले संशोधन चांगले निष्कर्ष हातात येत असतानाही झारीतल्या एका भ्रष्ट शुक्राचार्यामुळे कमलाबाईंनाच थांबवावे लागले.
त्याच काळात महाराष्ट्राचे एक कार्यक्षम मंत्री दिनकरराव देसाई ह्यांच्या विनंतीला मान देऊन कमलाबाईंनी आरे दुग्धालयाच्या दुधाचा दर्जा अजून वाढावा, हवाबंद बाटल्यांत अळ्या होऊ नयेत म्हणून अभ्यासांती काही सूचना केल्या. मग हुशार, देशप्रेमी शास्त्रज्ञ आणि कदर करणारे सत्ताधारी एकत्र काम करायला लागले की जनतेचे जीवनमान कसे सुधारते, ह्याचा प्रत्ययच जनतेला आला. आपल्या दर आठवड्याच्या आरे दुग्धालयाच्या फेरीला ते कमलाबाईंना बरोबर घेऊन जात. त्यांच्या सर्व सूचना अमलात आणल्या जात. त्याच काळात गायी, म्हशींना गोठ्यात दिल्या जाणार्‍या आहारात कमलाबाईंनी सुधारणा सुचवली. दुधातल्या चरबीचे प्रमाण शोधून काढायला कमलाबाईंनी आवश्यक यंत्रसामुग्री दुग्धालयाला पुरविली. पण, दिनकरराव देसाईंच्या निधनानंतर ‘पहिले पाढे पंचावन्न’!
1967 मध्ये महात्मा गांधींचे शिष्य आणि एकेकाळचे त्यांचे सहाय्यक मॉरिस फ्रीडमन कमलाबाईंना भेटले. त्यांच्याच सूचनेनुसार कमलाबाईंनी सालीसकट तांदळाचे (ह्याला धान किंवा पॅडी असेही म्हणतात.) पोषणमूल्य अभ्यासायला सुरुवात केली. पोषणमूल्यांच्या, किमतीच्या आणि उपलब्धतेच्या बाबतीत सर्वच प्रकारे साध्या तांदळापेक्षा खूपच सरस असलेल्या ‘धान’पासून केक, बिस्कीट, ढोकळा, इडली, भाकरी असे निरनिराळ्या चवींचे पदार्थ कमलाबाईंच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आले. परंतु, धान आटा, जन आटा, शक्ती आटा, बाल आटा अशा वेगवेगळ्या रूपांत शोधले आणि संस्कारीत केले गेलेले भारतीयांच्या आहाराचे पोषणमूल्य वाढवणारे पदार्थ नोकरशाहीमुळे जनतेपर्यंत कधी पोहोचूच शकले नाहीत.
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये काम करताना कमलाबाईंनी एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना संशोधनात्मक एम.एस्सी.साठी आणि सतरा विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. त्यांचे स्वतःचे असे 155 संशोधन निबंध प्रसिद्ध झाले होते. मुंबई, बडोदा आणि दिल्ली विद्यापीठातील जीवरसायन विभाग कमलाबाईंच्याच पूर्ण मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले. निरनिराळ्या विद्यापीठांच्या सिनेटवर, लोकसेवा आयोगावर, निरनिराळ्या विद्यापीठांच्या परीक्षक म्हणून कमलाबाईंनी काम केले आहे. एकूणच ज्ञानसरस्वतीची खरी सेविका असणार्‍या, राष्ट्रप्रेमी, गांधीवादी, ‘केम्ब्रिज रिटर्न’, उच्चशिक्षित आणि मोठ्या जबाबदारीची पदे भूषविलेल्या कमलाबाईंना खरेतर फार पूर्वीच इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालकपद मिळायला हवे होते. पण, कोणाची हाजी-हाजी करण्याचा स्वभाव नसल्याने आणि स्वतःसाठी कोणाकडे शब्द टाकणे तत्त्वात बसत नसल्याने कमलाबाईंना संचालकपद फार उशिरा मिळाले. आपल्याच चांगल्याची कदर न करणे भारताच्या दुर्दैवाचे एक कारण आहेच. संचालकपदावरून निवृत्त झाल्यावर कमलाबाईंनी स्वतःला ग्राहकहिताच्या चळवळीत गुंतवून टाकले. अन्नभेसळीविरुद्ध जागृतीसाठी विविध चर्चासत्रे, भाषणे आणि प्रात्यक्षिके द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याकाळी मिठाईत सर्रास वापरल्या जाणार्‍या, परंतु कर्करोगजन्य असणार्‍या ‘मेटॅनिल यलो’ म्हणजे ‘गाय छाप’ पिवळ्या रंगावर बंदी आणावी म्हणून केंद्र सरकारकडे कमलाबाईंनी केलेल्या पाठपुराव्यानंतरच त्या रंगावर बंदी घातली गेली. डेन्मार्कमधील प्रो. सोरेन्सन यांच्या ‘लॅब इन बॅग’पासून स्फूर्ती घेऊन सामान्य ग्राहकाला आपल्या खाद्यपदार्थांमधील भेसळ घरच्या घरीच ओळखण्यासाठी त्यांनी छोटी शोधपेटी विकसित केली, ज्यामुळे अन्नधान्यातली भेसळ कमी व्हायला खूपच मदत झाली. हे सर्व ज्ञान शहरांबरोबरच खेडेगावांतही पोहोचण्यासाठी कमलाबाईंनी भर दिला. ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना कमलाबाईंचे एक अतिशय महत्त्वाचे काम म्हणजे घरात वापरण्यात येणार्‍या सर्व इलेक्ट्रिक उपकरणांवर ISI असा शिक्का मारण्याची कारखानदार आणि दुकानदारांवर केंद्र सरकारने केलेली सक्ती! आज आपण जे सुख उपभोगतो त्याच्या जनक कमलाबाईच! जन्मभर सतत कामात आणि ज्ञानसाधनेत रमलेल्या कमलाबाई पती माधवरावांच्या 1995 मध्ये झालेल्या निधनानंतर ढासळल्या. पूर्वीपासूनच खूप जवळची असणार्‍या आपल्या मोठ्या बहिणीच्या, दुर्गाबाईंच्या अजूनच त्या जवळ गेल्या. कारण त्या एकाकी दिवसांत दुर्गाबाई हाच एकटा मानसिक आधार त्यांना होता. आपल्या गरीब देशबांधवांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त पोषक आहार मिळावा म्हणून जन्मभर अभ्यास करणार्‍या कमलाबाईंना कधीच पद्म किंवा तत्सम पुरस्कार मिळाले नाहीत. सरकारची लायकीच नव्हती ती! कमलाबाईंना शेवटचा पुरस्कार मिळाला तो मात्र भारतीय वैद्यक संशोधन संस्थेकडून. तो पुरस्कार घेतानाच त्या व्यासपीठावर कोसळल्या ते परत कधीही न उठण्यासाठीच! आपल्या कर्मक्षेत्रावरच मृत्यू येण्याचे भाग्य लाभावे अशी तपश्‍चर्या कमलाबाईंनी जन्मभर निश्‍चितच केली होती.
कमलाबाईंच्या देशप्रेमाचा, कर्तृत्वाचा, भारतीयत्वाचा आणि भारताचा पूर्ण आदर ठेवून हे दुर्दैवाने मान्य करावेच लागेल की, डॉ. चंद्रशेखर सुब्रह्मण्यम ह्यांच्या सल्ल्यानुसार केम्ब्रिज शिक्षणानंतरही कमलाबाई परदेशातच राहिल्या असत्या तर नक्कीच अजून एका भारतीयाला नोबेल पारितोषिक मिळाले असते. ही झाली एका कर्तृत्व नारायणाची, एका ज्ञानदुर्गेची आणि एका विज्ञानकमलेची कथा. भारताने ह्यांच्याकडून खूप काही घेतले आहे आणि अजूनही घेतो आहे. पण, त्यांच्याकडून बरेच काही घेण्याचे तो विसरलाही आहे. त्यांची आठवण ठेवून त्यांच्याकडून स्फूर्ती त्याने घ्यायलाच हवी, तर आणि तरच त्याला उज्ज्वल वर्तमान आणि भविष्य आहे.

*************************************************************************************************************
डॉ. सुबोध नाईक
डॉ. सुबोध नाईक एम. डी. (होमिओपॅथिक) आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि होमिओपॅथिक यांचा विशेष अभ्यास. लेखन व वक्तृत्व यांची गौरवशाली परंपरा. अनेक नियतकालिकांतून लेखन आणि संपादन. अंतरजालावर ब्लॉग स्वरूपात लेखन.
Email: drsubodhnaik@gmail.com
Mob: 99309 88433

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *